Old/New Testament
याजक व लेवी
12 यहुदाच्या प्रदेशात परत आलेले याजक व लेवी पुढीलप्रमाणे: शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते आले. त्यांच्या नावांची यादी अशी:
सराया, यिर्मया, एज्रा,
2 अमऱ्या, मललूख हत्तूश,
3 शखन्या, रहूम मरेमोथ,
4 इद्दो, गिन्नथोई, अबीया,
5 मियामीन, माद्या, बिलगा,
6 शमया, योयरीब, यदया.
7 सल्लू आमोक, हिल्कीया,यदया.
हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.
8 लेवी असे: येशूवा, बिन्नुइ, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, आणि मत्तन्या, हे लोक तसेच मत्तन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुतिस्तोत्रांचे प्रमुख होते. 9 बकबुक्या आणि उन्नी हे या लेव्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतिउपासनेच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहात. 10 येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा मुलगा योयादा. 11 योयादाने योनाथानला जन्म दिला आणि योनाथानने यद्दवाला.
12 योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे:
आणि सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया.
आणि यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या
13 एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम.
अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान.
14 मल्लूखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान
शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ
15 हरिमच्या घराण्याचा प्रमुख अदना.
मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ.
16 इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या.
गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम.
17 अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री.
मिन्यामिन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय.
18 बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा
शमयाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान.
19 योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय.
यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.
20 सल्लयाच्या घराण्याचा प्रमुख कल्लय
आमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर
21 हिल्कीयाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या
यदायाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल.
22 एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या दिवसात ज्या लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत. 23 लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंबप्रमुखांची नावे एल्याशीबचा मुलगा योहानान याच्या काळापर्यत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. 24 लेव्यांचे प्रमुख असे होते: हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा मुलगा येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी हे भाऊ त्यांच्या पलीकडे उभे राहात. एक समूह दुसऱ्या समूहाला प्रत्युत्तर करी. देवाचा माणूस दावीद याची तशीच आज्ञा होती.
25 दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब, 26 हे द्वारपाल योचाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशूवाचा मुलगा आणि येशूवा योसादाकचा. नहेम्या हा राज्यपाल आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्याच काळात हे द्वारपाल होते.
यरुशलेमच्या तटबंदीचे समर्पण
27 यरुशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी अर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरुशलेमला एकत्र आणले. यरुशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.
28-29 शिवाय सर्व गायक देखील यरुशलेम भोवतालच्या गावांहून यरुशलेमला आले. नटोफा, बेथ-गिलगाल, गेबा आणि अजमावेथ ही ती गावे होत. यरुशलेम भोवतालच्या प्रदेशात या गायकांनी आपल्यासाठी ही छोटी गावे वसवली होती.
30 नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वतःचे शुध्दीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरुशलेमची भिंत यांनाही शुध्द करण्याचा समारंभ केला.
31 यहुदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले. देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातल्या एका गटाने राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडच्या भिंतीच्या वर जावयाचे होते. 32 होशया आणि यहुदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले. 33 अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम, 34 यहूदा, बन्यामीन, शमया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ होते. 35 काही याजकही त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्या मागे निघाला. (जखऱ्या योनाथानचा मुलगा, योनाथान शमयाचा मुलगा, शमया मत्तन्याचा, मत्तन्या मिखाचा, मिखाचा जक्कूरचा आणि जक्कूर आसाफचा मुलगा) 36 आसाफचे भाऊ म्हणजे शमया, अजरेल, मिललई, गिललइ, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा माणूस दावीद याने केली होती. भिंत अर्पण करण्यासाठी जो लोकांचा गट आलेला होता त्यांना एज्रा हा लेखक पुढे घेऊन गेला. 37 झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर ते होते. दावीदाच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले.
38 गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले. 39 मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमची वेस जुनी वेस, मत्स्य वेस. हनानेलचा दुर्ग आणि शतकाचा दुर्ग यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन ते पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले 40 मग गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या. 41 मग पुढील याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते. 42 मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले.
मग यिज्र ह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली. 43 या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले. सर्वजण अतिशय आनंदात होते. देवाने सर्वांना आनंदित केले होते. बायका आणि मुलेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांनाही यरुशलेममधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.
44 त्यादिवशी कोठारांवरील लोकांच्या नेमणुका केल्या आपल्या झाडांची पहिली फळे वहिली आणि धान्यातला एकदशांश वाटा लोक घेऊन आले. कोठारप्रमुखांनी या वस्तू कोठारात ठेवल्या. सेवेत असलेले याजक व लेवी यांच्याबद्दल यहुद्यांना अतिशय समाधान होते. म्हणून त्यांनी कोठारात ठेवायला पुष्कळशा गोष्टी आणून दिल्या. 45 याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुध्दीकरणाचे विधी त्यांनी पार पाडले. गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेबरहुकूम त्यांनी सर्व यथसांग केले. 46 (फार पूर्वी, दावीदच्या काळी आसाफ गायकांचा मुख्य होता. त्याच्याजवळ देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते पुष्कळ होती.)
47 अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळांत समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही रक्कम बाजूला ठेवली. आणि अहरोनच्या वंशजांसाठी (म्हणजेच याजकांसाठी) लेव्यांनी पैसे वेगळे ठेवले.
नहेम्याच्या अखेरच्या आज्ञा
13 त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांना ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही. 2 या लोकांनी इस्राएली लोकांना अन्न आणि पाणी दिले नव्हते म्हणून हा नियम लिहिला गेला. शिवाय बलामने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून या लोकांनी त्याला पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले. 3 त्यामुळे इस्राएलींनी जेव्हा हा नियम ऐकला तेव्हा त्यांनी त्याचे पालन केले. या परकी लोकांच्या प्रजेपासून ते वेगळे झाले.
4-5 पण हे होण्यापूर्वीच एल्याशीबने तोबीयाला मंदिरात एक खोली दिली होती. एल्याशीब हा याजक देवाच्या मंदिरातील कोठाराचा रक्षक होता. आणि तो तोबीयाचा जिवलग मित्र होता. ही खोली धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवण्यासाठी वापरली जात असे. तिथले लेवी, गायक व द्वारपाल यांना लागणारा धान्याचा एकदशांश भाग, नवीन द्राक्षरस, आणि तेल या गोष्टीही तेथे ठेवल्या जात तरीही एल्याशीबने ती खोली तोबीयाला दिली.
6 हे सर्व होत होते तेव्हा मी यरुशलेममध्ये नव्हतो. बाबेलच्या राजाकडे मी परत गेलो होतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे यरुशलेमला परत जायची परवानगी मागितली. 7 आणि मी यरुशलेमला परतलो. एल्याशीबच्या वर्तनाची ही दु:खद बातमी मी यरुशलेममध्ये ऐकली. आपल्या देवाच्या मंदिरात एल्याशीबने तोबीयाला खोली दिलेली होती. 8 एल्याशीबच्या या वर्तनाने मी अतिशय क्रुध्द झालो. तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले. 9 त्या खोल्या शुध्द आणि स्वच्छ करून घ्यायची मी आज्ञा दिली. मग मंदिरातील पात्रे, वस्तू, धान्यार्पणे, धूप वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
10 लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही माझ्या कानावर आले. त्यामुळे लेवी आणि गायक आपापल्या शेतांवर कामाला गेले होते. 11 म्हणून मी आधिकाऱ्यांना सांगितले की त्यांचे चुकले. मी त्यांना विचारले, “तुम्ही देवाच्या मंदिराची देखभाल का केली नाही?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले. मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला त्यांना सांगितले. 12 त्यानंतर यहुदातील सर्व लोकांनी पिकाचा एकदशांश वाटा, नवीन द्राक्षारस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.
13 कोठारांवर या माणसांना मी नेमले: शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा मुलगा जक्कूर याचा मुलगा हनान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ही माणसे विश्वासार्ह आहेत हे मला माहीत होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते.
14 देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवा यांसाठी मी श्रध्देने जे केले त्याची आठवण ठेव.
15 यहुदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांना काम करताना पाहिले. द्राक्षारसासाठी द्राक्षे तुडवताना मी त्यांना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले. द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच गोष्टी शहरात नेताना मी लोकांना पाहिले. शब्बाथ दिवशी ते या सर्व गोष्टी यरुशलेममध्ये आणत होते. तेव्हा मी त्याबद्दल त्यांना ताकीद दिली. शब्बाथ दिवशी अन्नधान्याची विक्री करायची नाही हे मी त्यांना सांगितले.
16 तेव्हा सोरे नगरातील काही लोक यरुशलेममध्ये राहात होते. ते मासे आणि आणखी पुष्काळशा गोष्टी शब्बाथ दिवशी यरुशलेममध्ये आणून विकत. आणि यहुदी लोक त्या विकत घेत. 17 यहुदातील मान्यवर लोकांना मी हे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यांना मी म्हणालो, “तुम्ही ही फार वाईट गोष्ट करत आहात. तुम्ही शब्बाथाला अपवित्र करीत आहात. शब्बाथाला तुम्ही इतर दिवसांसारखाच एक करत आहात. 18 तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता. म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले. आता इस्राएलवर आणखी संकटे येतील असे तुम्ही वागत आहा. कारण शब्बाथ दिवस बाटवून त्यांचे महत्व तुम्ही घालवत आहात.”
19 म्हणून मी केले ते असे: दर शुक्रवारी रात्री अंधार पडण्यापूर्वी द्वारपालांना मी यरुशलेमच्या वेशींचा कडेकोट बंदोबस्त करायला सांगितले. शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश देला. माझी काही माणसे मी वेशीवर उभी केली. शब्बाथ दिवशी कोणताही माल यरुशलेममध्ये येत नाही याची खात्री करून घ्यायला मी त्यांना सांगितले.
20 एक दोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना यरुशलेमबाहेर रात्र काढावी लागली. 21 पण मी त्या व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांनाही समज दिली. मी त्यांना म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम करु नका. पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हाला पकडण्यात येईल.” तेव्हा पासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी त्यांच्या वस्तू विकायला आले नाहीत.
22 मग मी लेवींना त्यांच्या शुध्दीकरणाची आज्ञा दिली. ते पार पाडल्यावर त्यांना वेशींची राखण करायची होती. शब्बाथ हा दिवस म्हणून राखून ठेवला होता याची खात्री करण्यासाठी असे केले होते.
देवा, या गोष्टी केल्याबद्दल कृपया माझे स्मरण ठेव. माझ्यावर लोभ असू दे आणि तुझे महान प्रेम मला मिळूदे.
23 त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहुदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी बायकांशी लग्ने केली आहेत. 24 आणि या विवाहातून झालेल्या संततीपैकी निम्म्या मुलांना यहूदी भाषा बोलता येत नव्हती. ही मुले अश्दोदी, अम्मोनी किंवा मवाबी भाषा बोलत होती. 25 तेव्हा मी त्या पुरुषांना त्यांचा हा दोष दाखवला. त्यांचा मी धिक्कार केला. काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावली. त्यांना मी म्हणालो, “त्या लोकांच्या मुलींशी लग्ने करु नका. तुमच्या मुलांशी या परक्या लोकांच्या मुलींची लग्ने होऊ देऊ नका. तुमच्या मुलींना त्या परक्या लोकांच्या मुलांशी लग्ने करु देऊ नका. 26 अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. हे तुम्हाला माहीत आहे. शलमोनसारखा थोर राजा किती तरी राष्ट्रांमध्ये नव्हता. देवाचा शलमोनवर लोभ होता. देवाने सर्व इस्राएलवर शलमोनला राजा केले. पण परक्या स्त्रियांमुळे शलमोनही पाप करायला उद्युक्त झाला. 27 आणि आता तुम्हीही तसेच भयंकर पातक करत आहात असे मी ऐकतो. तुम्ही देवाशी एकनिष्ठ नाही. तुम्ही परक्या स्त्रियांशी विवाहबध्द होत आहात.”
28 योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा मुलगा. योयादाचा एक मुलगा होरेनच्या सनबल्लटचा जावई होता. त्याला मी हा देश सोडायला लावले. त्याला मी पळून जायला भाग पाडले.
29 माझ्या देवा, या लोकांना शासन कर. त्यांनी याजकपणा अपवित्र केला. त्याला ते क्षुल्लक समजले. याजक आणि लेवी यांच्याशी तू केलेला करार त्यांनी पाळला नाही. 30 म्हणून मी याजक आणि लेवी यांना शुध्द केले. सर्व परकी माणसे आणि त्यांनी शिकवलेल्या चमत्कारिक परकीय गोष्टी यांची मी हकालपट्टी केली. लेवी आणि याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या दिल्या. 31 लाकूड आणि झाडांची पहिली फळे यांच्या भेटी लोक योग्यवेळीआणतील याची मी व्यवस्था केली.
देवा, या सत्कृत्यांसाठी माझी आठवण ठेव.
पेत्र व योहान विश्वासणाऱ्यांकडे परततात
23 पेत्र व योहान यांची सुटका झाल्यावर ते त्यांच्या स्वतःच्या बंधुवर्गाकडे परत गेले. त्यांनी प्रमुख याजक व प्रमुख वडील यहूदी पुढारी जे बोलले ते सर्व त्यांनी बंधुवर्गांस सांगितले. 24 जेव्हा विश्वासणाऱ्यांनी हे ऐकले, तेव्हा त्या सर्वांनी एक मनाने देवाला प्रार्थना केली. ते म्हणाले, “सर्वसमर्थ प्रभु, तूच आकाश, जमीन, समुद्र व जगातील सर्वांचा निर्माणकर्ता आहेस. 25 आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याने हे शब्द लिहिले:
‘राष्ट्रे का ओरडत आहेत?
लोक (देवाविरुद्ध) का व्यर्थ कट रचित आहेत?
26 ‘या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले
आणि प्रभु परमेश्वर व त्याचा ख्रिस्त यांच्याविरुद्ध एकवट झाले आहेत.’ (A)
27 या गोष्टी खरोखर घडल्या, जेव्हा हेरोद. [a] पंत पिलात, यहूदीतर राष्ट्रे व यहूदी लोक हे सर्व जण येशूविरुद्ध ‘एकत्र आले.’ 28 त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली, हे सर्व तुइया सामर्थ्याने व तुइया इच्छेने घडले. 29 आणि आता प्रभु, ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हांला भेडसावण्याचा प्रयत्न करीन आहेत! प्रभु, आम्ही तुझे सेवक आहोत, तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हांला मदत कर. 30 तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही धीट बनण्यासाठी आम्हांला मदत कर; आजारी लोकांना बरे कर, पुरावे दे आणि चमत्कार कर, जे येशू जो तुझा पवित्र सेवक याच्या सामर्थ्यांने घडतील.”
31 विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केल्यावर, ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ती जागा हादरली, ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले. व ते न भीता देवाचा संदेश सांगत गेले.
विश्वासणाऱ्यांचा सहभाग
32 विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे. ते एकचित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत. 33 मोठ्या सामर्थ्याने प्रेषित लोकांना प्रभु येशू मेलेल्यांतून उठला याविषयी साक्ष देत. आणि त्या विश्वासणाऱ्यांवर देवाचा मोठा आशीर्वाद होता. 34 त्यांना आवश्यकता भासे ते सर्व त्यांना मिळत असे. प्रत्येक जण ज्याची स्वतःची शेत (जमीन) होती किंवा घर होती, त्यांनी ते पैशासाठी विकले व विकून आलेले पैसे त्यांनी प्रेषितांच्या हवाली केले. 35 आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार पुरवठा केला जात असे.
36 एका विश्वासणाऱ्याचे नाव होते योसेफ. प्रेषित त्याला बर्णबा म्हणत. (याचा अर्थ, “जो इतरांना मदत करतो तो मनुष्य.”) तो लेवी वंशातला होता. आणि कुप्र बेटावर जन्मलेला होता. 37 योसेफाचे स्वतःचे शेत होते, ते त्याने विकले व पैसे त्याने प्रेषितांकडे दिले.
2006 by World Bible Translation Center