Old/New Testament
विवेकबुध्दीसाठी शलमोनाची प्रार्थना
1 परमेश्वर देवाची शलमोनाला साथ असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राजा झाला. परमेश्वराने शलमोनाला थोर केले.
2 शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील प्रमुख मंडळी या सर्वांशी बोलला. 3 मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. परमेश्वराचा सभामंडप तेथे होता. परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो बनवला होता. 4 दावीदाने परमेश्वराचा करारकोश किर्याथ यारीमाहून यरुशलेम येथे आणला होता. यरुशलेममध्ये तो ठेवण्यासाठी दावीदाने जागा तयार केली होती. करारकोशासाठी त्याने यरुशलेममध्ये तंबू उभारला होता. 5 उरीचा मुलगा बसलेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती. म्हणून शलमोन आपल्या बरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला. 6 परमेश्वराच्या निवासमंडपासमोरील पितळी वेदी वर शलमोनाने 1,000 होमार्पणे केली.
7 त्यारात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले. तो म्हणाला, “शलमोन, मी तुला काय द्यावे अशी तुझी इच्छा आहे ते मला माग.”
8 शलमोन परमेश्वराला म्हणाला, “माझे वडील दावीद यांच्यावर तुझी फार कृपा दृष्टी होती. त्यांच्याजागी तू मला नवीन राजा म्हणून निवडलेस. 9 आता, हे परमेश्वर देवा, त्यांना तू दिलेले वचन पूर्ण कर. एका फार मोठ्या राष्ट्राचा तू मला राजा केले आहेस. त्यातील प्रजेची संख्या धरतीवरील रजःकणांसारखी विपुल आहे. 10 एवढ्या लोकांना उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे. तुझ्या मदतीखेरीज एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणालाच जमणार नाही.”
11 तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे. तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा मानसन्मान यांची मागणी केली नाहीस. शत्रूंचा नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस. स्वतःसाठी दीर्घायुष्य मागितले नाहीस. यापैकी काहीही न मागता ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेसाठी धोरणीपणाने निर्णय घेता यावेत म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस. 12 तेव्हा ते मी तुला देईनच पण त्याखेरीज मालमत्ता, ऐश्वर्य आणि मानसन्मानही देईन. तुझ्या आधीच्या कोणाही राजाला मिळाले नसेल एवढी संपत्ती व मानसन्मान देईन. पुढेही तुझ्याएवढे कोणत्याही राजाला मिळणार नाही.”
13 तेथून शलमोन गिबोन येथे उच्चस्थानी गेला. सभामंडपाकडून तो पुन्हा राजाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी यरुशलेम येथे गेला.
शलमोनाचे सैन्यबल आणि संपत्ती
14 शलमोनाने सैन्यासाठी घोडे आणि रथ यांची जमवाजमव सुरु केली. त्याच्याकडे 1,400 रथ आणि 12,000 घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने पागा आणि रथांसाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले. काहींना त्याने आपल्याजवळ यरुशलेम येथेच ठेवून घेतले. 15 यरुशलेममध्ये त्याने चांदीसोन्याचा भरपूर साठा केला.सोने चांदी सामान्य दगडांसारखी विपुल होती तर गंधसरुचे लाकूड पश्चिमेकडच्या डोंगराळ भागात उंबराचे लाकूड असे तितके विपुल होते. 16 मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे आणवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोड्यांची खरेदी करत. 17 या व्यापाऱ्यांनी मिसरमधून 600 शेकेल चांदीला एकेक रथ आणि 150 शेकेल चांदीला घोडा या प्रमाणे ही खरेदी केली. हित्ती आणि अरामी राजांना मग ते हे रथ आणि घोडे विकत.
शलमोनाचे मंदिराचे बांधकाम
2 परमेश्वराच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर तसेच स्वतःसाठी एक राजमहालही बांधायचे शलमोनाने ठरवले. 2 डोंगरातून दगडाचे चिरे काढायला 80,000 पाथरवट आणि 70,000 मजूर त्याने नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने 3,600 मुकादम नेमले.
3 सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला,
“माझे वडील दावीद यांना केलीत तशीच मला मदत करा. त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरुचे लाकूड पाठवले होते. 4 मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ, शब्बाथच्या दिवशी, दर नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे वाहू. इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.
5 “आमचा परमेश्वर हा सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे. 6 खरं म्हणजे परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणालाही झालं तरी कसं शक्य आहे? स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्याला सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणे मलाही शक्य नाही. मी आपला त्याच्या प्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो. एवढेच.
7 “तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्याला जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र करता यावे. कोरीव कामाचेही त्याला चांगले शिक्षण मिळालेले असावे. माझ्या वडिलांनी निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरुशलेममध्ये काम करील. 8 लबानोनमधून माझ्यासाठी गंधसरु, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूडही पाठवावे. लबानोनमधले तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे. त्या तुमच्या सेवकाना माझे सेवक मदत करतील. 9 मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला लाकूड मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. 10 लाकडासाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मेहनताना देईनः 1,25,000 बुशेल गहू, 1,25,000 बुशेल जव, 115,000 गॅलन द्राक्षारस आणि 1,15,000 गॅलन तेल.”
11 हिरामने मग शलमोनाला उत्तर पाठवले. त्यात त्याने असा निरोप पाठवला की:
“शलमोन, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.” 12 हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. राजा दावीदाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोन, तू सूज्ञ आणि विचारी आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधायला निघाला आहेस. 13 हिराम अबी नावाचा एक कुशल कारागिर मी तुझ्याकडे पाठवतो. 14 त्याची आई दान वंशातील असून त्याचे वडील सोर नगरातले होते. हा कारागिर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्याला सांगितलेली कोणतीही गोष्ट तो तिचे योग्य रेखाटन करुन कोरुन काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या, माझ्या स्वामी दाविदाच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.
15 “तुम्ही गहू, जव, तेल आणि द्राक्षारस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे. 16 आणि लबानोनमधून आम्ही तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओडक्यांचे तराफे करुन आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमला न्यावे.”
17 शलमोनाने यानंतर इस्राएलमधल्या सर्व उपऱ्या लोकांची गणना केली. दावीदाने गणती केली होती त्यानंतरची ही गणती. दावीद हा शलमोनाचा पिता. या गणनेत त्यांना 1,53,600 उपरे लोक मिळाले. 18 शलमोनाने त्यापैकी 70,000 जणांना ओझी वाहायला निवडले आणि 80,000 लोकांना डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या 3,600 उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.
शलमोन मंदिर बांधतो
3 यरुशलेममधील मोरिया पर्वतावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे वडील दावीद याला परमेश्वराने याच मोरिया पर्वतावर दर्शन दिले होते. दावीदाने तयार करुन ठेवलेल्या या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजेच ते अर्णान यबूसीचे खळे. 2 आपल्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली.
3 शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया 60 हात लांब आणि 20 हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते. 4 मंदिराच्या समोरचा द्वारमंडप 20 हात लांब आणि वीस हात उंच होता. त्याची आतील बाजू शलमोनाने शुध्द सोन्याने मढवली होती. 5 मोठ्या खोलीला सर्वबाजूंनी त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यांवर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरुन काढल्या 6 मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौदर्यात भर घातली. यात वापरलेले सोने पर्वाइमचे होते. 7 तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरुन काढले.
8 यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्र स्थान 20 हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर 23 टन सोने होते. 9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन 1 1/4 पौंड एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली. 10 अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले. 11 करुबांच्या एकेका पंखाची लांबी 5 हात होती. त्यांची एकंदर लांबी 20 हात एवढी होती. पहिल्या करुबाचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला. 12 आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता. 13 अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करुन उभे होते.
14 निळ्या, जांभळ्या आणि उंची किरमिजी वस्त्राचा पडदा करुन घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.
15 मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभे केले. हे स्तंभ 35 हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी 5 हात उंचीचे होते. 16 शलमोनाने साखळ्या करुन त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने 100 शोभिवंत डाळिंबे कलाकुसर म्हणून लावली. 17 हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज (सामर्थ्यवान) अशी नावे दिली.
मेंढपाळ आणि त्याची मेंढरे
10 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो, तेव्हा त्याने दाराचाच उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारु आहे. तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. 2 परंतु मेंढरांची काळजी घेणारा दारातूनच आत जातो, तो मेंढपाळ आहे. 3 दारावरचा पहारेकरी मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात, मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाका मारतो, आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो. 4 आपली सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्यांच्या पुढे पुढे चालतो. (त्यांचे नेतृत्व करतो). मेंढरे त्याच्या मागोमाग जातात. कारण ती त्याचा आवाज ओळखतात. 5 अनोळखी माणसांच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत. ती त्या माणसापासून दूर पळून जातील. कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो.”
6 येशूने लोकांना हा दाखला सांगितला. परंतु तो काय सांगत आहे हे लोकांना समजले नाही.
येशू उत्तम मेंढपाळ आहे
7 म्हणून येशू पुन्हा म्हणाला. “मी तुम्हांला खरे सांगतो. मी मेंढरांचे दार आहे. 8 माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटारु होते. मेंढरांनी त्यांचे आवाज ऐकले नाहीत. 9 मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. 10 चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे.
11 “मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो. 12 ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो. मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणार माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करुन त्यांची दाणादाण करतो. 13 मजूर पळून जातो कारण तो रोजंदारीवरचा कामगार असतो, तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही.
14-15 “मी मेंढरांची (लोकांची) काळजी घेणारा मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो. आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात. या मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. 16 माझी दुसरीही मेंढरे आहेत ती येथे या कळपात नाहीत. त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे. ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्यकाळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. 17 मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीति करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो. 18 तो कोणी माझ्यापासून घेत नाही. मी माझा स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे. आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.”
19 येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे यहूदी लोकांचे आपापसात एकमत होईना. 20 यहूदी लोकांपैकी पुष्कळजण म्हणाले, “याला भूत लागले आहे. म्हणून याचे डोके ठिकाणावर नाही. त्याचे का ऐकावे?”
21 परंतु दुसरे काही जण म्हणाले, “हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरविलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळीच नाही!”
येशूच्या विरोधात यहूदी पुढारी
22 यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण [a] जवळ आला. तो हिवाळा होता. 23 येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीत [b]होता.
2006 by World Bible Translation Center