Old/New Testament
नबुखद्नेस्सरला परमेश्वर राजा करतो
27 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या [a] वर्षी हा संदेश आला. सिद्कीया योशीया राजाचा मुलगा होता. 2 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, पट्ट्या आणि बांबू यांच्यापासून जोखड तयार कर. ते तुझ्या मानेवर ठेव. 3 मग यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला भेटण्यासाठी यरुशलेमला अदोम, मवाब, अम्मोन, सोरा व सीदोन ह्या राजांचे जे दूत येतात, त्यांच्या हाती ह्या सर्व राजांना निरोप पाठव. [b] 4 त्या दूतांना त्यांच्या स्वामींना असा निरोप द्यायला सांग की सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘तुमच्या राजांना सांगा 5 मी ही पृथ्वी व त्यावरील सर्व माणसे निर्माण केली. मी पृथ्वीवर सर्व प्राणी निर्माण केले. मी माझ्या प्रचंड सामर्थ्याच्या साहाय्याने आणि बळकट हाताने हे निर्माण केले. मी मला पाहिजे त्याला ही पृथ्वी देईन. 6 सध्या मी तुमचे सर्व देश बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन केले आहेत. तो माझा सेवक आहे. मी वन्य प्राण्यांनासुद्धा त्याचा हूकूम पाळायला लावीन. 7 सर्व राष्ट्रे, नबुखद्नेस्सर, त्याचा मुलगा आणि नातू ह्यांचे दास्य करतील. मग बाबेलच्या पराभवाची वेळ येईल. खूप राष्ट्रे आणि मोठे राजे बाबेलला त्याचा दास करतील.
8 “‘पण आता, काही राष्ट्रे वा राज्ये बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे दास्य करण्यास कदाचित् नकार देतील. ते त्याचे जोखड आपल्या मानेवर ठेवण्यास कदाचित तयार होणार नाहीत. असे झाल्यास मी काय करीन माहीत आहे? मी त्या राष्ट्रांवर युद्ध, उपासमार व भयंकर रोगराई ह्या आपत्ती आणून त्यांना शिक्षा करीन. हा परमेश्वराचा संदेश आहे. त्या राष्ट्रांचा नाश होईपर्यंत मी हे करीन. नबुखद्नेस्सरच्या विरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांचा नाश मी त्याच्याच हातून करीन. 9 तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही” असे सांगतात. 10 पण ते खोटे बोलत आहेत. तुमच्या जन्मभूमीपासून तुम्हाला दूर नेण्यास ते कारणीभूत होतील. मी तुम्हाला तुमची घरे सोडायला भाग पाडीन. तुम्ही दुसऱ्या देशात मराल.
11 “‘पण बाबेलच्या राजाच्या जोखडात आपल्या माना अडकविणारी व त्याचा हूकूम मानणारी राष्ट्रे जगतील. मी त्या राष्ट्रांना त्यांच्याच भूमीवर राहू देईन आणि बाबेलच्या राजाची सेवा करु देईन.’ हा देवाकडून आलेला संदेश आहे. ‘त्या राष्ट्रांतील लोक त्यांच्याच भूमीत राहून ती पिकवतील.’”
12 यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी असाच संदेश दिला. मी म्हणालो, “सिद्कीया, तुला तुझी मान बाबेलच्या राजाच्या जोखडात अडकवलीच पाहिजे आणि त्याचा हुकूम मानला पाहिजे. तू, बाबेलचा राजा आणि त्याची प्रजा, ह्यांची सेवा केलीस, तरच तू जगशील. 13 जर तू बाबेलच्या राजाची सेवा करण्यास तयार झाला नाहीस, तर तू आणि तुझी प्रजा शत्रूचा हल्ला, उपासमार व रोगराई ह्यांनी मराल. परमेश्वर म्हणतो की जे बाबेलच्या राजाची सेवा करण्याचे नाकारतील त्यांच्याबाबतीत ह्या गोष्टी घडतीलच. 14 पण खोटे संदेष्टे सांगतात की तुम्हाला कधीच बाबेलचे गुलाम व्हावे लागणार नाही.
“त्यांचे मुळीचे ऐकू नका. कारण ते तुम्हाला खोटा उपदेश करतात. 15 मी त्या संदेष्ट्यांना पाठविलेले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते खोटे सांगतात व तो माझा संदेश आहे असे म्हणतात म्हणून मी तुम्हा लोकांना दूर पाठवीन. तुम्ही मराल आणि तुम्हाला खोटे सांगणारे ते संदेष्टेही मरतील.”
16 नंतर मी (यिर्मया) याजकांना व सर्व लोकांना म्हणालो, “परमेश्वर म्हणतो ते खोटे संदेष्टे म्हणतात ‘खास्द्यांनी परमेश्वराच्या मंदिरातून खूप गोष्टी घेतल्या आहेत. त्या सर्व लवकरच परत आणल्या जातील. ते संदेष्टे खोटे सांगतात.’ म्हणून त्यांचे ऐकू नका. 17 त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बाबेलच्या राजाची सेवा करा. तुमच्या शिक्षेचा स्वीकार करा म्हणजे तुम्ही जगाल. या यरुशलेम नगरीच्या नाशास तुम्ही कारणीभूत होण्याचे काहीच कारण नाही. 18 ते जर खरेच संदेष्टे असतील आणि त्यांना परमेश्वराकडून खराच संदेश मिळाला असेल, तर त्यांना प्रार्थना करु द्या. ज्या गोष्टी अजूनही परमेश्वराच्या मंदिरात आहेत, त्यासाठी त्यांना आळवणी करु द्या. राजवाड्यात अजूनही शाबूत असलेल्या गोष्टींसाठी त्यांना विनवणी करु द्या. यरुशलेममध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींसाठी त्या याजकांना प्रार्थना करु द्या. ह्या सर्व गोष्टी बाबेलला नेल्या जाऊ नयेत म्हणून त्यांना आळवणी करु द्या.”
19 यरुशलेम मध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींबद्दल सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की मंदिरात अजूनही स्तंभ, काशाचे गंगाळ, हलविता येणाऱ्या बैठकी आणि इतर गोष्टी आहेत. 20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने ह्या गोष्टी [c] यरुशलेममध्येच सोडून दिल्या. त्याने यहूदाचा राजा यकन्या ह्याला कैद करुन नेले, तेव्हा ह्या गोष्टी नेल्या नाहीत. यकन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. नबुखद्नेस्सरने यहूदातील व यरुशलेममधील इतर महत्वाच्या व्यक्तींनासुद्धा नेले. 21 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव, परमेश्वराच्या मंदिरात राजवाड्यात आणि यरुशलेममध्ये अजून शिल्लक राहिलेल्या वस्तूंच्याबद्दल पुढीलप्रमाणे भाकीत करतो, “ह्या सर्व वस्तूसुध्दा बाबेलला नेल्या जातील. 22 मी त्या वस्तू परत आणायला जाईपर्यंत त्या बाबेलमध्येच राहतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “नंतर त्या गोष्टी मी परत आणीन. मी त्या पुन्हा ह्याच जागेवर ठेवीन.”
खोटा संदेष्टा हनन्या
28 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात [d] हनन्या हा संदेष्टा माझ्याशी बोलला. हनन्या हा अज्जूरचा मुलगा होता. तो गिबोन गावचा रहिवासी होता. परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी बोलला. तेव्हा याजक व इतर सर्व लोक तेथे उपस्थित होते. हनन्या म्हणाला, 2 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘यहूदाच्या लोकांच्या मानेवर बाबेलच्या राजाने ठेवलेले जोखड मी मोडीन. 3 दोन वर्षांच्या आत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातून नेलेल्या वस्तू मी परत आणीन. नबुखद्नेस्सरने त्या वस्तू बाबेलमध्ये नेल्या आहेत. पण मी त्या यरुशलेमला परत आणीन. 4 यहूदाचा राजा यकन्या यालासुद्धा मी येथे परत आणीन. यकन्या यहोयाकीमचा मुलगा आहे. नबुखद्नेस्सरने यहूदातील ज्या लोकांना बळजबरीने घरे सोडून बाबेलला नेले, त्या सर्व लोकांनाही मी परत आणीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘अशा रीतीने बाबेलच्या राजाने यहूदाच्या लोकांवर लादलेले जोखड मी मोडीन.’”
5 संदेष्टा हनन्याच्या ह्या वक्तव्यानंतर यिर्मया बोलला. ते परमेश्वराच्या मंदिरात उभे होते. याजक व सर्व लोक यिर्मयाचे बोलणे ऐकू शकत होते. 6 यिर्मया हनन्याला म्हणाला, “तथास्तु! (आमेन) परमेश्वर खरोखरच असे करो! परमेश्वर तुझा संदेश खरा करील, अशी मी आशा करतो. परमेश्वर खरोखरच त्याच्या मंदिरातील बाबेलला नेलेल्या वस्तू परत येथे आणो आणि बळजबरीने घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांना परमेश्वर येथे परत आणो!
7 “पण हनन्या, मला जे सर्व लोकांना सांगितले पाहिजे, ते तूही ऐक. 8 तू आणि मी संदेष्टा होण्याच्या खूप पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, हनन्या त्यांनी पुष्कळ देशांत आणि राज्यांत युद्ध, उपासमार आणि रोगराई येईल असे भाकीत केले. 9 पण जे संदेष्टे शांतीचा उपदेश करतात, ते खरोखरच परमेश्वराने पाठविलेले आहेत का, ते तपासून पाहिलेच पाहिजे. जर त्यांचा संदेश खरा ठरला, तर तो खरोखरच परमेश्वराने पाठविलेला संदेष्टा आहे हे लोकांना समजेल.”
10 यिर्मयाच्या मानेवर जोखड होते, ते याजक हनन्याने काढून टाकले, व तोडून टाकले. 11 मग सगळ्या लोकांना ऐकू जावे म्हणून हनन्या मोठ्याने म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘ह्याप्रमाणेच मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे जोखड तोडीन. त्याने ते जगातील सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवले आहे. पण दोन वर्षांच्या आतच मी ते तोडून टाकीन.’”
हनन्या असे म्हणताच, यिर्मया मंदिरातून निघून गेला.
12 जेव्हा यिर्मयाच्या मानेवरचे जोखड हनन्याने काढून तोडल्यानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 13 परमेश्वर यिर्मयाला म्हणाला, “हनन्याला जाऊन सांग ‘परमेश्वर असे म्हणतो की तू लाकडाचे जोखड तोडलेस. पण त्यांच्या जागी मी लोखंडाचे बनवीन.’ 14 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी सर्व राष्ट्रांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवीन. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची त्यांनी सेवा करावी, म्हणून मी असे करीन. ते त्याचे गुलाम होतील. मी नबुखद्नेस्सरला वन्यपशूंवरही अंकुश ठेवायला लावीन.’”
15 नंतर संदेष्टा यिर्मया संदेष्टा हनन्याला म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू यहूदाच्या लोकांना लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले. 16 म्हणून परमेश्वर म्हणतो, ‘हनन्या, लवकरच मी तुला ह्या जगातून उचलीन. ह्या वर्षी तू मरशील. का? कारण तू लोकांना परमेश्वराच्याविरुद्ध वागण्यास शिकविलेस.’”
17 त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात हनन्या मेला.
बाबेलमधील यहूदी कैद्यांना पत्र
29 बाबेलमध्ये राहणाऱ्या यहूदी कैद्यांना यिर्मयाने एक पत्र पाठविले. त्यांने ते पत्र वडीलधारी (नेते) याजक, संदेष्टे आणि बाबेलमध्ये राहणाऱ्या इतर सर्व लोकांना पाठविले. ह्या सर्वजणांना नबुखद्नेस्सरने यरुशलेममधून बाबेलला आणले होते. 2 (राजा यकन्या, राजमाता, अधिकारी, यहूदाचे व यरुशलेमचे नेते, सुतार व लोहार ह्यांना यरुशलेममधून नेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठविले) 3 सिद्कीयाने एलासा व गमऱ्या यांना नबुखद्नेस्सर राजाकडे पाठविले. सिद्कीया यहूदाचा राजा होता. एलासा शाफानचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा होता, यिर्मयाने, बाबेलला नेण्यासाठी, या दोघांजवळ, पत्र दिले. पत्रातील मजकूर असा होता.
4 यरुशलेममधून कैद करुन ज्या लोकांना यरुशलेमहून बाबेलला नेले आहे त्या सर्व लोकांना सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे सांगतो 5 “घरे बांधून त्यात राहा. तेथे वस्ती करा बागा लावा आणि तुम्ही पिकविलेले खा. 6 लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका. 7 मी तुम्हाला ज्या शहरांत पाठविले आहे, त्या शहरांचा फायदा करा. तुम्ही राहत असलेल्या शहराच्या भल्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. का? कारण त्या शहरात शांतता नांदत असेल तर तुम्हालाही शांती मिळेल.” 8 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका. 9 ते खोटा उपदेश करीत आहेत, व तो संदेश असून तो मी पाठविल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांना पाठविलेला नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
10 परमेश्वर असे म्हणतो, “सत्तर वर्षापर्यंत बाबेल सामर्थ्यशाली राहील. त्यानंतर बाबेलमध्ये राहणाऱ्या तुम्हा लोकांकडे मी येईन. तुम्हाला यरुशलेमला परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन. 11 तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो.” हा परमेश्वराचा संदेश आहे “तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दु:खविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. 12 मग तुम्ही माझा धावा कराल. माझ्याकडे याल. माझी प्रार्थना कराल. मग मी तुमच्या हाकेला ओ देईन. 13 तुम्ही मला शोधाल आणि तुम्ही जेव्हा मनापासून मला शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन. 14 मी स्वतःला तुमच्याकडून सापडवून घेईल.” हा परमेश्वराचा संदेश आहे “मी तुमची कैदेतून सुटका करीन. मी तुम्हाला ही जागा सोडायला लावली आता मी तुम्हाला ज्या ज्या राष्ट्रांत आणि प्रदेशात पाठविले होते तेथून गोळा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “आणि जेथून तुम्हाला मी कैदी म्हणून पकडून दूर नेण्यास भाग पाडले होते त्या जागी परत आणीन.”
15 “आम्हाला बाबेलमध्ये परमेश्वराने संदेष्टे दिले असे कदाचित् तुम्ही म्हणू शकाल.” 16 पण बाबेलमध्ये ज्यांना आणले गेले नाही, त्या तुमच्या आप्तांविषयी परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. ह्या गोष्टी दावीदाच्या सिंहासनावर आता बसलेल्या राजासाठी व यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांसाठी आहेत. 17 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांविरुद्ध मी लढाई उपासमार व रोगराई या आपत्ती पाठवीन. मी त्यांची स्थिती, खाण्यास अयोग्य असलेल्या नासक्या अंजिरासारखी करीन. 18 मी अजूनही यरुशलेममध्ये राहत असलेल्या लोकांचा लढाई, उपासमार व भयंकर रोगराई ह्यांनी पाठपुरावा करीन. ह्यामुळे लोकांची जी स्थिती होईल ती जगातील राज्यांचा भीतीने थरकाप उडवेल. ज्या राष्ट्रांत जायला त्यांना मी भाग पाडीन, तेथे तेथे त्यांच्याकडे एक शाप म्हणून पाहिले जाईल. ह्या लोकांची स्थिती पाहून ते विस्मयाने सुस्कारे सोडतील. 19 यरुशलेममधील लोकांनी माझे ऐकले नाही, म्हणून मी असे घडवून आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे “मी माझा संदेश पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाठविला. माझा संदेश देण्यासाठी मी माझ्या सेवकांना, माझ्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्या लोकांनी ऐकले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 20 “तुम्ही कैदी आहात. मी तुम्हाला बळजबरीने यरुशलेम सोडायला लावले व बाबेलला पाठविले. म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका.”
21 कोयालाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया यांच्याविषयी सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “ह्या दोघांनी तुम्हाला खोटा संदेश दिला आहे व तो संदेश माझ्याकडून आला असे त्यांनी सांगितले. पण ते खोटे बोलले. मी त्या दोघा संदेष्ट्यांना, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन आणि बाबेलचे कैदी असलेल्या तुम्हा सर्व लोकांसमोर तो त्यांना ठार करील 22 यहूदी कैदी दुसऱ्याचे वाईट चिंततांना त्या दोघांच्या नावाचा उदाहरण म्हणून उपयोग करतील. ते म्हणतील, ‘सिद्कीया व अहाब यांच्याप्रमाणे परमेश्वर तुमचे वाईट करो! बाबेलच्या राजाने त्या दोघांना जाळले.’ 23 त्या दोघा संदेष्ट्यांनी इस्राएलमध्ये फार वाईट कृत्ये केली. शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर त्यांनी व्यभिचार केला. त्यांनी खोटे सांगितले आणि माझा संदेश खोटे असल्याचे लोकांना सांगितले मी त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या नव्हत्या त्यांनी काय केले आहे, ते मला माहीत आहे मी त्याला साक्षी आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
शमायाला देवाचा संदेश
24 शमायालासुद्धा संदेश दे. शमाया नेहेलमी घराण्यातील आहे. 25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “शमाया, तू यरुशलेममधील सर्व लोकांना पत्रे पाठविलीस. मासेयाचा मुलगा याजक सफन्या ह्यासही तू पत्रे पाठविलीस. तू सर्व याजकांनाही पत्रे पाठविलीस. परमेश्वराची परवानगी न घेता, स्वतःच्या नावाने तू पत्रे पाठविलीस. 26 शमाया, सफन्याला पाठविलेल्या पत्रात तू असे लिहितोस ‘सफन्या, परमेश्वराने तुला यहोयदाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. परमेश्वराच्या मंदिराचा तू उत्तराधिकारी आहेस. जो कोणी वेड्याप्रमाणे [e] वागेल, वा संदेष्टा असल्याचे भासवेल, त्याला तू अटक करावेस. तू त्या माणसाचे पाय लाकडाच्या खोड्यात अडकवून त्याच्या गळ्यात लोखंडाची बेडी घालावी. 27 हल्ली यिर्मया आपण संदेष्टा असल्याचे दाखवीत आहे. मग तू त्याला अटक का केले नाहीस? 28 यिर्मयाने बाबेलमध्ये आम्हाला असा संदेश पाठविला तुम्हाला बाबेलमध्ये बराच काळ राहावे लागेल, म्हणून घरे बांधा, वस्ती करा, बागा लावा व स्वतः पिकविलेले खा.’”
29 याजक सफन्याने हे पत्र संदेष्टा यिर्मयाला वाचून दाखविले. 30 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला तो असा: 31 “यिर्मया, बाबेलमध्ये असलेल्या सर्व कैद्यांना पुढील निरोप पाठव नेहेलमी घराण्यातील शमाया ह्या माणसाबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘शमायाने तुम्हाला उपदेश केला. पण मी त्याला पाठविलेले नाही. शमायाने तुम्हाला खोटे सांगून त्यावर विश्वास ठेवायला लावले. 32 शमाया असे वागला म्हणून परमेश्वर म्हणतो की मी नेहेलमी घराण्यातील शमायाला लवकरच शिक्षा करीन. मी त्याच्या घराण्याचा सर्वनाश करीन. मी माझ्या लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी करीन, त्यात त्याचा वाटा असणार नाही.’” हा परमेश्वराचा संदेश आहे “‘शमायाने लोकांना परमेश्वराविरुद्ध पढविले म्हणून मी त्याला शिक्षा करीन.’”
जगण्याचा योग्य मार्ग
3 सत्ताधीश, आणि अधिकारी यांच्या अधीन राहण्या विषयी व त्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी व प्रत्येक चांगले काम करण्यास तयार राहण्याविषयी, 2 कोणाचीही निंदा न करण्याविषयी, भांडण टाळण्याविषयी आणि सर्व माणसांना मोठी नम्रता दाखविण्याविषयी त्यांना सतत आठवण करून देत राहा.
3 मी हे सांगतो कारण आपणसुद्धा एके काळी मूर्ख, आज्ञा न पाळणारे आणि बहकलेले असे होतो. आम्ही सर्व प्रकारच्या वासनांची व विलासाची गुलामाप्रमाणे सेवा करणारे होतो. आम्ही दुष्टतेचे व हेव्यादाव्याचे जीवन जगत होतो. इतर लोक आमचा द्वेष करीत. आणि आम्ही एकमेकांचा द्वेष करीत होतो. 4 पण जेव्हा आमच्या तारणाऱ्या देवाची कृपा व प्रीति मानवाप्रती प्रकट झाली, तेव्हा 5 त्याने आम्हाला तारले. देवाकडून निर्दोष म्हणवून घेण्यासाठी आम्ही केलेल्या कोणत्याही कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेमुळे आम्ही तारले गेलो आणि ते आमच्याकडे नव्या जन्माच्या स्नानाद्वारे आम्ही नवीन जन्म पावलो आणि पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त झालेले नवीकरण यांनी तारले गेलो. 6 देवाने तो पवित्र आत्मा आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे विपुलपणे आम्हावर ओतला. 7 यासाठी की, आता देवाकडून त्याच्या कृपेमध्ये आम्ही निर्दोष घोषित केले जावे. अनंतकाळच्या जीवनाच्या आशेने आम्ही त्याचे वारस व्हावे. 8 ही शिकवण विश्वसनीय आहे.
आणि यावर जोर द्यावा असे मला वाटते. यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी लोकांसाठी चांगल्या व हिताच्या आहेत.
9 परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळीसंबंधी चर्चा, भांडणे, नियमशास्त्राविषयीचा झगडा टाळ. करण ते निष्फळ व निरर्थक असे आहेत. 10 एकदोन वेळा बोध करून, फूट पाडणाऱ्या व्यक्तीला टाळा. 11 कारण तुला माहीत आहे की, असा मनुष्य वाइटाकडे वाहवत गेला आहे व तो पाप करीत आहे व त्याने स्वतःलाच दोषी ठरविले आहे.
लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी
12 जेव्हा मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवीन तेव्हा मला भेटण्यासाठी निकपलिसास येण्याचा तू होईल तितका प्रयत्न कर. कारण तेथे हिवाऴा घालविण्याचे मी ठरविले आहे. 13 जेना वकील व अपुल्लो यांना त्यांच्या प्रवासासाठी ज्याची गरज भासेल ती पुरविण्यासाठी तू सर्वतोपरी प्रयत्न कर. यासाठी की, त्यांना कशाचीही कमतरता भासू नये. 14 आपल्या लोकांनी चांगली कृत्ये करण्याविषयी शिकले पाहिजे यासाठी की तातडीच्या गरजा भागविल्या जाव्यात, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.
15 माझ्याबरोबरचे सर्वजण तुला सलाम सांगतात. विश्वासामध्ये आम्हावर प्रेम करणाऱ्या सर्वांना सलाम सांग.
देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center