Old/New Testament
3 माझे म्हणणे समजून घ्या. यहुदा व यरूशलेम ज्यावर अवलंबून आहेत अशा सर्व गोष्टी तो प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर काढून घेईल. देव त्यांची भाकरी व पाणी बंद करील. 2 तो (देव) वीरांचा व मोठ्या योध्द्या्ंना दूर करील. न्यायासनावर बसणारे, भोंदू संदेष्टे, मांत्रिक व तथाकथित वडीलधारी मंडळी इत्यादींना दुसरीकडे नेऊन ठेवील. 3 देव सैनिक शासक व शासनकर्ते यांना दूर करील. निपुण सल्लागार व जादूटोणा करून भविष्यकथन करण्याचा प्रयत्न करणारे चाणाक्ष लोक यांनाही दूर ठेवील.
4 देव म्हणतो, “तरूण मुले नेतेपदी बसतील अशी परिस्थिती मी निर्माण करीन. 5 प्रत्येकजण दुसऱ्याविरूध्द उभा राहील, लहान थोरांचा मान राखणार नाहीत व सामान्य प्रतिष्ठितांचा आदर करणार नाहीत.”
6 त्या वेळी एखादा उठेल व आपल्या घरातील एखाद्या भावाला पकडेल व त्याला म्हणेल “तुझ्याजवळ अंगरखा आहे, तर मग ह्या विध्वंस झालेल्या अवशेषांवर तूच नेता होशील.”
7 पण तो भाऊ उभा राहील व म्हणेल, “माझ्याच घरात पुरेसे अन्न, वस्त्र नाही. मी तुम्हाला काय मदत करू शकत नाही? तुम्ही मला तुमचा नेता करू नका.”
8 हे घडेल कारण यरूशलेम अडखळले आहे व त्याने चूक केली आहे. यहुदाने देवाला अनुसरायचे थांबवले आणि त्याचे पतन झाले. यरूशलेम व यहुदा यांची वाणी आणि कृती परमेश्वराच्या विरूध्द् आहे. परमेश्वराच्या तेजस्वी डोळ्यांना हे सर्व स्पष्टपणे दिसत आहे.
9 चुकीची कृत्ये केल्याची अपराधी भावना लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपल्या पापांबद्दल त्यांना गर्व वाटत आहे. ते सदोम शहरातील रहिवाशांसारखे झाले आहेत. आपली पापे कोण पाहत आहे ह्याची त्यांना पर्वा नाही. हे त्यांच्या दृष्टीने फारच वाईट आहे. त्यांनी स्वतःला आपत्तीत लोटले आहे.
10 सज्जनांना सांगा की त्यांचा उत्कर्ष होईल. सत्कृत्यांचे फळ त्यांना मिळेल. 11 पण दुर्जनांची काही धडगत नाही. त्यांना खूप त्रास होईल. त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना सजा मिळेल. 12 लहान बालके मोठ्यांचा पराभव करतील. अबलांचे राज्य येईल.
माझ्या लोकांनो, तुमच्या मार्गदर्शकांनी तुम्हाला योग्य मार्गापासून परावृत्त केले व चुकीच्या मार्गाने नेले.
देवाचा स्वतःच्या लोकांबद्दल निर्णय
13 परमेश्वर स्वतःच लोकांचा न्यायनिवाडा करील. 14 वडीलधारी मंडळी व नेते यांनी केलेल्या कृत्यांविरूध्द् परमेश्वर न्याय देईल.
परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोकांनी द्राक्षांची बाग(यहुदा) जाळली आहे. तुम्ही गरिबांच्या वस्तू बळकावल्या व स्वतःच्या घरात भरल्या. 15 माझ्या लोकांना दुखवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? गरिबांना धुळीत मिळवायचा तुम्हाला काय हक्क आहे?” माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
16 परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”
17 माझा प्रभु सीयोनच्या स्त्रियांच्या डोक्यांत व्रण करील. त्यांचे सर्व केस गळून पडतील. 18-23 त्या वेळी परमेश्वर ह्या स्त्रियांना ज्यांचा अभिमान वाटतो अशा सर्व गोष्टी म्हणजे पैजण, चंद्रसूर्याप्रमाणे असलेले हार, कर्णभूषणे, तोडे, बुरखे, गळपट्टे, पायातल्या साखळ्या, कमरपट्टे, अत्तरांच्या बाटल्या, ताईत, विशेष प्रकारच्या अंगठ्या, नथी, उंची रेशमी वस्त्रे, शेले व शाली, बटवे, आरसे, सुती वस्त्रे फेटे, लांब शाली काढून घेईल.
24 आता या स्त्रियांजवळ मधुर सुवासाची अत्तरे आहेत पण देव त्यांना शिक्षा करील त्या वेळी त्या अत्तरांना बुरशी येऊन कुजट घाण येईल. आता या स्त्रिया कमरपट्टे वापरतात पण त्या ऐवजी दोऱ्या वापरण्याची वेळ त्यांच्यावर येईल. आता त्या विविध केशरचना करतात पण नंतर त्यांच्या डोक्यावर केसच नसतील. त्यांचे केशवपन होईल. त्यांच्या मेजवान्यांसाठी असलेल्या विशेष वस्त्रप्रावरणांऐवजी त्यांना जे कपडे घालावे लागतील त्यातून त्यांची वाईट स्थिती दिसून येईल. त्यांच्या चेहेऱ्यावरील सौंदर्यखुणांच्या जागी भाजल्याचे डाग पडतील.
25 त्याच वेळी लढाईत तुमची माणसे तलवारीने मारली जातील. वीर लढाईत कामी येतील. 26 वेशीजवळ असलेल्या सभा-संमेलनाच्या जागी शोककळा पसरेल. चोर व लुटारूंनी सर्वस्व लुटलेल्या स्त्रीप्रमाणे यरूशलेम नगरी एकटीच बसून शोक करेल.
4 त्यावेळी सात स्त्रिया एका माणसाला पकडून म्हणतील, “आम्ही आमचे अन्न व वस्त्र स्वतः मिळवू. फक्त तू आमच्याशी लग्न कर. तुझे नाव आम्हाला लावू दे. कृपया आमच्या अब्रूचे रक्षण कर.”
2 ह्याच वेळी परमेश्वराचे रोपटे (यहुदा) खूप सुंदर व महान होईल. त्या वेळी इस्राएलमध्ये राहणाऱ्यांना भूमीतून पिकणाऱ्या सर्व गोष्टींचा अभिमान वाटेल. 3 त्यावेळी सीयोन व यरूशलेम येथे जे लोक राहत असतील त्यांना पवित्र मानले जाईल. देवाची कृपा झाल्याने त्यांची नावे खास यादीत समाविष्ट केली गेली आहेत. त्या सर्व लोकांच्या बाबतीत हे घडेल. त्या सर्व यादीतील लोकांना जिवंत राहण्याची संमत्ती दिली जाईल.
4 सीयोनमधील स्त्रियांचे रक्त परमेश्वर धुवून टाकील. यरूशलेमलाही परमेश्वर निर्मळ करील. देव न्यायीपणाचा आत्मा वापरून योग्य न्याय करील आणि प्रत्येक गोष्ट जळणाऱ्या आत्म्याद्वारे शुध्द् करील. 5 ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द् करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल. 6 हे आच्छादन म्हणजे सुरक्षित ठिकाण असेल. ते माणसाचा उन्हापासून बचाव करील तसेच सर्व प्रकारच्या पुरांपासून आणि पावसापासून रक्षण करण्यासाठी लपून बसण्याची ती सुरक्षित जागा असेल.
एकमेकांना मदत करा
6 बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण ते सौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वतःकडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये. 2 एकमेकांची ओझी वाहा. अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3 कारण जर कोणी स्वतःला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी, तर तो स्वतःची फसवणूक करुन घेतो. 4 प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वतःची इतरांबरोबर तुलना न करता स्वतःविषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल. 5 कारण प्रत्येकाला त्याची स्वतःची जबाबदारी असलीच पाहिजे.
जीवन हे शेत पेरणान्यासारखे आहे
6 ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.
7 तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल. 8 जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. पण जो आत्म्यात बीज पेरतो, त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. 9 जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करु नये. कारण आपण आळस केला नाही, तर योग्य वेळी आपणांस आपले पीक मिळेल. 10 तर मग ज्याप्रमाणे आपणांस संधि मिळेल, तसे सर्व लोकांचे आणि विशेषतः ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करु या.
Paul Ends His Letter
11 पाहा किती मोठे अक्षरे मी लिहिलीत. 12 ज्यांना बाह्य देखावा करणे आवडते, ते तुम्हांला सुंता करुन घेण्याची सक्ती करतात. परंतु ते अशासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये. 13 परंतु सुंता करुन घेणारेही नियमशास्त्र पाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरुन फुशारकी मारता यावी.
14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगू नये. त्याच्या द्वारे मला जग वधस्तंभावर खिळलेले, व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. 15 कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवी उत्पति हीच महत्वाची आहे. 16 तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दया असो.
17 आता इथून पुढे मी एवढेच मागतो की, यापुढे कोणीही मला त्रास देऊ नये, कारण आधीच मी येशूच्या खुणा माझ्या शरीरावर धारण केलेल्या आहेत.
18 बंधूनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center