Old/New Testament
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
31 परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे,
माझी निराशा करु नकोस
मला वाचव व माझ्यावर दया कर.
2 देवा, माझे ऐक त्वरीत येऊन
मला वाचव माझा खडक हो.
माझे सुरक्षित स्थळ हो.
माझा किल्ला हो, माझे रक्षण कर.
3 देवा, तू माझा खडक आहेस
तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर.
4 माझ्या शत्रूंनी माझ्यासमोर सापळा रचला आहे.
त्यांच्या सापळ्यापासून मला वाचव तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
5 परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस.
मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले.
मला तार!
6 जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो.
मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
7 देवा, तुझा दयाळूपणा मला आनंदी बनवतो
तू माझे कष्ट पाहिले आहेस.
तुला माझ्या संकटाची जाणीव आहे.
8 तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस
तू मला त्यांच्या सापळ्यातून मुक्त करशील.
9 परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत.
म्हणून माझ्यावर दया कर.
मी इतका दुखी: कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहेत,माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
10 माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे
माझी वर्षे सुस्कारा टाकण्यात निघून जाणार आहेत.
माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत.
माझी शक्ती मला सोडून जात आहे.
11 माझे शत्रू माझा तिरस्कार करतात
आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात
माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात
तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
12 मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे
लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
13 लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो.
ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
14 परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तूच माझा देव आहेस.
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे.
मला माझ्या शत्रूंपासून वाचव.
काही लोक माझा पाठलाग करीत आहेत
त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर.
माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
17 परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली
कारण मला निराश व्हायचे नव्हते.
वाईट लोक निराश होतील.
ते मुकाटपणे थडग्यात जातील.
18 ते वाईट लोक गर्व करतात.
आणि चांगल्या माणसांविषयी खोटे सांगतात.
ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत
परंतु खोटं बोलणारे त्यांचे ओठ लवकरच गप्प होतील.
19 देवा, तू तूझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टी लपवून ठेवल्या आहेस.
तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस.
20 वाईट लोक चांगल्या माणसांना त्रास देण्यासाठी एकत्र येतात.
ते दुष्ट लोक भांडणे सुरु करण्याचा प्रयत्न करतात.
परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस आणि त्यांचे रक्षण करतोस.
तू त्यांचे तुझ्या निवाऱ्यात रक्षण करतोस.
21 परमेश्वर धन्य आहे! त्याने त्याचे माझ्यावरील खरे प्रेम,
शहर शत्रूंनी वेढलेले असताना अत्यंत आश्चर्यकारक रीतीने व्यक्त केले.
22 मी घाबरलो आणि म्हणालो, “देव मला पाहू शकणार नाही अशा जागेत मी आहे.”
परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस.
23 देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा.
परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो.
परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात
त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.
24 परमेश्वराच्या मदतीची वाट बघत
असणाऱ्या लोकांनो बलवान व धैर्यवान व्हा.
दावीदाचे एक स्तोत्र.
32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
आहे तो अत्यंत सुखी आहे
ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.
3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.
5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
या विषयी मार्गदर्शन करीन.
मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
16 पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या व तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले, 17 पौलाने एका शताधिपतीला बोलाविले आणि सांगितले या तरुणाला सरदारकडे घेऊन जा. कारण सरदाराला सांगण्यासारखे याच्याकडे काहीतरी आहे. 18 मग त्याने त्या मुलाला घेतले व सरदाराकडे गेला व त्याला म्हणाला, “कैदेत असलेल्या पौलाने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे घेऊन जायला सांगितले. कारण हा तुम्हांला काही तरी सांगणार आहे.”
19 सरदाराने त्या तरुणाचा हात धरुन बाजूला नेले आणि तो त्याला म्हणाला, “तू मला काय सांगणार आहेस?”
20 तो मुलगा म्हणाला, “यहूदी लोकांनी असे ठरविले आहे की, पौलाला घेऊन तुम्हांला उद्या धर्मसभेपुढे यायला सांगायचे, व अशा बहाण्याने त्याला आणायचे की, जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकाशी करायची आहे. 21 पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका! कारण चाळीस लोकांडून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की, जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही, म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहेत.”
22 तू मला ह्यांविषयी सांगितले आहेस, “हे कोणाला सांगू नको!” असे म्हणून सरदारने त्याला जाण्याची आज्ञा केली.
पौलाला कैसरीया येथे पाठवितात
23 मग सरदाराने दोघा शाताधिपतींना बोलाविले, आणि म्हणाला, “दोनशे शिपाई कैसरीयाला जाण्यासाठी तयार ठेवा. तसेच सत्तर घोडेस्वार व दोनशे भालेदार रात्री नऊ वाजता येथून जाण्यासाठी तयार ठेवा! 24 खोगीर घातलेला घोडा पौलासाठी तयार ठेवा. आणि त्याला राज्यपाल फेलीक्स यांच्याकडे सुखरुप न्या.” 25 सरदाराने एक पत्र लिहिले. त्यात असे लिहिलेले होते:
26 क्लौद्य लुसिया याजकडून,
राज्यपाल फेलिक्स महाराज यांस,
सलाम.
27 या मनुष्याला यहूदी लोकांनी धरले होते. ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते. पण तेवढ्यात माझ्या शिपायांसह मी तेथे गेलो व त्याला सोडविले. तो रोमी नागारिक आहे हे समजल्यावरुन मी त्याची सुटका केली. 28 यहूदी लोक त्याच्यावर का दोषारोप करीत आहेत हे कळावे म्हणून मी त्याला धर्मसभेपुढे घेऊन गेलो. 29 यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नावरुन त्यांनी त्याला दोषी ठरविले हे मला दिसून आले. पण त्याच्यावर असा कोणताही आरोप नव्हता, ज्याची शिक्षा मरणदंड किंवा तुरुंगवास होईल. 30 जेव्हा या मनुष्याला जिवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले.
31 शिपायांनी त्यांना मिळालेल्या हुकुमाचे पालन केले. ते पौलाला घेऊन रात्रीच अंतिपत्रिसास गेले. 32 दुसऱ्या दिवशी घोडेस्वर पौलासोबत कैसरियास गेले. व शिपाई किल्ल्यात परतले. 33 जेव्हा पौल व घोडेस्वार कैसरियास पोहोंचले, तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले. व पौलाला त्याच्या स्वाधीन केले.
34 राज्यपालाने ने पत्र वाचले, व पौल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की, तो किलिकीयाचा आहे, तेव्हा तो म्हणाला, 35 “तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.” पौलाला हेरोदाच्या [a] राजवड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूमराज्यपालाने दिला.
2006 by World Bible Translation Center