Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र.
32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
आहे तो अत्यंत सुखी आहे
ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.
3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.
5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
या विषयी मार्गदर्शन करीन.
मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
सिनाय पर्वतावर एलीया
19 अहाब राजाने घडलेली सर्व हकीकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले. 2 तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार आहे. यात मला यश आले नाही तर देवतांनीच मला मारावे.”
3 एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैरशेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून 4 तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झुडुपाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्याला वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”
5 एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करुन म्हणाला, “उठ खाऊन घे.” 6 एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली गोड भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
7 आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.” 8 तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्याबळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.
10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही. 12 येशू म्हणतो,
“मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन
मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” (A)
13 तो आणखी म्हणतो,
“मी माझा विश्वास देवावर ठेवीन.” (B)
आणि तो पुन्हा म्हणतो,
“येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” (C)
14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. 15 आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. 16 कारण हे स्पष्ट आहे की, तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, 17 या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते. 18 कारण ज्याअर्थी त्याला स्वतःला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
2006 by World Bible Translation Center