Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 2:15-17

15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. 16 परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो. 17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील.”

उत्पत्ति 3:1-7

पापाची सुरवात

परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?”

स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, ‘बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.’”

परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.”

स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले.

तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली.

स्तोत्रसंहिता 32

दावीदाचे एक स्तोत्र.

32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
    आहे तो अत्यंत सुखी आहे
    ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
    जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.

देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
    परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
    प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
    मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.

परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
    परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
    आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
    संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
    तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
    म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
    या विषयी मार्गदर्शन करीन.
    मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
    या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”

10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
    परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
    शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!

रोमकरांस 5:12-19

आदाम आणि ख्रिस्त

12 म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे, जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले. 13 नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी पाप जगात आले होते. परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते. 14 परंतु मरणाने आदामाच्या काळपासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाही, त्याच्यांवरसुद्धा मरणाने राज्य केले.

देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला आदाम, ख्रिस्त जो येणार होता, त्याचे प्रतिरुप आहे. 15 पण देवाची मोफत देणगी आदामाच्या पापासारखी नाही. कारण आदामाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले. देवाची कृपा आणि दान, एक मानव येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आली व विशेषेकरुन सर्व लोकांकरिता विपुल झाली. 16 आदामाने पाप केल्यानंतर तो दोषी ठरला होता पण देवाची देणगी वेगळी आहे. देवाची मोफत देणगी पुष्कळ पापांनंतर आली आणि त्या देणगीमुळे तिने आपल्या लोकांना देवासमोर नीतिमान केले. 17 एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले. पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे, ते अनुभवतात, ते विशेषेकरुन येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील.

18 म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले. 19 यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल.

मत्तय 4:1-11

येशूची परीक्षा(A)

मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले. चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही. त्यानंतर त्याला खूप भूक लागली. तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे.”

येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की,

‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही
    तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.’” (B)

मग सैतानाने त्याला पवित्र नगरात (यरुशलेमात) नेले. सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले. आणि त्याला म्हटले, “जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की,

‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील
    आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून
ते तुला हातांवर झेलतील.’” (C)

येशूने त्याला उत्तर दिले, “असे सुद्धा लिहिले आहे की,

‘देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको.’” (D)

मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखविले. सैतान म्हणाला, “जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन.”

10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की,

‘देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर
    आणि केवळ त्याचीच सेवा कर.’” (E)

11 मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center