Old/New Testament
इस्राएल आणि यहूदा यांच्यात लढाई
3 दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. दिवसेंदिवस दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलचे घराणे कमकुवत बनत गेले.
हेब्रोन येथे दावीदाच्या सहा मुलांचा जन्म
2 हेब्रोन येथे दावीदाला मुलगे झाले,
त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पहिला मुलगा झाला तो अम्मोन.
3 दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा.
अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई.
4 अदोनीया चवथा, हग्गीथ ही त्याची आई.
शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल.
5 दावीदाची बायको एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला.
हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.
अबनेर दावीदाला येऊन मिळण्याचे ठरवतो
6 शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले. 7 शौलची रिस्पा नामक उपपत्नी होती. ती अय्याची मुलगी. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शरीर संबध का ठेवतोस?”
8 या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, “शौलशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही. [a] पण आता तू मला या बाईच्या संदर्भात दूषण देत आहेस. 9-10 आता मात्र मी निर्धाराने सांगतो की, देवाने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही तर देव खुशाल माझे वाईट करो.” 11 ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने काहीही प्रत्युत्तर केले नाही.
12 अबनेरने दूतांकरवी दावीदाला निरोप पाठवला, “ह्या प्रदेशांवर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याबरोबर करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”
13 यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले, मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलेस तरच मी तुला भेटीन.”
14 शौलचा मुलगा ईश-बोशेथ याच्याकडे दावीदाने जासूदांकरवी निरोप पाठवला, “माझी पत्नी मीखल हिला माझ्याकडे पाठवून द्यावे. ती मला देण्यात आलेली आहे. तिच्या प्राप्तीसाठी मी शंभर पलिष्ट्यांचा वध केला होता.”
15 तेव्हा ईश-बोशेथने लईशचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली. 16 पालटीयेल हा मीखलचा नवरा. तो तिच्यामागोमाग बहूरीम पर्यंत रडतरडत गेला. पण अबनेरने त्याला परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला.
17 अबनेरने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते. 18 आता ते प्रत्यक्षात आणा. परमेश्वराने दावीदा विषयी म्हटले आहे ‘पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.’”
19 अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला. त्यांना आणि इस्राएल लोकांना ते चांगले वाटले.
20 एवढे झाल्यावर तो आपल्या बरोबर वीस जणांना घेऊन हेब्रोन येथे दावीदाकडे आला. दावीदाने अबनेर आणि त्याच्या बरोबरचे हे सर्वलोक यांना मेजवानी दिली.
21 अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांना मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.”
तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला.
अबनेरचा मृत्यू
22 इकडे यवाब आणि दावीदाचे लोक युध्दावरुन परत आले. त्यांनी शत्रूकडून बऱ्याच मौल्यवान वस्तू लुटून आणल्या. दावीदाने निरोप दिल्यावर अबनेर नुकताच शांतचित्ताने तेथून गेला होता. तेव्हा हेब्रोन येथे दावीदाजवळ तो अर्थातच नव्हता. 23 यवाब सर्वसैन्यासह हेब्रोन येथे आला. सैन्यातील लोक यवाबाला म्हणाले, “नेरचा मुलगा अबनेर दावीदराजाकडे आलेला होता आणि दावीदाने त्याला शांत मनाने जाऊ दिले होते.”
24 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्याला तसेच जाऊ दिलेत! असे का? 25 या नेरच्या मुलाला तुम्ही ओळखताच. त्याचा यात कावा आहे. तो येथील बित्तंबातमी काढायला आला होता.”
26 मग दावीदाकडून निघून यवाबाने आपले दूत अबनेरच्या मागावर पाठवले. त्यांनी त्याला सिरा विहिरीजवळ गाठले आणि परत आणले. दावीदाला याची काहीच कल्पना नव्हती. 27 हेब्रोन येथे त्याला आणल्यावर यवाबाने त्याला गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटात वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेरने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला.
दावीदाचा अबनेर करता शोक
28 दावीदाला हे वृत्त समजले तेव्हा तो म्हणाला, “नेरचा मुलगा अबनेर याच्या खुनाच्या बाबतीत मी आणि माझे राज्य निर्दोष आहोत. परमेश्वर हे जाणतो. 29 यवाब आणि त्याचे कुटुंबीय या कृत्याला जबाबदार आहेत. तेव्हा अपराधी ते आहेत. (याचे फळ त्यांना भोगावे लागेल) त्याच्या वंशातील लोक महारोग, पंगुत्व यांनी ग्रासले जातील, युध्दात मारले जातील. त्यांची अन्नान्नदशा होईल.”
30 गिबोनच्या लढाईत अबनेरने असाएलला मारले. आपल्या भावाच्या वधाचे प्रत्युत्तर म्हणून यवाब आणि अबीशय यांनी अबनेरला मारले.
31-32 दावीदाने यवाब व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांना सांगितले, “तुमची ही वस्त्रे फाडा आणि शोक झाला असल्याचे दाखवणारी वस्त्रे घाला. अबनेरच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त करा.” त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्व जण यांनी विलाप केला.
33 तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले
“एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?
34 अबनेर, अरे, तुझ्या हातात बेड्या नव्हत्या,
पाय साखळदंडांनी बांधले नव्हते
नाही रे, तुला कपटी लोकांनी मारले.”
मग पुन्हा सर्वांनी अबनेरसाठी शोक व्यक्त केला. 35 दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको” असे तो बोलला होता. 36 लोकांनी हे सर्व पाहिले आणि दावीद राजाची वर्तणूक पाहून त्यांना आनंद झाला. 37 दावीदाने अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली.
38 दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज एक महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणताच. 39 त्याच दिवशी राजा म्हणून माझा राज्याभिषेक झाला. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो.”
शौलाच्या घराण्यावर संकटे
4 हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व लोक भयभीत झाले. 2 तेव्हा दोन माणसे ईश-बोशेथला भेटायला आले. ते दोघे सेनानायक असून रेखाब आणि बाना ही त्यांची नावे. हे रिम्मोनचे मुलगे (रिम्मोन हा बैरोथचा बैरोथ नगर बन्यामिन वंशाचे, म्हणून हे ही बन्यामिनी होत. 3 पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे.)
4 शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्याला घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.
5 बैरोथच्या रिम्मोनची मुले. रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता. 6-7 गहू घेण्याच्या मिषाने रेखाब आणि बाना घरात घुसले. आपल्या शयनगृहात तेव्हा ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करुन या दोघांनी त्याला ठार मारले. त्याचे शिर धडावेगळे करुन ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत. 8 ते हेब्रोन येथे पोचले. आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले.
रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शिक्षा केली.”
9 पण दावीद त्या दोघांना म्हणाला, “देवाशपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटांतून सोडवले आहे. 10 यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्याला वाटले या बातमीबद्दल मी त्याला बक्षीस देईन पण मी त्याला धरून सिकलाग येथे ठार केले. 11 तुम्हालाही आता ठार करुन या भूमीवरुन नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या माणसाला तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.”
12 असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.
इस्राएल लोक दावीदाला राजा करतात
5 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीद पाशी एकत्र आले आणि त्याला म्हणाले, “आपण इस्राएल लोकांना एकाच कुटुंबातले, एकाच रकतामांसाचे आहोत. 2 शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तूच युध्दात आमचे नेतृत्व करत होतास, इस्राएलांना युध्दावरून तूच परत आणत होतास. खुद्द परमेश्वर तुला म्हणाला, ‘माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.’”
3 मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
4 दावीद राज्य करायला लागला तेव्हा तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले. 5 हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरुशलेम मधून राज्य केले.
दावीद यरुशलेम नगर जिंकतो
6 राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात [b] प्रवेश करु शकणार नाहीस. आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हाला थोपवतील.” (दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले. 7 तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीद नगर असे त्याचे नाव पडले.)
8 दावीद त्यादिवशी आपल्या लोकांना म्हणाला, “यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा.” यावरूनच, “आंधळे पांगळे यांना या घरात येता यायचे नाही” अशी म्हण पडली.
9 दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव “दावीदनगर” असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या. 10 सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक समर्थ होत गेला.
11 सोरेचा राजा हीराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले. गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले. 12 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे हे ही त्याला उमगले.
13 हेब्रोनहून आता दावीद यरुशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि बायका होत्या. यरुशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला. 14 त्याच्या या यरुशलेम येथे जन्मलेल्या मुलांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन, 15 इभार, अलीशवा, नेफग, याफीय, 16 अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.
दावीदाचे पालिष्ठ्यांशी युध्द
17 दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्याला शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरुशलेम येथील किल्ल्यात आला. 18 पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
19 दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करु का? तुझे साहाय्य मला लाभेल का?”
परमेश्वर उत्तरला, “होय, पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”
20 तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घुसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूंवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव “बाल परासीम” म्हणजेच खिंडार पाडणारा प्रभू असे ठेवले. 21 पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ति त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या माणसांनी त्या तेथून हलवल्या.
22 पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
23 दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर. 24 तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हाला झाडाच्या शेंड्यांवरुन ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वराच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”
25 दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गेबापासून गेजेरपर्यंत त्यांचा पाठलाग त्यांना घालवून दिले.
प्रथम तुम्ही योजना आखा(A)
25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, 26 “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जिवाचासुद्धा द्धेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. 27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
28 “जर तुम्हांपैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करुन तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? 29 नाहीतर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करु शकणार नाही. आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, 30 ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करु शकला नाही!’
31 “किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय? 32 जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रु दूर अंतरावर असतानाच तो शिष्टमंडळ पाठवून शांततेसाठी तहअटींची विचारणा करील.
33 “त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
तुमचा प्रभाव गमावू नका(B)
34 “मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्याला खारटपणा कशाने येईल? 35 ते पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील.
“ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको!”
2006 by World Bible Translation Center