Old/New Testament
13 त्यावेळी दावीदाच्या वंशासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पाण्याचा नवा झरा फुटेल. त्याचा उपयोग लोकांची पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी होईल.
यापुढे खोटे संदेष्टे राहणार नाहीत
2 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी जगातील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांना त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुध्द आत्म्यांचा नायनाट करीन. 3 एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्याला शिक्षा केली जाईल. त्याचे स्वतःचे आई-वडील त्याला म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आई-वडील त्याला भोसकतील. 4 त्यावेळी संदेष्ट्यांना स्वतःच्या दृष्टान्तांची आणि संदेशाची लाज वाटेल. ज्यावरुन संदेष्टा ओळखाला जातो असे सणाचे कापड ते वापरणार नाहीत. भविष्याच्या नावाखाली खोटेनाटे सांगून लोकांना फसविण्यासाठी ते असे कपडे घालणार नाहीत. 5 ‘मी संदेष्टा नाही. मी शेतकरी आहे मी लहानपणापासून शेतीच करीत आलोय.’ असे ते सांगतील. 6 पण इतर लोक त्याला विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला मार देण्यात आला!’”
7 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, मेंढपाळांवर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढ्या पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन. 8 त्या प्रदेशातील 2 3 लोक जखमी होऊन मरतील. पण 1 3 वाचतील 9 मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.’”
निवाड्याचा दिवस
14 पाहा! परमेश्वराचा न्यायदानाचा ठराविक दिवस आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती तुमच्या शहरात वाटली जाईल. 2 यरुशलेमशी लढण्यासाठी मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांचा नाश करतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे-अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांना नगरीतून नेले जाणार नाही. 3 मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल ते खरोखरीचे युध्द असेल. 4 त्यावेळी, तो यरुशलेमच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहील. जैतुन पर्वत दुभंगेल पर्वताचा काही भाग उत्तरेकडे व काही दक्षिणेकडे सरकेल. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत एक खोल दरी निर्माण होईल. 5 दरी जसजशी रुंदावून तुमच्याकडे सरकेल, तसतसे तुम्ही दूर पळायचा प्रयत्न कराल यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल. पण माझा परमेश्वर, देव तेथे अवतरेल आणि त्याच्याबरोब त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.
6-7 तो एक विशेष दिवस असेल त्यावेळी प्रकाश, गारठा वा कडाक्याची थंडी नसेल. कसे ते परमेश्वरालाच ठाऊक. पण तेव्हा दिवसही नसेल वा रात्र. त्यामुळे, नेहमीच्या अंधाराच्या वेळीही प्रकाश असेल. 8 तेव्हा यरुशलेममधून सतत जिवंत पाण्याचा झरा वाहील [a] त्याला दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाईल तर दुसरा पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल. तो संपूर्ण वर्षभर-हिवाळ्यात व उन्हाळ्यात वाहील. 9 त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. परमेश्वर एकच आहे व त्याचे नावही “एक”च आहे. 10 तेव्हा यरुशलेम भोवतालचा सर्व प्रदेश अराबाच्या वाळवटासारखा ओसाड होईल. निगेवमधील गेबापासून रिम्मोनपर्यंत पसरलेल्या वाळवंटासारखा तो देश होईल. पण सर्व यरुशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल-अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत (कोपऱ्यावरच्या द्वारापर्यंत) आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून (राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत.) 11 लोक तेथे वस्ती करण्यास जातील. यापुढे कोणीही शत्रू त्यांचा नाश करायला येणार नाही. यरुशलेम अगदी सुरक्षित असेल.
12 पण यरुशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील. तो त्या राष्ट्रांना रोगराईने पछाडेल. जिवंतपणीच लोकांची कातडी कुजू लागेल. त्याचे डोळे त्यांच्या खाचांत आणि जिभा तोंडांत सडतील. 13-15 हा भयंकर रोग शत्रू-सैन्याच्या छावणीत पसरेल. त्यांच्या घोड्यांना, खेचरांना, उंटाना आणि गाढवांनाही हा भयंकर रोग होईल.
तेव्हा लोकांना खरोखरच परमेश्वरच परमेश्वराची भीती वाटेल प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील. [b] यहूदाचे लोक यरुशलेममध्ये लढतील. पण नगरीभोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून त्यांना संपत्ती मिळेल त्यांना भरपूर सोने, चांदी आणि कपडालता मिळेल. 16 यरुशलेमशी लढण्यास आलेल्यापैकी काही वाचतील. आणि सर्वशक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यासाठी ते दरवर्षी येतील. मंडपाचा सण साजरा करायला ते यरुशलेमला येतील. 17 पृथ्वीवरील कोणत्याही कुटुंबातील लोक यरुशलेमला प्रभुराजाची, सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करायला गेले नाहीत तर परमेश्वर त्यांच्या प्रदेशात पाऊस पाडणार नाही. 18 जर मिसरमधील एखादे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासठी आले नाही, तर शत्रूंच्या राष्ट्रांत परमेश्वराने जो भयंकर रोग पसरविला होता, तो रोग त्यांना होईल. 19 “मंडपाच्या साणा”लान आल्याबद्दल मिसरला व इतर राष्ट्रांना ही शिक्षा असेल.
20 त्यावेळी, सर्व गोष्टी देवाच्या मालकीच्या असतील अगदी घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा परमेश्वरासाठी पवित्र अशी चिठ्ठी असेल. परमेश्वराच्या मंदिरात वापरली जाणारी भांडी, वेदीवर वापरल्या जाणाऱ्या कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील. 21 खरे, म्हणजे, यरुशलेममधील व यहूदातील प्रत्येक ताटावर सर्वशक्तिमान परमेश्वरास पवित्र असे लिहिलेले असेल. परमेश्वराची उपासना करणारा प्रत्येकजण या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खाऊ शकेल.
त्यावेळी सर्व शक्तिमान परमेश्वराच्या मंदिरात वस्तूंची खरेदी-विक्री करणारे कोणीही व्यापारी नसतील.
नवीन यरुशलेम
21 मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी [a] पाहिली. कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती. आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. 2 पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर यरुशलेम, वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते.
3 आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, “आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे. आणि तो त्यांच्या बरोबर राहील. आणि तो त्यांचा देव होईल. 4 तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवा दु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”
5 जो सिंहासनावर बसलेला होता, तो म्हणाला, “पाहा मी सर्व काही नवीन करीत आहे!” मग तो पुढे म्हणाला, “लिही! कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत.”
6 नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. 7 जो विजय मिळवितो, त्याला या सर्व गोष्टी मिळतील, मी त्याचा देव होईन, व तो माझा पुत्र होईल. 8 परंतु भित्रे, विस्वास न ठेवणारे अंमगळ, खुनी, व्यभिचारी, (म्हणजे लैंगिक अनीतीने वागणारे लोक), चेटकी, मूर्तिपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्या तळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.”
9 मग ज्या देवदूतांच्या हातात सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या होत्या. त्यांच्यापैकी एक देवदूत आला, आणि तो मला म्हणाला, “इकडे ये! जी कोकऱ्याची वधु आहे, ती मी तुला दाखवितो.” 10 मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.
11 ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मोलवान रत्नासारखे होते; स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. 12 त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या. आणि त्याला बारा वेशी होत्या. त्या बारा वेशींजवळ बारा देवदूत उभे होते. आणि त्या वेशींवर इस्राएलाच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती. 13 त्या नगरला पूर्व दिशेला तीन, उत्तर दिशेला तीन, दक्षिण दिशेला तीन आणि पश्चिम दिशेला तीन वेशी होत्या. 14 नगराच्या भिंतीना बारा पाये होते. त्या पायांवर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.
15 नगराची, वेशीची आणि भिंतीची लांबी-रुंदी मोजता यावी म्हणून जो देवदूत माझ्याशी बोलला, त्याच्याजवळ सोन्याची एक मोजपट्टी होती. 16 नगर चौरस आकाराचे होते. त्याची लांबी व रुंदी सारखीच होती. देवदूताने सोन्याच्या मोजपट्टीने नगराचे माप मोजून पाहिले. ते पंधरा हजार मैल [b] भरले. नगराची लांबी, रुंदी व उंची समसमान होत्या. 17 नंतर देवदूताने नगराच्या भिंतीचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 72 मीटर (216 फूट) [c] भरले. देवदूताच्या हाताने देखील माप तेवढेच भरले. 18 नगराच्या भिंती यास्फे रत्नाच्या होत्या. आणि नगर शुद्ध सोन्याचे, चमकाणाऱ्या काचेसारखे होते.
19 नगराचे पाये प्रत्येक प्रकारच्या मोलवान अशा रत्नांनी सजविले होते. पाहिला पाया यास्फे रत्नाचा होता. दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चौथा पाचू (पाच), 20 पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकिंथ, बारावा पदमाराग रत्नाचा होता. 21 बारा वेशी बारा मोत्यांनी बनविल्या होत्या. आणि प्रत्येक वेस एकाएका रत्नाची होती. नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा, काचेसारखा स्पष्ट होता.
22 त्य नगरात मला कोठेही मंदीर दिसले नाही; 23 प्रभु देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवीत होते, आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे. 24 राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील. आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील. 25 त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही. 26 राष्टांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील. 27 जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही. अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.
2006 by World Bible Translation Center