Old/New Testament
शांतीचा राजा येत आहे
11 इशायाच्या बुंध्याला (वंशाला) अंकुर (मूल) फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल. 2 परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील. 3 परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.
हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही. 4-5 तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगुलपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.
6 त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील. 7 गायी आणि अस्वले एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. सगळ्यांची पिल्ले एकत्र राहतील आणि कोणीच कोणाला इजा करणार नाही. सिंह गाईसारखे चारा खातील. एवढेच नव्हे तर सापही माणसाला दंश करणार नाहीत. 8 तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.
9 ह्या सगळ्या गोष्टीवरून, तेथे शांती नांदेल, हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते, तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल.
10 त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या “ध्वजाकडे” विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.
11 त्या वेळेला माझा प्रभू (देव) मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचेल. असे तो दुसऱ्यांदा करील. आणि त्यांना बाहेर आणील. अश्शूर, उत्तर मिसर, दक्षिण मिसर, इथिओपिया, एलाम, बॉबिलॉन, हमाथ आणि पृथ्वीवरील दूरची सर्व राष्ट्रे येथे असलेल्या ह्या त्याच्या लोकांना तो बाहेर आणील. 12 देव “तो ध्वज” सर्व लोकांची निशाणी म्हणून उभारेल. इस्राएल व यहुदा येथील लोकांना बळजबरीने देशाच्या बाहेर घालवून देण्यात आले ते पृथ्वीवरील दूरदूरच्या देशात विखुरले. पण देव त्यांना एकत्र आणील.
13 तेव्हा एफ्राइमला (इस्राएलला) यहुदाचा मत्सर वाटणार नाही. यहुदाला कोणी शत्रूच राहणार नाहीत. यहुदा एफ्राइमला (इस्राएलला) काही त्रास देणार नाही. 14 पण एफ्राइम (इस्राएल) व यहुदा दोघे मात्र पलिष्ट्यांवर हल्ला करतील. आकाशात उडणाऱ्या दोन पक्ष्यांनी जमिनीवरील किड्याकाटकावर झडप घालावी तसेच हे दोन देश पलिष्ट्यांवर तुटून पडतील. दोघे मिळून पूर्वेकडच्या लोकांना लुटतील व अदोम, मवाब, व अम्मोन ह्यांच्यावर राज्य करतील.
15 पूर्वी परमेश्वराला राग आला व त्याने समुद्र दुभंगून आपल्या माणसांना मिसरमधून बाहेर काढले आता पण तसेच होईल परमेश्वर युफ्राटिस नदी दुभंगवेल. तो नदीवर हातातील दंड मारील आणि तिचे सात लहान नद्यांत विभाजन करील. त्या नद्या खोल नसतील. लोक त्या चालत सहज पार करू शकतील. 16 ह्यामुळे अश्शूरमध्ये मागे राहिलेल्या त्याच्या लोकांना अश्शूर सोडून जाता येईल. हे देवाने मिसरमधून इस्राएली लोकांना बाहेर काढले, त्या वेळे प्रमाणेच असेल.
देवाचे स्तुतिस्तोत्र
12 त्या वेळेला तू म्हणशील:
“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो
तू माझ्यावर रागावला होतास
पण आता राग सोड
तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.
2 देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे.
मी निर्भय आहे तो मला तारतो.
परमेश्वर हीच माझी शक्तीआहे.
तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.”
3-4 तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या
म्हणजे सुखी व्हाल
आणि म्हणाल,
“परमेश्वराची स्तुती असो.
त्याच्या नावाची उपासना करा.
त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”
5 परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण
त्याने महान कार्य केले आहे.
देवबद्दल ही वार्ता सर्व जगात
पसरवा, सर्व लोकांना हे कळू द्या.
6 सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा.
कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे.
तेव्हा आनंदी व्हा.
देवाचा बाबेलोनला संदेश
13 आमोजचा मुलगा यशया ह्याला देवाने बाबेलोनबद्दल दुख:दायक हा संदेश दिला. 2 देव म्हणाला,
“जेथे काहीही उगवत नाही अशा ओसाड डोंगरावर ध्वज उभारा.
लोकांना हाका मारा.
हातांनी खुणा करा.
त्यांना प्रतिष्ठितासाठी असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगा.”
3 देव पुढे म्हणाला, “मी त्या लोकांना इतरांपासून वेगळे केले आहे.
मी स्वतः त्याच्यावर सत्ता गाजवीन.
मी रागावलो आहे.
मी माझ्या योध्द्यांना त्या लोकांना शिक्षा करण्यासाठी, गोळा केले आहे.
मला ह्या सुखी लोकांचा अभिमान वाटतो.
4 “डोंगरावर मोठा आवाज होत आहे तो लक्षपूर्वक ऐका.
खूप माणसांच्या गोंगाटासारखा तो आवाज आहे
कारण पुष्कळ राज्यातील माणसे एकत्र येत आहेत.
सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या सैन्याला एकत्र बोलावीत आहे.
5 दूरच्या प्रदेशातून परमेश्वर व हे सैन्य येत आहे.
क्षितिजापलीकडून ते येत आहेत.
ह्या सैन्याचा उपयोग परमेश्वर आपला राग व्यक्त करण्याचे शस्त्र म्हणून करणार आहे.
हे सैन्य सर्व देशाचा नाश करील.”
6 परमेश्वराने ठरविलेला खास दिवस जवळ आला आहे. तेव्हा आक्रोश करा व शोक करा शत्रूकडून तुमची लूट होण्याची वेळ जवळ येत आहे. सर्व शक्तिमान देव हे घडवून आणील. 7 लोकांचे धैर्य गळेल. त्यांची भीतीने गाळण उडेल. 8 प्रत्येक माणूस भेदरलेला असेल. बाळंत होत असलेल्या स्त्रीप्रमाणे भितीने त्यांच्या पोटात गोळा उठेल. त्यांची तोंडे अग्नीप्रमाणे लाल होतील. सर्वांच्याच तोंडावर ही कळा पाहून ते आश्चर्यचकीत होतील.
देवाचा बाबेलोनविरूध्द् न्याय
9 पाहा परमेश्वराचा खास दिवस येत आहे. तो फारच भयानक दिवस असेल. देव फारच संतप्त होईल. आणि तो देशाचा नाश करील. ह्या देशातील पापी लोकांना देश सोडण्यास तो भाग पाडील. 10 आकाश अंधकारमय होईल. सूर्य, चंद्र, तारे प्रकाश देणार नाहीत.
11 देव म्हणतो, “मी जगात वाईट गोष्टी घडवून आणीन. पाप्यांना त्यांच्या पापांबद्दल मी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचे गर्वहरण करीन. दुसऱ्यांशी क्षुद्र वृत्तीने वागणाऱ्या बढाईखोरांचा तोरा उतरवीन. तेव्हा थोडेच लोक शिल्लक राहतील. 12 दुर्मिळ सोन्याप्रमाणे चांगले लोकही थोडेच राहतील आणि शुध्द् सोन्याहून त्यांची किंमत जास्त असेल. 13 माझ्या रागाने मी आकाशाला हलवेन व पृथ्वी तिच्या स्थानावरून ढळविली जाईल.”
हे सर्व, सर्वशक्तिमान परमेश्वर रागावेल तेव्हा घडून येईल. 14 त्या वेळी बाबेलोनमधील प्रजा घायाळ हरणाप्रमाणे पळ काढेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे ते सैरावैरा धावतील. प्रत्येकजण आपल्या देशात व आपल्या लोकात पळून जाईल. 15 पण शत्रू त्यांचा पाठलाग करील. आणि शत्रूच्या हाती सापडणाऱ्याला शत्रू तलवारीने ठार मारील. 16 त्यांची घरे लुटली जातील. त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील, त्यांच्या डोळ्यादेखत लहान मुलांना मरेपर्यंत मारले जाईल.
17 देव म्हणतो, “पाहा! बाबेलोनवर हल्ला करण्यासाठी मी मेदीचे सैन्य वापरीन. मेदीच्या सैन्याला चांदी, सोने दिले तरी ते हल्ला करीतच राहील. 18 ते बाबेलोनमधील तरूणावर हल्ला करून त्यांना मारतील मुलांना ते दया दाखविणार नाहीत. लहानग्यांची ते कीव करणार नाहीत. सदोम व गमोरा यांच्याप्रमाणे बाबेलोनचा संपूर्ण नाश होईल. देव सर्वनाश घडवून आणील मागे काहीही उरणार नाही.
19 “बाबेलोन सर्व देशांहून सुंदर आहे. बाबेलोनच्या रहिवाशांना आपल्या शहराबद्दल गर्व आहे. 20 पण बाबेलोनचे सौंदर्य टिकणार नाही. भविष्यकाळात लोक तेथे राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत. मेंढपाळ मेंढ्या चारण्यास तेथे येणार नाहीत. 21 वाळवंटातील जंगली प्राण्यांशिवाय तेथे कोणी राहणार नाही. बाबेलोनमधील घरे ओस पडतील. वटवाघुळांची व घुबडांची तेथे वस्ती असेल. बोकडांच्या रूपातील पिशाच्चे त्या घरात खेळतील. 22 बाबेलोनच्या भव्य आणि सुंदर इमारतीतून रानकुत्री आणि लांडगे केकाटतील, बाबेलोन नष्ट होईल. त्याचा शेवट जवळ आला आहे. मी त्याचा नाश लांबणीवर टाकू देणार नाही.”
शरीराचे ऐक्य
4 म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, (दास) तो तुम्हांला विनंती करतो, देवाकडून तुम्हांला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा. 2 नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा. आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा. 3 शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा. 4 एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलाविले होते. 5 एक प्रभु, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, 6 एक देव आणि पिता जो सर्वांचा मालक आहे. जो प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करतो आणि जो प्रत्येकात आहे,
7 ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणांस प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे. 8 यासाठीच पवित्र शास्त्र असे म्हणते.
“जेव्हा तो उच्चस्थानी चढला,
तेव्हा त्याने युद्धकैद्दांस आपणांबरोबर नेले
आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.” (A)
9 आता, जेव्हा ते असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या खालील प्रदेशात सुध्दा उतरला असाच होतो की नाही? 10 जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याला भरता याव्यात. 11 आणि त्याने स्वतःच काही लोकांना प्रेषित, इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्तिक, तर दुसऱ्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली. 12 ख्रिस्ताने त्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिकरीतीने ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. 13 आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोंचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते.
14 हे असे आहे म्हणून यापूढे आपण लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्त्व देते, अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत 15 त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे. 16 ज्यावर सर्व शरीर आधारित आहे, ते आधार देणाऱ्या प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले असते. आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, संपूर्ण शरीर वाढते व प्रीतीत बळकट होत जाते.
अशा मार्गाने तुम्ही जगावे
17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो: ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. 18 त्यांची अंतःकरणे अंधकारमय अशा स्थितीत आहेत आणि देवापासून जे जीवन येते त्यापासून ते वेगळे झाले आहेत. कारण ते अजाण आहेत, आणि त्याची अंतःकरणे कठीण झाली आहेत. 19 त्यांना आता कशाचीच लाज वाटत नाही व त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेच्या सवयीला वाहून घेतले आहे. 20 परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही. आणि 21 मला यात काही शंका नाही की, तुम्ही त्याच्याविषयी ऐकले आहे. आणि येशूमध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे त्याचे अनुयायी म्हणून ते सत्य तुम्ही शिकला असाल. 22 तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी, तुम्हांला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करुन घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे. 23 यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि 24 नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे.
25 म्हणून लबाडी करु नका! “प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे.” 26 “तुम्ही रागवा पण पाप करु नका.” सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. 27 तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका. 28 जो कोणी चोरी करील असेल तर त्याने यापुढे चोरी करु नये. उलट, त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.
29 तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दु:खी करु नका. कारण तुम्ही आत्म्याबरोबर देवाची संपत्ती म्हणून तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारलेले असे आहात. 31 सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. 32 एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
2006 by World Bible Translation Center