Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र.
32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
आहे तो अत्यंत सुखी आहे
ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.
3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.
5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
या विषयी मार्गदर्शन करीन.
मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
पहिले कुटुंब
4 आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले. तेव्हा हव्वा म्हणाली, “परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.”
2 त्यानंतर हव्वेने आणखी एका बाळाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजे काइनाचा भाऊ हाबेल होता. हाबेल मेंढपाळ झाला; काइन शेतकरी झाला.
पहिला खून
3 काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. 4 हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले.
परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले. 5 परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काइन फार दु:खी झाला व त्याला फार राग आला 6 परमेश्वराने काइनाला विचारले, “तू का रागावलास? तुझा चेहरा दु:खी का दिसत आहे? 7 तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस.”
8 काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, “चल, आपण जरा शेतात जाऊ या.” तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले.
9 काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?”
काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?”
10 नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस? 11 तू तुझ्या भावाला ठार केलेस. त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे. ह्याच कारणाने तू शापित आहेस. भूमी तुला नकारेल. 12 पूर्वी तू जमिनीची मशागत केलीस आणि तिने तुला चांगले पीक दिले. पण आता तू मशागत करशील तरी ती भूमी तुला पीक देणार नाही. तू पृथ्वीवर एका ठिकाणी घर करुन राहणार नाहीस तर तू भटकत राहशील व परागंदा होशील.”
13 मग काइन म्हणाला, “ही शिक्षा मी सहन करु शकणार नाही इतकी भारी आहे. 14 पहा तू मला ह्या माझ्या भूमिवरुन दूर पाठवीत आहेस, मी तुला पाहू शकणार नाही किंवा तुझ्या जवळ मला येता येणार नाही; मला घरदार असणार नाही. या पृथ्वीवर तू मला ठिकठिकाणी भटकणे व परागंदा होणे लादले आहेस. मी जर कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारुन टाकेल.”
15 मग परमेश्वर काइनास म्हणाला, “मी असे घडू देणार नाही. कारण तुला जर कोणी ठार मारील तर त्याला मी कितीतरी अधिक पटीने शिक्षा देईन.” मग काइनाला कोणी मारु नये म्हणून परमेश्वराने त्याच्यावर एक विशिष्ठ खूण केली.
काइनाचे घराणे
16 काइन परमेश्वरा समोरुन निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात जाऊन राहिला.
देवासमोर येण्यास येशू आपणांस मदत करतो
14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरू या. 15 कारण आपल्याला लाभलेला महान याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला. 16 म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.
5 प्रत्येक मुख्य याजकाची निवड लोकांमधून होते. आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी दाने व अर्पणे देवाला सादर केली जातात, त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो. 2 प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो कारण तो स्वतः दुबळा असतो. 3 आणि त्या दुबळेपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. 5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने मुख्य याजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला,
“तू माझा पुत्र आहेस
आज मी तुला जन्म दिला आहे.” (A)
6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो,
“मलकीसदेकाप्रमाणे
तू अनंतकाळासाठी याजक आहेस” (B)
7 येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात, त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. 8 जरी तो पुत्र होता, तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला 10 व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो प्रमुख याजक म्हणून नियुक्त झाला.
2006 by World Bible Translation Center