Revised Common Lectionary (Semicontinuous)
17 परंतु लोकांनी देवाविरुध्द पाप करणे चालूच ठेवले.
ते वाळवंटात सुध्दा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या विरुध्द गेले.
18 नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले.
त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
19 त्यांनी देवाविरुध्द तक्रारी केल्या.
ते म्हणाले, “देव आम्हांला वाळवंटात अन्न देऊ शकेल का?
20 त्याने दगडाला प्रहार केला आणि त्यातून पुरासारखे पाणी बाहेर येऊ लागले
तो आम्हांला भाकरी आणि मांस नक्कीच देईल.”
52 नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले.
त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
53 त्याने त्याच्या माणसांना काळजीपूर्वक मार्गदर्शन केले
देवाच्या माणसांना कशाचीच भीती वाटली नाही.
देवाने त्यांच्या शत्रूंना लाल समुद्रात बुडविले.
54 देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात
त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले.
55 देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले.
देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला.
देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्वःतचे घर दिले.
दर्शन मंडप
7 मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्याला “दर्शन मंडप” असे नांव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वराला काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शन मंडपाकडे जाई. 8 ज्या ज्या वेळी मोशे छावणीतून दर्शन मंडपाकडे जाई त्या त्यावेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहात आणि मोशे दर्शन मंडपात जाईपर्यत त्याला बघत. 9 जेव्हा मोशे तंबूत जाई तेव्हा उंच ढग खाली उतरून येई आणि दर्शन मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. 10 जेव्हा लोक दर्शन मंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
11 ज्याप्रमाणे एखादा माणूस आपल्या मित्राशी बोलतो त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोरबोलत असे. परमेश्वराशी बोलल्यानंतर मोशे नेहमीआपल्या छावणीत माघारी जाई तरी मोशेचा मदतनीस. नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
मोशे परमेश्वराचे तेज पाहातो
12 मोशे परमेश्वराला म्हणाला, “ह्या लोकांना घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, ‘मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.’ 13 जर मी तुला खरोखर संतोष दिला असेल तर तू मला तुझे मार्ग शिकव. तुला जाणून घेण्याची माझी इच्छा आहे मग तुला सतत संतोष देणे मला जमेल. हे सर्व लोक तुझे आहेत याची तू आठवण ठेव.”
14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वतः तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”
15 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग आम्हाला या ठिकाणापासून पुढे पाठवू नकोस. 16 तसेच तू माझ्या विषयी व लोकांविषयी संतुष्ट आहेस ते आम्हाला कसे कळेल? जर तू आमच्याबरोबर येशील तर मग मात्र आम्हाला खातरीने कळेल! जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग मी व हे लोक त्यांच्यात आणि पृथ्वीवरल कोणत्याही लोकात काही फरक राहणार नाही.”
17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण मी तुजवर संतुष्ट आहे आणि मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो.”
18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन म्हणजे तू ते ऐकशील कारण मी निवडलेल्या कोणावरही दया करीन व त्यांच्यावर प्रेम करीन. 20 परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जगणार नाही.
21 “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. 22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यत माझ्या हाताने तुला झाकीन; 23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठपाहाशील; परंतु तू माझा चेहरा पाहाणार नाहीस.”
30 “चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले. 31 जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली, तो आवाज प्रभूचा होता. 32 प्रभु म्हणाला, ‘मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे-अब्राहाम, इसहाक, याकोब यांचा देव आहे.’ मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करुन पाहण्याचे धाडस त्याला होईना.
33 “देव त्याला म्हणाला, ‘तुझ्या पायातील वहाणा काढ! कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. 34 माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे. आणि त्यांचे विव्हळ्णे माझ्या कानी आले आहे. म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवीत आहे.’ [a]
2006 by World Bible Translation Center