Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरांत जाण्याच्या वेळेचे स्तोत्र.
121 मी वर डोंगरांकडे बघतो.
पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2 माझी मदत परमेश्वराकडून,
स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3 देव तुला खाली पडू देणार नाही.
तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही.
देव कधीही झोपत नाही.
5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे
तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6 दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही.
आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील.
परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8 परमेश्वरा तुला जाण्या-येण्यात मदत करील.
परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
इस्राएलने अब्राहामसारखे व्हावे
51 “तुम्ही काही लोक चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करता. तुम्ही मदतीसाठी परमेश्वराकडे धाव घेता. माझे ऐका. तुम्ही तुमचे वडील अब्राहाम यांच्याकडे पाहावे तुम्हाला ज्यापासून कापून काढले तो तो खडक आहे. 2 अब्राहाम तुमचा पिता आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहावे. जिने तुम्हाला जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहावे. मी बोलाविले तेव्हा अब्राहाम एकटा होता. मी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याने मोठ्या वंशाचा आरंभ केला. त्याचा वंश खूप वाढला.”
3 त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनाचे आणि तिच्या उध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील.
आभारप्रदर्शन आणि उत्तेजन
3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने भक्ती करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. 4 माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे. 5 तुझ्यातील प्रामाणिक विश्वासाचे मला स्मरण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे. 6 या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, जेव्हा मी माझे हात तुझ्यावर ठेवले तेव्हा देवाच्या दानाची जी ज्योत तुला मीळाली ती तेवत ठेव. 7 कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आत्मा दिला आहे.
2006 by World Bible Translation Center