Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र दावीदाने बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर भविष्यवेता नाथान त्याच्याकडे आला तेव्हाचे स्तोत्र
51 देवा, माझ्यावर दया कर,
तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने
आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक.
माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे.
ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत
असे सांगतोस त्याच मी केल्या.
देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले.
मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास.
तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या
आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल
तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर.
मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग.
तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्रदय निर्माण कर.
माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि
तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो,
मला पुन्हा तुझा आनंद दे,
माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
13 पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन.
आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.
14 देवा, तूच माझा त्राता आहेस.
तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे.
15 प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.
16 तुला बळी नको आहेत.
तुला नको असणारे बळी मी देणार नाही.
17 देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय.
देवा,तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्रदयाकडे पाठ फिरवणार नाहीस.
18 देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.
यरुशलेमच्या भिंती बांध.
19 नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील
आणि होमार्पणे ही तू उपभोगशील.
आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील.
परमेश्वर बोलावितो आणि योना आज्ञा पाळतो
3 मग परमेश्वर योनाशी पून्हा बोलला. परमेश्वर म्हणाला, 2 “त्या मोठ्या नगरीला, निनवेला जा आणि मी सांगतो तो संदेश सांग.”
3 मग योनाने परमेश्वराची आज्ञा पाळली. तो निनवेला गेला. निनवे फार मोठी नगरी होती. नगरीच्या एका टोकापासून दूसऱ्या टोकापर्यंत जाण्यास तीन दिवस चालावे लागे.
4 योना नगरी मध्यभागी जाऊन लोकांना उपदेश करु लागला. योना म्हणाला, “चाळीस दिवसानंतर निनवेचा नाश होईल.”
5 निनवेच्या लोकांनी परमेवराच्या संदेशावर विश्वास ठेवला. त्यांनी काही काळ उपवास करण्याचे ठरविले आणि आपल्या पापांचा विचार करण्याचा निश्चय केला. त्यांनी खेद प्रदर्शित करणारे खास कपडे घातले. नगरीतल्या सर्व लोकांनी असे केले. मग तो राव असो की रंक.
6 निनवेच्या राजाच्या कानावर या गोष्टी गेल्या. त्याला त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल खेद वाटला. त्याने त्याचे सिंहासन सोडले व आपली राजवस्त्रे उतरविली आणि दु:ख प्रकट करण्यासाठी असलेली वस्त्रे घातली. मग तो राखेत बसला. 7 त्याने एक विशेष संदेश लिहिला आणि तो सर्व नगरीत घोषित केला.
राजा आणि महान राज्यकर्ते यांची आज्ञा:
काही काळ कोणत्याही माणसाने व पशूने काहीही खाऊ नये. गुराढोरांनी रानांत चरू नये. निनवेत राहणाऱ्या कोणत्याही सजीवाने खाऊ-पिऊ नये. 8 प्रत्येक माणसाने व प्राण्याने दु:ख प्रकट करणारे वस्त्र पांघरले पाहिजे. माणसांनी परमेश्वरापाशी टाहो फोडला पाहिजे. प्रत्येकाचे जीवन बदलले पाहिजे आणि वाईट कर्मे करावयाचे थांबविले पाहिजे. 9 मग कदाचित् देवाचे मनःपरिवर्तन होईल आणि योजलेल्या गोष्टी तो करणार नाही. कदाचित् देवाच्या मनात बदल होईल व तो रागावणार नाही, व आपला नाशही होणार नाही.
10 लोकांचे वागणे परमेश्वराने पाहिले. लोकांनी दुष्कृत्ये करावयाचे सोडून दिले हेही परमेश्वराने पाहिले. मग परमेश्वराचे मन बदलले व त्याने ठरविल्याप्रमाणे केले नाही. परमेश्वराने लोकांना शिक्षा केली नाही.
1 प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून. 2 देवाच्या संदेष्ट्यांच्या द्वारे पवित्र शास्त्रात पूर्वी सांगितलेली होती, 3-4 ती ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त जो देहाने एक मनुष्य म्हणून दाविदाच्या वंशात जन्माला आला याच्याविषयी आहे.पण पवित्रतेच्या आत्म्याच्याद्वारे तो मरणातून पुन्हा जिवंत झाला त्यामुळे त्याच्या सामर्थ्यासह “देवाचा पुत्र” असा गणला गेला.
5 त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषित पद मिळाले आहे. अशासाठी की जे यहूदी नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्या नावांकरिता विश्वासाच्या आज्ञापालनामुळे जो आज्ञाधारकपणा निर्माण होतो तो निर्माण करावा. 6 तुम्हीही त्या यहूदी नसलेल्यांमध्ये आणि देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात.
7 ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे.
आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति असो.
2006 by World Bible Translation Center