Old/New Testament
बाबेलचे सैन्य मिसरवर चढाई करील
30 मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो असे सांग.
“‘ओरडून सांग
“तो भयंकर दिवस येत आहे.”
3 तो दिवस नजीक आहे.
हो! परमेश्वराचा न्यायाचा दिवस जवळ आहे.
तो ढगाळ दिवस असेल.
ती राष्ट्रांची न्यायनिवाडा करण्याची वेळ असेल.
4 मिसरविरुद्ध तलवार उठेल.
मिसरच्या पतनाच्या वेळी कुश देशातील लोकांचा भीतीने थरकाप उडेल.
बाबेलचे सैन्य मिसरच्या लोकांना कैदी करुन नेईल.
मिसरचा पाया उखडला जाईल.
5 “‘खूप लोकांनी मिसरबरोबर शांतता करार केला. पण ते सर्व म्हणजे कुशी पूटी लूदी, अरेबिया येथील लोक, मिश्र जाती, कूबी आणि इस्राएल लोक यांचा नाश होईल.
6 “‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:
मिसरला मदत करणारे आपटतील,
त्यांच्या सत्तेचा तोरा उतरेल.
मिग्दोलपासून सवेनेपर्यंतचे मिसरचे लोक युद्धात मारले जातील.”
परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला,
7 मिसर नाश झालेल्या देशांच्या मालिकेत जाऊन बसेल.
मिसर त्या ओसाड देशांपैकी एक होईल.
8 मी मिसरमध्ये आग लावीन
आणि मिसरच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन.
मगच त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे.
9 “‘त्याच वेळी, मी बाहेर दूत पाठवीन ते जहाजातून कूशला वाईट बातमी सांगण्यासाठी जातील. आता कूशला सुरक्षित वाटते. पण मिसरच्या शिक्षेच्या वेळी कूशमधील लोकांचा भीतीने थरकाप उडेल. ती वेळ येत आहे!’”
10 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की
“मिसरच्या लोकांचा नाश करण्यासाठी
मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरचा उपयोग करीन.
11 सर्व राष्ट्रामध्ये, नबुखद्नेस्सर
व त्याचे लोक भयंकर आहेत
आणि मिसरचा नाश करण्यासाठी मी त्यांना आणीन.
ते मिसरविरुद्ध तलवारी उपसतील.
ती भूमी प्रेतांनी भरुन टाकतील.
12 मी नाईल नदीला कोरडी करीन
आणि ती जागा दुष्टांना विकीन.
मी, परमेश्वर, सांगतो की
परक्यांकरवी मी ती भूमी ओसाड करीन.”
मिसरच्या मूर्तीचा नाश होईल
13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:
“मी मिसरमधील मूर्तींचा सुध्दा नाश करीन.
मी नोफातील पुतळे त्यापासून दूर करीन.
ह्यापुढे मिसरमध्ये कोणीही नेता नसेल.
मी मिसरमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण करीन.
14 मी पथ्रोसला ओसाड करीन.
सोअनास आग लावीन
मी नोला शिक्षा करीन.
15 मिसरचा गड जो सीन त्यावर मी माझा संपूर्ण राग काढीन.
मी नोच्या लोकांचा नाश करीन.
16 मी मिसरला आग लावीन.
सीनला खूप वेदना होतील.
सैनिक नो शहरात घुसतील
आणि नोफाला रोज नव्या नव्या अडचणी येतील.
17 आवेन व पी बेसेथ येथील तरुण युद्धात मारले जातील
आणि स्त्रियांना धरुन नेतील.
18 ज्या दिवशी मी मिसरचे नियंत्रण मोडीन, तो दिवस तहपन्हेसचा काळा दिवस असेल.
मिसरच्या उन्मत्त सत्तेचा अंत होईल.
मिसरला ढग झाकेल आणि
त्याच्या मुलींना कैद करुन नेले जाईल.
19 अशा रीतीने, मी मिसरला शिक्षा केल्यावर,
त्यांना मी परमेश्वर आहे, हे पटेल.”
मिसर कायमचा दुर्बल होईल
20 परागंदा काळातील अकराव्या वर्षांच्यां पहिल्या महिन्याच्या (एप्रिलच्या) सातव्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, 21 “मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.”
22 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मी मिसरचा राजा फारो याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला, मोडीन. मी त्याला त्याच्या हातातून तलवार टाकायला भाग पाडीन. 23 मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन. 24 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन. मी माझी तलवार त्याच्या हाती देईन. पण मी फारोचे हात तोडीन. मग तो मरणयातना भोगणाऱ्या माणसाप्रमाणे आक्रोश करील. 25 मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करीन, पण फारोचे हात तोडून टाकीन. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
“मी माझी तलवार बाबेलच्या राजाला देईन. तो ती मिसरवर उपसेल. 26 मी मिसरी लोकांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकेल म्हणजे त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळेल.”
अश्शूर गंधसरुप्रमाणे आहे
31 परागंदा काळाच्या अकराच्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो आणि त्याचे लोक यांना पुढील गोष्टी सांग:
“मोठेपणात तुम्ही कोणासारखे आहात?
3 अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या
व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील
उंच गंधसरुसारखा होता.
त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.
4 पाण्यामुळे वृक्ष वाढला.
नदीमुळे तो उंच झाला.
वृक्षाभोवती नद्या वाहत होत्या.
त्याच्यापासून निघणारे फक्त लहान पाटच
मळ्यातील इतर झाडांपर्यंत जात.
5 म्हणून तो वृक्ष मळ्यातील इतर झाडांपेक्षा उंच होता.
त्यांला खूप फांद्या फुटल्या.
त्याला भरपूर पाणी मिळाल्याने,
त्याच्या फांद्या विस्तारल्या.
6 सर्व पक्ष्यांनी त्या वृक्ष्याच्या फांद्यांमध्ये
आपली घरटी बांधली.
त्याच्या छायेत सर्व प्राण्यांची वीण होई.
त्याच्या सावलीला सर्व मोठी राष्ट्रे राहात.
7 वृक्ष फारच सुंदर होता.
त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने
त्याचा विस्तार मोठा झाला,
त्याच्या फांद्या लांब झाल्या.
8 देवाच्या बागेतील, गंधसुरुंनासुध्दा
एवढ्या फांद्या नव्हत्या
देवदारुलाही एवढ्या फांद्या नव्हत्या,
अर्मोन झाडांनाही अशा फांद्या नव्हत्या.
देवाच्या बागेतील कोठलाच वृक्ष,
ह्या वृक्षा इतका, सुंदर नव्हता.
9 मी त्याला खूप फांद्या
देऊन सुंदर बनविले.
मग एदेनमधील म्हणजेच देवाच्या
बागेतील वृक्ष त्याचा द्वेष करु लागले.”
10 मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वृक्ष उंच वाढला आहे. त्याचा शेडा ढगाला भिडला आहे. वृक्षाला आपल्या उंचीचा अभिमान आहे. 11 म्हणून मी त्यास एका बलिष्ट राजाच्या स्वाधीन करीन. तो त्या वृक्षाने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्याला शिक्षा करील. मी त्या वृक्षाला त्याच्या दुष्टाव्याबद्दल माझ्या बागेतून काढून टाकीन. 12 राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले. 13 आता त्या तोडून टाकलेल्या झाडावर पक्ष्यांची वस्ती आहे आणि हिंस्र श्वापदे त्याच्या तोडून टाकलेल्या फांद्यामधून संचार करत आहेत.
14 “आता, पाण्याजवळचे कोठलेही झाड गर्व करणार नाही. कोणीही ढगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार नाही. ते पाणी पिणारे मोठे वृक्ष आपल्या उंचीची प्रौढी मिरविणार नाहीत. का? कारण प्रत्येकाला मरण अटळ आहे. त्यांना जमिनीखाली, शेओलमध्ये मृत्यूलोकांत जावे लागणार. इतर मृतांमध्ये, खोल विवरात त्यांना जावे लागणार.”
15 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “ज्या दिवशी तो वृक्षा शेओलमध्ये मृत्युलोकांत गेला, त्या दिवशी मी लोकांना शोक करायला लावला. मी खोल पाण्याने त्या वृक्षाला झाकले. [a] वृक्षाच्या नद्यांचा प्रवाह मी अडविला. त्यामुळे झाडांकडे वाहणारे पाणी वाहण्याचे थांबले. मी त्याच्यासाठी लबानोनला शोक करायला भाग पाडले. त्या मोठ्या वृक्षाबद्दलच्या दु:खाने मळ्यातील झाडे म्लान झाली. 16 मी वृक्ष पाडला. त्याच्या आवाजाने राष्ट्र हादरली, घाबरली. मी वृक्षाला मृत्यूलोकांत जायला भाग पाडले. तो वृक्ष इतर लोकांबरोबर खोल विवरात जाऊन पडला. पूर्वी, एदेनमधल्या सर्व वृक्षांनी आणि लबानोनमधील उत्तम झाडांनी तेच पाणी प्यायले होते. धरणीखाली गेलेले ते वृक्ष मग समाधान पावले. 17 हो! ते वृक्षही मोठ्या वृक्षाबरोबर खाली गेले. ते लढाईत मारल्या गेलेल्या लोकांमध्ये जाऊन मिसळले. त्या मोठ्या वृक्षाने इतरांना बलवान केले होते. राष्ट्रांमध्ये ती झाडे ह्या मोठ्या वृक्षाच्या सावलीला राहिली.
18 “तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
फारो: सिंह का मगर?
32 परागंदा काळाच्या बाराव्या वर्षाच्या बाराव्या महिन्याच्या (मार्चच्या) पहिल्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो ह्याच्यासाठी हे शोकगीत गा. त्याला सांग:
“तू स्वतःला राष्ट्रांमध्ये उन्मत्तपणे चालणारा बलिष्ठ तरुण सिंह समजलास.
पण खरे म्हणजे तू तळ्यांतील मगरी प्रमाणे आहेस.
तू प्रवाहातून रेटा देऊन मार्ग काढतोस
तुझ्या पायाने पाणी गढूळ करतोस,
मिसरच्या नद्या घुसळून काढतोस.”
3 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:
“मी पुष्कळ लोकांना एकत्र जमविले आहे.
आता मी माझे जाळे तुझ्यावर फेकीन.
मग ते लोक तुला आत ओढून घेतील.
4 मग मी तुला कोरड्या जमिनीवर टाकीन.
मी तुला शेतांत टाकीन.
सर्व पक्षी येऊन तुला खाऊ देत.
सर्व ठिकाणचे सगळे हिंस्र प्राणी येऊन तुला खाऊन तृप्त होऊ देत.
5 मी तुझ्या मृत शरीराचे तुकडे पर्वतावर फेकीन
आणि त्या तुकड्यांनी दऱ्या भरुन टाकीन.
6 मी तुझे रक्त डोंगारांवर ओतीन.
ते जमिनीत मुरेल.
नद्याही रक्ताने भरतील.
7 मी तुला अदृश्य करीन.
मी आकाश झाकीन व तारे निस्तेज करीन.
मी सूर्याला ढगाने झाकीन.
आणि चंद्रप्रकाश पडणार नाही.
8 तुझ्यावर पडणारा आकाशातील सर्व प्रकाश मी निस्तेज करीन.
मी तुझ्या संपूर्ण देशाला अंधारात ठेवीन.”
माझा प्रभु परमेश्वर ह्या गोष्टी म्हणाला आहे.
9 “मी तुझा नाश करण्यासाठी शत्रूला आणले हे ऐकून पुष्कळ लोक अस्वस्थ व दु:खी होतील. तुला अनोळखी असलेली राष्ट्रेसुध्दा अस्वस्थ होतील. 10 तुझ्याकडे पाहून खूप लोकांना धक्क बसेल. मी माझी तलवार परजताच, त्या लोकांचे राजे अत्यंत भयभीत होतील. तुझ्या पतनाच्या दिवशी, क्षणाक्षणाला, ते थरथर कापतील. प्रत्येकाला आपल्या जीवाचे भय वाटेल.”
11 का? कारण परमेश्वर, माझा प्रभू. पुढील गोष्टी सांगतो: “बाबेलच्या राजाची तलवार तुमच्यावर उपसली जाईल. 12 लढाईत, त्या सैनिकांकरवी मी तुमचे लोक मारीन. ते सर्वांत भयंकर अशा राष्ट्रांतून आलेले सैनिक आहेत. मिसरच्या अभिमानास्पद गोष्टी ते लुटतील. मिसरच्या लोकांचा नाश केला जाईल. 13 मिसरच्या नद्यांच्या काठी असणाऱ्या सर्व प्राण्यांचा नाश होईल. ह्यापुढे लोकांच्या पायामुळे पाणी गढूळ होणार नाही. तसेच गुरांच्या खुरांमुळेही ते खराब होणार नाही. 14 मी मिसरचे पाणी शांत करीन. नद्यांचा प्रवाह मंद करीन. त्यांना तेलाप्रमाणे निसरड्या करीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, 15 “मी मिसरची भूमी ओसाड करीन. त्यातील सर्व काही नष्ट होईल मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना मी शिक्षा करीन. मगच त्यांना ‘मी देव व प्रभू’ असल्याचे समजेल.
16 “लोक मिसरसाठी शोकगीत गातील. इतर राष्ट्रांतील मुलीही (गावे) त्याच्यासाठी शोकगीत गातील. त्या मिसर व त्याचे लोक यांच्यासाठी ते गीत गातील.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
मिसरचा नाश
17 परागंदा काळातील बाराव्या वर्षांच्या त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला, 18 “मानवपुत्रा, मिसरच्या लोकांसाठी शोक कर. मिसरला आणि बलाढ्य राष्ट्रांच्या मुलींना थडग्याकडे ने. त्यांना जमिनीखाली ने. म्हणजे ते खोल विवरात गेलेल्या लोकांच्यामध्ये राहतील.
19 “मिसर, तू कोणापेक्षाही चांगला नाहीस. मृत्युलोकांत जा. त्या परदेशीयांबरोबर जाऊन पड.
20 “लढाईत मारल्या गेलेल्या लोकांत मिसर जाऊन पडेल. शत्रूने त्याला व त्याच्या सर्व लोकांना ओढून नेले आहे.
21 “बलवान व शक्तिशाली लोक युद्धात मारले गेले. ते परदेशी मृत्युलोकात गेले. तेथून ते मिसरशी व त्याच्या साहाय्यकर्तांशी बोलतील ते सुद्धा युद्धात मारले गेले.
22-23 “अश्शूर व त्याचे सैन्य मृत्युलोकात आहे. खोल विवरात अतिशय खोलात त्यांची थडगी आहेत. ते सर्व अश्शूरी सैनिक लढाईत मारले गेले. अश्शुरच्या थडग्याभोवती अश्शूरचे सैन्य आहे. ते जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले. पण आता ते सर्व शांत झाले आहेत-ते सर्व युद्धात मारले गेले.
24 “एलाम तेथेच आहे व तिच्या थडग्याभोवती त्याचे सर्व सैन्य आहे. ते सर्व लढाईत मारले गेले. ते परदेशी जमिनीखाली खोल गेले. ते जिवंत असताना, लोक त्यांना घाबरत. पण जमिनीखालच्या खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली. 25 त्यांनी एलाम व युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांसाठी शय्या तयार केली. एलामच्या थडग्याभोवती त्याचे सैनिक आहेत. ते सर्व परदेशी युद्धात मारले गेले. ते जिवंत होते, तेव्हा त्यांनी लोकांना घाबरविले. पण जमिनीखाली खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली. त्यांना मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर ठेवले गेले.
26 “मेशेख, तुबाल आणि त्यांचे सैन्यही तेथेच आहेत. त्यांची थडगी सभोवती आहेत. ते सर्व परदेशी लढाईत मारले गेले. त्यांनी जिवंतपणी लोकांना घाबरविले. 27 पण ते आता पूर्वीच मृत्यू पावलेल्या बलवान लोकांबरोबर पडून आहेत. त्यांना त्यांच्या शस्त्रांबरोबर पुरले. त्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवल्या आहेत. पण त्यांचे पाप त्यांच्या हाडांवर आहे. का? कारण जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले.
28 “मिसर, तुझासुद्धा नाश होईल. तू सुद्धा त्या परदेशी लोकांच्यात जाऊन पडशील. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्यामध्ये तू जाशील.
29 “तेथे अदोमसुद्धा आहे, तिच्याबरोबर तिचे राजे व नेते आहेत. ते सुद्धा शक्तिशाली होते. पण आता ते युद्धात मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर पडतात. ते परदेशी लोकांवर पडून आहेत. ते खोल विवरात गेलेल्या लोकांबरोबर तेथे आहेत.
30 “उतरेकडचे सर्वच्या सर्व राज्याकर्ते तेथे आहेत. सीदोनचे सर्व सैनिकही तेथे आहेत. त्यांच्या बळाला लोक घाबरले. पण ते आता शरमले आहेत. ते परदेशी, युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्यामध्ये पडून आहेत. त्यांनी त्या खोल विवरात जाताना स्वतःची अप्रातिष्ठाही स्वतःबरोबर नेली.
31 “फारोला मृत्युलोकात गेलेले लोक दिसतील. तो आणि त्याच्या बरोबरचे इतर लोक मग समाधान पावतील. हो! फारो आणि त्याचे सर्व सैन्य युध्दात मारले जाईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
32 “फारो जिवंत असताना, मी लोकांना त्याची भीती दाखविली. पण आता तो परदेशी लोकांबरोबर पडेल. युद्धात मारल्या इतर सैनिकांबरोबर फारो व त्याचे सर्व सैन्य पडेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
बदललेली जीवने
4 ख्रिस्ताने जसा शरीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला, तसेच तुम्हीसुद्धा ख्रिस्ताची जशी चित्तवृति होती तशा प्रकारच्या चित्तवृत्तीने सज्ज व्हा. मी असे म्हणतो कारण ज्याने शारीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला आहे तो पाप करण्याचे सोडून देतो. 2 म्हणून तो या जगात राहत असता आपल्या उरलेल्या पृथ्वीवरील जीवनात मानवी वासनांच्या आहारी जाणार नाही तर देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष देईल. 3 कारण तुम्ही आजपर्यंत विदेशी लोकांसारखे आयुष्य जगत आला म्हणजे तुम्ही कामातुरपणाच्या कृतीत चालला, देहवासना, मद्यापान, बदफैलीपणा, रंगेलपणा आणि अमंगळ मूर्तिपूजा यात बेभान जीवन जगलात.
4 आता तुम्ही त्यांच्यासारखे वाहवत जात नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून तुम्हांस शिव्याशाप देतात. 5 ते त्यांच्या वागणुकीचा हिशोब येशू ख्रिस्त जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास तयार आहे, त्यास देतील, 6 कारण जे मेलेले आहेत त्यांनासुद्धा सुवार्ता सागण्यात आली होती यासाठी की, मनुष्यांप्रमाणेच शारीरिकदृष्ट्या त्यांचा न्याय व्हावा आणि आध्यात्मिकदृष्ट्या देवासमान सार्वकालिक जीवन जगावे.
देवाने दिलेल्या देणग्यांचे चांगले कारभारी व्हा
7 सर्व गोष्टींचा शेवट होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून पूर्णपणे सावधानतेने वागा आणि प्रार्थना करण्यास सतत तयार राहा. 8 सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते. 9 कुरकुर न करता एकमेकांचा पाहूणचार करा. 10 तुमच्यातील प्रत्येकाने देवाकडील कारभारी या नात्याने तुम्हाला प्राप्त झालेल्या विविध दानांचा एकमेकांची सेवा करण्यासाठी काळजीपूर्वक वापर करावा. वेगवेगळी दाने असलेला कारभारी करतो तसा करावा. 11 सर्व बाबतीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला गौरव मिळावे, यासाठी जो भाषण करतो त्याने देवापासून आपल्याला वचन आले आहे असे बोलावे; जो सेवक आहे त्याने देवाने पुरविलेल्या सामर्थ्यानुसार सेवा करीत राहावे. यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताद्वारे देवाला गौरव दिले जावे. कारण गौरव व सामर्थ्य अनंतकालासाठी त्याचीच आहेत. आमेन.
ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन करणे
12 प्रिय मित्रांनो, तुमच्यावर मोठे संकट येऊन तुमची कसोटी होते तेव्हा नवल वाटून घेऊ नका. 13 त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे भागीदार झाल्याबद्दल आनंद करा. यासाठी की, जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हा तुम्ही आनंदाने आरोळी मारावी. 14 जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात म्हणून कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही धन्य आहात. कारण देवाचा गौरवी आत्मा तुमच्यावर विसावतो. 15 म्हणून, तुमच्यातील कोणास खुनी, चोर, भ्रष्टाचारी किंवा इतरांच्या खाजगी व्यवहारात लुडबूड करणारा म्हणून दु:ख सोसावे लागू नये. 16 पण जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन केले तर तुम्हांला त्याबद्दल लाज वाटण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्हांला “ख्रिस्ती” हे नाव मिळाल्याने देवाला गौरव द्यावे. 17 कारण देवाच्या घराण्यापासून सुरुवात करुन न्यायनिवाडा व्हावा अशी वेळ आली आहे. आणि त्याचा आरंभ पहिल्यांदा आपल्यापासून होईल, तर देवाच्या सुवार्तेचा सन्मान करण्याचे जे नाकारतील त्या लोकांचा शेवट कसा होईल बरे?
18 आणि “जर चांगल्या माणसाचे तारण होणे अवघड आहे
तर मग जो अधार्मिक व पापी मनुष्य आहे त्याचे काय होईल?” (A)
19 तर मग ज्यांना देवाच्या इच्छेनुसार दु:ख सोसावे लागते, त्यांनी आपल्या निर्माणकर्त्या देवाच्या हाती आपले जीवन सोपवून द्यावे आणि त्यांनी चांगली कामे करीत राहावे.
2006 by World Bible Translation Center