Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र दावीदाने बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर भविष्यवेता नाथान त्याच्याकडे आला तेव्हाचे स्तोत्र
51 देवा, माझ्यावर दया कर,
तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने
आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक.
माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे.
ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत
असे सांगतोस त्याच मी केल्या.
देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले.
मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास.
तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या
आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल
तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर.
मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग.
तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्रदय निर्माण कर.
माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि
तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो,
मला पुन्हा तुझा आनंद दे,
माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
13 पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन.
आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.
14 देवा, तूच माझा त्राता आहेस.
तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे.
15 प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.
16 तुला बळी नको आहेत.
तुला नको असणारे बळी मी देणार नाही.
17 देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय.
देवा,तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्रदयाकडे पाठ फिरवणार नाहीस.
18 देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.
यरुशलेमच्या भिंती बांध.
19 नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील
आणि होमार्पणे ही तू उपभोगशील.
आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील.
परमेश्वराच्या दयेचा योनाला राग येतो
4 परमेश्वराने नगरी वाचविली, ह्याचा योनाला आनंद झाला नाही तर उलट तो रागावला. 2 योनाने परमेश्वराकडे तक्रार केली. तो म्हणाला, “हे असे होणार हे मला माहीतच होते! मी माझ्या देशात होतो. तू मला येथे येण्यास सांगितलेस. त्याच वेळी मला कळले की या पापी नगरीच्या लोकांना तू क्षमा करणार. म्हणून मी तार्शिशला पळून जायचे ठरविले. तू दयाळू परमेशवर आहेस. हे मला ठाऊक होते. तू दया दाखवितोस आणि लोकांना शिक्षा करण्याची तुझी इच्छा नसते हे मला माहीतच होते. तू दयेचा सागर आहेस, हे मी जाणून होतो. मला माहीत होते की हे लोक पापांपासून परावृत्त झाल्यास, त्यांचा नाश करण्याचा बेत तू बदलशील. 3 म्हणून आता मी, परमेशवरा. तुला मला ठार मारण्याची विनंती करतो. माझ्या दृष्टीने जगण्यापेक्षा मरणे बरे!”
4 मग परमेशवर म्हणाला, “मी त्या लोकांचा नाश केला नाही म्हणून तू असे रागावणे योग्य आहे असे तुला वाटते का?”
5 पण ह्या सर्व गोष्टींबद्दल अजूनही योनाच्या मनात राग होता म्हणून तो नगरीबाहेर निघून गेला. नगरीजवळच्या, पूर्वाेकडील एका ठिकाणी योना गेला तेथे त्याने स्वतःसाठी निवारा तयार केला. मग तेथे तो सावलीत नगरीचे काय होते ह्याची वाट पाहात बसला.
भोपळ्याचा वेल आणि किडा
6 परमेशवराने, योनाच्या डोक्यावर, झटपट एक भोवळ्याचा वेल वाढविलास त्यामुळे योनाला बसायला थंड जागा झाली. त्याला आणखी आराम मिळायला मदत झाली ह्या वेलामुळे योनाला खूप आनंद झाला.
7 दुसऱ्या दिवशी सकाळी वेलीचा काही भाग खाण्याकरिता परमेशवराने एक किडा पाठविला किड्याने वेल खायला सुरवात केली व वेल मेला.
8 सूर्य डोक्यावर असताना, परमेशवराने गरम पूर्वेचा वारा निर्माण केला. त्याने मरणासाठी परमेशवराची विनवणी केली तो म्हणाला “माझ्या मताने जगण्यापेक्षा मरणे बरे!”
9 पण परमेशवर त्याला म्हणाला “हा वेल मेला म्हणून रागावणे तुला योग्य वाटते का?”
योना उत्तरला, “हो माझा राग अगदी बरोबर आहे मी रागाने मरुन जाण्याइतका रागावलो आहे.”
10 मग परमेशवर म्हणाला, “तू त्या वेलासाठी काहीही केले नाहीस. तू त्याला वाढविले नाहीस. तो एका रात्रीत वाढला व दुसऱ्या दिवशी मेला आणि आता तुला त्या वेलाबद्दल वाईट वाटत आहे. 11 तू एका वेलासाठी अस्वस्थ होऊ शकतोस तर मग निनवेसारख्या मोठ्या नगरीसाठी मला वाईट वाटणे अगदी शक्य आहे त्या नगरीत 1,20,000 पेक्षा जास्त लोक व खूप प्राणी आहेत. त्या लोकांना आपण चुकीचे वागत आहेत ह्याची जाणीव नव्हती.”
आभाराची प्रार्थना
8 सुरुवातीलाच तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे. 9 देव माझा साक्षी आहे, ज्याची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता सांगून करतो. मी तुमची नेहमी आठवण करतो. 10 माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हांला भेटता येणे शक्य व्हावे. 11 मला तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे. यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि तुम्ही बलवान व्हावे. 12 म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करु. माझ्या विश्वासामुळे तुम्हांला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल.
13 बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हांला भेट देण्याची मला इच्छा झाली. यासाठी की, जसे मला यहूदीतरांमध्ये मिळाले, तसे तुमच्यामध्येसुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हांला माहीत असावे.
14 मी सर्व लोकांची-ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख-सेवा केली पाहिजे. 15 त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे.
16 मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वासाठी तारण आहे. प्रथम यहूद्यांकारिता आणि नंतर ग्रीकांसाठी. 17 कारण सुवार्तेमध्ये देवाचे नितिमत्व ते विश्वासापासून विश्वास असे प्रगट झाले आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “नितिमान विश्वासाद्वारे वाचेल.”
2006 by World Bible Translation Center