Old/New Testament
34 नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला:
2 “शहाण्या माणसांनो मी काय सांगतो ते ऐका.
हुशार माणसांनो, माझ्याकडे लक्ष द्या.
3 तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते
आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात.
4 तेव्हा आपण आता या मुद्यांची तपासणी करु या आणि काय योग्य आहे याचा निर्णय करु या.
काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या.
5 ईयोब म्हणतो, ‘मी, ईयोब निष्पाप आहे,
आणि देव माझ्या बाबतीत न्यायी नाही.
6 मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो.
मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले.’
7 “ईयोबसारखा आणखी कुणी आहे का?
तुम्ही ईयोबची मानहानी केली तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो.
8 ईयोब वाईटांशी मैत्री करतो
त्याला दुष्टांबरोबर राहायला आवडते.
9 मी असे का म्हणतो? कारण ईयोब म्हणतो की,
‘माणूस जर देवाला खुश करायला लागला तर त्याला त्यापासून काहीही मिळणार नाही.’
10 “तुम्हाला समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका.
जे वाईट आहे ते देव कधीही करणार नाही.
तो सर्वशक्तिमान देव कधीच चुकणार नाही.
11 एखादा माणूस जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करील.
देव लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
12 हे सत्य आहे देव कधीही चुकत नाही,
सर्वशक्तिमान देव नेहमीच न्यायी असतो.
13 देवाला कुणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही.
सगळ्या जगाची काळजी देवावर कुणी सोपवली नाही.
सारे काही देवानेच निर्माण केले आहे
आणि सारे त्याच्याच नियंत्रणाखाली आहे.
14 जर देवाने पृथ्वीवरील लोकांचा आत्मा
आणि श्वास घेऊन,
15 टाकायचे ठरवले तर पृथ्वीवरील सर्वजण मरतील.
सगळ्याची परत माती होईल.
16 “जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय
म्हणतो त्याकडे लक्ष द्याल.
17 जो माणूस न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही.
ईयोब, देव शक्तिमान आणि चांगला आहे.
तू त्याला अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का?
18 एक देवच असा आहे जो राजांना ‘तुम्ही कवडीमोलाचे आहात’ असे म्हणू शकतो.
देव पुढाऱ्यांना, ‘तुम्ही वाईट आहात.’ असे सांगू शकतो.
19 देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही.
देव गरीब माणसांपेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही.
का? कारण त्यानेच प्रत्येकाला निर्माण केले आहे.
20 माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात.
ते आजारी पडतात आणि मरतात.
अगदी शक्तिशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात.
21 “लोक जे करतात ते देव बघतो.
देव माणसाची प्रत्येक हालचाल बघत असतो.
22 जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही
जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील.
23 देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते.
लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही.
24 शक्तिशाली लोकांनी वाईट कुत्ये केल्यावर देवाला
त्यांना प्रश्र्न विचारण्याची गरज वाटत नाही.
तो सहजपणे त्यांचा नाश करु शकतो
आणि त्यांच्या जागी इतरांना पुढारी बनवू शकतो.
25 तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते.
म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो.
26 वाईट माणसांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल देव त्यांना शिक्षा करतो.
आणि जिथे इतर लोक त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो.
27 का? कारण वाईट माणसांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले
आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
28 हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात,
आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.
29 देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो.
परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले
तरी देवाला कुणी अपराधी ठरवू शकणार नाही.
देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही.
तो लोकांवर आणि राज्यांवर राज्य करणारा राज्यकर्ता आहे.
30 परंतु जर एखादा माणूस वाईट असेल आणि इतरांना पाप करायला भाग पाडत असेल
तर देव त्या माणसाला कधीही राज्यकर्ता होऊ देणार नाही.
31 “जर तो माणूस देवाला म्हणेल की,
‘मी अपराधी आहे.
यापुढे मी पाप करणार नाही.
32 देवा, मी जरी तुला बघू शकत नसलो, तरी तू मला जगण्याचा योग्य मार्ग दाखव.
मी जरी चुका केल्या असल्या तरी मी त्या पुन्हा करणार नाही.’
तरच असे घडेल.
33 ईयोब, तुला देवाने बक्षीस द्यावे असे वाटते.
परंतु तू मात्र बदलायला तयार नाहीस.
ईयोब, हा तुझा निर्णय आहे. माझा नाही.
तुला काय वाटते ते मला सांग.
34 शहाणा माणूस माझे ऐकेल.
शहाणा माणूस म्हणेल.
35 ‘ईयोब एखाद्या अज्ञानी माणसासारखे बोलत आहे.
तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’
36 ईयोबला अजून शिक्षा करायला हवी असे मला वाटते.
का? कारण ईयोब एखाद्या वाईट माणसासारखे आपल्याला उत्तर देत आहे.
37 ईयोब त्याच्या पापात बंडाची भर घालीत आहे.
ईयोब इथे आपल्यासमोर बसून आपला अपमान करतो आहे आणि देवाची थट्टा करतो आहे.”
35 अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले.तो म्हणाला,
2 “ईयोबा, ‘मी देवापेक्षा अधिक बरोबर आहे’
हे तुझे म्हणणे योग्य नाही.
3 आणि ईयोबा तू देवाला विचारतोस
‘जर एखाद्या माणसाने देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय मिळेल?
मी जर पाप केले नाही तर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
4 “ईयोबा, मी (अलीहू) तुला आणि तुझ्या मित्रांना उत्तर देण्याची इच्छा करतो.
5 ईयोबा, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या
आकाशाकडे, ढगांकडे बघ.
6 ईयोब, तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही.
तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही.
7 आणि ईयोबा, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही.
देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.
8 ईयोबा, तू ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी करतोस त्यांचा परिणाम तुझ्यावर
आणि तुझ्यासारख्या इतरांवर होतो.
त्यामुळे देवाला मदत होते
किंवा त्याला दु:ख होते असे नाही.
9 “जर वाईट लोकांना दु:ख झाले तर ते मदतीसाठी ओरडतील.
ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
10 परंतु जे वाईट लोक देवाकडे मदत मागत नाहीत.
ते असे म्हणणार नाहीतः ‘मला निर्माण करणारा देव कुठे आहे?
लोक दु:खी कष्टी असले की देव त्यांना मदत करतो.
आता तो कुठे आहे?’
11 ‘देवाने आम्हाला पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे
तेव्हा तो कुठे आहे?’
12 “किंवा त्या वाईट माणसांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही.
का? कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत आपण फार मोठे आहोत.
असे त्यांना अजूनही वाटते.
13 देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही हे खरे आहे.
सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
14 तेव्हा ईयोब, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही
तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही.
तू देवाला भेटण्याची आणि त्याला तू निरपराध आहेस
हे पटवून देण्याच्या संधीची वाट पहात आहेस असे म्हण.
15 “ईयोब, देव वाईट लोकांना शिक्षा करत नाही असे तुला वाटते.
तो पापाकडे लक्ष देत नाही असेही तुला वाटते.
16 म्हणून ईयोब त्याचे निरर्थक बोलणे चालूच ठेवतो.
आपण खूप मोठे असल्याचा आव ईयोब आणतो.
परंतु आपण काय बोलत आहोत
हे ईयोबाला कळत नाही हे सहजपणे समजून येते.”
यरुशलेम येथील सभा
15 मग काही माणसे यहूदीया प्रांतातून अंत्युखियास आली. ती बंधुजनांना (यहूदीतर) शिक्षण देऊ लागली: “तुमची सुंता झालेली नसेल तर तुमचे तारण होणार नाही. मोशेने आम्हांला हे करायला शिकविले.” 2 पौल व बर्णबा या शिक्षणाविरुद्ध होते. या विषयावर त्या लोकांशी पौलाने व बर्णबाने वाद घातला, म्हणून लोकांनी असे ठरविले की, पौल, बर्णबा व इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे. हे लोक त्या ठिकाणी प्रेषित व वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले.
3 मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके व शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले. 4 ते जेव्हा यरुशलेमला पोहोंचले तेव्हा तेथील ख्रिस्ती मंडळी, प्रेषित आणि वडीलजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पौल व बर्णबा यांनी आपल्या हातून देवाने जे काम करुन घेतले त्याविषयी सविस्तर सांगितले. 5 परुशी गटातील काही विश्वासणारे उभे राहीले आणि म्हणाले, “यहूदीतर विश्वासणाऱ्यांची सुंता झालीच पाहिजे. तसेच आपण त्यांना मोशेचे नियम पाळण्याविषयी शिकविले पाहिजे!”
6 मग प्रेषित आणि वडीलजन या समस्येचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमले. 7 त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. मग पेत्र उभा राहिला. आणि त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूनो मला माहीत आहे, सुरुवातीला जे काही घडले, ते तुमच्या आठवणीत आहे. जे यहूदी नाहीत, त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्यामधून देवाने माझी निवड केली. यासाठी की, त्यांनीही विश्वास धरावा. 8 देव सर्वांचे विचार जाणतो, आणि त्याने या यहूदीतर लोकांचा स्वीकार केला आहे. देवाने जसा आम्हांला पवित्र आत्मा दिला, तसाच त्यांनाही देऊन त्याने हे आम्हांस दाखवूत दिले. 9 देवाच्या दृष्टीने ते लोक आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला, तेव्हा त्याने त्यांची ह्रदये शुद्ध केली. 10 मग आता यहूदीतर लोकांच्या मानेवर जड जू तुम्ही का ठेवीत आहात? तुम्ही देवाला राग आणीत आहात काय? आपण व आपले वाडवडील (पूर्वज) हे ओझे वाहण्याइतके सशक्त नव्हतो. 11 आम्ही असा विश्वास धरतो की, आम्ही आणि हे लोक प्रभु येशूच्या कृपेमुळे तारले जाणार आहोत.”
12 मग सगळे लोक शांत झाले, ते पौल व बर्णबाचे बोलणे ऐकू लागले. पौलाने व बर्णबाने लोकांना सांगितले की, देवाने त्यांच्याद्वारे यहूदीतर लोकांमध्ये चमत्कार व अदभूत कृत्ये केली. 13 पौलाने व बर्णबाने आपले बोलणे संपविले. मग याकोब बोलला. तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, माझे ऐका. 14 शिमोन (पेत्र) याने यहूदीतर लोकांना देवाने आपले प्रेम कसे दाखविले ते सांगितले. पहिल्यांदाच देवाने यहूदीतर लोकांना स्वीकारले. आणि त्यांना आपले लोक बनविले. 15 संदेष्टेयांच्या शब्दांनी सुद्धा याला सहमती दर्शविली:
16 ‘मी (देव) यानंतर परत येईन
मी दाविदाचे घर पुन्हा बांधीन
ते पडलेले आहे
त्याच्या घराचे पडलेले भाग मी पुन्हा बांधीन
मी त्याचे घर नवे करीन
17 मग इतर सर्व लोक देवाचा शोध करतील
सर्व यहूदीतर लोकसुद्धा माझे लोक आहेत असे मी मानतो.
प्रभु (देव) असे म्हणाला,
व हे करणारा तोच आहे.’ (A)
18 ‘या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच माहीत आहेत.’
19 “म्हणून मला वाटते जे यहूदीतर बंधु देवाकडे वळले आहेत, त्याना आपण तसदी देऊ नये. 20 त्याऐवजी आपण त्यांना एक पत्र लिहू या. आपण त्यांना या गोष्टी सांगू:
मूर्तिपुढे ठेवलेले अन्न खाऊ नका.
(त्यामुळे अन्न अशुद्ध होते)
कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.
रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका.
21 त्यांनी या गोष्टी करु नयेत, कारण अजूनसुद्धा प्रत्येक शहारात यहूदी लोक आहेत जे मोशेचे नियम शिकवितात. बऱ्याच वर्षांपासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानातून मोशेचे नियम वाचण्यात येतात.”
2006 by World Bible Translation Center