Old/New Testament
शलमोनाच्या भेटीस शबाची राणी
10 शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली. 2 नोकरा चाकरांचा लवाजमा आणि मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुशलेमला आली. शलमोनाला भेटल्यावर तिने सुचतील ते सर्व प्रश्न विचारले. 3 शलमोनाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला कुठलाच प्रश्न अवघड वाटला नाही. 4 शलमोन अतिशय हुषार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने बांधलेला सुंदर महालही तिने बघितला. 5 त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांचा पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्र्चर्याने थक्क झाली.
6 ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते वस्तुस्थितीला धरुनच होते. 7 पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे. 8 तुझ्या बायका [a] आणि कारभारी खरेच फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेचे भाग्य त्यांना लाभले आणि तुझ्या ज्ञानाचा लाभ त्यांना होतो. 9 परमेश्वर देव थोर आहे. तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलचा राजा केले. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे. म्हणूनच त्याने तुला राजा केले. तू नियमशास्त्राचे पालन करतोस आणि लोकांना न्यायाने वागवतोस.”
10 मग शबाच्या राणीने राजाला जवळजवळ 9,000 पौंड सोने नजर केले. शिवाय मसाल्याचे सुगंधी पदार्थ आणि मौल्यवान हिरेही दिले. इस्राएलमध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले.
11 हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली. 12 शलमोनाने या लाकडाचा वापर मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलमध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही.
13 दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासहित मायदेशी निघून गेली.
14 शलमोन राजाला दरसाल जवळपास एकोणऐंशी हजार नऊशेवीस पौंड सोने मिळत राहिले. 15 या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले.
16 शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीचे वजन पंधरा पौंड होते. 17 तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्यात चार पौंड सोने होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमध्ये त्याने या ठेवल्या.
18 शिवाय शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते. 19 सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते. 20 तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणत्याही राज्यात नव्हते.
21 शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमधली सर्व शस्त्रास्त्रे आणि सामुग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.
22 राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत.
23 शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुध्दि चातुर्य होते. 24 लोक त्याला पाहायला उत्सुक असत. देवाने त्याला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे. 25 ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणी. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.
26 शलमोनाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बाराहजार घोडे यांचा संग्रह होता. रथांसाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यात रथ ठेवले. काही रथ त्याच्या जवळ यरुशलेममध्येही होते. 27 राजाने इस्राएलला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुशलेम नगरात चांदी दगडधोंड्यासारखी आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते. 28 मिसर आणि क्यू येथून शलमोन घोडे आणवत असे. त्याचे व्यापारी क्यूमध्ये ते खरेदी करत आणि तेथून ते इस्राएल मध्ये आणत. 29 मिसरचा एक रथ साधारण 15 पौंड चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत पावणेचार पौंड चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना शलमोन हे रथ आणि घोडे विकत असे.
शलमोन आणि त्याचा जनानखाना
11 स्त्रियांबद्दल शलमोनाला आकर्षण होते. इस्राएल देशाच्या बाहेरच्याही अनेक स्त्रिया त्याच्या आवडत्या होत्या. फारोच्या मुलीखेरीज, हिती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले. 2 परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला. 3 त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले. 4 तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडील दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही. 5 सिदोनी लोकांच्या अष्टोरेथ देवाची त्याने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही त्याने भजले. 6 अशाप्रकारे त्याने परमेश्वराचा अपराध केला. आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.
7 कमोश या मवाबी लोकांच्या भंयकर दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या भयंकर दैवतासाठीही एक स्थळ केले. 8 आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच सोय केली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.
9 इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावृत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते. 10 इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले. 11 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्या कडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या एखाद्या सेवकाला मी ते देईन. 12 पण तुझे वडील दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा मुलगा गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन. 13 तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दावीदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरुशलेमसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”
शलमोनाचे शत्रू
14 आणि मग परमेश्वराने अदोममधल्या हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमच्या राजघराण्यातला होता. 15 त्याचे असे झाले दावीदाने पूर्वी अदोमचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दावीदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. त्याने सर्वांची कत्तल केली होती. 16 यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोममध्ये सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोममध्ये कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही. 17 हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडीलांचे काही सेवकही त्याच्याबरोबर गेले. 18 मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्नवस्त्राची सोय केली.
19 फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्नही लावून दिले. (तहपनेस ही राजाची राणी होती) 20 या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा मुलगा झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलां बरोबरच वाढला.
21 दावीदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्याला कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”
22 तेव्हा फारो त्याला म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्व काही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?”
तेव्हा हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.
23 देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा मुलगा. सोबाचा राजा हददेजर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला. 24 दावीदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर रजोनने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला 25 अरामवर रजोनने राज्य केले. इस्राएलबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलला बराच त्रास दिला.
26 नबाट याचा मुलगा यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडील वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
27 त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीदनगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करुन घेत होता. 28 यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्याला योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले. 29 एकदा यराबाम यरुशलेमच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्याला शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखीकोणी नव्हते.
30 अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.
31 मग अहीया यराबामला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वतःजवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे ‘शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन. 32 आणि दावीदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे. 33 शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबचा कमोश, अम्मोन्यांचा मिलकोम या खोट्यानाट्या दैवतांचे तो भजनपूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडील दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही. 34 तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर राहील. माझा सेवक दावीद याच्या लोभाखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दावीदने पाळल्या म्हणून मी त्याला निवडले. 35 पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन. 36 शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेममध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वतःचे म्हणून निवडले. 37 बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल. 38 माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दावीदाप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दावीदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन. 39 शलमोनाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.’”
शलमोनाचा मृत्यू
40 शलमोनाने यराबामच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.
41 शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या आहेत. 42 यरुशलेममधून त्याने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले 43 मग तो वारला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीदनगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले.
यरुशलेमेचा नाश(A)
20 “जेव्हा तुम्ही यरुशलेमाला सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हांला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे. 21 जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. 22 ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. 23 त्या दिवसांत ज्या गरोदरस्त्रिया आहेत, व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल. मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल. 24 ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.
भिऊ नका(B)
25 “सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील. 26 भीतीमुळे लोक बेशुद्ध होतील आणि जगात काय घडणार आहे ह्या धास्तीमुळे व भीतिमुळे लोक दुर्बल होतील. आकाशातील सामर्थ्ये डळमळीत होतील. 27 नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने मेघात येताना पाहतील. 28 मग या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा. आणि तुमचे मस्तक वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
माझी वचने सर्वकाळ टिकतील(C)
29 नंतर त्याने त्यांस एक बोधकथा सांगितली: “अंजिराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडांकडे पाहा. 30 त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. 31 त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
32 “मी तुम्हांस खरे सांगतो की, ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. 33 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
सर्वदा तयार राहा
34 “सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल. 35 खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जिवंतांवर येईल. 36 सर्व समयी जागृत राहा. होणाऱ्या सर्व गोष्टींपासून जिवंत राहण्यासाठी आणि विश्वासाने मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहणे शक्य व्हावे यासाठी प्रार्थना करा.”
37 दर दिवशी तो मंदिरात शिक्षण देत असे. परंतु रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर जात असे. 38 सर्व लोक मंदिरात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे जात.
2006 by World Bible Translation Center