Old/New Testament
यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला इषारा
34 यिर्मयाला देवाचा संदेश आला. नबुखद्नेस्सर ह्या बाबेलच्या राजाने यरुशलेम व तिच्या आजूबाजूची गावे ह्यांच्याविरुध्द जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा यिर्मयाला हा संदेश मिळाला. नबुखद्नेस्सरकडे त्याचे स्वतःचे सैन्य व त्याच्या साम्राज्यातील इतर राज्यांची सैन्ये व लोक होते.
2 संदेश असा होता, परमेश्वर इस्राएलचा देव म्हणतो, “यिर्मया, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जा व पुढील निरोप दे. ‘सिद्कीया, परमेश्वर असे म्हणतो की मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन व ती तो भस्मसात करील. 3 सिद्कीया, तू बाबेलच्या राजाच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला पकडून निश्र्चितपणे त्याच्या ताब्यात दिले जाईल. तू बाबेलच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील. तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल व तू बाबेलला जाशील. 4 सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो तुला तलवारीने मृत्यू येणार नाही. 5 तुला शांतपणे मरण येईल. तुझ्या आधी जे तुझे पूर्वज राजे झाले व ज्यांनी राज्य केले, त्यांना मान देण्यासाठी लोकांनी ज्याप्रमाणे दफनाच्या वेळी अग्नी पेटविला, तसाच लोक तुला मान देण्यासाठी पेटवतील. ते तुझ्याकरिता शोक करतील व म्हणतील “हाय रे माझ्या धन्या!” मी स्वतः तुला हे वचन देत आहे.’” हा परमेश्वराचा संदेश आहे.
6 यिर्मयाने परमेश्वराचा संदेश यरुशलेममध्ये सिद्कीयाला दिला. 7 तेव्हा बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढत होते. यहूदातील ज्या शहरांचा पाडाव झाला नव्हता, त्यांच्याशीही बाबेलचे सैन्य लढत होते. ती शहरे म्हणजे लाखीश व अजेका ही होत. यहूदामध्ये तटबंदी असलेली फक्त ही दोनच शहरे राहिली होती.
लोक एका कराराचा भंग करतात.
8 सर्व इब्री गुलांमांना स्वातंत्र्य देण्याचा करार सिद्कीया राजाने यरुशलेमच्या सर्व लोकांबरोबर केला होता. हा करार झाल्यावर यिर्मयाला देवाचा संदेश आला. 9 प्रत्येकाने आपल्या इब्री गुलामांना बंधमुक्त करावे अशी अपेक्षा होती. सर्व इब्री गुलामांना पुरुष व स्त्री यांना बंधमुक्त करायचे होते. कोणीही यहुदी कुळातील माणसाला गुलामगिरीत ठेवू नये, अशी अपेक्षा होती. 10 यहूदातील सर्व नेत्यांनी व सर्व लोकांनी या कराराला मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करणार होता. प्रत्येकजण कबूल झाला आणि सगळे गुलाम मुक्त झाले. 11 पण त्यानंतर [a] ज्या लोकांकडे गुलाम होते, त्या लोकांनी आपला विचार बदलला आणि त्यांनी मुक्त केलेल्यांना पकडून पुन्हा गुलाम केले.
12 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 13 “यिर्मया, परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो: ‘तुमचे पूर्वज मिसरमध्ये गुलाम होते. मी त्यांना तेथून सोडविले हे करताना मी त्यांच्याबरोबर एक करार केला. 14 मी तुमच्या पूर्वजांना म्हणालो: “प्रत्येक सात वर्षाच्या अखेरीला प्रत्येकाने आपल्याकडील इब्री गुलामांना मुक्त केलेच पाहिजे. तुमच्या एखाद्या इब्री बांधवाने स्वतःला तुम्हाला विकले असेल, तर त्याने सहा वर्षे तुमची गुलामी केल्यावर तुम्ही त्याला जाऊ दिलेच पाहिजे.” पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही वा माझ्याकडे लक्ष दिले नाही. 15 काही वेळा पूर्वी, योग्य ते करण्यापासून तुम्हीही विचलित झालात. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्याकडे गुलाम असलेल्या इब्री बांधवाला स्वातंत्र्य दिले आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात, माझ्यापुढे एक करारही केलात. 16 पण आता, तुमचे मन बदलले. तुम्ही माझ्या नावाचा मान राखीत नाही, हे तुम्ही दाखवून दिलेत. तुम्ही हे कसे काय केले? तुम्ही प्रत्येकाने मुक्त केलेल्या गुलामांना स्त्रिया व पुरुष दोघांनाही परत पकडले. त्यांना बळजबरीने पुन्हा गुलाम केलेत.’
17 “म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही तुमच्या इब्री गुलामांना स्वातंत्र्य दिले नाही. तुम्ही कराराचे पालन केले नाही, म्हणून आता मी “स्वातंत्र्य” देईन. हा परमेश्वराचा संदेश आहे. युद्धात, भयंकर रोगराईने अथवा उपासमारीने मरण्याचे “स्वातंत्र्य” (मी तुम्हाला देईन) मी तुमच्याबाबतीत असे काहीतरी करीन की त्याबद्दल ऐकून पृथ्वीवरची राज्ये भीतीने चळाचळा कापतील. 18 कराराचा भंग करणाऱ्या आणि माझ्यासमोर दिलेले वचन न पाळणाऱ्या लोकांना मी शत्रूच्या हवाली करीन. ह्या लोकांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले. [b] 19 माझ्यासमोर करार करुन, वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत जाणारे हे लोक म्हणजे यहूदा आणि यरुशलेमचे नेते, न्यायालयातील महत्वाचे अधिकारी, याजक आणि या देशातील लोक होत. 20 मी ह्या सर्व लोकांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या हवाली करीन. त्यांची प्रेते म्हणजे पक्षी व वन्य पशूंचे भक्ष्य होतील. 21 मी यहूदाचा राजा सिद्कीया व तेथील नेते ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या लोकांच्या स्वाधीन करीन. जरी बाबेलच्या सैन्याने यरुशलेम सोडले [c] असले, तरी मी सिद्कीया आणि त्याच्या लोकांना बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हवाली करीन.’ 22 मी बाबेलच्या सैन्याला हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे ‘परत यरुशलेममध्ये येण्याची आज्ञा देईन. ते सैन्य यरुशलेमच्याविरुद्ध लढेल. ते ती नगरी ताब्यात घेतील, तिला आग लावतील आणि ती बेचिराख करतील. मी यहूदातील शहरांचा नाश करीन. ती शहरे म्हणजे ओसाड वाळवंट होईल ती निर्जन होईल.’”
रेखाबी घराण्याचे उत्तम उदाहरण
35 यहोयाकीम यहूदावर राज्य करीत असताना, यिर्मयाला देवाचा संदेश आला. यहोयाकीम हा योशीया राजाचा मुलगा होता. परमेश्वराकडून आलेला संदेश असा होता. 2 “यिर्मया, रेखाब्यांकडे जा त्यांना देवाच्या मंदिरातील एका बाजूच्या खोलीत बोलाव. त्यांना पिण्यास मद्य दे.”
3 म्हणून मी (यिर्मया) याजनाकडे गेलो. याजना हा यिर्मयाचा [d] मुलगा होता आणि यिर्मया हबसिन्याचा मुलगा होता. मी याजनाच्या सर्व भावांना व मुलांना आणि 4 रेखाबी कुटुंबीयांना एकत्र केले आणि त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले. आम्ही सर्व हानानच्या मुलांच्या खोलीत गेलो. हानान हा इग्दल्याचा मुलगा होता व तो “देवाचा माणूस” होता. ही खोली यहूदाच्या राजपुत्रांच्या खोली शेजारी होती. द्वारपाळ मासेया याच्या खोलीच्या वर ही खोली होती. मंदिराचा द्वारपाळ मासेया हा शल्लूमचा मुलगा होता. 5 नंतर मी (यिर्मयाने) त्या रेखाबे कुटुंबीयांसमोर मद्य भरलेले वाडगे व पेले ठेवले. मी म्हणालो, “थोडे मद्य प्या”
6 पण ते म्हणाले, “आम्ही कधीच मद्य पीत नाही कारण आमचे पूर्वज रेखाब यांचा मुलगा योनादाब यांनी आम्हाला तशी आज्ञा दिली आहे ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी कधीही दारु घेऊ नये असे त्यांनी सांगितले आहे. 7 शिवाय त्यांनी असेही सांगितले आहे की तुम्ही कधीही घरे बांधू नका. बी पेरु नका वा द्राक्षमळे लावू नका. ह्यातील कोणतीच गोष्ट तुम्ही कधीही करु नका. तुम्ही फक्त तंबूतच राहिले पाहिजे. तुम्ही असे केलेत तरच स्थलांतर करीत तुम्ही ज्या जागी आला आहात, तेथे दीर्घ काळ राहाल.’ 8 आमचे पूर्वज योनादाब यांनी घालून दिलेले निर्बंध आम्ही रेखाबे घराण्यातील लोक पाळत आलो आहोत. आम्ही कधीच मद्य घेत नाही. आमच्या बायका वा मुलेमुलीही मद्य घेत नाहीत. 9 आम्ही आम्हाला राहण्यासाठी घरे बांधीत नाही. आमची स्वतःच्या मालकीची शेते वा द्राक्षमळे नाहीत. आम्ही कधीही शेती करीत नाही. 10 आम्ही फक्त तंबूत राहत आलो आणि आमचे पूर्वज योनादाब यांनी सांगितल्याप्रमाणे वागत आलो. 11 पण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदावर हल्ला केल्यावर. आम्हाला यरुशलेमला जावेच लागले. आम्ही एकमेकांना म्हणालो, ‘चला, आपण यरुशलेमला गेलेच पाहिजे. तरच खास्द्यांच्या आणि अराम्यांच्या सैन्यापासून आपला बचाव होईल.’ म्हणून आम्ही यरुशलेममध्ये राहिलो.”
12 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 13 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदातील व यरुशलेममधील लोकांना हा संदेश ऐकव. तुम्ही लोकांनी धडा शिकावा व माझ्या संदेशाचे पालन करावे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 14 “रेखाबचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना मद्य ‘पिऊ नका’ असे सांगितले आणि त्यांनी त्याचे ऐकले. आजपर्यंत त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. त्यांनी मद्य घेतले नाही. पण मी परमेश्वराने स्वतः तुम्हाला पुन्हा पुन्हा संदेश दिले, तरी यहूदाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐकले नाही. 15 इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सेवक-संदेष्टे पाठविले. मी त्यांना तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाठविले. ते संदेष्टे म्हणाले ‘इस्राएल आणि यहूदा येथील प्रत्येक माणसाने दुष्कृत्ये करणे बंद करावे. तुम्ही चांगलेच असले पाहिजे. दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजा वा सेवा करु नका. तुम्ही माझे ऐकलेत, तर तुमच्या पूर्वजांना व तुम्हाला दिलेल्या देशात तुम्ही राहाल.’ पण तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. 16 योनादाबच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या आज्ञा पाळल्या. पण यहूदाच्या लोकांनी माझेही ऐकले नाही.”
17 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी सांगतो, यहूदाचे आणि यरुशलेमचे वाईट होईल. लवकरच मी त्यांचे वाईट करीन. मी त्या लोकांशी बोललो, पण त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या, पण त्यांनी ओ दिली नाही.”
18 नंतर यिर्मया रेखाब कुटुंबीयांना म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलचा देव असे म्हणतो ‘तुम्ही तुमचे पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा पाळल्यात. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागलात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केलीत. 19 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, रेखाबचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.’”
राजा यहोयाकीम यिर्मयाचा पट जाळतो
36 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. योशीयाचा मुलगा यहोयाकीम हा यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाला परमेश्वराचा हा संदेश मिळाला. तो असा होता. 2 “यिर्मया, मोठा पट घे आणि मी तुला दिलेले सर्व संदेश त्यावर लिही. यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे ह्यांच्याविषयी मी तुला सांगितले आहे. योशीयाच्या कारकिर्दीपासून आतापर्यंत मी तुला सांगितलेले सर्व लिही. 3 न जाणो यहूदाच्या घराण्याबाबत मी ज्या योजना आखल्या आहेत, त्या ऐकून ते दुष्कर्मे करण्याचे सोडून देतील. त्यांनी असे केल्यास, मी त्यांनी केलेल्या वाईट पापांबद्दल त्यांना क्षमा करीन.”
4 मग यिर्मयाने बारुख नावाच्या माणसाला बोलाविले. बारुख नेरीयाचा मुलगा होता. यिर्मयाने, त्याला परमेश्वराकडून आलेले संदेश, सांगितले व ते बारुखने पटावर लिहून काढले. 5 मग यिर्मया बारुखाला म्हणाला, “मी परमेश्वराच्या मंदिरात जाऊ शकत नाही. मला तेथे जाण्याची परवानगी नाही. 6 म्हणून तू परमेश्वराच्या मंदिरात जावेस असे मला वाटते. उपवासाच्या दिवशी तेथे जा आणि लोकांना पट वाचून दाखव. मला आलेले परमेश्वराचे संदेश मी तुला सांगितले व ते तू लिहून घेतलेस. ते तू सर्व लोकांना वाचून दाखव. यहूदाच्या शहरांतून यरुशलेममध्ये आलेल्या सर्व लोकांना तू ते संदेश वाचून दाखव. 7 कदाचित ते लोक देवाकडे मदतीसाठी धावा करतील. कदाचित प्रत्येकजण दुष्कर्मे करण्याचे सोडून देईल. परमेश्वर त्या लोकांवर फार रागावल्याचे परमेश्वराने जाहीर केलेच आहे!” 8 नेरीयाचा मुलगा बारुख याने, यिर्मयाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे केले. परमेश्वराचे संदेश लिहिलेला पट बारुखने मोठ्याने वाचला. तो त्याने परमेश्वराच्या मंदिरात वाचला.
9 यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात उपास ठरविल्याचे जाहीर करण्यात आले. यरुशलेममध्ये राहणारे व यहूदातील इतर शहरांतून यरुशलेममध्ये आलेले अशा सर्वांनी परमेश्वरासमोर उपास करावा अशी अपेक्षा होती. 10 त्याच वेळी यिर्मयाच्या शब्दातील पट बारुखने वाचून दाखविला. त्याने तो परमेश्वराच्या मंदिरात वाचून दाखविला. हा पट वाचताना बारुख गमऱ्याच्या घरच्या चौकातील खोलीत होता. ही खोली मंदिराच्या “नवीन प्रवेशद्वारा” जवळ होती. गमऱ्या शाफानचा मुलगा होता. गमऱ्या मंदिरातील लेखनिक होता.
11 बारुखने वाचलेले पटावरचे परमेश्वराचे संदेश मीखाया नावाच्या माणसाने ऐकले. शाफानचा मुलगा गमऱ्या ह्याचा मीखाया मुलगा होता. 12 पटावरील संदेश ऐकताच, मीखाया राजावाड्यातील राजाच्या खासगी चिटणीसाच्या खोलीत गेला. तेथे सर्व वरिष्ठ अधिकारी बसलेले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: खाजगी चिटणीस अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानचा मुलगा गमऱ्या, हनन्याचा मुलगा सिद्कीया. आणखीही काही वरिष्ठ अधिकारी तेथे होते. 13 बारुख पट वाचत असताना ऐकलेली प्रत्येक गोष्ट मीखायाने त्यांना सांगितली.
14 मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यहूदी नावाच्या माणसाला बारुखकडे पाठविले. यहूदी नथन्याचा व नथन्या शलेम्याचा मुलगा होता. शलेम्याच्या वडिलांचे नाव कुशी. यहूदी बारुखला म्हणाला, “ज्या पटावरुन तू वाचलेस तो घेऊन माझ्याबरोबर चल.”
नेरीयाचा मुलगा बारुख याने पट घेतला व तो यहूदीबरोबर अधिकाऱ्यांकडे गेला.
15 मग ते अधिकारी बारुखला म्हणाले, “बस आणि आम्हाला तो पट वाचून दाखव.”
मग बारुखने तो पट त्यांना वाचून दाखविला.
16 त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पटावरील सर्व संदेश ऐकले. मग ते घाबरुन एकमेकांकडे पाहू लागले. ते बारुखला म्हणाले, “पटावरील संदेशाबाबत आपण राजा यहोयाकीम ह्याला सांगितलेच पाहिजे.” 17 मग त्या अधिकाऱ्यांनी बारुखला विचारले, “बारुख, ह्या पटावर लिहिलेले संदेश तुला कोठून मिळाले? यिर्मयाने तुला सांगितलेल्या गोष्टी तू लिहून घेतल्यास का ते आम्हाला सांग.”
18 बारुख म्हणाला, “हो! यिर्मयाने सांगितले व मी ते सर्व शाईने पटावर लिहिले.”
19 मग ते वरिष्ठ अधिकारी बारुखला म्हणाले, “तुला आणि यिर्मयाला कोठेतरी जाऊन लपलेच पाहिजे. तुमच्या लपण्याची जागा कोणालाही कळू देऊ नका.”
20 मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो पट अलीशामा लेखनिकाच्या खोलीत ठेवला. ते राजा यहोयाकीम याच्याकडे गेले व त्यांनी त्याला पटाबद्दल सर्व काही सांगितले.
21-22 यहोयाकीम राजाने यहूदीला तो पट आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा लेखनिकाच्या खोलीतून पट आणला. नंतर यहूदीने तो पट राजाला व तेथे उभ्या असलेल्या सेवकांना वचून दाखविला. हे सर्व वर्षांच्या नवव्या महिन्यात घडले. तेव्हा राजा यहोयाकीम त्याच्या हिवाळी निवासात होता. समोरच्या चुलवणात शेकोटी पेटलेली होती. 23 यहूदीने पट वाचायला सुरवात केली. पण त्याने पटावरील दोन-तीन रकाने वाचताच, राजाने तो पट खेचून घेतला. त्याने लहान चाकूने ते पटावरील रकाने कापले आणि शेकोटीत फेकून दिले. शेवटी सगळाच पट त्याने जाळून टाकला. 24 राजा यहोयाकीम व त्याचे सेवक पटावरील मजकूर ऐकून घाबरले नाहीत. आपल्या चुकांबद्दल दु:ख प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले नाहीत.
25 राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही. 26 यहोयाकीम राजाने लेखनिक बारुख व संदेष्टा यिर्मया यांना अटक करण्याचा काही लोकांना हूकूम दिला. ते लोक म्हणजे राजपुत्र यमेल, अरहज्रीएलचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या हे होत, पण त्यांना बारुख व यिर्मया सापडले नाहीत कारण त्यांना देवाने लपविले होते.
27 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला परमेश्वराचे सर्व संदेश लिहिलेला पट यहोयाकीमने जाळला, त्यानंतर हा संदेश आला. यिर्मयाने बारुखला सांगितले व बारुखने लिहून घेतले. तो संदेश असा होता.
28 “यिर्मया, दुसरा पट घे. पहिल्या पटावर लिहिलेले सर्व संदेश दुसऱ्या पटावर लिही. पहिला पट यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळला. 29 यिर्मया, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला असेही सांग ‘परमेश्वर काय म्हणतो पाहा यहोयाकीम, तू तो पट जाळलास. तू म्हणालास “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करील असे यिर्मयाने का लिहिले? बाबेलचा राजा माणसे व पशू ह्या दोघांचाही नाश करील असे तो का म्हणाला?” 30 म्हणून, यहोयाकीमचे वंशज दावीदाच्या सिंहासनावर बसणार नाहीत. जेव्हा यहोयाकीम मरेल, तेव्हा त्याचे राजाच्या इतमामाने अंत्यसंस्कार होणार नाहीत, तर त्याचा मृतदेह जमिनीवर फेकून दिला जाईल. दिवसाची उष्णता आणि रात्रीचे थंड दव ह्यात तो मृतदेह पडून राहील. 31 मी, परमेश्वर, यहोयाकीम व त्यांची मुले यांना शिक्षा करीन. मी त्याच्या अधिकाऱ्यांनाही शिक्षा करीन. कारण ते सर्व दुष्ट आहेत. मी त्यांच्यावर, यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांवर व यहूदाच्या सर्व लोकांवर भयंकर अरिष्ट आणण्याचे निश्र्चित केले आहे. मी ठरविल्यामप्रमाणे, त्यांचे वाईट करीन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.’”
32 मग यिर्मयाने दुसरा पट घेतला व तो नेरियाचा मुलगा बारुख या लेखनिकाला दिला. यिर्मयाने सांगितले आणि बारुखने या पटावर लिहिले. या दुसऱ्या पटावरील संदेश, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जाळलेल्या पटावरील संदेशाप्रमाणेच होते. पण ह्या दुसऱ्या पटात त्या संदेशा बरोबरच त्या संदेशातील शब्दांप्रमाणे आणखी पुष्कळ शब्दांची भर घातलेली होती.
आमचे तारण नियमशास्त्रापेक्षा मोठे आहे
2 त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये. 2 कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. 3 तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभुने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली 4 देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
त्यांचे तारण करण्यासाठी ख्रिस्त मनुष्यांसारखा झाला
5 जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्याकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत. 6 पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे:
“मनुष्य कोण आहे की ज्याची
तुला चिंता वाटते?
किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की
ज्याचा तू विचार करावास?
7 थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले
तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
8 तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” (A)
देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही. 9 परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही. 12 येशू म्हणतो,
“मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन
मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” (B)
13 तो आणखी म्हणतो,
“मी माझा विश्वास देवावर ठेवीन.” (C)
आणि तो पुन्हा म्हणतो,
“येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” (D)
14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. 15 आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. 16 कारण हे स्पष्ट आहे की, तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, 17 या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते. 18 कारण ज्याअर्थी त्याला स्वतःला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
2006 by World Bible Translation Center