Old/New Testament
शोमरोनच्या वडीलधाऱ्यांना येहूचे पत्र
10 शोमरोनमध्ये अहाबला सत्तर मुलगे होते. शोमरोनमधील अधिकारी आणि वडीलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. तसेच ज्यांनी या अहाबच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले. 2-3 “हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्या जवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे. तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल त्याला त्याच्या बापाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.”
4 पण हे वाचून ती अधिकारी आणि वडीलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुध्द येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्याला अडवणार?”
5 मग, अहाबच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडीलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”
शोमरोनच्या अधिकाऱ्यांकडून अहाबच्या मुलांची हत्या
6 येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबच्या मुलांचा शिरच्छेद करा. ऊद्या साधारण याच वेळेला त्यांना माझ्याकडे आणा.”
अहाबला सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते. 7 या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या सर्वच्यासर्व सत्तर जणांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या इज्रेलला येहूकडे पाठवल्या. 8 निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.”
त्याला येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करुन सकाळपर्यंत तिथे ठेवा.”
9 सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्याला ठार केले. पण अहाबच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत. 10 परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करुन दाखवल्या आहेत.”
11 आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
अहज्याच्या नातलगांचा वध
12 इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला. 13 यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?”
ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”
14 तेव्हा येहू आपल्या बरोबरच्या लोकांना म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.”
तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वाना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.
येहूची यहोनादाबशी भेट
15 तिथून निघाल्यावर येहूला रेखाबचा मुलगा यहोनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?”
यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.”
येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.”
आणि येहूने त्याचा हात धरुन त्याला आपल्या रथात घेतले.
16 येहू यहोनादाबला म्हणाला, “चल माझ्या बरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कटता आहे ती बघ.”
तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला. 17 शोमरोनला पोंचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबीय अजून जिवंत होते त्या सर्वाना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.
बाल देवतेच्या पूजकांना येहू बोलावतो
18 येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबने बालची थोडी सेवा केली. पण येहू मात्र बालची बरीच सेवा करणार आहे. 19 आता बालच्या सर्व पुरोहितांना आणि संदेष्ट्यांना बोलावून घ्या. तसेच जे जे बालची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यात कोणीही गैरहजर असता कामा नये. बालसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्याला मी ठार करीन हे नक्की”
येहूची ही सर्व बतावणी होती. त्याला बालच्या पूजकांचा संहार करायचा होता. 20 येहू म्हणाला, “बालसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा पुरोहितांनी त्याची घोषणा केली. 21 येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बालचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बालच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.
22 वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बालच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वांसाठी वस्त्रे दिली.
23 मग येहू आणि रेखाबचा मुलगा यहोनादाब बालच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बालच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करुन घ्या. बालची पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.” 24 यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बालचे सर्व पूजक बालच्या देवळात शिरले.
बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्याला जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”
25 स्वतः यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.”
तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बालदेवळाच्या गर्भगृहात गेले 26 स्मृतिस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि देऊळ जाळले. 27 बालच्या स्मृतिस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बालच्या देवळाचाही विद्धवंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करुन टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात.
28 अशा प्रकारे इस्राएलमधली बालची पूजा येहूने मोडून काढली. 29 पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.
इस्राएलवर येहूचे राज्य
30 परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.”
31 पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मनःपूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वतःला थोपवू शकला नाही.
हजाएलकडून इस्राएलचा पराभव
32 याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला. 33 यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यांतील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यात आला. तसेच अर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.
येहूचा मृत्यू
34 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे. 35 येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनमध्ये केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला. 36 येहूने शोमरोन मधून इस्राएलवर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.
अथल्या यहूदामध्ये राजाच्या सर्व मुलांचा वध करते
11 अथल्या ही अहज्याची आई. आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर ती उठली आणि सर्व राजघराण्याची तिने हत्या केली.
2 यहोशेबा ही राजा योरामची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.
3 योवाश आणि यहोशेबा मग परमेश्वराच्या मंदिरात लपून राहिले. योवाश तिथे सहा वर्षे राहिला. यहूदावर अथल्याचे राज्य होते.
4 सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. परमेश्वराच्या मंदिरात त्या सगळ्यांना बोलावले आणि यहोयादाने त्यांच्याशी एक करार करुन त्यांच्याकडून शपथ घेतली मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
5 यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हाला आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे. 6 दुसऱ्या एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे. योवाशच्या मागे तुमची अशी संरक्षक भिंत होईल. 7 प्रत्येक शब्बाथ दिवसाच्या अखेरीला तुमच्यापैकी दोनतृतीयांश लोक परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशला संरक्षण देतील. 8 राजा योवाश जिथे जिथे जाईल तिथे तिथे सर्ववेळ तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे. प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्याला मारुन टाकावे.”
9 याजक यहोयाद याने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या अधिकाऱ्यांनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या माणसांना बरोबर घेतले. एका गटाने शनिवारी राजाचे रक्षण करावयाचे होते. आठवड्यातले इतर दिवस बाकीचे गट ते काम करणार होते. हे सर्व लोक यहोयादाकडे गेले. 10 यहोयादाने भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीदाने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच. 11 मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहात.
12 या सर्वांनी योवाशला बाहेर काढले. त्याला त्यांनी मुकुट घातला आणि राजा व देव यांच्यातील करारलेख त्याला दिला. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व राजा केले मग टाळ्यां वाजवून त्यांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयघोष केला. 13 हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.
14 राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे राहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांना खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.
15 हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”
16 पहारेकऱ्यांनी मग तिला पकडले आणि घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.
17 यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.
18 या नंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बालच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडेतुकडे केले बालचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले.
याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले. 19 सर्व लोकांना घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला. 20 लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. महालाजवळच राणी अथल्या तलवारीने मारली गेली.
21 योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.
योवाशच्या सत्तेची सुरुवात
12 येहू इस्राएलचा राजा झाल्याच्या सातव्या वर्षी योवाश (म्हणजेच यहोआश) याच्या सत्तेला सुरवात झाली. योवाशने येरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. योवाशच्या आईचे नाव सिब्या, ती बैर-शेबा इथली होती. 2 योवाशचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता. 3 पण उंचवट्यावरील पुजास्थळांना त्याने धक्का लावला नाही. लोक यज्ञ करायला, धूप जाळायला तिथे जातच राहिले.
मंदिर दुरुस्तीची योवाशची आज्ञा
4-5 योवाश याजकांना म्हणाला, “परमेश्वराच्या मंदिराची आर्थिक स्थिती चांगली आहे. लोकांनी मंदिराला बरेच काही दिले आहे. शिरगणती झाली तेव्हा लोकांनी कर भरला. केवळ इच्छेखातरही लोकांनी पैसे दिले. तुम्ही याजकांनी आता त्या पैशाचा विनियोग परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी करायला हवा. प्रत्येक याजकाने आपापल्या यजमानांकडून मिळालेले पैसे या कामी वापरले पाहिजेत. परमेश्वराच्या मंदिरात काही मोडतोड झाली असेल तर या पैशातून तिची दुरुस्ती व्हावी.”
6 तरीही याजकांनी काहीही सुरु केले नाही. योवाशचे राजा म्हणून तेविसावे वर्ष चालू होते तोपर्यत याजकांनी मंदिराची दुरुस्ती केलेली नव्हती. 7 तेव्हा मात्र योवाशने यहोयाद आणि आणखी काही याजक यांना बोलावणे पाठवले. त्यांना तो म्हणाला, “अजूनही तुमच्या हातून मंदिराची दुरुस्ती का झाली नाही? आता आपापल्या लोकांकडून पैसे घेणे आणि ते पैसे वापरणे बंद करा. त्या पैशाचा विनियोग मंदिराच्या दुरुस्तीसाठीच झाला पाहिजे.”
8 याजकांनी लोकांकडून पैसे घेण्याचे थांबवण्याबद्दल आपली सहमती दर्शवली खरी पण मंदिराची दुरुस्ती करायची नाही असेही ठरविले. 9 तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाकणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वराला वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत.
10 मग लोकही मंदिरात आल्यावर पेटीतच पैसे टाकत. राजाचा चिटणीस आणि मुख्य याजक अधून मधून येत आणि पेटीत बरेच पैसे साठलेले दिसले की ते पैसे काढून घेत. थैल्यांमध्ये भरुन ते मोजत. 11 मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यात सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते. 12 दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडणे आणि दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात.
13-14 लोक परमेश्वराच्या मंदिरासाठी पैसे देत. पण याजकांना ते चांदीची उपकरणी, कातऱ्या, वाडगे, कर्णे, सोन्या-चांदीची तबके यासाठी वापरता येत नव्हते, तर कारागिरांनाच ते पैसे दिले जात. त्या पैशाने ते मंदिराची दुरुस्ती करत. 15 कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशोब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.
16 आपल्याहातून घडलेल्या अपराधांचे, पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी अर्पणे करण्यासाठी लोक येत तेव्हा ते पैसे देत, पण हा पैसा कारागिरांना देण्यासाठी वापरला जात नसे. तो याजकांचा होता.
योवाश हजाएलपासून यरुशलेमचे रक्षण करतो
17 हजाएल अरामचा राजा होता. तो गथवर स्वारी करुन गेला. गथचा त्याने पाडाव केला आणि तो यरुशलेमवर चढाई करायचा विचार करु लागला.
18 योवाशच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वराला बऱ्याच गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशनेही बरेच काही परमेश्वराला दिले होते. योवाशने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरुशलेमला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.
योवाशचा मृत्यू
19 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात योवाशच्या थोर कृत्यांची नोंद आहे.
20 योवाशच्या कारभाऱ्यांनी योवाशाविरुध्द कट केला. शिल्ला येथे जाणाऱ्या रस्तावरील मिल्लोच्या घरात त्यांनी योवाशचा वध केला. 21 शिमाथचा मुलगा योजारवार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले.
दावीद नगरात लोकांनी योवाशला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशचा मुलगा अमस्या त्याच्यानंतर राज्य करु लागला.
येशू देवाचा कोकरा
29 दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा. 30 याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’ 31 तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते. परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा [a] करीत आलो यासाठी की, येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्राएलाला (यहूदी लोकांना) कळावे.”
32-34 नंतर योहान म्हणाला, “ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, ‘आत्मा खाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल. तोच मनुष्य पवित्र आत्म्याने [b] बाप्तिस्मा करील.’ योहान म्हणाला, हे होताना मी पाहिले आहे. स्वर्गातून पवीत्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला. आत्मा कबुतरासारखा दिसत होता. आणि तो त्याच्यावर (येशूवर) येऊन स्थिरावला. म्हणून मी लोकांना सांगतो: ‘तो (येशू) देवाचा पुत्र आहे.’”
येशूचे पहिले शिष्य
35 दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला. योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते. 36 योहानाने येशूला जाताना पाहिले, योहान म्हणाला, “पाहा हा देवाचा कोकरा!” [c]
37 योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले, म्हणून ते योहानाचे शिष्य येशूच्या मागे गेले. 38 येशूने मागे वळून पाहिले तो दोघेजण आपल्यामागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले, “तुम्हांला काय पाहिजे?”
ते दोघे म्हणाले, “गुरूजी (रब्बी), तुम्ही कोठे राहता?”
39 येशूने उतर दिले, “माझ्याबरोबर या म्हणजे तुम्हांला दिसेल.” तेव्हा ते दोघेजण येशूबरोबर गेले. येशू राहत होता ती जागा त्यांनी पाहिली. ते त्या दिवशी येशूबरोबर तेथे राहिले. त्यावेळी सुमारे दुपारचे चार वाजले होते.
40 येशूविषयी योहानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले. त्यांच्यापैकी एकाचे नाव अंद्रिया होते. अंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ. 41 अंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की, आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. अंद्रिया शिमोनाला म्हणाला, “आम्हांला मशीहा सापडला आहे.”
42 शिमोनाला घेऊन अंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा [d] म्हणतील.”
43 दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” 44 जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता. 45 फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”
46 परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?”
फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.”
47 येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले, येशू म्हणाला, “हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.”
48 “तुम्ही मला कसे ओळखता?” नथनेलाने विचारले.
येशूने उत्तर दिले, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच.”
49 मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.”
50 येशू नथनेलला म्हणाला, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले, असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील!” 51 येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.” [e]
2006 by World Bible Translation Center