Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 119:1-8

आलेफ

119 शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत.
    ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत.
    ते परमेश्वराच्या आज्ञा मनापासून पाळतात.
ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत.
    ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.
परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास
    आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन
    तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि
    न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन.
    तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.

लेवीय 26:34-46

34 “तुम्हाला तुमच्या शत्रूच्या देशात नेतील; तुमचा देश ओसाड होईल. तेव्हा अखेरीस तुमच्या देशाला विसावा मिळेल. तो शब्बाथाचा विसावा उपभोगील. 35 देश ओसाड असे पर्यंत तुम्ही राहात असताना तुमच्या शब्बाथांनी त्याला दिला नाही इतका विसावा त्याला मिळेल. 36 तुमच्यातील जे जगूनवाचूंन उरतील त्यांचे धैर्य आपल्या शत्रूंच्या देशात खचेल; त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल; वाऱ्याने उडविल्या जाणाऱ्या पानाप्रमाणे ते इकडे तिकडे संभोवार पळतील; कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसतानाही ते पळतील. 37 कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील व कोणी त्यांच्यामागे लागले नसतानाही पळाल्यामुळे ते अडखळून एकमेंकावर पडतील.

“तुमच्या शत्रूविरुद्ध उभे ठाकण्याइतके बळ तुमच्यात नसणार. 38 राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल. 39 तेव्हा जगूनवाचून उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील ज्याप्रमाणे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.

माणसाला नेहमी आशा असते

40 “परंतु कदाचित् ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील. 41 मी, त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध-बेसुनत-हृदय लीन होऊन ते आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील. 42 तेव्हा मग मी याकोब, इसहाक व अब्राहाम ह्यांच्याशी केलेल्या कराराची आठवण करीन व त्या देशाचीही आठवण करीन.

43 “त्यांचा देश त्यांच्यावाचून ओस पडेल आणि ओस असे पर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; मग जगूनवाचून राहिलेले आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील; त्यांनी माझ्या नियमांना व विधींना तुच्छ लेखून ते पाळले नाहीत म्हणून त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांना शिक्षा झाली हे त्यांना समजेल. 44 त्यांनी खरोखर पाप केले; पण त्यांच्यापासून मी आपले तोंड फिरवणार नाही; ते आपल्या शत्रूंच्या देशात असले तरी मी त्यांचे ऐकेन. मी त्यांना समूळ नष्ट करणार नाही. त्यांच्याशी केलेला करार मी मोडणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे! 45 त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!”

46 हे विधी, नियम व निर्बध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांना सांगितले.

1 योहान 2:7-17

इतर लोकांवर प्रेम करा अशी देवाने आज्ञा दिली

प्रिय मित्रांनो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही तर जुनीच आज्ञा लिहीत आहे, जी तुम्हांला सुरुवातीपासूनच देण्यात आली होती. ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे. शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मी तिजविषयी लिहीतो कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.

जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे. 10 जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, जी एखाद्याला पापात पडण्यास भाग पाडते. 11 पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळत नाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे.

12 प्रिय मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे.
13 वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो
    कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो,
मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.
14 मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण तुम्हांला पिता माहीत आहे.
वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले,
    कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे.
    त्याची तुम्हांला ओळख झाली आहे.
तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले,
    कारण तुम्ही सशक्त आहात;
देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते,
    कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.

15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका. जर कोणी जगावर प्रेम करतो, तर पित्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम नाही. 16 कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंतकाळपर्यंत जगेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center