Old/New Testament
बाबेलला देवाचा संदेश
47 “धुळीत पड आणि तेथेच बस!
खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस.
तू आता सत्तेवर नाहीस.
लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.
2 तू आता खूप मेहनत केली पाहिजेस.
तुझी चांगली वस्त्रे आणि बुरखा उतरव तू जात्यावर धान्य दळले पाहिजेस.
पुरूष तुझे पाय पाहू शकतील एवढे तुझे वस्त्र वर उचलून धर आणि नद्या पार कर.
तुझा देश सोड.
3 पुरूष तुझा देह पाहतील
आणि तुझा भोग घेतील.
तुझ्या दुष्कृत्यांची किंमत मी तुला मोजायला लावीन.
आणि कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही.”
4 “माझे लोक म्हणतात, ‘देवाने आम्हाला वाचविले.
त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
इस्राएलचा पवित्र एकमेव देव.’”
5 “बाबेल, तेथेच शांत बसून राहा.
खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कन्ये, अंधारात जा, का?
कारण तू यापुढे ‘राज्याची राणी’ राहणार नाहीस.
6 “मी माझ्या लोकांवर रागावलो होतो ते लोक माझे आहेत
पण मी रागावलो असल्याने त्यांचे महत्व कमी केले.
मी त्यांना तुझ्या ताब्यात दिले.
तू त्यांना शिक्षा केलीस.
पण तू त्यांना अजिबात दया दाखविली नाहीस.
तू वृध्दांनासुध्दा् खूप मेहनत करायला लावलीस.
7 तू म्हणालीस, ‘मी चिरकाल राहीन.
मी नेहमीच राणी होईन.’
तू त्या लोकांना वाईट वागविलेस हे तुझ्या लक्षात आले नाही.
काय घडेल याचा तू विचार केला नाहीस.
8 तेव्हा ‘सभ्य स्त्रिये,’ आता माझे ऐक!
तुला आता सुरक्षित वाटते व तू स्वतःशीच म्हणतेस,
‘मीच तेवढी महत्वाची व्यक्ती आहे.
माझ्यासारखे महत्वाचे कोणीही नाही.
मी कधीच विधवा होणार नाही.
मला नेहमीच संतती होईल.’
9 एके दिवशी, एका क्षणात तुझ्याबाबत पुढील दोन गोष्टी घडतील.
पहिली तू तुझी मुले गमावशील आणि नंतर दुसरी म्हणजे तू तुझा पती गमावशील.
हो! ह्या गोष्टी तुझ्याबाबत खरोखरच घडतील.
तुझी सर्व जादू आणि तुझ्या प्रभावी युक्त्या तुला वाचविणार नाहीत.
10 तू दुष्कृत्ये केलीस आणि तरी तुला सुरक्षित वाटते.
मनातल्या मनात म्हणतेस ‘माझी दुष्कृत्ये कोणालाच दिसत नाहीत.’
तुझे शहाणपण आणि ज्ञान तुला वाचवील असे तुला वाटते.
‘मीच एकमेव आहे.
माझ्यासारखे महत्वाचे कोणी नाही’ असा विचार तू स्वतःशीच करतेस.
11 “पण तुझ्यावर संकटे येतील हे केव्हा होईल ते तुला कळणार नाही.
पण तुझा नाश जवळ येत आहे.
तू ती संकटे थोपवू शकणार नाहीस.
काय होते आहे हे कळायच्या आतच तुझा नाश होईल.
12 जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी
तू आयुष्यभर मेहनत केलीस.
तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर.
कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील;
कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.
13 तुला खूप सल्लागार आहेत.
त्यांनी दिलेल्या सल्याचा तुला वीट आला का?
मग ग्रहनक्षत्रे पाहून ज्योतिष सांगणाऱ्यांना पाठव.
ते तुला महिन्याची सुरवात कधी आहे हे सांगतात;
तर कदाचित् तुझा त्रास कधी सुरू होणार हे ही सांगू शकतील.
14 पण ही माणसे स्वतःचा बचाव करण्यासही समर्थ असणार नाहीत.
ते गवताच्या काडीप्रमाणे जळतील.
ते इतक्या चटकन् जळतील की भाकरी भाजायला निखारे पेटणार नाहीत
की उबेला आगोटी राहणार नाही.
15 तू ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतलीस त्या गोष्टींच्या बाबतीत असेच होईल.
तू आयुष्यभर ज्यांच्याबरोबर व्यापार केलास ते सर्व तुला सोडून जातील.
प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जाईल.
तुला वाचवायला कोणीही राहणार नाही.”
देव त्याच्या जगावर अधिपत्य करतो
48 परमेश्वर म्हणतो, “याकोबाच्या वंशजांनो, माझे ऐका.
तुम्ही, जे ‘इस्राएलच्या’ नावाने ओळखले जाता.
तुम्ही यहुदाच्या वंशातील आहात.
तुम्ही वचने देताना परमेश्वराचे नाव घेता.
तुम्ही इस्राएलच्या देवाची स्तुती करता.
पण हे तुम्ही सच्चे पणाने आणि खरेपणाने करीत नाही.”
2 “हो ते पवित्र नगराचे नागरिक आहेत.
ते इस्राएलच्या देवावर अवलंबून राहतात.
सर्वशक्तिमान परमेश्वर अशी त्याची ख्याती आहे.
3 “मी तुम्हाला फार पूर्वीच भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितले.
मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितले
आणि अचानक त्या गोष्टी घडवून आणल्या
4 मी तसे केले, कारण तुम्ही हट्टी होतात व ते मला माहीत होते.
मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तुम्ही नकार दिलात.
जस्ताप्रमाणे कठीण आणि लोखंडाप्रमाणे न वाकणारा असा तुमचा हट्ट होता.
5 म्हणूनच गोष्टी घडायच्या कितीतरी आधी मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितले,
असे सांगण्याचे कारण हेच की आम्ही आमच्या सामर्थ्यावर
हे सर्व केले असे तुम्ही म्हणू नये.
‘आमच्या मूर्तींनी हे सर्व घडवून आणले’
असे तुम्ही म्हणू नये म्हणून मी हे केले.”
इस्राएलला शुध्द् करण्यासाठी देव त्याला शिक्षा करतो
6 “तुम्ही काय घडले ते पाहिलेत व ऐकलेत.
म्हणून तुम्ही ही वार्ता इतरांना सांगावी.
आता मी तुम्हांला माहीत नसलेल्या नवीन गोष्टी सांगीन.
7 ह्या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत.
ह्या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत.
या आधी तुम्ही कधी या गोष्टींबद्दल ऐकले नसेल.
त्यामुळे ‘आम्हांला हे अगोदरच माहीत होते’
असे तुम्ही म्हणू शकणार नाही.
8 पण जरी मी तुम्हाला भविष्यात काय घडणार आहे हे सांगितले तरी ते ऐकून घ्यायला
तुम्ही अजूनही नकार द्याल.
तुम्ही काहीही शिकणार नाही.
मी सांगितलेली कोणतीही गोष्ट तुम्ही केव्हाही ऐकली नाही.
तुम्ही माझ्याविरूध्द् जाल हे मला सुरवातीपासूनच माहीत होते.
तुम्ही जन्मल्यापासून माझ्याविरूध्द् बंड पुकारले आहे.
9 “पण मी सहन करीन.
हे मी माझ्यासाठी करीन.
तुमच्यावर रागावून तुमचा नाश करीत नाही म्हणून लोक माझी स्तुती करतील.
मी केलेल्या प्रतीक्षेबद्दल तुम्ही माझे स्तवन कराल.
10 “पाहा! मी तुम्हांला शुध्द् करीन.
लोक चांदी शुध्द् करण्यासाठी गरम भट्टीचा उपयोग करतात.
मी तुम्हांला संकटात टाकून शुध्द् करीन.
11 हे मी माझ्यासाठी करीन.
मला कमी लेखून तुम्हांला चालणार नाही.
माझे वैभव आणि प्रशंसा मी खोट्या देवांच्या वाट्याला जाऊ देणार नाही.
माझे नाव मी दूषित का होऊ द्यावे?
12 “याकोबा, माझे ऐक,
इस्राएल, मी तुला माझे होण्यासाठी बोलाविले,
तेव्हा माझे ऐक.
मीच आरंभ आहे
आणि मीच अंत आहे.
13 मी माझ्या हाताने पृथ्वी निर्माण केली.
माझ्या उजव्या हाताने आकाश निर्माण केले
आणि मी जर त्यांना हाक मारली
तर ती माझ्यासमोर गोळा होतील.
14 “तुम्ही सगळे इकडे या आणि माझे ऐका.
कोणत्याही खोट्या देवाने असे कसे होईल म्हणून तुम्हाला सांगितले का? नाही.
देव इस्राएलवर प्रेम करतो बाबेलबाबत
आणि खास्द्यांबाबत देव त्याला पाहिजे ते करील.”
15 परमेश्वर म्हणतो, “मी त्याला बोलवीन, असे मी तुम्हाला सांगितले आहे,
मी त्याला आणीन
आणि मी त्याला यशस्वी करीन.
16 इकडे या आणि माझे ऐका.
बाबेल राष्ट्र म्हणून जगायला लागले तेव्हा मी तेथे होतो
आणि आरंभापासून मी स्पष्टपणे बोललो का
तर लोकांना मी काय म्हणालो ते समजावे.”
नंतर यशया म्हणाला, आता परमेश्वर माझा देव, मला आणि त्याच्या आत्म्याला पुढील गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवितो. 17 मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो,
“मीच परमेश्वर तुमचा देव आहे.
मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो.
तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.
18 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या
तर पूर्ण भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे शांती
तुमच्याकडे आली असती,
समुद्राच्या परत परत येणाऱ्या लाटांप्रमाणे चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा
तुमच्याकडे आल्या असत्या.
19 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या
तर वाळूच्या कणांप्रमाणे खूप संतती तुम्हाला झाली असती
आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले
गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.”
20 माझ्या लोकांनो, बाबेल सोडा,
खास्दयापांसून पळा, ही वार्ता लोकांना आनंदाने सांगा.
जगातील दूरदूरच्या ठिकाणी
ही बातमी पोहोचवा.
लोकांना सांगा,
“परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याची सुटका केली.
21 परमेश्वराने त्याच्या लोकांना वाळवंटातून पार नेले
पण ते तहानलेले राहिले नाहीत का?
कारण देवाने आपल्या माणसांसाठी खडकातून पाणी वाहायला लावले.
त्याने खडक फोडला
आणि पाणी बाहेर वाहू लागले.”
22 पण परमेश्वर म्हणतो,
“पाप्यांना शांती मिळणार नाही.”
देव त्याच्या खास सेवकाला बोलावितो
49 दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांनो,
माझे म्हणणे ऐका.
जगातील सर्व लोकांनो, माझे ऐका माझ्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी
मला निवडले मी आईच्या गर्भात असतानाच त्याने माझी निवड केली.
2 परमेश्वर त्याचे म्हणणे माझ्याकडून वदवितो.
तो माझा उपयोग धारदार तलवारीसारखा करतो.
त्याच्या ओंजळीत मला लपवून तो माझे रक्षणही करतो.
परमेश्वर टोकदार बाणाप्रमाणे माझा उपयोग करतो,
पण तो त्याच्या भाल्यात मला लपवितोही.
3 परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस.
मी तुझ्याबाबत विस्मयकारक गोष्टी करीन.”
4 मी म्हणालो, “मी निरर्थक मेहनत केली.
स्वतः झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही.
मी माझी सर्व शक्ती खर्च केली
पण माझ्याहातून काहीच झाले नाही.
तेव्हा आता काय करायचे.
ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे.
देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे.
5 मी परमेश्वराचा सेवक व्हावे,
याकोबाला आणि इस्राएलला मी परत देवाकडे न्यावे, म्हणून मला देवाने जन्माला घातले.
परमेश्वर माझा सन्मान करील.
मला देवाकडून शक्ती मिळेल.”
6 परमेश्वर मला म्हणाला, “तू माझा फार महत्वाचा सेवक आहेस.
इस्राएलचे लोक कैदी आहेत.
पण त्यांना माझ्याकडे परत आणले जाईल.
याकोबाच्या वंशजांचा गोतावळा माझ्याकडे परत येईल.
पण तुझे काम दुसरेच आहे,
ते ह्या कामा पेक्षा महत्वाचे आहे.
मी तुला सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा करीन.
जगातील सर्व माणसांचे रक्षण करण्याचा माझा मार्ग तू होशील.”
7 परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव, इस्राएलला वाचवितो देव म्हणतो,
“माझा सेवक नम्र आहे.
तो अधिपतींची सेवा करतो पण लोक त्याचा तिरस्कार करतात पण राजे त्याला पाहतील आणि उभे राहून त्याला मान देतील.
मोठे नेते त्याच्यापुढे वाकतील.”
परमेश्वराला, इस्राएलच्या पवित्र देवाला हे व्हायला पाहिजे आहे म्हणून असे घडेल, परमेश्वर विश्वासू आहे. ज्याने तुला निवडले तोच तो आहे.
तारणाचा दिवस
8 परमेश्वर म्हणतो,
“माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल.
त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन.
तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल.
तेव्हा मी तुला मदत करीन.
मी तुझे रक्षण करीन.
माझा लोकांबरोबर झालेल्या कराराचा तू पुरावा असशील.
देशाचा आता नाश झाला आहे
पण ती जमीन तू ज्याची त्याला परत देशील.
9 तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील.
अंधारात राहणाऱ्या लोकांना तू म्हणशील
‘अंधारातून बाहेर या’ प्रवास करताना लोकांना खायला मिळेल.
ओसाड टेकड्यांवरही त्यांना अन्न मिळेल.
10 लोक उपाशी राहणार नाहीत.
ते तहानेलेही राहणार नाहीत.
तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत.
का? कारण देव त्यांचे दु:ख हलके करील
आणि त्यांना घेऊन जाईल तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.
11 मी माझ्या लोकांसाठी रस्ता तयार करीन.
डोंगर सपाट करीन
आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.
12 “पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून लोक माझ्याकडे येत आहेत उत्तर
आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत.
मिसरमधील सीनीहूनही (आस्वानहूनही) लोक येत आहेत.”
13 हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, आनंदित व्हा.
डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा.
का? कारण परमेश्वर लोकांचे दु:ख हलके करतो.
गरिबांवर तो दया करतो.
सियोन-परित्यक्ता स्त्री
14 पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले,
माझा प्रभु मला विसरला.”
15 पण मी म्हणतो,
“आई आपल्या बाळाला विसरू शकते का? नाही.
आपल्या गर्भातून जन्मलेल्या मुलाला विसरू शकते का? नाही.
आई आपल्या मुलाला विसरू शकत नाही
आणि मी (परमेश्वर) तुला विसरू शकत नाही.
16 पाहा! मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे.
मी नेहमी तुझाच विचार करतो.
17 तुझी मुले तुझ्याकडे परत येतील.
लोकांनी तुझा पराभव केला पण ते लोक तुला एकटी सोडतील.
18 वर पाहा, तुमच्या सभोवती पाहा.
तुझी मुले एकत्र गोळा होऊन तुझ्याकडे येत आहेत.”
परमेश्वर म्हणतो,
“मी प्रत्यक्ष आहे आणि मी तुला पुढील गोष्टींचे वचन देतो.
तुझी मुले गळ्यात शोभून दिसणाऱ्या रत्नांप्रमाणे होतील.
नववधूने गळ्यात घालायच्या हाराप्रमाणे ती होतील.
19 “आता तुझा नाश केला गेला आहे आणि तुझा पराभव झाला आहे.
तुझा देश कुचकामी आहे.
पण थोड्या काळानंतर, तुझ्या भूमीवर खूप खूप लोक असतील.
तुझा नाश करणारे खूप दूर जातील.
20 तुझ्या हरवलेल्या मुलांसाठी तू दु:खी झालीस.
पण ती मुले तुला म्हणतील,
‘ही जागा फारच लहान आहे.
आम्हाला राहायला मोठी जागा दे.’
21 मग तू मनाशी म्हणशील,
‘ही सर्व मुले मला कोणी दिली?
हे फार चांगले आहे.
मी दु:खी होते आणि एकटी होते.
माझा पराभव केला गेला आणि मला माझ्या माणसांपासून दूर केले गेले.
मग ही मुले मला कोणी दिली?
पाहा मला एकटी सोडले,
ही सर्व मुले कोठून आली?’”
22 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो,
“बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन.
मी सर्व लोकांना दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन नंतर
ते तुझी मुले तुझ्याकडे आणतील.
ते त्यांना खांद्यांवरून
आणि हातांतून आणतील.
23 राजे तुझ्या मुलांचे शिक्षक असतील.
राजकन्या त्यांची काळजी घेतील.
ते राजे व राजकन्या तुझ्यापुढे वाकतील.
ते तुझ्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लावतील.
मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे.
आणि माझ्यावर जो विश्वास ठेवतो त्याची निराशा होत नाही.”
24 जेव्हा एखादा शूर वीर युध्दात संपत्ती जिंकतो,
तेव्हा तुम्ही ती त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही.
जेव्हा एखादा बलवान शिपाई तुरूंगावर पहारा करतो
तेव्हा कैदी तुरूंगातून निसटू शकत नाही.
25 पण परमेश्वर म्हणतो,
“कैदी पळून जातील.
कोणीतरी त्यांना त्या कडक पहाऱ्यातून दूर नेईल.
हे कसे होईल? तुझी लढाई मी लढेन.
मी तुझ्या मुलांना वाचवीन.
26 त्या लोकांनी तुला दुखावले
पण त्यांना स्वतःचेच मांस खायला मी लावीन.
स्वतःच्याच रक्ताची त्यांना मद्यासारखी धुंदी चढेल.
मी तुला वाचविले हे प्रत्येकाला माहीत होईल
याकोबाच्या सामर्थ्यवान परमेश्वराने तुझे रक्षण केले हे सर्वांना समजेल.”
देवाला संतोषविणारे जीवन
4 बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टीविषयी सांगायचे आहे; प्रभु येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंति करतो व बोध करतो की, देवाला कसे संतोषवायचे याचे शिक्षण तुम्हांला आमच्याकडून जसे मिळाले, तसे तुम्ही खरोखरच जगत आहात, आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा. 2 कारण तुम्हांला हे माहीत आहे की, प्रभु येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या होत्या. 3 आणि हेच देवाला पाहिजे आहे. तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे. तुम्ही जारकर्मपासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे. 4 त्याची अशी इच्छा आहे की, तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा मिळविण्यास शिकावे. [a] 5 आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही त्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे. 6 त्याची हीसुद्धा इच्छा आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या बंधूचा याबाबतीत गैरफायदा घेऊ नये. कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की, प्रभु या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे. 7 कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे, तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते. 8 म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो, तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो.
9 आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे. 10 आणि हे खरे पाहता, जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा.
11 आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वतःच्या हातांनी काम करण्याची इच्छा करा. 12 यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की, तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
प्रभूचे येणे
13 बंधूंनो, तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे, जे मेलेले आहेत, अशांसाठी इतरांसारखे दु:ख करु नये. कारण इतरांना आशा नाही. 14 कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसेच देवही येशूबरोबर, त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून मेलेले आहेत, त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील.
15 आता आम्ही जे तुम्हांला सांगत आहोत तो एक संदेश आहे. जे आम्ही जिवंत आहोत, ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरु. जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही. 16 कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभु स्वतः स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील. 17 मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील. आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदासर्वकाळ राहू. 18 म्हणून या शब्दांनी एकमेकाचे समाधान करा.
2006 by World Bible Translation Center