Old/New Testament
28 “लोकांना जेथून चांदी मिळते अशा खाणी असतात
आणि लोक जेथे सोने वितळवतात आणि ते शुध्द करतात अशा जागा असतात.
2 लोक जमिनीतून लोखंड काढतात.
दगडांमधून तांबे वितळवले जाते.
3 मजूर गुहेत दिवा नेतात.
ते गुहेत अगदी खोलवर शोध घेतात.
ते अगदी खोल अंधारात दगडांचा शोध घेतात.
4 ते अशुध्द धातूचा शोध घेत घेत अगदी खोलवर जातात.
लोकांच्या राहाण्याच्या जागेपासून ते खूप लांबवर आणि खोलवर जातात.
जिथे आजपर्यंत कोणीही गेला नसेल तिथे ते जातात.
ते दोरीला लोंबकळत इतरांपेक्षा खूप खोल जातात.
5 वरच्या जमिनीत धान्य उगवते.
परंतु जमिनीच्या खाली काही वेगळेच असते,
धातू शुध्द असतो अगदी अग्नीत वितळवल्यासारखा.
6 जमिनीच्या खाली इंद्रनील मणी
आणि शुध्द सोन्याचे दाणे असतात.
7 रानटी पक्ष्यांना भूपृष्ठाखालील वाटांविषयी काही माहिती नसते.
कुठल्याही बहिरी ससाण्याने त्या अंधारवाटा पाहिलेल्या नसतात.
8 रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात.
सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.
9 मजूर अगदी कठीण खडक खोदतात.
ते मजूर डोंगर पोखरतात आणि त्यांना बोडके करतात.
10 मजूर खडकातून बोगदा खणतात
आणि खडकातला खजिना बघतात.
11 पाणी अडवण्यासाठी मजूर धरण बांधतात.
ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.
12 “पण माणसाला शहाणपण कुठे मिळेल?
समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
13 शहाणपण किती मोलाचे आहे ते आपल्याला कळत नाही.
पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
14 महासागर म्हणतो, ‘माझ्याजवळ शहाणपण नाही.’
सागर म्हणतो, ‘माझ्याजवळही ते नाही.’
15 तुम्ही शुध्द सोने देऊन शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
16 तुम्ही ओफिरच्या सोन्याने किंवा मौल्यवान शोहमच्या खड्याने
वा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
17 शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते.
सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
18 शहाणपण पोवळ्यापेक्षा वा स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे.
माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
19 इथिओपियातले पीत स्फटिक शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान नाहीत.
शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.
20 “मग शहाणपणा कुठून येतो?
समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे.
आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
22 मृत्यू आणि विनाश [a] म्हणतात,
‘आम्हाला शहाणपण सापडले नाही.
आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
23 “फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे.
फक्त देवालाच तो कुठे आहे ते माहीत आहे.
24 देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते.
त्याला आकाशाखालचे सर्व काही दिसते.
25 देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली.
सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
26 पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले
आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
27 त्याच वेळी देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला.
शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने जोखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
28 आणि देव लोकांना म्हणाला,
‘परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या तेच शहाणपण आहे.
वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.’”
ईयोब त्याचे बोलणे चालू ठेवतो
29 ईयोबाने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:
2 “काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता,
तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते.
3 तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता.
तसेच आताही असायला हवे होते असे मला वाटते.
4 मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो.
त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते.
5 जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता
आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो.
6 त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते.
मी माझे पाय मलईत धूत असे.
माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती.
7 “त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे
आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
8 सगळे लोक मला मान देत.
मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात.
मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत.
9 लोकप्रमुख बोलणे थांबवीत
आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
10 महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत.
होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे.
11 लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत.
आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत.
मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी.
12 का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्याला मदत करीत असे
आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसले तर मी मदत करीत असे.
13 मृत्युपंथाला लागलेला माणूस मला आशीर्वाद देत असे.
मी गरजू विधवांना मदत करीत असे.
14 सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते.
माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती.
15 मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे.
मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे.
16 गरीब लोकांना मी वडिलांसारखा वाटत असे.
मला माहीत नसलेल्या लोकांनादेखील मी मदत करीत असे.
मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे.
17 मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले.
मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला.
18 “मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन,
मला स्वतःच्या घरातच मृत्यू येईल.
19 मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत
अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
20 मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे.
रोज नवीन बाण सोडण्याइतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे.
21 “पूर्वी लोक माझे ऐकत असत
माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत.
22 मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे.
माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.
23 पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात.
वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत.
24 काही लोकांनी आशा सोडून दिली होती.
त्यांचे धैर्य खचले होते.
परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो.
माझ्या हास्याने त्यांना बरे वाटले.
25 मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहाण्याचे ठरवले.
आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.
बर्णबा व शौल खास कामसाठी निवड होते
13 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणे: बर्णबा, निग्र शिमोन, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला), आणि शौल. 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले आहे”
3 म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
कुप्र येथे बर्णबा व शौल
4 पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीया शहराला गेले. नंतर ते समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. 5 जेव्हा बर्णबा व शौल सलमीन शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचा संदेश यहूदी लोकांच्या सभास्थानात दिला. मार्क म्हटलेला योहान त्यांच्या मदतीला होता.
6 ते संपूर्ण बेट पार करुन पफे शहरास गेले. पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बर्येशू होते. तो खोटा संदेष्टा होता. 7 बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. सिर्ग्य पौल राज्यपाल होता. व तो हुशार होता. त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलाविले. त्याला त्यांचा संदेश ऐकावयाचा होता. 8 परंतु अलीम जादूगार हा बर्णबा व शौल यांच्या विरुद्ध होता. (ग्रीक भाषेत बर्येशूसाठी अलीम शब्द वापरतात. त्याचा अर्थ तोच आहे.) राज्यपालाने येशूवर विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. 9 पण शौल आत्म्याने भरला होता. (शौलाचे दुसरे नाव पौल) पौलाने अलीमकडे (बर्येशूकडे) पाहिले व म्हणाला, 10 “सैतानाच्या पुत्रा! जे काही योग्य असेल त्या सर्वांचा तू शत्रू आहेस. तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. तू देवाचे सत्य नेहमी खोटेपणात बदलण्याचा प्रयत्न करतोस! 11 आता तुला देवाने स्पर्श करताच तू आंधळा होशील. भर दिवसाच्या उन्हातही तुला काही काळ दिसणार नाही.”
मग अलीमसाठी सर्व काही अंधकारमय झाले, चाचपडत तो इकडेतिकडे फिरु लागला. कोणीतरी मदतीला घेऊन त्याचा हात धरुन जाण्यासाठी प्रयत्न करु लागला. 12 जेव्हा राज्यपालाने ते पाहिले (सार्ग्य पौल) त्याने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.
पौल व बर्णबा कुप्र सोडतात
13 पौल व जे लोक त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले. ते पंफुल्यातील पिर्गा गावी आले. परंतु योहान (मार्क) त्यांना सोडून परत यरुशलेमला गेला. 14 त्यांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते अंत्युखियास गेले. (जे पिसीडीयाजवळ होते.)
अंत्युखियात असताना शब्बाथ दिवशी ते यहूदी सभास्थानात गेले आणि तेथे बसले. 15 पवित्र शास्त्रातील नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लोखाणाचे वाचन झाले, मग सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला: “बधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही तरी तुम्हांला सांगायचे असेल तर कृपा करुन बोला!”
16 पौल उभा राहिला. आणि आपला हात उंचावून (लोकांचे लक्ष वेधून घेऊन) म्हणाला, “माझ्या यहूदी बांधवानो व इतर लोकहो, जे तुम्ही खऱ्या देवाची उपासना करता, ते कृपा करुन माझे ऐका! 17 इस्राएलाच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली. ते ज्या काळात इजिप्तमध्ये परकी म्हणून राहत होते, त्याकाळात देवाने त्यांना यशस्वी होण्यास मदत केली. मोठ्या सामर्थ्याने देवाने त्यांना त्या देशातून बाहेर आणले. 18 आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षांत त्यांना सहनशीलता दाखविली. 19 देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांना दिल्या. 20 हे सर्व साधारणपणे चारशेपन्रास वर्षांत घडले.
“त्यानंतर देवाने आपल्या लोकांना शास्ते (नेते) दिले. ते शमुवेल संदेष्टेयाच्या काळापर्यंत. 21 मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो चाळीस वर्षेपर्यंत राजा होता. 22 नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दावीदाला त्यांचा राजा केले. दावीदाविषयी देव असे बोलला: दावीद, इशायाचा पुत्र, हा मला आवडला, मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व तो करील.
23 “याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. 24 येशू येण्यापूर्वी सर्व यहूदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. 25 जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हांला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’
2006 by World Bible Translation Center