Old/New Testament
यराबामच्या मुलाचा मृत्यू
14 याच सुमारास यराबामचा मुलगा अबीया आजारी पडला. 2 तेव्हा यराबाम आपल्या बायकोला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. 3 संदेष्ट्याला तू दहा भाकरी, काहीगोड पुऱ्या आणि मधाचा बुधला दे. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
4 मग राजाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते. 5 पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा मुलगा फार आजारी आहे.” मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले.
यराबामची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता. 6 अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे. 7 परत जाशील तेव्हा इस्राएलचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलच्या समस्त प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली. 8 याआधी इस्राएलवर दावीदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे, मनःपूर्वक मलाच अनुसरत असे, मला मान्य असलेल्या गोष्टीच तो करी. 9 पण तुझ्या हातून अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे. 10 तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काडीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन. 11 तुझ्या घरातल्या ज्याला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.’”
12 अहीया संदेष्टा मग यराबामच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू गावात शिरल्याबरोबर तुझा मुलगा मरणार आहे. 13 सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्याताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे. 14 परमेश्वर इस्राएलवर नवीन राजा नेमील. तो यराबामच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल. 15 मग परमेश्वर इस्राएलला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्राटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा देवीचे स्तंभ त्यांनी उभारले याचा त्याला संताप आला. 16 आधी यराबामच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”
17 यराबामची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा मुलगा वारला. 18 सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.
19 राजा यराबामने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे. 20 बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा नादाब त्याच्यानंतर सत्तेवर आला.
21 शलमोनाचा मुलगा रहबाम यहूदाचा राजा झाला तेव्हा तो एक्के चाळीस वर्षाचा होता. यरुशलेममध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वतःच्या सन्मानासाठी या नगराची निवड केली होती. इस्राएलमधल्या इतर नगरांमधून त्याने हेच निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा. ती अम्मोनी होती.
22 यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले आणि परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती. 23 या लोकांनी उंचवट्यावरील देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. खोट्यानाट्या दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी या गोष्टी बांधल्या.
24 परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात याआधी जे लोक राहात असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलच्या लोकांना दिला होता.
25 रहबामच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमवर स्वारी केली. 26 त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून दावीदाने ज्या सोन्याच्या ढाली आणल्या होत्या त्याही त्याने पळवल्या. दावीदाने त्या यरुशलेममध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या. 27 मग रहबामने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या. 28 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.
29 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे. 30 रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
31 रहबाम वारला आणि त्याचे आपल्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामचा मुलगा अबीया नंतर राज्यावर आला.
यहूदाचा राजा अबीया
15 नबाटाचा मुलगा यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, त्याचा (रहबामचा) मुलगा अबीया यहूदाचा पुढचा राजा झाला. 2 अबीयाने तीन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमची मुलगी.
3 आपल्या वडीलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ट नव्हता. 4 दावीदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याखातर त्याने अबीयाला यरुशलेमचे राज्य दिले. परमेश्वराच्या कृपेने त्याला मुलगाही झाला यरुशलेमला परमेश्वर दयेने सुरक्षितताही लाभली. हे सर्व दावीदासाठीच परमेश्वराने केले. 5 दावीदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
6 रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत. 7 अबीयाने आणखी जे काही केले त्याची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे. 8 अबीयाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा मुलगा आसा राज्य करु लागला.
यहूदाचा राजा आसा
9 यराबामच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला 10 आसाने यरुशलेमवर एक्के चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमची मुलगी.
11 आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले. 12 त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडीलांनी केलेल्या मूर्तीही हलवल्या. 13 आपली आजी माका हिला आसाने राणी, होण्यापासून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली. 14 उंचवट्यावरील पूजास्थळांची त्याने नासधूस केली नाही, मात्र आयुष्यभर तो परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला. 15 आसा आणि त्याचे वडील यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करुन घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यात होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
16 आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत. 17 बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणेजाणे त्याला थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले. 18 आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेनहदाद हा तब्रिम्मोनचा मुलगा आणि तब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती. 19 आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल.”
20 राजा बेनहदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ माका, गालिल सरोवरालगतची गावे आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य पाठवले. 21 या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबुतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला. 22 मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामुग्री आणली. बन्यामीनमधील मेबा आणि मिस्पा येथे हे सर्व सामान त्यांनी वाहून नेले. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
23 आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. 24 त्याचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा यहोशाफाट राज्य करु लागला.
इस्राएलचा राजा नादाब
25 यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामचा मुलगा नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले. 26 नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडील यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये त्याने केली यराबामने इस्राएल लोकांनाही पाप करायला लावले होते.
27 बाशा हा अहीयाचा मुलगा. हे इस्साखारच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले. 28 आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
इस्राएलचा राजा बाशा
29 बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले. 30 राजा यराबामने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांनाही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामवर कोप झाला.
31 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत. 32 बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
33 आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा मुलगा बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले. 34 पण परमेश्वराच्या मते जे गैर ते त्याने केले. आपले वडील यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली होती.
तुमचा विश्वास ढळू देऊ नका(A)
31 “शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे. 32 परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना कसून केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”
33 परंतु शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.”
34 पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारीपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
संकटासाठी तयार राहा
35 येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हांला थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांस काही कमी पडले का?”
ते म्हणाले, “काहीही नाही.”
36 तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी. आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि एक विकत घ्यावी. 37 कारण मी तुम्हांस सांगतो, हा शास्त्रभाग माझ्यामध्ये परिपूर्ण झालाच पाहिजे:
‘आणि तो अपराधी असा गणला गेला.’ (B)
होय, हा माझ्याविषयीचा संदर्भ पूर्ण होत आहे.”
38 ते म्हणाले, “प्रभु, पहा, येथे दोन तरवारी आहेत.”
तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!”
येशू प्रेषितांना प्रार्थना करण्यास सांगतो(C)
39-40 तो निघाला आणि नेहमीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. तो त्या ठिकाणी आला तेव्हा त्यांना म्हणाला, “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
41 तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले. आणि अशी प्रार्थना केली, 42 “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माइयाकडून घे. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 43 स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला 44 दु;खाने ग्रासलेला असतानासुद्धा त्याने अधिक काकुळतीने प्रार्थना केली. आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. 45 आणि जेव्हा प्रार्थना करुन तो उठला आणि शिष्यांकडे आला तेव्हा ते त्यांच्या दु:खामुळे थकून जाऊन झोपी गेलेले आढळले. 46 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा, आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
2006 by World Bible Translation Center