Old/New Testament
देवाचा लेबाननला संदेश
23 सोरविषयी शोक संदेश:
तार्शीशच्या गलबतावरील प्रवाशांनो,
तुमची गलबते जेथे लागतात ते बंदर उध्वस्त झाले आहे
तेव्हा शोक करा.
(कित्तीहून परतणाऱ्या गलबतांवरील प्रवाशांना ही बातमी सांगितली गेली.)
2 समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनो, दुखा:ने स्तब्ध व्हा.
सोर हे “सीदोनचे व्यापारी केंद्र आहे.”
तेथील व्यापारी समुद्रपार जाऊन व्यापार करतात आणि धनदौलत आणतात.
3 ते समुद्रमार्गे जाऊन धान्याचा शोध घेतात.
नाईल नदीच्या तीरावर पिकलेले धान्य ते विकत घेतात
आणि इतर राष्ट्रांत विकतात.
4 सीदोन, तू खरे म्हणजे जास्त खिन्न व्हायला पाहिजेस.
का? कारण आता समुद्र व समुद्रातील किल्ला म्हणजे सोर म्हणतात,
“मला मुले नाहीत.
मी प्रसूतिवेदना अनुभवल्या नाहीत.
मी मुलांना जन्म दिला नाही.
मी मुलांना वाढवले नाही.”
5 मिसरला सोरची वार्ता कळेल.
ह्या वार्तेने मिसरला धक्का बसेल, दुख: होईल.
6 गलबतांनो, तुम्ही तार्शीशला माघारी जाणे बरे!
समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनी खिन्न व्हायला पाहिजे.
7 पूर्वी तुम्ही सोरमध्ये मजा केली.
आरंभापासून त्या शहराची वाढ होत आहे.
त्या शहरवासीयांनी उपजीविकेसाठी दूरवर प्रवास केला आहे.
8 सोर शहराने पुष्कळ नेते दिले.
तेथील व्यापारी म्हणजे जणूराजपुत्रच.
व्यापाऱ्यांना सगळीकडे मान मिळतो.
मग सोरविरूध्द् कट कोणी रचला?
9 ही सर्वशक्तिमान परमेश्वराचीच करणी होती.
त्याने सोरचे महत्व कमी करायचे ठरविले.
10 तार्शीशच्या गलबतांनो, तुम्ही स्वदेशी परत जाणे योग्य.
लहान नदी जशी पार करतात, तसा समुद्र पार करा.
तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही.
11 परमेश्वराने आपला हात समुद्रापर्यंत पसरला आहे.
सोरविरूध्द् लढण्यासाठी तो राज्यांना गोळा करीत आहे.
त्याने, तार्शीशचे सुरक्षित ठिकाण सोर
नष्ट करण्याची कनानला आज्ञा दिली आहे.
12 परमेश्वर म्हणतो, “सीदोनच्या कुमारिके, तुझा नाश होईल.
तू पुन्हा आनंदित होणार नाहीस.”
पण सोरचे रहिवासी म्हणतात, “सायप्रस आम्हाला मदत करील.”
पण जरी तुम्ही समुद्र पार करून सायप्रसला गेलात,
तरी तुम्हाला तेथे आराम करायला जागा मिळणार नाही.
13 मग सोर लोक म्हणतात, “बाबेलोनमधील लोक आम्हाला मदत करतील.”
पण खास्द्यांच्या भूमीकडे (बाबेलोनकडे) पाहा.
बाबेलोन आता देश राहिलेला नाही.
अश्शूरने बाबेलोनवर हल्ला केला आणि त्याच्या भोवती युध्द्स्तंभ उभारले.
सुंदर घरातील सर्व चीजवस्तू सैनिकांनी लुटल्या.
अश्शूरांनी बाबेलोनला जंगली जनावरांना राहण्यायोग्य बनविले.
त्यांनी बाबेलोनला पूर्णपणे उजाड केले.
14 तार्शीशच्या गलबतांनो, तुमचे सुरक्षिततेचे ठिकाण-सोर
हे नष्ट केले जाणार आहे म्हणून तुम्ही शोक करा.
15 सत्तर वर्षे सोर शहराला लोक विसरून जातील. (हा एका राज्याच्या कारकिर्दी इतका कालखंड आहे.) सत्तर वर्षांनंतर सोरची स्थिती पुढील गाण्यातील वेश्येसारखी असेल.
16 “पुरूषांच्या विस्मरणात गेलेल्या वारांगने,
तुझी सारंगी उचल आणि शहरातील रस्त्यातून फीर.
सारंगीवर सुरेल गाणे वाजव.
तुझे गाणे पुन्हा पुन्हा म्हण.
म्हणजे लोकांना तुझी आठवण होईल.”
17 सत्तर वर्षांनंतर परमेश्वर सोरबद्दल फेरविचार करील. आणि आपला निर्णय देईल. तेथे परत व्यापार सुरू होईल. ती पृथ्वीवरील सर्व देशांची वारांगना होईल. 18 पण तिने मिळविलेला पैसा ती जवळ ठेवणार नाही. व्यापारात तिला झालेला फायदा परमेश्वरासाठी राखून ठेवला जाईल. तो फायदा, ती परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना देईल. मग परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना पोटभर अन्न मिळेल. ते चांगले कपडे घालतील.
देव इस्राएलला शिक्षा करील
24 पाहा! परमेश्वर ह्या देशाचा नाश करील. ही भूमी पूर्णपणे स्वच्छ करील. परमेश्वर लोकांना बळजबरीने दूर जायला लावील. 2 त्या वेळेला सामान्य लोक आणि याजक यांना एकाच मापाने मोजले जाईल. गुलाम व मालक हे सारखेच समजले जातील. दासी आणि मालकीण यांच्यात फरक केला जाणार नाही. खरीददार व विक्रेते, कर्ज घेणारे व कर्ज देणारे आणि धनको व ऋणको ह्यांत भेद केला जाणार नाही. 3 सर्व लोकांना देशातून बळजबरीने हाकलून दिले जाईल. सर्व संपत्ती लुटली जाईल. परमेश्वराच्या आज्ञेवरून हे घडेल. 4 देश ओस पडून त्याच्यावर शोककळा पसरेल. जग ओसाड व दु:खी होईल. ह्या देशातील महान नेते दुबळे होतील.
5 ह्या देशातील लोकांनी देशाला ओंगळ केले. हे कसे झाले? देवाच्या शिकवणुकी विरूध्द् जाऊन त्यांनी चुकीचे आचरण केले. देवाचे नियम त्यांनी मानले नाहीत. पूर्वी लोकांनी देवाबरोबर करार केला पण ती त्यांनीच मोडला. 6 ह्या देशात राहणारे लोक दुष्कृत्यांचे धनी आहेत. म्हणून देवाने हा देश नष्ट करायचा पण केला. लोकांना शिक्षा होईल. फारच थोडे वाचतील.
7 द्राक्षवेली सुकत चालल्या आहेत. नवीन मद्य खराब आहे. पूर्वी लोक सुखी होते. पण आता तेच लोक दु:खी झाले आहेत. 8 लोकांचे आनंदप्रदर्शन थांबले आहे. सगळे आनंददात थांबले आहेत. सांरगीतून आणि डफातून उठणारे आनंदसंगीत बंद पडले आहे. 9 लोक मद्य पिताना आनंदगीते म्हणत नाहीत. मद्याची चव कडू झाली आहे.
10 “संपूर्ण गोंधळ” हेच नाव या शहराला शोभेल. शहराचा नाश झाला आहे. लोक घरात प्रवेश करू शकत नाहीत. दारांना अडसर घातले आहेत. 11 बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही. सगळीच मजा गेली आहे. 12 सर्वत्र पडझड झाली आहे. वेशीसुध्दा कोलमडून पडल्या आहेत.
13 सुगीच्या काळात, लोक जैतूनची फळे झाडावरून पाडतात.
पण काही झाडावर राहतातच.
अनेक देशांमध्ये असलेल्या ह्या देशाचे देखील असेच होईल.
14 वाचलेले लोक आरडाओरड सुरू करतील.
त्यांचा आवाज महासागराच्या गर्जनेपेक्षा मोठा असेल.
परमेश्वराची महानता पाहून ते आनंदित होतील.
15 ते लोक म्हणतील, “पूर्वेकडच्या लोकांनो, परमेश्वराचे स्तवन करा.
दूरच्या देशांतील लोकांनो,
इस्राएलच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा.”
16 जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील.
ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल.
पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले.
मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत.
लोकांच्या विरूध्द् विश्वासघातकी उठले आहेत.
व त्यांना त्रास देत आहेत.”
17 ह्या देशात राहणाऱ्या लोकांवर येणारे संकट मला दिसत आहे.
त्यांची भीती, त्यांच्या पुढे असलेले खाचखळगे व सापळे मला दिसतात.
18 लोकांना संकटाची चाहूल लागून
ते घाबरून जातील.
काही लोक सैरावैरा पळतील.
पण ते खाचखळग्यात पडतील आणि सापळ्यात अडकतील.
त्यातील काही खड्ड्यातून चढून बाहेर येतील.
पण ते दुसऱ्या सापळ्यात अडकतील,
आकाश फाटेल आणि प्रलय होईल.
पृथ्वीचा पाय कापू लागेल.
19 धरणीकंप होऊन जमीन दुभंगेल.
20 पृथ्वीला पापांचा भार झाला आहे.
म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल.
पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल.
एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल
आणि पुन्हा उठणार नाही.
21 त्या वेळी, परमेश्वर, स्वर्गातील सैन्यांचा स्वर्गात
व पृथ्वीवरील राजांचा पृथ्वीवर,
न्यायानिवाडा करील.
22 खूप राजे एकत्र जमतील
आणि त्यांना तुरूंगात टाकले जाईल.
पण शेवटी, बऱ्याच काळानंतर,
त्यांना न्याय दिला जाईल.
23 यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल.
त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल.
त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल
आणि सूर्याला लाज वाटेल.
देवाचे स्तुतिस्तोत्र
25 प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस.
मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो.
तू आश्चर्य घडवली आहेस.
तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे.
तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.
2 तू ज्या शहराचा नाश केलास, ते शहर मजबूत तटबंदीने सुरक्षित केलेले होते.
पण आता तेथे फक्त दगडांचा खच पडला आहे
परकीयांचा राजवाडा जमीनदोस्त केला गेला आहे.
तो परत कधीच बांधला जाणार नाही.
3 बलाढ्य राष्ट्रातील लोक तुला मान देतील.
क्रूर राष्ट्रांतील शहरे तुला घाबरतील.
4 परमेश्वरा, तू गरजू गरीब लोकांचा आसरा आहेस.
त्यांच्यापुढील अनेक समस्या त्यांना खच्ची करू पाहतात
पण तू त्यांचे रक्षण करतोस.
परमेश्वरा, तू उन्हापावसापासून रक्षण करणाऱ्या निवाऱ्यासारखा आहेस.
पीडा या तुफान वादळ व पावसासारख्या असतात.
पण पावसाची झड भिंतीवर आपटून खाली पडते.
घरातल्या लोकांना तिचा त्रास होत नाही.
5 शत्रू आरडाओरडा करून गोंगाट करतो.
भयंकर शत्रू आव्हाने देतो.
पण देवा तू त्यांचा बंदोबस्त करतोस.
ज्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळवंटातील झाडेझुडपे सुकून जमिनीवर गळून पडतात,
त्याप्रमाणे तू शत्रूचा पराभव करून
त्यांना तुझ्यापुढे गुडघे टेकायला लावतोस.
ज्याप्रमाणे मोठे ढग उष्णतेचा ताप कमी करतात,
त्याप्रमाणे तू भयंकर शत्रूच्या गर्जना थांबवतोस.
देवाची त्याच्या भक्तांना मेजवानी
6 त्या वेळेस, सर्वशक्तिमान परमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल. 7 सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच “मृत्यू” होय. 8 पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दुख: भोगले पण देव पृथ्वीवरचे दुख: दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.
9 तेव्हा लोक म्हणतील,
“हा आपला देव आहे.
आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा.
तो आपले रक्षण करायला आला आहे.
आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत,
म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”
10 परमेश्वराचे सामर्थ्य ह्या डोंगरावर
असल्याने मवाबचा पराभव होईल.
परमेश्वर कचऱ्याच्या ढिगातील
गवताच्या काडीप्रमाणे शत्रूला पायाखाली तुडवील.
11 पोहणाऱ्या माणसाच्या हाताप्रमाणे परमेश्वर स्वतःचा हात लांब करील
आणि लोकांना ज्यांचा अभिमान आहे अशा सर्व गोष्टी तो जमा करील.
लोकांनी घडविलेल्या सर्व सुंदर वस्तू
परमेश्वर गोळा करील आणि दूर फेकून देईल.
12 लोकांनी बांधलेल्या उंच भिंती व सुरक्षित जागा
परमेश्वर पाडून टाकून धुळीला मिळवील.
1 ख्रिस्त येशूचे दास असलेल्या पौल व तीमथ्य यांजकडून, फिलिप्पै येथे राहणाऱ्या ख्रिस्त येशूमधील देवाच्या सर्व पवित्र लोकांना, तसेच सर्व वडील मंडळीला व खास मदतनिसांना,
2 देव आपला पिता आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त याजपासून तुम्हांस कृपा असो.
पौलाची प्रार्थना
3 प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो, तेव्हा देवाचे आभार मानतो. 4 नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्यावेळी मी आनंदाने प्रार्थना करतो. 5 कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे. 6 मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.
7 तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात. आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो, तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता. 8 देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हां सर्वांसाठी मी अधीर झालो होतो.
9 आणि माझी हीच प्रार्थना आहे:
की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल. 10 मी अशी प्रार्थना करतो की, तुमच्याठायी हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, 11 आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुति साठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरुन जावे.
पौलाच्या त्रासामुळे प्रभूच्या कार्याला मदत होते
12 बंधूनो, जे काही माझ्या बाबतीत घडले त्यामुळे सुवार्ताकार्यात प्रत्यक्ष वाढ झाली हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छ आहे. 13 याचा परिणाम असा झाला की, राजवाड्याच्या सर्व पहारेकऱ्यांना व येथे असणाऱ्या सर्वांना हे माहीत झाले की, मी ख्रिस्ताला अनुसरतो म्हणून मला तुरुंगवास भोगावा लागत आहे. 14 शिवाय, पुष्कळशा बांधवांना माझ्या तुरुंगवासामुळे उत्तेजन मिळाले. व ते बोलण्यात ख्रिस्तामध्ये अधिकाधिक धीट होत चालले आहेत व न भिता संदेश देत आहेत.
15 हे खरे आहे की त्याच्यातील काही जण हेव्याने व वैरभावने ख्रिस्ताचा संदेश देतात, पण इतर चांगल्या भावनेने ख्रिस्ताचा संदेश देतात. 16 हे लोक प्रेमापोटी असे करतात, कारण त्यांना माहीत आहे की, सुवार्तेचे समर्थन करण्यासाठी देवाने मला येथे ठेवले आहे. 17 पण दुसरे ख्रिस्ताची घोषणा स्वार्थी ध्येयाने करतात आणि प्रामाणिकपणे करीत नाहीत, कारण त्यांना वाटते की, मी तुरुंगात असताना मला त्रास देणे त्यांना शक्य होईल. 18 पण त्यामुळे काय होते? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येक मार्गाने चांगला हेतू असो की वाईट हेतू असो, ख्रिस्त गाजविला जातो. आणि त्यामुळे मला आनंद होतो.
आणि मला आनंद होतच राहील. 19 कारण मला माहीत आहे तुमच्या प्रार्थनेमुळे आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे येणाऱ्या मदतीमुळे याचा परिणाम माझ्या सुटकेत होणार आहे. 20 हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे, की, माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल. 21 कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे. 22 पण जर मी या शरीरातच राहिलो तर त्याचा अर्थ असा की, माझ्या कामाचे फळ, आनंद मी अनुभवीन. मला माहीत नाही की मी काय निवडीन. 23 या दोन पर्यायातून निवडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आहे. माझी अशी इच्छा आहे की, या जीवनातून जाऊन ख्रिस्ताबरोबर असावे कारण ते फार फार चांगले होईल. 24 पण तुमच्यासाठी या शरीरात राहणे हे माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे. 25 आणि मला याची खात्री असल्याने मला माहीत आहे की मी येथेच राहीन व तुमच्याबरोबर असेन. 26 यासाठी की तुमच्याबरोबर पुन्हा असण्याचा परिणाम म्हणून तुम्हांला अभिमान बाळगण्यास अधिक योग्य कारण मिळेल.
27 पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा. यासाठी की, जरी मी तुम्हांला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने, एकजीवाने धडपड करीत आहात. 28 आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्यांच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल. 29 कारण, ख्रिस्ताच्या वतीने केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी दु:ख भोगणे असा हक्क तुम्हांला देण्यात आलेला आहे. 30 माझ्यामध्ये चाललेले युंद्ध तुम्ही अनुभवलेले आहे आणि पाहिले आहे आताही ते माझ्यामध्ये चालले असल्याचे तुम्ही ऐकत आहात.
2006 by World Bible Translation Center