Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 25-27

यहूदाचा राजा अमस्या

25 अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान. ती यरुशलेमची होती. त्याची वर्तणूक परमेश्वराला पटेल अशी होती पण त्यात मनःपूर्वकता नव्हती. अमस्या शक्तिशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली. पण त्याच्या मुलांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी आईवडिलांना आणि आईवडिलांच्या अपराधासाठी मुलांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”

अमस्याने सर्व यहूदा लोकांना एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामिन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी वय वर्षे किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढाली या आयुधांनी सज्ज असे सैनिक त्याने मोजले. ते एकंदर 3,00,000 निवडक सैनिक युध्दाला तयार होते. यांच्याखोरीज आणखी 1 लक्ष सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने 3 3/4 टन चांदी एवढी किंमत मोजली. पण यावेळी देवाचा एक माणूस अमस्याकडे येऊन त्याला म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांना परमेश्वराची साथ नाही. तू भले कितीही तयारी करुन लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”

यावर अमस्या त्या देवाच्या माणसाला म्हणाला, “पण इस्राएली सैन्याला मी पैसे देऊन बसलो आहे, त्याचे काय?” देवाचा माणूस म्हणाला, “परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.”

10 तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले. या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहुदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागानेच घरी परतले.

11 यानंतर अमस्याने मोठेच धाडस करुन अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने या ठिकाणी सेइर मधील 10,000 लोकांना ठार केले. 12 आणखी 10,000 जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन खडकाच्या मध्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.

13 नेमक्या याचवेळी इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून थेट शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली. 3,000 लोकांना जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करुन न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.

14 अदोम्यांचा पाडाव करुन अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेइरमधील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरु केली. या दैवतांना वंदन करुन तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला. 15 या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वतःच्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”

16 अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प राहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”

17 यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजचा मुलगा आणि यहोआहाज येहूचा. येहू इस्राएलचा राजा होता.

18 इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनच्याच एका गंधसरुला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलींचे माझ्या मुलाशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले. 19 ‘मी अदोमचा पारभव केला.’ असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. उगीच नसत्या फंदात पडून अडचणीत येऊ नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वतःच्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”

20 पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. देवाच्याच मनात तसे होते. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजनपूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते. 21 तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ-शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ-शेमेश यहूदातच आहे. 22 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला. 23 योवाशने बेथ-शेमेश येथे अमस्याला पकडले आणि यरुशलेमला नेले. अमस्याच्या वडलांचे नाव योवाश. योवाशचे वडील यहोआहाज. योवाशने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरुशलेमच्या तटबंदीची 600 हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली. 24 सर्व सोनेरुपे तसेच मंदिरातील उपकरणी, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेदअदोमची होती. राजमहालातील चीजवस्तूही योवाशने लुटली. काही जणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.

25 योवाशच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे वडील म्हणजे यहुदाचा राजा योवाश. 26 यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची साद्यंत हकीकत आली आहे. 27 अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरुशलेमच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला. 28 अमस्याचा मृत देह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदानगरात आणून त्याला पूर्वजांशेजारी पुरले.

यहूदाचा राजा उज्जीया

26 अमस्याचा मुलगा उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता. उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.

उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला. पुढे त्याने यरुशलेमवर 52 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या. ती यरुशलेमची होती. उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले. जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.

उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले. अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली. पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले. अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोंचली.

यरुशलेममध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली. 10 वाळवंटातही त्याने बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या निगराणीसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.

11 उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई. 12 सैन्यात एकंदर 2,600 प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत. 13 शत्रूवर तुटून पडणाऱ्या 307,500 वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात. 14 या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली. 15 काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेममध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोंपऱ्यांवर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.

16 पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. 17 तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी ऐंशी शूर याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले. 18 त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्याला म्हणाले, “उज्जीया, परमेश्वराला धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नयेस. अहरोनचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही.”

19 पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले. 20 मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला. 21 राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. मंदिरात त्याला मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा मुलगा योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.

22 उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा याने अथपासून इतीपर्यंत लिहिलेली आहेत. 23 उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजांसाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्याला पुरले. कारण “तो कुष्ठरोगी होता.” उज्जीयाच्या नंतर त्याचा मुलगा योथाम राजा झाला.

यहूदाचा राजा योथाम

27 योथाम राजा झाला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा. ती सादोकची मुलगी. योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे वडील जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे दुर्वर्तन चालूच होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले. यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले. अम्मोन्यांचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीनवर्षे अम्मोनी योथामला 3 3/4 टन चांदी, 62,000 बुशेल गहू (किंवा 10,000 कोर) गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.

परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मनःपूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले. त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांशजारी दफन केले गेले. दाविदनगरांत लोकांनी त्याला पुरले. योथामच्या जागी आहाज हा त्याचा मुलगा राज्य करु लागला.

योहान 16

16 “मी हे सर्व तुम्हांला सांगितले आहे ते यासाठी की, तुम्ही माझ्यावरील विश्वासविषयी भुलविले जाऊ नये. ते तुम्हांला सभास्थानाच्या बाहेर काढतील; खरे पाहता अशी वेळ येत आहे की, जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला वाटेल की, आपण देवाची सेवाच करीत आहोत. आणि ते तुम्हांला असे जरूर करतील कारण त्यांना पिता किंवा मी माहीत नाही. मी तुम्हांला आता या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल.

पवित्र आत्म्याचे कार्य

“तेव्हा मी तुम्हांला त्यांच्यविषयी सावध केले होते हे तुमच्या लक्षात येईल. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे आता मी जातो. ‘तरी तू कोठे जातोस’ असे तुम्हांतील कोणी मला विचारीत नाही. पण या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतःकरण दु:खाने भरले आहे. तरी तुम्हांस खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही तर साहाय्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही. पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.

“आणि तो येऊन पाप, धार्मिकता आणि न्याय याविषयी जग दोषी आहे हे सिद्य करील. मी पापाविषयी सांगितले तर, लोक माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना त्यांची जाणीव करून देईल 10 नीतिमत्वाविषयी मी पित्याकडे जात आहे. मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना पटवून देईल 11 हा साहाय्यकर्ता जगाला न्यायाचे सत्य पटवून देईल. कारण या जगाच्या अधिपतीचा (सैतान) न्याय होऊन चुकला आहे.

12 “मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे. 13 पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल. 14 जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हांला कळवून तो माझे गौरव करील. 15 जे सर्व पित्याचे आहे, ते माझे आहे. या कारणासाठीच मी म्हणालो, की आत्मा जे माझे आहे त्यातून घेईल आणि ते तुम्हांला कळवील.

दु:ख आनंदामध्ये बदलेल

16 “थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, नंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”

17 त्याच्या शिष्यांतील काही जण एकमेकांस म्हणाले, “तो असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही. मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. कारण मी पित्याकडे जात आहे!” 18 ते विचारतच राहिले, “‘थोड्या वेळाने याचा अर्थ काय?’ तो काय म्हणत आहे हे आम्हांला समजत नाही.”

19 येशूने पाहिले की, याविषयी त्यांना काही विचारायचे आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांना हे विचारीत आहात काय की, जेव्हा मी म्हणालो, ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग थोडया वेळाने तुम्ही मला पाहाल?’ 20 मी तुम्हांला खरे सांगतो. जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल, तुम्ही दु:खी व्हाल, पण तुमचे दु:ख आनंदात बदलेल.

21 “जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते. 22 त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दु:ख आहे, पण मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुम्ही आनंद कराल आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही. 23 त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही, मी खरे सांगतो. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हांला देईल. 24 आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल.

जगावर विजय

25 “जरी मी तुम्हांला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हांला सांगेन. 26 त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल, आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंति करीन असे मी म्हणत नाही. 27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीति केली व माझ्यावर विश्वास ठेवला की, मी देवापासून आलो. 28 मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो आणि आता मी जग सोडत आहे, आणि पित्याकडे पुन्हा जात आहे.”

29 मग येशूचे शिष्य म्हणाले, “आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रूपकाची भाषा वापरीत नाही. 30 आता आम्हांला पक्के समजले की, तुम्हांला सर्व माहीत आहे. आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याचीसुद्वा आवश्यकता नाही, यामुळे आमचा विश्वास बसतो की, आपण देवापासून आला आहात.”

31 येशूने उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरू लागला काय? 32 पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे, जेव्हा तुमची पांगापांग होईल. प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल. तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही कारण माझा पिता मजबरोबर आहे.”

33 “मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center