Old/New Testament
दारयावेशचा आदेश
6 तेव्हा राजा दारयावेशने आपल्या आधीच्या राजांच्या कागदपत्रांचा दफ्तरखान्यात शोध घेण्याचा आदेश दिला. बाबेलच्या जामदराखान्यातच ही कागदपत्रे ठेवलेली होती. 2 मेदी प्रांतातील अखमथा किल्ल्यात (राजवाड्यात) एक गुंडाळी सापडली. तिच्यावर पुढीलप्रमाणे मजकूर लिहिलेला होता:
अधिकृत टिपण: 3 कोरेश राजाच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, देवाचे मंदिर पुन्हा बांधले जावे.
तेथे यज्ञ अर्पण करता यावेत. मंदिराचा पाया बांधून काढावा. मंदिराची उंची 90 फूट आणि रुंदी 90 फूट असावी. 4 भोवतालच्या भिंतीत मोठ्या पाषाणांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. मंदिराच्या बांधकामाचा खर्च राजाच्या तिजोरीतून केला जावा. 5 मंदिरातील सोन्यारुप्याच्या वस्तू पुन्हा आपापल्या जागी ठेवल्या जाव्यात. नबुखद्नेस्सरने त्या यरुशलेमच्या मंदिरातून हलवून बाबेलला आणल्या होत्या. त्यांची पुन्हा मंदिरात स्थापना व्हावी.
6 तेव्हा आता मी दारयावेश,
फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर बोजनई आणि त्यांचे त्या प्रांतातील इतर कारभारी यांना असा आदेश देतो की त्यांनी यरुशलेममधून दूर जावे. 7 कामगारांना त्रास देऊ नये. देवाच्या प्रार्थनास्थळाच्या कामात व्यत्यय आणू नये. यहुदी अधिकारी आणि यहूदी वडीलधारी मंडळी यांना हे मंदिर पूर्वी होते त्याचठिकाणी पुन्हा बांधू द्यावे.
8 आता माझा आदेश असा आहे: देवाच्या मंदिराचे बांधकाम करणाऱ्या यहूदी वडीलजनांसाठी असे करा. मंदिराच्या बांधकामाचा पूर्ण खर्च राजाच्या खजिन्यातून दिला जावा. हा पैसा फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रांतांमधून येणाऱ्या करातून जमा होईल. या गोष्टी विनाविलंब करा म्हणजे कामाला खीळ बसणार नाही. 9 त्या लोकांना लागेल ते द्या. स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्यांना गोऱ्हे, मेंढे, कोकरे हत्यादी ज्या गोष्टी लागतील त्या द्या. यरुशलेममधील याजकांनी गहू, मीठ, द्राक्षारस तेल वगैरे मागीतल्यास त्यांना त्या वस्तू तात्काळ आणि रोजच्या रोज पुरवा. 10 स्वर्गातील देवाला प्रसन्न करणारे होम या यहूदी याजकांनी अर्पण करावे आणि त्यांनी माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी म्हणून त्यांना जे जे लागेल ते सर्व द्या.
11 माझी आणखी एक आज्ञा: माझ्या आज्ञेत कोणी फेरफार केल्यास त्याच्या घराचे लाकूड काढून ते त्याच्या शरीरात घुसवावे आणि त्याच्या घराची राखरांगोळी करुन केवळ दगडांच्या ढिगाऱ्यात त्याचे रुपांतर करावे.
12 परमेश्वराने यरुशलेममध्ये आपले नाव चिरंतन केले आहे. तेव्हा मला वाटते की या आज्ञेत बदल करणाऱ्या व्यक्तीचा मग ती व्यक्ती राजा असो की आणखी कोणी, देव त्यांचा नि:पात करील. कोणी त्याच्या यरुशलेममधील या मंदिराचा विध्वंस करायचा प्रयत्न केल्यासही देव त्याचा नाश करील.
मी, दारयावेश, हा हुकूम करीत आहे. त्याची तात्काळ आणि पूर्ण अंमलबजावणी व्हावी.
मंदिराच्या बांधकामाची समाप्ती आणि प्रतिष्ठापना
13 फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी मग राजा दारयावेशच्या हुकुमाचे पालन केले. त्यांनी ही आज्ञा कसोशीने आणि ताबडतोब पाळली. 14 यहुदी वडीलधाऱ्या मंडळींचे मंदिराचे काम चालूच राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यात त्यांना यश आले. इस्राएलच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पुरे केले. 15 हे मंदिर राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी अदार [a] महिन्याच्या तृतीयेला पुरे झाले.
16 इस्राएल लोकांनी या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या आनंदाने साजरी केली. बदिवासातून सुटून परत आलेले याजक, लेवी आणि इतर सर्व जण या उत्सवात सहभागी झाले.
17 प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्राएलच्या पापार्पणासाठी बारा बकरेही अर्पण केले. इस्राएलींच्या बारा घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते. 18 यरुशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्यांची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली.
वल्हांडण
19 बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडण सण पाळला. 20 वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यांनी शुचिर्भूत होऊन स्वतःला शुध्द केले. कैदेतून सुटून आलेले आपले भाऊबंद याजक आणि ते स्वतः या सर्व यहुद्यांसाठी लेवींनी वल्हांडणाच्या कोकराचा बळी दिला. 21 बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्राएल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. त्या देशाच्या मूर्तिपूजक लोकांच्या अशुध्दतेपासून दूर व्हावे म्हणून इतरांनीही शुचिर्भूत होऊन त्या भोजनाचा आस्वाद घेतला. इस्राएलचा परमेश्वर याला मदतीसाठी शरण जाता यावे म्हणून त्यांनी हे शुध्दीकरण केले. 22 बेखमीर भाकरींचा सण त्यांनी मोठ्या उत्साहाने सात दिवस साजरा केला. परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मनपरिवर्तन केले होते त्यामुळे त्या राजाने त्यांना मंदिराच्या बांधकामात मदत केली. अशा तऱ्हेने परमेश्वराने लोकांना सुखी केले.
एज्राचे यरुशलेममध्ये आगमन
7 या घडामोडी नंतर, [b] पारसचा राजा अर्तहशश्त याच्या कारकीर्दीत एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. एज्रा हा सरायाचा मुलगा, सराया अजऱ्याचा, अजऱ्या हिल्कीयाचा मुलगा. 2 हिल्कीया शल्लूमचा, शल्लूम सादोकाचा, सादोक अहीटूबचा, 3 अहीटूब अमऱ्याचा मुलगा, अमऱ्या अजऱ्याचा. आणि अजऱ्या मरोयाथचा मुलगा. 4 मरोयाथ जरह्याचा, जरह्या उज्जीचा, आणि उज्जी हा बुक्कीचा मुलगा. 5 बुक्की अबीशूवाचा, अबीशूवा फिनहासचा, व फिनहास एलाजारचा आणि एलाजार हा प्रमुख याजक अहरोन याचा मुलगा होय.
6 एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. एज्रा अध्यापक होता. मोशेच्या नियमशास्त्रात तो चांगला पारंगत होता. इस्राएलचा देव परमेश्वर याने हे मोशेचे नियमशास्त्र दिले. एज्राला परमेश्वराची साथ असल्यामुळे राजा अर्तहशश्तने त्याला हवे ते सर्व देऊ केले. 7 एज्राबरोबर बरेच इस्राएली लोक आले. त्यांच्यात याजक होते, लेवी होते, गायक, द्वारपाल आणि मंदिराचे सेवेकरी होते. राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी हे सर्व यरुशलेमला आले. 8 अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातल्या पाचव्या महिन्यात एज्रा यरुशलेममध्ये आला 9 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला एज्रा आणि मंडळींनी बाबेल सोडले आणि पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेला ते यरुशलेमला पोचले. एज्रावर परमेश्वर देवाचा वरदहस्त होता. 10 एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे सर्व वेळ मनःपूर्वक अध्ययन आणि पालन केले. त्याला (परमेश्वराचे) हे आदेश आणि नियम इस्राएल लोकांनी शिकवायचे होते, तसेच त्यांच्याकडून तसे आचरण करुन घ्यायचे होते.
राजा अर्तहशश्तचे एज्राला पत्र
11 एज्रा याजक आणि अध्यापक होता. इस्राएलला परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आणि नियम यांचे त्याला चांगले ज्ञान होते त्याला राजा अर्तहशश्तने जे पत्र लिहिले त्याची ही प्रतः
12 [c] राजा अर्तहशश्त कडून,
याजक आणि स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक एज्रा यास:
अभिवादन!
13 माझा आदेश असा आहे: माझ्या राज्यातील ज्या कोणाला एज्रा बरोबर यरुशलेमला जायचे असेल तो जाऊ शकतो. मग ती व्यक्ती कोणीही असो, याजक अथवा इस्राएलचा लेवी.
14 एज्रा, मी आणि माझे सात मंत्री तुला पाठवत आहोत. तू यहूदा आणि यरुशलेमला जावेस. देवाचे नियमशास्त्र तुझ्याकडे आहेच. त्याचे पालन लोक कसे काय करत आहेत ते तू पाहावेस.
15 इस्राएलच्या देवाला मी आणि माझे मंत्री सोने-चांदी पाठवत आहोत. ते तू तुझ्याबरोबर न्यावेस. देव यरुशलेममध्ये आहे. 16 सर्व बाबेलभर फिरुन तू लोकांकडून तसेच याजक व लेवी यांच्याकडून देणग्या गोळा कराव्यास. स्वखूशीने दिलेल्या त्या वस्तू यरुशलेममधील त्यांच्या देवाच्या मंदिरासाठी आहेत.
17 या पैशातून तू बैल, मेंढरे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची धान्यार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरुशलेममधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर. 18 यातून उरेल त्या सोन्यारुप्याचा विनियोग तू आणि तुझे भाऊबंद, देवाला रुचेल त्या मार्गाने हवा तसा करा. 19 तुमच्या परमेश्वराच्या मंदिरातील उपासनेसाठी या सर्व गोष्टी आहेत, त्या तिकडे घेऊन जा. 20 मंदिरासाठी आणखीही काही गोष्टी तुम्हाला लागत असतील तर त्याही तुम्ही घ्या. त्यासाठी राजाच्या खजिन्यातून पैशाची उचल करा.
21 आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागातले जे खजिनदार आहेत त्यांनी एज्राला हवे ते पुरवावे. कारण एज्रा हा स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक आणि याजक आहे. याची अंमलबजावणी पूर्णत्वाने आणि ताबडतोब करावी. 22 एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी 3 3/4 टन, गहू 600 बुशेल, द्राक्षारस 600 गॅलन, जैतुनाचे तेल 600 गॅलन, एज्राला पाहिजे तितके मीठ. 23 एज्राला जे जे मिळावे असा स्वर्गातील देवाचा आदेश आहे ते ते सर्व त्याला विनाबिलंब आणि पुरेपूर द्यावे. हे सर्व स्वर्गातील परमेश्वराच्या मंदिरासाठी आहे. देवाचा माझ्या राज्यावर किंवा माझ्या मुलांवर कोप व्हायला नको.
24 एज्रा, मंदिरातील याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील सेवेकरी, किंवा मंदिरातील कामाशी संबंधित इतर कोणी यांना कर द्यायला लावणे नियमाविरुध्द आहे. हे तुम्ही लोकांनी समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. त्यांनी कोणताही कर, खंडणी, जकात भरायची नाही. 25 तुझे देवाविषयीचे ज्ञान वापरुन तू धार्मिक आणि नागरी क्षेत्रात न्यायाधीश नेमावेस. तसा अधिकार मी तुला देतो. फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागातल्या लोकांचे ते न्यायाधीश होतील. देवाचे नियमशास्त्र जाणणाऱ्या सर्वांवर ते नागरी आणि धार्मिक न्यायाधीश नियुक्त करतील. आणि ज्यांना देवाच्या आज्ञा माहीत नाहीत अशांना ते त्या शिकवतील. 26 जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्याला शासन झाले पाहिजे. त्याला मृत्युदंड द्यायचा की हद्दपार करायचे की द्रव्यदंड करायचे की कैदेत टाकायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून राहील.
एज्राचे स्तोत्र
27 आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याला धन्यवाद! यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोध्दार करावा अशी इच्छा परमेश्वरानेच राजाच्या मनात निर्माण केली. 28 राजा, त्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्या डोळ्या देखतच परमेश्वराने माझ्यावर कृपा केली. परमेश्वराचा पाठिबा लाभल्यामुळे मला धैर्य आले. इस्राएलातील पुढारी मंडळींना बरोबर घेऊन मी यरुशलेमला निघालो.
एज्राबरोबर जाणाऱ्या कुटुंबप्रमुखांची यादी
8 बाबेलहून यरुशलेमला माझ्याबरोबर, (म्हणजे एज्रारोबर) आपापल्या घराण्यातली जी वडीलधारी मंडळी आणि इतर लोक आले त्यांची नावे आता देतो. अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत आम्ही यरुशलेमला आलो. त्या सर्वांची नावे पुढीलप्रमाणे:
2 फिनहासाच्या वंशजांमधला गर्षोम, इथामारच्या वंशजांमधला दानीएल, दावीदच्या वंशजांपैकी हट्टूश,
3 शखन्याच्या वंशजातील परोशाच्या वंशजांमधला जखऱ्या, आणि आणखी 150 जण,
4 पहथ-मवाबाच्या वंशजातल्या जरह याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे 200 लोक,
5 जट्टूच्या वंशजातल्या यहजोएलचा मुलगा शखन्या आणि 300 पुरुष.
6 आदीनच्या वंशजातल्या योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे 50 जण.
7 एलामाच्या वंशजातल्या अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे 70 जण.
8 शफाट्याच्या वंशजातल्या मीखाएलचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे 80 जण.
9 यवाबच्या वंशजातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि आणखी 218 जण.
10 बानीच्या वंशजातल्या योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्या बरोबरचे 160 लोक.
11 बेबाईच्या वंशजातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे 28 लोक.
12 अजगादच्या वंशजातल्या हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे 110 लोक.
13 अदोनीकामच्या वंशजातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे 60 जण
14 आणि बिगवईच्या कुळातले उथई, जक्कू व त्यांच्याबरोबरचे 70 जण.
यरुशलेमला परत
15 मी (म्हणजे एज्राने) या सर्व लोकांना अहवाकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ बोलावून घेतले. त्या ठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मला असे समजले की या लोकांमध्ये याजक होते पण लेवी नव्हते. 16 तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशल्लूम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या अध्यापकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले. 17 त्यांना इद्दोकडे पाठवले. इद्दो हा कासिफ्या नगराचा मुख्य. त्याला आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी या मंडळींना सांगितले होते. इद्दोचे नातलगांना कासिफ्याच्या मंदिरातील सेवेकरी होते. परमेश्वराच्या मंदिरातील सेवाचाकरी प्रीत्यर्थ माणसे मिळावीत म्हणून मी माझ्या लोकांना इद्दोकडे पाठवले. 18 देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे काहीजणांना पाठवले. लेवी वंशजातील महलीच्या वंशातला एक हुषार माणूस शेरेब्या महली हा लेवीच्या मुलांपैकी एक. लेवी हा इस्राएलांच्या वंशातलाच. शेरेब्याचे मुलगे आणि भाऊ यांनाही त्यांनी पाठवले. त्या वंशंजातील एकंदर अठराजण आमच्याकडे आले. 19 मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व भाचे, असे एकंदर वीस जण. 20 शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवाचाकरीसाठी दोनशेवीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवींचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.
21 तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता. 22 प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.” 23 म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला.
24 तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली. 25 मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर चीजवस्तू यांचे नीट वजन करुन या गोष्टी मी या बारा याजकांना दिल्या. या वस्तू राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि बाबेलमधील इस्राएल लोक यांनी दिल्या होत्या. 26 मी वजन केले त्याप्रमाणे चांदी 25 टन भरली, चांदीची तबके आणि इतर वस्तू 3 3/4 टन भरल्या. सोने 3 3/4 टन होते. 27 शिवाय मी सोन्याचे वीस कटोरे त्यांना दिले, त्यांचे वजन एकोणीस पौंड भरले. याखेरीज, सोन्याइतकीच किंमती अशी चकचकीत पितळेची दोन सुंदर तकबे मी त्यांना दिली. 28 मग मी त्या बारा याजकांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी दिलेली आहे. 29 तेव्हा त्यांची काळजीपूर्वक जपवणूक करा. या गोष्टी यरुशलेममधील मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्राएलमधील वडीलधारी मंडळी यांच्या हाती सोपवा. ते त्यांचे वजन करुन त्या गोष्टी यरुशलेममधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील.”
30 यावर, एज्राने वजन करुन दिलेल्या खास भेटवस्तू आणि चांदी सोने याजकांनी व लेवींनी ताब्यात घेतले. यरुशलेममधील मंदिरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
31 पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी आम्ही अहवा नदीपासून यरुशलेमला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले. 32 आम्ही यरुशलेमला पोचलो. तेथे तीन दिवस विश्रांती घेतली. 33 चौच्या दिवशी मंदिरात गेलो आणि सोने-चांदी व इतर वस्तू वजन करुन उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे दिल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते. 34 आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली.
35 त्यांनंतर बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांनी इस्राएलच्या देवाला यज्ञार्पणे वाहिली. सर्व इस्राएलकरता बारा बैल, शहाण्णव मेंढे, सत्याहत्तर नर कोकरे, पापार्पणासाठी बारा बोकड एवढे सगळे त्यांनी देवाला यज्ञात अर्पण केले.
36 मग या लोकांनी राजा अर्तहशश्तने दिलेले पत्र राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांना आणि मंदिराला सहाय्य केले.
येशू सात शिष्यांना दिसतो
21 नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले: 2 काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. 3 शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.”
ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
4 दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. 5 तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?”
त्यांनी उत्तर दिले, “नाही.”
6 तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना.
7 तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभु आहे!” असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली. 8 दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते. 9 जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली. 10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.”
11 शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. 12 येशू त्यांना म्हणाला, “या, जेवा.” तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. 13 मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली.
14 येशू मेलेल्यांतून उठल्यावर तो आपल्या शिष्यांस प्रगट होण्याची ही तिसरी वेळ.
येशू पेत्राबरोबर बोलतो
15 मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीति करतोस काय?”
तो म्हणाला, “होय प्रभु, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”
येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.”
16 पुन्हा येशू म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू खरोखर माझ्यावर प्रीति करतोस का?”
पेत्राने उत्तर दिले, “होय प्रभु तुम्हांला माहीत आहे की मी तुमच्यावर प्रीति करतो.”
येशू म्हणाला, “माझ्या मेढरांची काळजी घे.”
17 तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?”
पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, “तू माझ्यावर प्रीति करतोस का?”
तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”
येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार. 18 मी खरे सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.” 19 तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.”
20 मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीति करीत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभु, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले. 21 जेव्हा पेत्राने त्याला पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “प्रभु, याचे काय?”
22 येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्येत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर.”
23 या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?”
24 जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहीत आहे.
25 आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत, ती एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही, असे मला वाटते.
2006 by World Bible Translation Center