Old/New Testament
सिरीयावर संकट
7 यहुदाचा राजा आहाज हा योथामचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र. आहाजच्याकारकिर्दीत रसीन हा सिरीयावर राज्य करीत होता तर रमाल्याचा पुत्र पेकह हा इस्राएलचा राजा होता. एकदा रसीन व पेकह हे दोघे यरूशलेमवर चाल करून गेले. पण त्यांना ते शहर काही जिंकता आले नाही.
2 “सिरीया आणि एफ्राइम (इस्राएल) यांच्या सैन्यांची एकजूट झाली आहे आणि त्यांनी एकत्र तळ ठोकला आहे,” असे दाविदच्या वंशजाला कळविण्यात आले. जेव्हा राजा आहाज ह्याला हा. संदेश कळला तेव्हा तो व त्याची प्रजा अतिशय घाबरून गेले. रानातील वृक्ष वाऱ्याने ज्याप्रमाणे कापतात तशीच भीतीने त्यांची स्थिती झाली.
3 तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या डोहाला पाणी मिळते तेथे तू व तुझा मुलगा शआर-याशूब असे दोघे आहाजला भेटा व त्याच्याशी बोला.
4 “आहाजला सांगा, ‘सावध राहा पण शांत राहा भिऊ नकोस. रसीन आणि रमाल्याचा पुत्र ह्यांना घाबरू नकोस. ते दोघे जळलेल्या काड्यांप्रमाणे आहेत. पूर्वी त्यांच्यात आग होती पण आता ते नुसते धुमसताहेत! रसीन, सिरीया आणि रमाल्याचा पुत्र हे खूप चिडले आहेत. 5 त्यांनी तुझ्याविरूध्द कट केला आहे. ते म्हणाले, 6 “आपण चाल करून जाऊ आणि यहुदाविरूध्द लढून यहुदा जिंकू. आपण आपापसात यहुदाची वाटणी करू आणि ताबेलाच्या पुत्राला यहुदाच्या गादीवर बसवू. असा त्यांचा बेत आहे.”’”
7 “पण त्यांचा बेत सिध्दीस जाणार नाही. असे काही घडणार नाही. असे माझा परमेश्वर प्रभू म्हणाला. 8 आता एफ्राइम (इस्राएल) एक राष्ट्र आहे पण 65 वर्षांनी ते राष्ट्र म्हणून राहाणार नाही. तेव्हा, जोपर्यंत रसीन हा दमास्कसचा राजा आहे 9 आणि एफ्राईमची (इस्राएलची) राजधानी शोमरोन येथे रमाल्याचा पुत्र राज्य करीत आहे तोपर्यंत, रसीन व रमाल्याचा पुत्र यांनी केलेला बेत सिध्दीस जाणार नाही. तू जर ह्या संदेशावर विश्वास ठेवला नाहीस तर तुझी लोकांनीही तुझ्यावर विश्वास ठेवू नये.”
इम्मानुएल-देव आमच्या बरोबर आहे
10 परमेश्वर आहाजशी बोलतच राहिला 11 परमेश्वर म्हणाला, “ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत हे सिध्द् करण्यासाठी तू काही निशाणी मागून घे. तू तुला हवी असलेली निशाणी माग. ती निशाणी पाताळातून येवो अगर आकाशातून.”
12 पण आहाज म्हणाला, “पुरावा म्हणून मी कोठलीही निशाणी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”
13 तेव्हा यशया म्हणाला, “हे दाविदाच्या वंशजा, लक्षपूर्वक ऐक. तू लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहातोस. हे पुरेसे नाही म्हणून आता तू देवाच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेस का? 14 तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वतःहून चिन्ह देईल:
त्या कुमारिकेकडे पाहा [a] ती गर्भवती आहे.
ती मुलाला जन्म देईल.
ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
15 इम्मानुएल मध व लोणी खाईल.
अशा रीतीने जगत असतानाच ह्यातूनच तो चांगले करावे व वाईट सोडावे हे शिकेल.
16 पण तो चांगल्या वाईट गोष्टींतील फरक कळण्याइतका मोठा होण्याआधी एफ्राइम (इस्राएल)
व सिरीया हे वैराण बनलेले असतील.
तुला आता त्या दोन राजांची भीती वाटते.
17 “पण खरे म्हणजे तू परमेश्वराला भ्यायला पाहिजेस. का? कारण परमेश्वर तुझ्या वाट्याला काही काळ क्लेश देईल. ते क्लेश यहूदातून एफ्राइमच्या निघून जाण्याच्या वेळेप्रमाणे असतील, त्यानंतर असे क्लेश आताच तुमच्या वाट्याला येतील. तुझ्या वडिलांच्या वंशजांना आणि तुझ्या प्रजेला हे क्लेश सोसावे लागतील. देव काय करील बरे? देव अश्शूरच्या राजाला तुझ्याविरूध्द् लढण्यास भाग पाडील.
18 “त्यावेळी परमेश्वर ‘माशा’ व ‘मध माश्यांना’ बोलावील. 19 वाळवटांतील झऱ्याजवळच्या खडकाळ दऱ्यांत, झाडांझुडपांत व पाणथळ जागांत ते आपला तळ ठोकतील. 20 परमेश्वर अश्शूर देशाचा उपयोग यहुदाला शिक्षा करण्यासाठी करून घेईल. अश्शूर देशाला भाडोत्री म्हणून घेऊन त्याचा उपयोग वस्तऱ्याप्रमाणे केला जाईल. देव जणू काही ह्या वस्तऱ्याचा उपयोग करून यहुदाचे डोके, पाय भादरेल आणि त्याची हजामतही करील.
21 “त्यावेळी प्रत्येक माणूस एक कालवड व दोन मेंढरे पाळू शकेल. 22 त्या माणसाला पुरेल एवढे लोणी त्याला त्यांच्या दुधापासून मिळेल. देशातील प्रत्येक माणूस त्या वेळी लोणी व मध खाऊन राहील. 23 आता ह्या देशातील भूमीवर एक हजार द्राक्षवेली असलेले द्राक्षमळे आहेत. प्रत्येक द्राक्षवेलीची किंमत एक हजार चांदीची नाणी एवढी आहे. 24 पण हे द्राक्षमळे काट्यांनी व तणांनी भरून नष्ट होतील. ह्या भूमीत जंगल माजेल. व तिचा उपयोग शिकारीसाठीच होईल. 25 एकेकाळी ज्या टेकड्यांवर लोक शेती करून धान्य पिकवीत होते त्या टेकड्यांवर काट्याकुट्यांचे रान माजेल. कोणीही माणूस तिकडे फिरकणार नाही. फक्त मेंढ्या व गुरेढोरे तिकडे जातील.”
अश्शूर लवकरच येईल
8 परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी गुंडाळी घे आणि टाकाने त्यावर पुढील शब्द लिही, ‘महेर-शालाल-हाश-बज.’ (याचा अर्थ: ‘लवकरच येथे लूटालूट व चोऱ्या होतील.’)”
2 साक्षीदार म्हणून विश्वास टाकता येईल अशा काही लोकांना मी गोळा केले. (ते होते उरिया हा याजक व यबरेख्याचा मुलगा जखऱ्या) त्यांच्या समोरच मी लिहिले. 3 नंतर मी संदेष्ट्रीशी समागम केला. ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. “परमेश्वराने मला त्याचे नाव “महेर-शालाल-हाश-बज” असे ठेवण्यास सांगितले. 4 कारण तो मुलगा “आई-बाबा” असे बोलायला लागण्यापूर्वीच देव दमास्कसची व शोमरोनची सर्व धनसंपत्ती काढून अश्शूरच्या राजाला देईल.
5 पुन्हा एकदा परमेश्वर माझ्याशी बोलला. 6 माझा प्रभु, म्हणाला, “हे लोक संथ वाहणारे शिलोहाचे पाणी नाकारतात. ते रसीन व रमाल्याचा पुत्र (पेकह) यांच्या सहवासात आनंद मानतात.” 7 पण मी, परमेश्वर, अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व शक्तीनीशी तुमच्यावर आक्रमण करण्यास भाग पाडीन. युफ्राटिस नदीच्या लोंढ्याप्रमाणे ते येतील. पुराचे पाणी चढत जाऊन नदीच्या किनाऱ्यावरून बाहेर ओसंडून वाहते तसेच ते येतील. 8 नदीचा काठ ओलांडून बाहेर पसरलेल्या पाण्याप्रमाणे अश्शूरचे सैन्य सर्व यहुदाभर पसरेल. ते यहुदाच्या गळ्यापर्यंत चढेल व जवळजवळ यहुदाला बुडवून टाकील.
इम्मानुएल, हे पुराचे पाणी सर्व देशाला व्यापेपर्यंत पसरत राहील.
9 सर्व राष्ट्रांनो, युध्दा्ची तयारी करा,
तुम्ही पराभूत व्हाल,
दुरवरच्या सर्व देशांनो, ऐका!
लढाईची तयारी करा,
तुमचा पराभव होईल.
10 लढण्याचे बेत करा,
ते सिध्दी्स जाणार नाहीत.
तुम्ही तुमच्या सैन्याला हुकूम करा,
पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
का? कारण देव आमच्या पाठीशी आहे.
यशयाला इशारा
11 परमेश्वर माझ्याशी त्याच्या महान सामर्थ्यानिशी बोलला मी ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नये. असे परमेश्वराने मला बजावले. परमेश्वर म्हणाला, 12 “दुसरे त्यांच्याविरूध्द् कट करीत आहेत, असे ते म्हणत आहेत. तू त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस, ज्या गोष्टींना हे लोक घाबरतात, त्या गोष्टींना घाबरू नकोस. त्या गोष्टींची मुळीच भीती बाळगू नकोस.”
13 सर्वशक्तिमान परमेश्वर हाच असा आहे की त्याचे भय मानावे. त्याचाच फक्त आदर करावा. त्यालाच फक्त पवित्र मानावे. 14 तु जर परमेश्वराचा मान राखलास, तो पवित्र आहे असे मानलेस, तर तो तुला अभय देईल, पण जर तू त्याचा अनादर केलास, तर देव रस्त्यावरील दगडाप्रमाणे होईल आणि तुम्ही लोक त्यावर ठेचकाळून पडाल. इस्राएलच्या दोन घराण्यांना तो दगड अडखळवतो. यरूशलेमच्या सर्व लोकांचा परमेश्वरच सापळा आहे. 15 (पुष्कळ माणसे ह्याच अडथळ्याला अडखळून पडतील व त्यांची हाडे मोडतील. ते सापळ्यात अडकतील व पकडले जातील.)
16 यशया म्हणाला, “करार करा व त्यावर शिक्कामोर्तब करा माझ्या शिकवणुकीचे भविष्यकाळासाठी जतन करा. माझ्या शिष्यांसमोर हे करा.” 17 तो करार असा:
परमेश्वराने आपल्याला मदत करावी म्हणून मी वाट पाहीन.
याकोबाच्या वंशजांची परमेश्वराला लाज वाटते.
तो त्यांच्याकडे पाहण्याचे नाकारतो.
पण मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन.
तो आम्हाला वाचवील.
18 माझी मुले आणि मी इस्राएल लोकांकरिता निशाणी आणि पुरावे आहोत. सीयोनच्या डोंगरावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराने आम्हाला पाठविले आहे.
19 काही लोक “काय करावे ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे यांना विचारा” असे म्हणतात. (ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे कुजबुजतात व आपल्याला गुपित समजते असे लोकांना वाटावे म्हणून पक्षांप्रमाणे बोलतात.) पण मी सांगतो की “तुम्ही मदतीसाठी देवाला हाक मारावी. ते ज्योतिषी आणि जादूटोणा करणारे मृतांची मदत घेतात. सजीवांनी मृतांची मदत का घ्यावी?” 20 तुम्ही शिकवणुकीप्रमाणे वागा व कराराचे पालन करा. तुम्ही ह्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल. (चुकीच्या आज्ञा म्हणजे ज्योतिषी व जादूटोणा करणारे ह्यांनी दिलेल्या आज्ञा होत. त्या आज्ञांना काही अर्थ नाही. त्या आज्ञांचे पालन करून तुम्हाला काहीही मिळणार नाही.) 21 तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल तर देशावर संकटे येतील आणि उपासमार होईल. लोकांची उपासमार झाल्यावर लोक संतापतील व ते राजा आणि त्याचे देव ह्यांच्याविरूध्द् बोलू लागतील. मग मदतीसाठी देवाकडे पाहतील. 22 जर त्यांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले तर त्यांना संकटे आणि निराशेचा अंधकार दिसेल, बळजबरीने देश सोडून जावे लागणाऱ्या लोकांचे अतीव दु:ख त्यांना दिसेल आणि जे लोक या अंधकारात अडकतील त्यांना आपली सुटका करून घेता येणार नाही.
मरणाकडून जीवनाकडे
2 पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता. 2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे. 3 एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
4 पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले. 5 आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.) 6 देवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. 7 देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.
8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. 9 आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये. 10 कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.
ख्रिस्तामध्ये एक
11 म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते. 12 आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला. 13 पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.
14 कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. 15 त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे. 16 आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल. 17 म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, 18 कारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.
19 यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात. 20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. 21 संपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. 22 त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
2006 by World Bible Translation Center