Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यशया 58:1-9

देवाला अनुसरण्यास लोकांना सांगितले पाहिजे

58 तुम्हाला शक्य असेल तेवढ्या जोरात ओरडा.
    थांबू नका.
रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे मोठ्याने ओरडा.
    लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांगा.
    याकोबाच्या वंशजांपुढे त्यांच्या पापांचा पाढा वाचा.
म्हणजे माझी उपासना करायला ते रोज येतील.
    माझे मार्ग जाणून घ्यायची लोकांना इच्छा होईल.
योग्यरीतीने जगणारे ते राष्ट्र होईल.
    देवाच्या चांगल्या आज्ञांचे पालन करण्याचे ते सोडणार नाहीत.
त्यांना योग्य न्याय देण्यास ते मला सांगतील.
    न्याय निर्णयासाठी त्यांना देवाकडे जावेसे वाटेल.

आता ते लोक म्हणतात, “तुझ्याबद्दल आदर दाखविण्यासाठी आम्ही उपास करतो. तू आमच्याकडे का पाहत नाहीस? तुझा न राखण्यासाठी आम्ही आमच्या शरीरांना क्लेश करून घेतो. तू आमची दखल का घेत नाहीस?”

पण परमेश्वर म्हणतो, “विशेष दिवशी उपास करून तुम्ही तुम्हालाच पाहिजे ते करता. [a] तुम्ही तुमच्या शरीराला क्लेश देत नाही तर तुमच्या नोकरांना शिक्षा करता. तुम्ही भुकेले आहात. पण ती भूक अन्नाची नाही, भाकरीची नाही तर भांडणाची आणि लढाईची आहे. तुमच्या पापी हातांनी लोकांना मारण्यासाठी तुम्ही भुकेले आहात. तुम्ही माझ्याकरिता उपास करीत नाही. माझी स्तुती करण्याची तुमची इच्छा नाही. त्या विशेष दिवसांत उपास करून आपल्या शरीरांना लोकांनी क्लेश दिलेले पाहण्याची माझी इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का? मला लोकांना दु:खी असलेले पाहावेसे वाटते असे तुम्हाला वाटते का? लोकांनी वाळलेल्या झाडांप्रमाणे माना झुकवाव्या व शोकप्रदर्शक कपडे घालावे अशी माझी इच्छा आहे; असे तुम्हाला वाटते का? लोकांनी राखेत बसून त्यांचे दु:ख मला दाखवावे अशी माझी इच्छा आहे, असे तुम्हाला वाटते का? विशेष दिवसांत उपास करून तुम्ही हे सर्व करता, परमेश्वराला हेच पाहिजे असे तुम्हाला वाटते का?

“मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा, त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे, त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी. भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा, उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे. अशा लोकांना मदत करताना मागे-पुढे पाहू नका. ती तुमच्यासारखीच माणसे आहेत.”

तुम्ही ह्या केल्यात तर पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य उजळेल. तुमच्या जखमा भरून येतील. तुमचा “चांगुलपणा” (देव) तुमच्या पुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुमच्या पाठीमागून येईल. नंतर तुम्ही परमेश्वराला हाक मारल्यास परमेश्वर तुमच्या हाकेला ओ देईल. तुम्ही त्याचा धावा केल्यास तो म्हणेल, “हा मी येथे आहे.”

लोकांना त्रास देण्याचे व त्यांच्या दु:खाचे ओझे वाढविण्याचे तुम्ही थांबवावे. तुम्ही लोकांना कटू शब्द वापरू नयेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल दोष देऊ नये.

यशया 58:9-12

नंतर तुम्ही परमेश्वराला हाक मारल्यास परमेश्वर तुमच्या हाकेला ओ देईल. तुम्ही त्याचा धावा केल्यास तो म्हणेल, “हा मी येथे आहे.”

लोकांना त्रास देण्याचे व त्यांच्या दु:खाचे ओझे वाढविण्याचे तुम्ही थांबवावे. तुम्ही लोकांना कटू शब्द वापरू नयेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल दोष देऊ नये. 10 भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दु:ख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल.

11 परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल.

12 पुष्कळ वर्षे तुमच्या शहरांचा नाश झाला. पण नवीन शहरे वसविली जातील आणि त्या शहरांचा पाया अनेक वर्षे टिकून राहील. तुम्हाला “कुंपण पक्के करणारा आणि रस्ते व घरे बांधणारा” असे नांव मिळेल.

स्तोत्रसंहिता 112:1-9

112 परमेश्वराची स्तुती करा.

जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील.
    त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील.
    चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल
    आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.
चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो.
    देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते.
    माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.
तो माणूस कधीही पडणार नाही.
    चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही.
    त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही.
    तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो
    आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो.

स्तोत्रसंहिता 112:10

10 दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात.
    ते रागाने त्यांचे दांत खातील आणि
    नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.

1 करिंथकरांस 2:1-12

ख्रिस्ताविषयीचा वधस्तंभावरील संदेश

म्हणून बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्वकलेने सांगण्यासाठी आलो नाही. कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला याशिवाय कशाचेही ज्ञान असू नये असा मी निश्र्च्य केला आहे. तेव्हा मी तुमच्याकडे अशक्तपणाने, भीतियुक्त असा व थर थर कापत आलो आहे. माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते. यासाठी की, तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यवर असावा.

देवाचे ज्ञान

परंतु जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञान देतो. या युगाच्या अधिकाऱ्यांना नव्हे, ज्यांचा शेवट करण्यासाठी आणण्यात येत आहे. त्याऐवजी, जे लपविलेले आहे, आणि हे युग सुरु होण्यापूर्वी देवाने आमच्या गौरवासाठी नेमले होते ते देवाचे रहस्यमय ज्ञान देतो. जे या युगाच्या कोणाही सत्ताधीशाला माहीत नव्हते, कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते,

“डोळ्यांनी पाहिले नाही,
    कानांनी ऐकले नाही,
आणि मनुष्याच्या अंतःकरणाने जे उपजविले नाही,
    ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.” (A)

10 परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे.

कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शौध घेतो, एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो. 11 कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही. 12 परंतु आम्हांला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हांला ज्ञान व्हावे.

1 करिंथकरांस 2:13-16

13 मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. 14 स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत. आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रितीने पारख केली जाते. 15 परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते, 16 कारण पवित्र शास्त्र म्हणते,

“प्रभूचे मन कोण जाणतो?
    जो त्याला शिकवू शकेल?” (A)

परंतु आमच्या ठायी ख्रिस्ताचे मन आहे.

मत्तय 5:13-20

तुम्ही मिठासारखे तसेच प्रकाशासारखे आहात(A)

13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.

14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. 15 आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16 तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

येशू आणि जुन्या करारातील संदर्भ

17 “मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. 18 मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशात्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही.

19 “म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल. 20 कारण मी तुम्हांस सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center