Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
नहेम्या 1-3

नहेम्याची प्रार्थना

नहेम्या हा हखल्याचा मुलगा. त्याची ही वचने: किसलेव महिन्यात मी, नहेम्या, शूरान या राजधानीत होतो. राजा अर्तहशश्तच्या कारदीर्चीचे तेव्हा विसावे वर्ष होते. मी शूशन येथे असताना माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहुदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे राहणाऱ्या यहुद्यांची चौकशी केली. हे युहदी म्हणजे बंदिवासातून सुटून अजून यहुदातच राहणारे लोक होते. यरुशलेम नगराचीही खुशाली मी त्यांना विचारली.

हनानी आणि त्याच्या बरोबरचे लोक म्हणाले, “नहेम्या, बंदिवासातून सुटून यहुदात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत. त्यांच्यापुढे बऱ्याच अडचणी असून त्यांची अप्रतिष्ठा चालली आहे. कारण यरुशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे. तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”

यरुशलेमच्या लोकांची आणि नगराच्या तटबंदीची ही हकीकत ऐकून मी अत्यंत उद्विग्न झालो. मी खाली बसलो व रडू लागलो. मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली:

“हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू मोठा सर्वशक्तीमान देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांशी केलेला प्रेमाचा करार पाळणारा तू परमेश्वर आहेस.

“तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपा करून डोळे आणि कान उघडे कर व ऐक. तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलींच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएलींनी तुझ्याविरुध्द जी पापे केली त्यांची मी कबुली देत आहे. मी कबुल करतो की मी तुझ्याविरुध्द पाप केले तसेच माझ्या वडीलांच्या घराण्यातील लोकांनीही केले. आम्हा इस्राएलींची वर्तणूक तुझ्या दृष्टीने वाईट होती. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.

“आपला सेवक मोशे याला दिलेली शिकवण तू कृपया आठव. त्याला तू म्हणाला होतास, ‘तुम्ही इस्राएल लोक एकनिष्ठ राहिला नाहीत तर दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मी तुम्हाला विखरुन टाकीन. पण तुम्ही माझ्याकडे परत आलात आणि माझ्या आज्ञा पाळल्यात तर मी असे करीनः आपापली घरे बळजबरीने सोडायला लागून पृथ्वीच्या अंतापर्यंत देशोधडीला लागलेल्या तुमच्यातल्या लोकांनाही मी ठिकठिकाणांहून एकत्र आणीन. माझे नाव ठेवावे म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.’

10 “इस्राएल लोक तुझे सेवक असून ते तुझे लोक आहे. तुझ्या प्रचंड सामर्थ्याने तू या लोकांना सोडवलेस. 11 तेव्हा, हे परमेश्वरा, माझी विनवणी कृपा करुन ऐक. मी तुझा सेवक आहे. तुझ्या नावाविषयी भीतियुक्त आदर दाखवण्याची इच्छा असलेल्या तुझ्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐकावीस. मी राजाचा मद्य चाखणारा सेवक [a] आहे, हे परमेश्वरा, तुला हे माहीत आहेच. तेव्हा कृपा करून आज माझ्या मदतीला ये. राजाजवळ मी मदतीची याचना करीन तेव्हा मला साहाय्य कर. मला यश दे आणि राजाची मर्जी राखण्यात मला मदत कर.”

राजा अर्तहशश्त नहेम्याला यरुशलेमला पाठवतो

राजा अर्तहशश्तच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजासमोर द्राक्षारस आणला गेला. मी तो उचलला आणि राजाला दिला. या पूर्वी मी कधी राजाच्या सहवासात असताना उदास नव्हतो पण यावेळी मात्र कष्टी होतो. म्हणून राजाने मला विचारले, “तुला बरे वाटत नाही का? तू असा खिन्न का दिसतोस? तू मनातून दु:खी दिसतोस.”

तेव्हा मी फार घाबरलो. पण, भ्यायलेला असूनही मी राजाला म्हणालो, “राजा चिरायू होवो! माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे ते नगर उद्ध्वस्त झाले आहे. म्हणून मी दु:खी आहे. नगराच्या वेशीसुध्दा आगीत जळून गेल्या आहेत.”

यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?”

उत्तर देण्यापूर्वी मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मग मी राजाला म्हणालो, “राजाची मर्जी असेल आणि मी तुमच्याशी भलेपणाने वागलो असेन तर कृपया मला माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे त्या यहुदातील यरुशलेम नगराला पाठवावे. तिथे जाऊन नगराची पुन्हा उभारणी करण्याची माझी इच्छा आहे.”

राणी राजाजवळच बसली होती. त्या दोघांनी मला विचारले, “तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील?”

राजा मला जाऊ द्यायला आनंदाने तयार झाला म्हणून मी ही त्याला विशिष्ट मुदत सांगितली. मी पुढे राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मेहेरनजर असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. फरात नदीच्या पश्चिमेकडील अधिकाऱ्यांसाठी काही पत्रे मला द्यावीत. म्हणजे ती त्यांना दाखवल्यावर यहुदाच्या वाटेवर त्यांच्या हद्दीतून सुखरुप जायला ते मला परवानगी देतील. शिवाय दरवाजे, भिंती, प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला द्यायला मला पत्र द्यावे.”

राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्व काही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.

मग मी फरात नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या, प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते. 10 सनबल्लट आणि तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता. इस्राएलींच्या मदतीसाठी कोणी एक जण आला आहे याने ते नाराज झाले व रागावले. सनबल्लट होरोन या गावचा होता आणि तोबीया अम्मोनी आधिकारी होता.

नहेम्या यरुशलेमच्या तटबंदीची पाहणी करतो

11-12 मी यरुशलेमला गेलो आणि तीन दिवस राहिलो. मग रात्री काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरुशलेमसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात जागवला होता त्याबद्दल मी कोणाशी काही बोललो नव्हतो. मी ज्या घोड्यावर बसलो होतो तो वगळता आणखी घोडे माझ्याबरोबर नव्हते. 13 अंधार असतानाच खोऱ्याच्या वेशीतून मी बाहेर पडलो.मकरकूप विहिर आणी राखेच्या ढिगाची वेस यांच्या दिशेने मी कूच केले. यरुशलेमची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वारे यांची पहाणी केली. 14 मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नसल्याचे जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आले. 15 तेव्हा मी अंधारातच भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वरती गेलो,शेवटी मी मागे वळलो आणि परतून खोऱ्याच्या वेशीतून आत शिरलो. 16 इस्राएली अधिकारी आणि महजन यांना माझा ठावठिकाणा माहीत नव्हता. माझे काय चालले आहे ते त्यांना माहीत नव्हते. यहुदी, याजक, राजाचे कुटुंबीय, अधिकारी आणि जे बांधकामाचे काम करणार होते यांच्यापैकी कोणालाही मी काही बोललो नव्हतो.

17 मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहातच आहात. यरुशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरुशलेमची तटबंदी पुन्हा बांधू या. म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.”

18 देवाची माझ्यावर कृपा असल्याचेही मी त्यांना सांगितले. राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते लोक म्हणाले, “आपण आत्ताच कामाला लागू या!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली. 19 पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली. त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”

20 पण मी त्यांना असे म्हणालो: “स्वर्गातील देवच आम्हाला यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू. या कामात तुम्ही काही मदत करु शकणार नाही. तुमच्या कुटुंबातील कोणीही यरुशलेममध्ये राहिलेले नाही. तुमच्या मालकीची जमीन येथे नाही. या जागेत असायचा तुम्हाला काही अधिकार नाही.”

तटबंदीचे बांधकाम करणारे

मुख्य याजकाचे नाव होते एल्याशीब. एल्याशीब आणि त्याचे याजक बांधव उठून कामाला लागले आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी पवित्र परमेश्वरासाठी प्रार्थनापूर्वक तिची प्रतिष्ठापना केली. दरवाजे भिंतीत बसवले. हमेयाचा बुरुज (म्हणजे शंभराचा बुरुज) आणि हनानेल बुरुज इथपर्यंत या याजकांनी यरुशलेमच्या तटबंदीचे काम केले. त्यांनी पवित्र परमेश्वरासाठी आपल्या कामाची प्रार्थनापूर्वक प्रतिष्ठापना केली.

याजकांच्या शेजारी यरीहोच्या लोकांनी भिंत बांधली आणि इम्रीचा मुलगा जक्कूर याने यरीहोच्या लोकांच्या कामालगत भिंतीचे बांधकाम केले.

हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळ्या घातल्या. दरवाजे बसवले. या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.

उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. (उरीया हा हक्कोस याचा मुलगा.)

बरेख्याचा मुलगा मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. (बरेख्या मशेजबेलचा मुलगा.)

बानाचा मुलगा सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.

तकोवाच्या लोकांनी भिंतीच्या त्यापुढच्या भागाची डागडूजी केली. पण तकोवाच्या नेत्यांनी मात्र आपला राज्यपाल नहेम्या याच्यासाठी काम करायला नकार दिला.

यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा मुलगा आणि मशुल्लाम बसोदयाचा मुलगा. त्यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले. नंतर कड्या व अडसर बसवले.

गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेडील भागाच्या राज्यपालांच्या सत्तेखाली होता.

हरह याचा मुलगा उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली. उज्जियेल सोनार होता. हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमची डागडुजी केली.

हूरचा मुलगा रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरुशलेमच्या अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता.

10 हरूमफाचा मुलगा यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वतःच्या घरालगतच्या भिंतीची डागडूजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा मुलगा हत्तूश याने बांधला. 11 हारीमचा मुलगा मल्कीया आणि पहथ-मवाबचा मुलगा हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली. तसेच भट्टी बुरुज ही बांधला.

12 हल्लोहेशचा मुलगा शल्लूम याने त्यापुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या मुलींनी त्याला मदत केली. शल्लूम यरुशलेमच्या अर्ध्या भागाचा आधिकारी होता.

13 हानून नावाचा एक जण आणि जानोहे येथे राहाणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. शिवाय त्यांनी पाचशे यार्ड लांबीची भिंतही दुरुस्त केली. थेट उकिरड्याच्या वेशीपर्यंत त्यांनी ही डागडुजी केली.

14 रेखाबचा मुलगा मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली. मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली. दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. या दरवाजांना कड्या, अडसर घातले.

15 कोलहोजेचा मुलगा शल्लूम याने कारंज्याजी वेस दुरुस्त केली. शल्लूम मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले. वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या सिल्लोम तळ्याची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरतात तिथपर्यंत त्याने डागडुजी केली.

16 अजबूकचा मुलगा नहेम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नहेम्या बेथसुरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दावीदच्या कबरेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले.

17 लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा मुलगा रहूम याच्या हाताखाली या लोकांनी काम केले. हशब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नहेम्या कईला जिल्ह्याचा तो अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या.

18 त्याच्याभावांनी पुढचे काम केले. हेनदादचा मुलगा बवई याच्या हाताखाली त्यांनी काम केले. कईलाच्या उरलेल्या निम्म्या भागाचा बवई अधिकारी होता.

19 नंतर येशूवाचा मुलगा एजेर पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रागारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंतदुरुस्तीचे काम त्याने केले 20 जक्कायाचा मुलगा बारुख याने पुढची दुरुस्ती केली. बारुखने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशीबच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशीब हा मुख्य याजक होता. 21 हक्कोसचा मुलगा उरीया. उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने एल्याशीबच्या घराच्या दारापासून थेट घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले. 22 भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती त्या भागात राहणाऱ्या याजकांनी केली. [b]

23 बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली अनन्याचा मुलगा मासेया. मासेयाचा मुलगा अजऱ्या. याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरस्तीचे काम केले.

24 हेनादादचा मुलगा बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून, भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले.

25 उजई याचा मुलगा पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. ही बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यांनंतर परोशचा मुलगा पदाय याने दुरुस्ती केली.

26 ओफेल टेकडीवर मंदिराचे सेवेकरी राहात असत. त्यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरुजापर्यंतचे भिंतदुरुस्तीचे काम केले.

27 पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते थेट ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला.

28 घोडा वेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली. 29 इम्मोरचा मुलगा सादोक याने आपल्या घरापुढच्या भिंतीची डागडुजी केली. शखन्याचा मुलगा शमाया याने पुढचा भाग दुरुस्त केला. शमाया हा पूर्ववेशीचा राखणदार होता.

30 शलेम्याचा मुलगा हनन्या याने आणि सालफचा सहावा मुलगा हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली.

बरेख्याचा मुलगा मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली. 31 मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती मल्कीया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील जागे खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मल्कीयाने केली. मल्कीया सोनार होता. 32 कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.

प्रेषितांचीं कृत्यें 2:1-21

पवित्र आत्म्याचे आगमन

पन्रासावाचा [a] दिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते. अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरुन गेले. त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या. आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरुन गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता.

त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहूदी लोक होते. हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते. या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला.ते आश्चर्यचकित झाले कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली.

यामुळे यहूदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की, प्रेषित हे कसे करु शकले. ते म्हणाले, “पाहा! ही माणसे (प्रेषित) ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालीली [b] आहेत! पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत. हे कसे शक्य आहे? आपण भिन्र देशाचे आहोतः पार्थी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहूदा, कपदुकीया, पंत, आशिया [c] 10 फ्रुगिया, पंफिलीया, इजिप्त, कुरेने शहराजवळचा लिबीयाचा भाग, रोमचे प्रवासी, 11 क्लेत व अरब प्रदेश असे आपण सर्व निरनिराळ्या देशांचे आहोत. आपल्यापैकी काही जन्मानेच यहूदी आहेत. काही जण धर्मांतरीत आहेत. आपण या निरनिराळ्या देशांचे आहोत. परंतु आपण ह्या लोकांचे बोलणे आपापल्या भाषेत ऐकत आहोत! आपण सर्व ते देवाविषयीच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो.”

12 ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, “काय चालले आहे?” 13 दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की, प्रेषित द्राक्षारस खूप प्रमाणात प्यालेले आहेत.

पेत्राचे लोकांपुढे भाषण

14 मग पेत्र अकरा प्रेषितांसह उठून उभा राहिला. आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला. तो म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका, मी जे सांगतो, ते तुम्हांला समजणे जरुरीचे आहे, काळजीपूर्वक ऐका. 15 सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हांला वाटते तसे हे लोक द्राक्षारसाच्या धुंदीत बोलत नाहीत! 16 परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेष्ट्याने लिहीले होते. योएल असे लिहिले:

17 ‘देव म्हणतो: शेवटल्या दिवसात
    मी अखिल मानवांवर आपला आत्मा ओतीन
तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील
    तुमच्या तरुणांना दृष्टांत [d] होतील;
    तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील.
18 त्यावेळी मी माझा आत्मा माझ्यासेवकांवर,
    पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन
    आणि ते भविष्य सांगतील.
19 वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन,
    खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन.
    तेथे रक्त, अग्नि आणि दाट धूर असतील.
20 सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल
    चंद्र रक्तासारखा लाल होईल
नंतर प्रभुचा महान व गौरवी दिवस येईल.
21 प्रत्येक व्यक्ति जी प्रभुवर विश्वास ठेवते ती वाचेल.’ (A)

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center