Old/New Testament
इस्राएल घरी परत येईल
14 पुढील काळात, परमेश्वर याकोबाला प्रेमाची पुन्हा प्रचिती देईल. तो इस्राएली लोकांची पुन्हा निवड करील. तो त्यांना त्यांची जमीन परत देईल. यहुद्यां व्यतिरिक्त अन्य लोक त्यांना येऊन मिळतील. ते एकत्र होतील आणि त्यांचा एकच वंश याकोबाचा वंश होईल. 2 इतर राष्ट्रे इस्राएलला त्याची जमीन परत देतील, इतर राष्ट्रांतील स्त्री पुरूष इस्राएलचे गुलाम होतील. पूर्वी ह्याच लोकांनी इस्राएलच्या प्रजेला गुलाम होण्यास भाग पाडले होते. पण आता इस्राएलच त्यांचा पराभव करील व त्यांच्यावर राज्य करील. 3 परमेश्वर तुमचे कष्ट कमी करून सुख व आराम देईल. पूर्वी तुम्ही गुलाम होता. लोक तुम्हाला राबवून घेत. पण परमेश्वर तुमचे कष्ट नाहीसे करील.
बाबेलोनच्या राजाबद्दलचे गाणे
4 त्या वेळी बाबेलोनच्या राजाबद्दलचे हे गाणे तुम्ही म्हणायला लागाल, राजा आमच्यावर राज्य करीत.
असताना नीचपणे वागत होता,
पण आता त्याची सत्ता नष्ट झाली.
5 परमेश्वर दुष्ट राजांचा राजदंड मोडतो.
परमेश्वर त्यांची सत्ता काढून घेतो.
6 रागाच्या भरात बाबेलोनच्या राजाने लोकांना फटकावले.
तो नेहमीच लोकांना फटकावत असे.
त्या दुष्ट राजाने क्रोधाने लोकांवर सत्ता गाजवली.
तो नेहमीच लोकांना दुखवत असे.
7 पण आता संपूर्ण देशाला स्वास्थ्य मिळाले आहे.
देश शांत आहे.
लोक उत्सव, समारंभ करू लागले आहेत.
8 तू दुष्ट राजा होतास.
पण आता तू संपला आहेस.
लबानोनमधील गंधसरू
व सरूवृक्षसुध्दा आनंदित झाले आहेत.
वृक्ष म्हणतात, “राजाने आम्हाला कापून टाकले होते.
पण आता राजाच पडला आहे.
तो आता कधीच उठणार नाही.”
9 राजा, तू येणार म्हणून अधोलोकात
खळबळ उडाली आहे.
पृथ्वीवरच्या नेत्यांच्या आत्म्यांना,
तू येणार म्हणून जागे करीत आहे,
सिंहासनावरून त्यांना उठवीत आहे,
ते तुझ्या आगमनाची तयारी करतील.
10 ते सर्व तुझी चेष्टा करतील.
ते म्हणतील, “आता तू अगदी आमच्याप्रमाणे
निर्जीवकलेवर झाला आहेस.”
11 तुझा गर्व अधोलोकात पाठविला आहे.
तुझ्या सारंगीचा नाद तुझ्या गर्विष्ठ आत्म्याचे आगमनच घोषित करीत आहे.
अळ्या तुझे शरीर खाऊन टाकतील.
तू अळ्यांच्या अंथरूणावर झोपशील व कीटकांचे पांघरूण घेशील.
12 तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास,
पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस.
पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे नेहमीच वाकत होती,
पण आता तू संपला आहेस.
13 तू नेहमीच स्वतःला सांगायचास,
“मी परात्पर देवासारखा होईन.
मी आकाशात उंच जाईन.
देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन.
मी पवित्र साफोन डोंगरावरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन.
14 मी मेघांवर आरोहण करून वेदीवर जाईन.
मी परात्पर देवासारखा होईन.”
15 पण तसे घडले नाही.
तू देवाबरोबर आकाशात गेला नाहीस.
तुला अधोलोकात, पाताळात आणले गेले.
16 लोक तुझ्याकडे निरखून पाहतील व तुझ्याबद्दल विचार करतील.
तू एक कलेवर आहेस हे ते पाहतील आणि म्हणतील,
“पृथ्वीवर सगळीकडे ज्याने
प्रचंड भय निर्माण केले होते तो हाच का?
17 ज्याने शहरांचा विध्वंस करून
सर्व जमिनीचे वाळवंट केले तो हाच मनुष्य का?
ज्यांने युध्दात लोकांना कैदी केले
व त्यांना घरी जाऊ दिले नाही तो हाच का?”
18 पृथ्वीवरील प्रत्येक राजा वैभवात मरण पावला,
प्रत्येकजण आपापल्या थडग्यात विसावा घेत आहे.
19 पण, हे दुष्ट राजा,
तुला तुझ्या थडग्याच्या बाहेर टाकले आहे.
तू झाडाच्या तोडलेल्या फांदीप्रमाणे आहेस.
लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकाला बाकीचे सैनिक तुडवून जातात तशी तुझी स्थिती आहे.
आता तुझ्यात व इतर कलेवरात काहीही फरक नाही
तुला कफनात गुंडाळले आहे.
20 इतर खूप राजे मृत्यू पावले, व आपापल्या थडग्यात विसावले
पण तुला त्यांच्यात जाता येणार नाही.
का? कारण तू स्वतःच्याच देशाचा विध्वंस केलास.
स्वतःच्याच प्रजेला ठार मारलेस.
तुझी मुले तुझ्यासारखा नाश करीत राहू शकणार नाहीत.
त्यांना परावृत्त केले जाईल.
21 त्याच्या मुलांना ठार मारण्याची तयारी करा,
कारण त्यांचे वडील गुन्हेगार आहेत.
त्यांची मुले नातेवाईक, नातवंडे कधीही ह्या देशावर राज्य करणार नाहीत.
ते, पुन्हा कधीही ह्या जगात, त्यांची शहरे वसविणार नाहीत.
22 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मी स्वतः त्या लोकांविरूध्द लढण्यास उभा राहीन. मी प्रसिध्द् शहर बाबेलोनचा नाश करीन. मी सर्व बाबेलोन वासीयांचा नाश करीन. त्यांची मुले, नातवंडे, पतवंडे ह्यांचा नाश करीन.” हे सर्व स्वतः परमेश्वर बोलला.
23 परमेश्वर पुढे म्हणाला, “मी बाबेलोनचे रूप बदलून टाकीन. ती जागा लोकांना नव्हे तर जनावरांना राहण्यालायक करीन. त्या जागी दलदल करीन ‘नाशरूपी झाडूने’ मी बाबेलोन स्वच्छ करीन.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
देव अश्शूरला पण शिक्षा करील
24 सर्वशक्तिमान परमेश्वराने वचन दिले आहे. परमेश्वर म्हणाला, “मी वचन देतो, मी सांगितल्याप्रमाणे गोष्टी घडून येतील. मी योजल्याप्रमाणे सर्व होईल. 25 मी माझ्या देशात अश्शूरच्या राजाचा नाश करीन. माझ्या डोंगरावर मी त्या राजाला पायाखाली तुडवीन. त्याने माझ्या माणसांना त्याचे गुलाम केले, त्यांच्या मानेवर जोखड घातले. यहुदाच्या मानेवरील जोखड दूर केले जाईल. त्याच्यावरी ओझे दूर सारले जाईल. 26 माझ्या लोकांकरिता मी हा बेत केला आहे. मी माझ्या हाताचा (बळाचा) सर्व राष्ट्रांना शिक्षा करण्यासाठी उपयोग करीन.”
27 जेव्हा परमेश्वरच संकल्प करतो तेव्हा कोणीच तो रद्द करू शकत नाही. जेव्हा लोकांना शिक्षा करण्यासाठी परमेश्वरच हात उगारतो, तेव्हा कोणीच त्याला थांबवू शकत नाही.
देवाचा पलेशेथविरूध्द संदेश
28 राजा आहाजच्या मृत्यूच्या वर्षीच ही शापवाणी झाली.
29 पलेशेथ देशा, तुला पराभूत करणारा राजा गेला म्हणून तुला आनंद झाला आहे. पण खरे तर तुला आनंद व्हायचे काही कारण नाही. हे खरे आहे की त्या राजाची सत्ता संपली आहे. पण राजाचा मुलगा गादीवर बसेल व राज्य करील. हे एका सापाने दुसऱ्या अती विषारी सापाला जन्म दिल्यासारखे होईल. हा नवा राजा तुझ्या दृष्टीने चपळ व भयानक सापासारखा असेल. 30 पण माझी गरीब प्रजा मात्र सुखाने खाईल. त्यांची मुले सुरक्षित राहतील. माझे गरीब लोक सुखशांतीने राहतील. पण मी तुझ्या कुळाचा उपासमारीने अंत करीन. तुझ्या कुळातील उरलेले सर्व लोक मरतील.
31 नगरच्या वेशीजवळील प्रजाजनांनो, रडा.
नगरवासीयांनो, आक्रोश करा.
पलेशेथ मधील सर्व लोक भयभीत होतील.
त्यांचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.
उत्तरेकडे पाहा!
धुळीचा लोट उठला आहे.
अश्शूरचे सैन्य येत आहे.
त्या सैन्यातील सर्व माणसे बलवान आहेत. [a]
32 ते सैन्य त्यांच्या देशात निरोप पाठवील.
ते जासूद त्यांच्या लोकांना काय सांगतील?
ते सांगतील की पलेशेथचा पराभव झाला आहे.
पण परमेश्वराने सीयोनला बलवान बनवले
व सर्व गरीब तिकडे आश्रयासाठी गेले.
मवाबला देवाचा संदेश
15 मवाबबद्दल ही शापवाणी.
एका रात्रीत आर मवाब लुटले गेले.
त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले.
त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
2 राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत.
नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत.
आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे.
3 मवाबमधील सर्वांनी घरादारातील सर्वांनी
काळे कपडे घातले आहेत
व ते रडत आहेत.
4 हेशबोन व एलाले येथील लोक एवढ्यामोठ्याने रडत आहेत की
त्यांचा आवाज दूरच्या याहसा शहरापर्यंत ऐकू येत आहे.
एवढेच काय पण सैनिकही गर्भगळीत
होऊन भीतीने कापत आहेत.
5 मवाबच्या दु:खाने माझे मन रडत आहे.
लोक बचावासाठी धावत आहेत.
ते दूर सोअर व एगलाथ शलिशीयापर्यंत पळतात.
लूहीथच्या चढणीवर
ते रडत रडत चढत आहेत.
होरोनाइमच्या वाटेवर लोक मोठ्याने
आक्रोश करीत जात आहेत.
6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे.
सर्व झाडेझुडपे वाळली आहेत.
कोठेच हिरवेपणा नाही.
7 म्हणून लोक स्वतःची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात.
ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात.
8 मवाबमध्ये सगळीकडे रडणे ऐकू येत आहे.
लांब असलेल्या एग्लाइममधील लोक रडत आहेत
आणि बैर-एलिममध्येही आक्रोश सुरू आहे.
9 दीमोनचेपाणी सक्ताने लालभडक झाले आहे.
मी परमेश्वर दीमोनवर आणखी संकटे आणीन,
मवाबमधील काही थोडी माणसे शत्रूच्या हातातून निसटली आहेत
पण मी त्यांच्यावर त्यांना खाऊन टाकण्यासाठी सिंह पाठवीन.
16 तुम्ही लोकांनी राजाला नजराणा पाठविला पाहिजे. तुम्ही सेला येथील कोकरू वाळवंटामार्गे सीयोनकन्येच्या डोंगरावर (यरूशलेमला) पाठविले पाहिजे.
2 मवाबच्या स्त्रिया अर्णोन नदी ओलांडण्याचा प्रयत्न करतील.
त्या मदतीसाठी सैरभैर धावतील.
त्यांची स्थिती, घरटे मोडल्यामुळे जमिनीवर पडलेल्या चिमुकल्या पाखरांप्रमाणे होईल.
3 त्या म्हणतात, “आम्हाला मदत करा,
आम्ही काय करावे ते सांगा.
जशी सावली दुपारच्या उन्हापासून आपले रक्षण करते,
तसे शत्रूपासून आमचे रक्षण करा.
आम्ही शत्रूला चुकवून पळत आहोत.
आम्हाला लपवा.
आम्हाला शत्रूच्या ताब्यात देऊ नका.
4 मवाबमधील लोकांना बळजबरीने त्यांची घरे सोडावी लागली.
म्हणून त्यांना तुमच्या देशात राहू द्या.
शत्रूंपासून त्यांना लपवा.”
लुटालूट थांबेल.
शत्रूचा पराभव होईल.
दुसऱ्यांना त्रास देणारे ह्या भूमीतून जातील.
5 नंतर नवा राजा गादीवर बसेल.
तो दाविदाच्या वंशातला असेल.
तो सत्यप्रिय, प्रेमळ व दयाळू असेल.
तो खरेपणाने न्याय देईल.
तो योग्य व बरोबर अशाच गोष्टी करील.
6 आम्ही मवाबवासीयांच्या गर्वाविषयी
व अहंकाराविषयी ऐकले आहे.
ते दांडगट व बढाईखोर आहेत.
पण त्यांच्या बढाया निरर्थक आहेत.
7 त्या गर्वामुळे सर्व देशाला दु:ख भोगावे लागेल.
सर्व मवाबवासीयांना रडावे लागेल लोक दु:खी होतील.
पूर्वीच्या गोष्टी त्यांना हव्याशा वाटतील.
कीर हेरेसेथमध्ये तयार झालेले अंजिराचे केक त्यांना हवे असतील.
8 हेशबोनमधील मळे व सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या म्हणून लोकांना वाईट वाटेल.
परकीय राजांनी द्राक्षवेली तोडून टाकल्या.
शत्रूचे सैन्य दूर याजेरपर्यत पसरले आहे.
ते वाळवंटापासून समुद्रापर्यंत पसरले आहे.
9 द्राक्षांचा नाश झाला म्हणून मी याजेर
व सब्मे यांच्याबरोबर शोक करीन.
सुगीचा मोसम येणार नाही म्हणून मी हेशबोन
व एलाले यांच्याबरोबर रडीन.
उन्हाळी फळे पण नसतील
आणि हर्षोल्लास पण नसेल.
10 कारमेलमध्ये (द्राक्षमळ्यात) आनंदगान होणार नाही.
सुगीच्या काळातील आनंद मी कोणालाही होऊ देणार नाही.
द्राक्ष मद्य काढण्यासाठी तयार आहेत
पण ती नासून जातील.
11 म्हणून मला मवाबबद्दल आणि कीर हेरेसबद्दल फार वाईट वाटते
या शहरांबद्दल मला खरोखरच अतिशय वाईट वाटते.
12 मवाबवासी त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतील,
पण काय घडले ते त्यांना दिसेल.
ते इतके दुर्बल झालेले असतील
की प्रार्थना करण्याची शक्ती त्यांच्यात नसेल.
13 मवाबबद्दलच्या ह्या गोष्टी परमेश्वराने बऱ्याच वेळा सांगितल्या. 14 आणि आता परमेश्वर म्हणतो, “तीन वर्षांत सर्व लोक आणि लोक ज्या वस्तूंचा अभिमान बाळगत होते, त्या सर्व वस्तू नाहीशा होतील. तेथे अगदी थोडे लोक उरतील.”
5 प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा, 2 आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.
3 जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नावही निघू नये, हे देवाच्या पवित्र लोकांसाठी योग्य नाही. 4 तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. उलट उपकारस्तुति असावी. 5 कारण तुम्हांला हे माहीत असावे की: जो मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा अधाशी जे मूर्तिपूजेसारखेच आहे, त्या मनुष्याला देवाच्या आणि ख्रिस्ताच्या राज्यात वतन असणार नाही.
6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये. कारण या कारणांमुळे जे आज्ञा मोडतात, त्यांच्यावर देवाचा क्रोध येणार आहे. 7 म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. 8 मी हे सांगतो कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूचे अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. 9 कारण प्रकाशाची फळे प्रत्येक चांगुलपणात, नीतीमत्वात, आणि सत्यात दिसून येतात. 10 नेहमी प्रभूला कशाने संतोष होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा. 11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्यांचे भागीदार होऊ नका. तर उलट, ती उघडकीस आणा. 12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयी बोलणेही लज्जास्पद आहे. 13 पण जेव्हा सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते, तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते. 14 आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते, ती प्रकाश आहे. म्हणूनच आम्ही असे म्हणतो:
“हे झोपलेल्या जागा हो
व मेलेल्यांतून ऊठ,
आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. 16 जे चांगल्या संधीचा उपयोग करतात. कारण हे दिवस वाईट आहेत.
2006 by World Bible Translation Center