Readings for Lent and Easter
8 जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात. 9 तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.
10 तुमच्याकडे येणार असलेल्या कृपेसंबंधी ज्या संदेष्ट्यांनी भविष्य वर्तविले होते त्यांनी त्या तारणाबाबत फार मनःपूर्वक शोध घेतला व काळजीपूर्वक चौकशी केली. 11 ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्यामध्ये राहात होता. ते शोध घेत होते की कोणत्या वेळी व कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ताच्या दु:खाचा व गौरवाचा शोध घेण्यास आत्मा सुचवीत आहे.
12 स्वर्गातून पाठविलेल्या आत्म्याद्वारे ज्यांनी शुभवर्तमान तुमच्याकडे आणले, त्यांनीच तुम्हांस आता या गोष्टी विदित केल्या. त्याच गोष्टी कळविण्याची जी सेवा ते करीत होते, ती स्वतःसाठी नाही, तर आमच्यासाठी करीत होते, त्या गोष्टी बारकाईने पाहण्यासाठी देवदूतसुद्धा उत्सुक आहेत.
पवित्र जीवनाकरिता पाचारण
13 म्हणून मानसिकदृष्ट्या सावध असा आणि पूर्णपणे आत्मसंयमन करा. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्यावर तुमची आशा केंद्रित करा. 14 आज्ञाधारक मुलांप्रमाणे वागा व तुम्ही अज्ञानी असताना, तुम्हांला पूर्वी ज्या दुष्ट इच्छा होत्या त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार देण्याचे थांबवा. 15 त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे, तुम्हीसुद्धा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल त्यात पवित्र असा. 16 कारण असे लिहिले आहे: “पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.” [a]
17 आणि ज्याप्रमाणे, देवाला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जो लोकांचा नि:पक्षपातीपणे, प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, म्हणून या परक्या भूमीवर तुम्ही वास्तव्य करीत असताना, या काळात देवाबद्दलच्या आदरयुक्त भितीमध्ये आपले जीवन जगा.
2006 by World Bible Translation Center