Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यशया 17-19

देवाचा सिरीयाला संदेश

17 दमास्कसला हा शोक संदेश आहे. परमेश्वर म्हणतो की पुढील गोष्टी दमास्कसला घडतील.

“आता दमास्कस एक शहर आहे, पण त्याचा नाश होईल.
    फक्त पडझड झालेल्या इमारती तेथे शिल्लक राहतील.
लोक अरोएराची शहरे सोडून जातील.
    त्या ओसाड शहरांतून शेळ्यामेंढ्यांचे कळप मुक्तपणे हिंडतील.
    त्यांना हाकलायला तेथे कोणी माणूस नसेल.
एफ्राइमची (इस्राएलची) किल्ले असलेली शहरे नष्ट होतील.
    दमास्कसचे सरकार पडेल.
इस्राएलला जे घडले तेच सिरीयात घडेल.
    सगळी प्रतिष्ठित माणसे दूर केली जातील.”
    सर्वशक्तिमान परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टी घडतील.

“त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल.
    आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल.

“एफ्राइम खोऱ्यातील धान्याच्या मोसमाप्रमाणे तो काळ असेल. मजूर शेतात पिकलेली पिके कापून गोळा करतात. नंतर कणसे तोडून ते धान्य गोळा करतात.

“तो काळ जैतूनच्या मोसमाप्रमाणेही असेल. लोक झाड हलवून जैतूनची फळे पाडतात. पण काही झाडावर राहतातच. उंचावरच्या फांद्यावर चार-पाच फळे राहून जातातच. ह्या शहरांचेही असेच होईल.” सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले आहे.

त्या वेळी लोक देवाकडे म्हणजे आपल्या जन्मदात्याकडे पाहतील. त्यांना इस्राएलच्या पवित्र देवाचे दर्शन होईल. लोक, स्वतःच्या हाताने केलेल्या वेद्यांकडे जाणार नाहीत. त्यांनी खोट्या देवांसाठी तयार केलेल्या अशेरा स्तंभाचा आणि धूपाच्या वेद्यांचा ते मान ठेवणार नाहीत. त्या वेळेला किल्ले असलेली सर्व शहरे ओस पडतील. इस्राएलचे लोक येण्याआधी त्या भूमीवर जसे डोंगर आणि जंगले होती [a] त्याप्रमाणे ती शहरे होतील. पूर्वी इस्राएली लोकांना येताना पाहून तेथे राहणारे लोक पळून गेले. भविष्यात परत एकदा देश ओस पडेल. 10 असे घडण्याचे कारण तू तुला वाचवणाऱ्या देवाला विसरलास. देव हे तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे तुझ्या लक्षात राहिले नाही.

दूरच्या देशांतून तू चांगल्या जातीच्या द्राक्षवेली आणल्यास तू त्यांची लावणी करशील पण त्या वाढणार नाहीत. 11 एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील.

12 समुद्राच्या गर्जनेप्रमाणे येणारा पुष्कळ लोकांचा आक्रोश ऐक.
    ते मोठ्याने रडत आहेत.
    लाटा एकमेकीवर आदळून उठणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आक्रोश आहे.
13 लोकांची स्थितीही त्या लाटांप्रमाणेच होईल.
    देव त्यांची कानउघाडणी करील आणि ते लांबवर धावत सुटतील.
लोकांची स्थिती वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे होईल.
    वावटळीत उडून जाणाऱ्या गवताप्रमाणे त्यांची अवस्था होईल.
14 त्या रात्री सर्व माणसे अतिशय भयभीत होतील.
    उजाडण्यापूर्वी सर्व नष्ट झालेले असेल.
त्यामुळे आमच्या शत्रूंना काहीही मिळणार नाही
    ते ह्या भूमीवर पाय ठेवतील तेव्हा येथे काहीही उरलेले नसेल.

देवाचा इथिओपियाला संदेश

18 इथिओपियामधील नद्यांकाठच्या प्रदेशाकडे पाहा. तेथे इतके कीटक आहेत की त्यांचे गुणगुणणे तुम्ही ऐकू शकाल. तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात.

शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा.
    (ह्या उंच व धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात.
    त्याचे राष्ट्र बलशाली आहे.
त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे.
    त्यांचा देश नद्यांनी
    विभागलेला आहे.)
त्यांना इशारा करा की त्यांचे काहीतरी वाईट होणार आहे.
    त्या राष्ट्रांचे वाईट होताना जगातील सर्व लोक पाहतील.
डोंगरावर फडकणाऱ्या ध्वजाप्रमाणे ही गोष्ट सर्वांना स्वच्छ दिसेल.
    ह्या उंच लोकांबाबत घडणारी गोष्ट जगातील सर्व लोक रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे स्पष्टपणे ऐकतील.

परमेश्वर मला म्हणाला, “माझ्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी मी असेन. [b] मी शांतपणे ह्या गोष्टी घडताना पाहीन. उन्हाळ्यातील प्रसन्न दिवशी दुपारी लोक विश्रांती घेत असतील. (उन्हाळा असल्यामुळे पाऊस अजिबात नसेल. फक्त सकाळी दव असेल.) तेव्हाच काहीतरी भयानक घडेल. सगळीकडे फुले फुललेली असतील, द्राक्षे पिकत असतील, पण सुगीचा हंगाम येण्याआधीच शत्रू येईल व सर्व झाडे कापून टाकील. तो द्राक्षाच्या वेली तोडून फेकून देईल. त्या वेली डोंगरावरील पक्ष्यांच्या आणि जंगली जनावरांच्या उपयोगी पडतील. उन्हाळ्यात पक्षी त्यात राहतील आणि थंडीत जंगली जनावरे त्या खाऊन टाकतील.”

त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वराला अर्पण करण्यासाठी खास वस्तू आणल्या जातील. ह्या वस्तू, उंच आणि धडधाकट लोक, देवाच्या स्थळी सीयोनच्या डोंगरावर आणतील. (ह्या उंच व धडधाकट लोकांना सर्व लोक घाबरतात. त्यांचे राष्ट्र बलाढ्य आहे. ते इतर राष्ट्रांना हरवते. हे राष्ट्र नद्यांनी विभागले गेले आहे.)

देवाचा मिसरला संदेश

19 मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.

देव म्हणतो, “मी मिसरमधील लोकांना त्यांच्याच लोकांविरूध्द लढायला लावीन. भावाभावात लढाई होईल शेजारी शेजाऱ्याच्याविरूध्द जाईल. शहरे एकमेकांच्या विरूध्द जातील. प्रदेश एकमेकांच्या विरोधात जातील. मिसरच्या लोकांचे बेत मी उधळून टाकीन. मिसरवासी गोंधळून जातील. ते काय करावे याबाबत त्यांचे खोटे देव, चाणाक्ष लोक, जादूगार, मांत्रिक यांचा सल्ला घेतील. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.” प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “मी मिसरला कठोर शासकाच्या हातात देईन. एक सामर्थ्यवान राजा मिसरवर राज्य करील.”

नाईल नदी कोरडी पडेल. समुद्र आटतील. सर्व नद्यांच्या पाण्याला दुर्गंध येईल. सर्व कालवे सुकतील आणि मिसरमधील पाणी नाहीसे होईल. पाणवनस्पती कुजून जातील. नदीकाठची झाडे सुकतील, मरतील व वाऱ्यावर उडून जातील. नदीच्या रूंदट पात्रातील वनस्पतीसुध्दा मरतील.

नाईल नदीत मच्छिमारी करणारे कोळी दु:खाने रडतील. कारण ते अन्नासाठी नाईल नदीवर विसंबून असतात. पण तीच कोरडी होईल. विणकर फार दु:खी होतील. कारण त्यांना कापड तयार करण्यासाठी आंबाडी लागते. पण नदी कोरडी पडल्यामुळे त्यात आंबाडी होणार नाही. 10 पाण्यावर बांध बांधणाऱ्यांना काम न राहिल्याने ते सुध्दा कष्टी होतील.

11 सोअनचे नेते मूर्ख आहेत. फारोचे “शहाणे सल्लागार” चुकीचा सल्ला देतात. हे नेते स्वतःला शहाणे समजतात. ते म्हणतात की आम्ही पूर्वीच्या राजघराण्यातील आहोत. पण ते स्वतःला जेवढे शहाणे समजतात तेवढे ते नाहीत. 12 मिसर देशा, तुझे ते सुज्ञ लोक कोठे आहेत? त्यांना सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरबद्दल काय योजले आहे ते समजले पाहिजे. त्यांनी तुला काय घडणार आहे ते सांगितले पाहिजे.

13 सोअनाच्या नेत्यांना मूर्ख बनविले गेले आहे. नोफाचे नेते खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. म्हणून ते सर्व मिसरला चुकीच्या मार्गाने नेतात. 14 परमेश्वराने नेत्यांना गोंधळात टाकले आहे. ते स्वतःभरकटतात आणि मिसरला चुकीच्या वाटेने नेतात. ते जे काय करतात ते चूकच असते. ते मद्यप्यांसारखे मळमळून येऊन गडबडा लोळत आहेत. 15 नेत्यांना करण्यासारखे आता काही नाही. (हे नेते म्हणजे “डोके व शेपूट,” “शेंडे व बुडखे” आहेत.)

16 त्या वेळी मिसरवासी घाबरलेल्या बायकांसारखे दिसतील. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला भितील. देव शिक्षा करण्यासाठी हात उगारील व त्यांची घाबरगुंडी उडेल. 17 यहुद्यांच्या भूमीला मिसरमधील सर्व लोक घाबरतील. मिसरमधील प्रत्येकजण यहुदाचे नाव ऐकताच भयभीत होईल. असे होण्याचे कारण हेच की सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरमध्ये भयानक गोष्टी घडून आणण्याची योजना आखली आहे. 18 ह्या वेळेला मिसरमधील पाच शहंरातील लोक युहद्यांची कनान भाषा बोलतील. त्या पाच शहरांपैकी एका शहराचे नाव “ईर-हरेस” असेल. ह्या शहरांत राहणारे लोक सर्वशक्तिमान परमेश्वराला अनुसरण्याची शपथ वाहतील.

19 तेव्हा मिसरच्या मध्यावर परमेश्वरासाठी एक वेदी असेल. व परमेश्वराविषयी आदर दाखविण्यासाठी मिसरच्या सीमेवर एक स्मारक उभारले जाईल. 20 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सामर्थ्यशाली कृत्यांची मिसरमधील ही निशाणी आणि पुरावा असेल. केव्हाही लोकांनी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला की परमेश्वर मदत पाठवील. लोकांचे रक्षण व बचाव करण्यास देव एका माणसाला पाठवील हा माणूस अत्याचार करणाऱ्यापासून लोकांना सोडवील.

21 त्या वेळेला मिसरवासीयांना परमेश्वराची खरी ओळख होईल. ते देवावर प्रेम करतील. ते देवाची उपासना करतील आणि बळी अर्पण करतील. ते परमेश्वराला नवस बोलतील आणि ते फेडतील. 22 परमेश्वर मिसरमधील लोकांना शिक्षा करील. नंतर परमेश्वर त्यांना क्षमा करील. ते परमेश्वराला शरण जातील. परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला पावेल व त्यांना क्षमा करील.

23 त्या वेळी मिसर ते अश्शूर असा महामार्ग असेल. त्यामुळे मिसर व अश्शूर त्यांच्यामधे ये-जा होईल. मिसर अश्शूरच्या बरोबरीने वागेल. 24 त्या वेळी इस्राएल, अश्शूर व मिसर एकत्र येऊन राज्य करतील. हा देशाच्या दृष्टीने ईश्वराचा कृपाप्रसादच ठरेल. 25 सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या देशांवर कृपा करील. तो म्हणेल, “मिसरवासीयांनो, तुम्ही माझे आहात अश्शूरच्या रहिवाशांनो, तुम्हाला तर मीच घडवलय्! इस्राएलच्या लोकांनो, मी तर तुमचा स्वामी आहे. तुम्हासर्वांना माझे आशीर्वाद!”

इफिसकरांस 5:17-33

17 म्हणून मूर्खासारखे वागु नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या. 18 द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा, 19 स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंतःकरणात प्रभूसाठी गायने गा. 20 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.

पती-पत्नी

21 ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा.

22 पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा. 23 कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. ख्रिस्त स्वतःच शरीराचा तारणारा आहे. 24 पण, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.

25 पतींनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीति करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीति करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, 26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन निर्मळ करावे. 27 यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.

28 याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नींवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. 29 कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. 30 कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. 31 शास्त्र सांगते त्याप्रमाणे, “म्हणून मनुष्य त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील. आणि ते दोघे एकदेह होतील.” [a] 32 हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. 33 तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. व पत्नी नेही पतीचा मान राखाला पाहिजे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center