Old/New Testament
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतीगीत
140 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव
दुष्टांपासून माझे रक्षण कर.
2 ते लोक वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत आहेत.
ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात.
3 त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत.
जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.
4 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव.
वाईट लोकांपासून माझे रक्षण कर.
ते लोक माझा पाठलाग करतात,
आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
5 त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला.
त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले.
त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.
6 परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
7 परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस.
तू माझा रक्षणकर्ता आहेस.
लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिरस्त्राणासारखा तू आहेस.
8 परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस.
त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस.
9 परमेश्वरा, माझ्या शत्रूंना जिंकू देऊ नकोस.
ते लोक वाईट योजना आखत आहेत.
पण त्या वाईट गोष्टी त्यांच्याच बाबतीत घडू दे.
10 त्यांच्या डोक्यावर निखारे ओत.
माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे.
त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्ड्यात फेकून दे.
11 परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस.
त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
12 परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे.
देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
13 परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील.
चांगले लोक तुझी उपासना करतील.
दावीदाचे एक स्तुतिगीत
141 परमेश्वरा, मी तुला मदतीसाठी हाक मारली.
मी तुझी प्रार्थना करतो तेव्हा तू लक्ष दे
त्वरा कर आणि मला मदत कर.
2 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर.
ती जळणाऱ्या धूपाप्रमाणे असू दे.
ती संध्याकाळच्या अर्पणा प्रमाणे असू दे.
3 परमेश्वरा, मी जे बोलतो त्यावर नियंत्रण ठेवायला मला मदत कर.
मी बोलतो त्यावर लक्ष ठेवायला मला मदत कर.
4 माझ्यात वाईट गोष्टी करायची इच्छा उत्पन्न होऊ देऊ नकोस.
वाईट लोक चुकीच्या गोष्टी करतात तेव्हा मला त्यांच्यात जाऊ देऊ नकोस.
वाईट लोकांना ज्या गोष्टी करायला आवडते त्यात मला भाग घेऊ देऊ नकोस.
5 चांगला माणूस माझ्या चुका दुरुस्त करु शकतो.
तो त्याचा दयाळूपणाच होईल.
तुझे भक्त माझ्यावर टीका करु शकतात.
त्यांना करण्यासाठी ती चांगली गोष्ट असेल.
मी ती स्वीकारीन परंतु वाईट लोक ज्या वाईटगोष्टी करतात
त्यांच्याविरुध्द मी नेहमी प्रार्थना करीन.
6 त्यांच्या राज्यकर्त्यांना शिक्षा होऊ दे.
नंतर लोकांना कळेल की मी खरे बोलत होतो.
7 लोक जमीन खणतात आणि नांगरतात आणि
सभोवताली घाण टाकतात.
त्याच रीतीने हाडे त्यांच्या थडग्यांभोवती विखरुन टाकली जातील.
8 परमेश्वरा, माझ्या प्रभु मी तुझ्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो.
मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. कृपा करुन मला मरु देऊ नको.
9 वाईट लोक माझ्यासाठी सापळे रचतात.
मला त्यांच्या सापळ्यात पडू देऊ नकोस त्यांना मला पकडू देऊ नकोस.
10 वाईट लोकांना त्यांच्याच सापळ्यात पडू दे
आणि मला कसलीही इजा न होता दूर जाऊ दे.
दावीदाचे मास्कील तो गुहेत असतानाची प्रार्थना.
142 मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन.
मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
2 मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन.
मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.
3 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे
मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे.
पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
4 मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत.
पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही.
मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.
5 म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो.
परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस.
6 परमेश्वरा, माझी प्रार्थना
ऐक मला तुझी फार गरज आहे.
जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव.
ते लोक मला फार भारी आहेत.
7 हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर,
म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन.
चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील
कारण तू माझी काळजी घेतलीस.
मंडळीला मदत करण्यासाठी आध्यात्मिक दाने वापरा
14 प्रीतीसाठी प्रयत्न करा. आणि आध्यात्मिक दानांची विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा. 2 ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता माणसांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो. कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. आत्म्याच्या द्वारे तो गुढ गोष्टी बोलतो. 3 परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती, उपदेश याविषयी बोलतो, 4 ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करुन घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे (देवासाठी बोलण्याचे) दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.
5 आता तुम्ही सर्वांनी भाषांमध्ये बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याहीपेक्षा जर तुम्हांला संदेश देता आले तर मला अधिक आवडेल. जो संदेश देतो, (देवासाठी बोलतो) तो भाषा बोलणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण भाषा बोलणारा हा संदेश देणाऱ्यासारखाच (देवासाठी बोलणाऱ्यासारखाच) आहे, जर त्याने जी भाषा तो बोलतो तिचा अर्थ सांगितला तर, त्याद्वारे संपूर्ण मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या बळकट होते.
6 आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का? 7 हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे: जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल? 8 आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल?
9 त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल. 10 नि:संशय, जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत, व कोणतीही अर्थविरहीत नाही. 11 म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल. 12 नेमके तेच तुम्हांलाही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवीत म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यत्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
13 म्हणून, जो दुसऱ्या भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. 14 कारण जर मी दुसऱ्या भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझे मन रिकामे राहते. 15 मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धिनेही प्रार्थना करीन. 16 कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो फक्त ऐकणारा सामान्य तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही. 17 आता तू धन्यवाद देत असलास हे जरी चांगले असले तरी दुसरी व्यक्ति आध्यात्मिकदृष्ट्या बलवान झालेली नसते.
18 मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलू शकतो ज्याचे दान मला आहे, 19 परंतु सभेत इतरांनाही बोध करता यावा म्हणून इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माझ्या मनाप्रमाणे पाच शब्द सांगणे मी पसंत करतो.
20 बंधूनो, तुमच्या विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.
2006 by World Bible Translation Center