Old/New Testament
दावीद पलिष्ट्यांचा आश्रय घेतो
27 पण दावीद मनात म्हणाला, “कधीतरी शौल मला पकडेल आणि ठार मारेल. त्यापेक्षा पलिष्ट्यांच्या भूमीत आश्रय घेणे उत्तम. तेव्हाच इस्राएलमध्ये माझा शोध घ्यायचे शौल थांबवेल. माझी त्याच्या तावडीतून सुटका होईल.”
2 मग दावीद आपल्या बरोबरच्या सहाशे माणसांना घेऊन इस्राएल सोडून गेला. मवोखचा मुलगा आखीश याच्याकडे ते सगळे आले. आखीश गथचा राजा होता. 3 दावीद मग आपल्या बरोबरचे लोक आणि त्यांचा परिवार यांच्यासह गथ येथे आखीशच्या राज्यात राहिला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलची अबीगईल या दावीदाच्या दोन बायकाही त्याच्यासह होत्या. अबीगईल म्हणजे नाबालची विधवा. 4 दावीद गथ येथे पळून गेला असल्याचे लोकांकडून शौलला कळले. तेव्हा त्याने दावीदचा पाठलाग सोडून दिला.
5 दावीद आखीशला म्हणाला, “माझ्यावर तुझी मेहेरनजर असेल तर या मुलखातील एखाद्या ठिकाणी मला राहायला जागा दे. मी केवळ एक सेवक आहे. मी असेच कुठेतरी राहायला पाहिजे, तुझ्याबरोबर इथे राजधानीच्या शहरी नव्हे.”
6 तेव्हा आखीशने त्याला सिकलाग हे नगर वस्तीला दिले. ते तेव्हापासून आजतागायत यहूदांच्या राजांच्या ताब्यात आहे. 7 दावीद त्या पलिष्ट्यांच्या मुलखात एक वर्ष चार महिने राहिला.
दावीद आखीशाला फसवतो
8 शूर जवळच्या तेलेमपासून पार मिसरर्यंत जे अमालेकी आणि गशूरी लोक राहात त्यांच्यावर दावीदाने आपल्या माणसांसह हल्ले केले. त्यांचा पराभव करुन त्यांना लुटले. 9 त्या भागातील सर्वांना दावीदाने नेस्तनाबूत केले. त्यांची मेंढरे, गाई गुरे, गाढवे, उंट, कापड चोपड लुटून आखीशच्या स्वाधीने केले. पण त्याने या लोकांपैकी कोणालाही जिवंत ठेवले नाही.
10 हे दावीदाने अनेकदा केले. कोणत्या लढाईवरुन ही लूट आणली असे आखीशने दरवेळी विचारल्यावर दावीद प्रत्येक वेळी सांगत असे, “यहूदाच्या दक्षिण भागावर हल्ला केला.” किंवा “यहरमेलीच्या दक्षिण प्रांतात लढाई केली” किंवा “केनीच्या दक्षिण प्रदेशावर चढाई केली” [a] 11 पराभूतांपैकी कोणालाही त्याने गथला जिवंत येऊ दिले नाही. दावीदला वाटायचे, “त्यांच्यापैकी कोणी इथे आले तर प्रत्यक्षात काय आहे ते आखीशला कळायचे.”
पलिष्ट्यांच्या भूमीत असेपर्यंत दावीदाने असेच केले. 12 दावीदाने आखीशचा विश्वास संपादन केला. आखीश मनात म्हणाला, “इस्राएलचे लोक आता दावीदचा द्वेष करतात. त्याच्याशी त्यांचा उभा दावा आहे. तेव्हा दावीद आता चिरकाल माझीच सेवा करील.”
पलिष्टी युध्दाला सज्ज
28 तेव्हा पुढे पलिष्ट्यांनी इस्राएलवर स्वारी करायला सैन्याची जमवाजमव केली. आखीश दावीदला म्हणाला, “इस्राएलशी युद्ध करायला तू आणि तुझे लोक यांना माझ्या बाजूला असले पाहिजे हे लक्षात ठेव.”
2 दावीद म्हणाला, “निश्चितच माझी कामगिरी पाहालच तुम्ही.”
आखीश म्हणाला, “उत्तम. मी तुला माझा अंगरक्षक म्हणून नेमतो. तू माझ्या संरक्षणाची काळजी घेशील.”
शौल आणि एन-दोर येथील एक बाई
3 शमुवेल मरण पावला होता. सर्व इस्राएलांनी निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्याच्या गावी रामा येथे शमुवेलचे दफन केले होते.
शौलने मांत्रिक आणि दैवज्ञ यांना इस्राएल मधून घालवून दिले होते.
4 पलिष्ट्यांनी युद्धाच्या तयारीने शूनेम येथे तळ दिला. शौलने सर्व इस्राएलांना एकत्र आणून गिलबोवा येथे तळ दिला. 5 पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याची छाती धडधडू लागली. 6 त्याने परमेश्वराची प्रार्थना केली पण परमेश्वराने त्याला उत्तर दिले नाही. स्वप्न, संदेष्टे किंवा उरीम यापैकी कोणत्याही माध्यामातून देव त्याच्याशी बोलला नाही. 7 शेवटी शौल आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, एखाद्या भूतविद्याप्रवीण बाईला गाठा. तिलाच या युध्दाविषयी प्रश्न विचारतो.
ते अधिकारी म्हणाले, “अशी एक बाई एन-दोन येथे आहे.”
8 आपणच शौल आहोत हे ओळखू देऊ नये म्हणून वेष पालटून शौल दोन सेवकांना सोबतीला घेऊन रात्रीच त्या बाईकडे गेला. तिला म्हणाला, “पुढे काय होणार हे मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा आपल्या भूतविद्येचा प्रयोग करुन, मी ज्याचे नाव घेईन त्याला इथे हजर कर.”
9 तेव्हा ती बाई शौलला म्हणाली, “शौलने काय केले माहीत आहेना? त्याने सर्व भूताविद्याप्रवीण आणि भविष्यवादी लोकांना इस्राएलमधून हद्दपार केले आहे. मलाही त्यात अडकवून मारायचा तुझा विचार दिसतो.”
10 शौलने परमेश्वराची शपथ घेऊन तिला वचन दिले की परमेश्वर जिवंतअसेतो तुला शिक्षा होणार नाही.
11 तेव्हा कोणाला समोर आणू असे तिने त्याला विचारले.
शौल म्हणाला, शमुवेलला आण.
12 आणि तसे झाले. शमुवेलला पाहताच ती मोठ्याने किंचाळली. शौलला ती म्हणाली, “तू मला फसवलेस तू शौल आहेस.”
13 तेव्हा राजा म्हणाला, “घाबरु नकोस. तुला काय दिसते ते सांग.”
ती म्हणाली, “मला एक आत्मा भूमीतून वर येताना दिसतोय.”
14 शौलने विचारले, “तो दिसायला कोणासारखा आहे?”
ती म्हणाली, “एक विशिष्ट प्रकारचा अंगरखा घातलेला एक वृध्द आहे.” तो शमुवेलच असल्याचे शौलाच्या लक्षात आले. जमिनीपर्यंत वाकून त्याने त्याला अभिवादन केले. 15 शमुवेल शौलला म्हणाला, “मला तू त्रास का दिलास? मला का उठवलेस?”
शौल म्हणाला, “मी अडचणीत सापडलो आहे. पलिष्टी माझ्यावर हल्ला करायला आले आहेत. परमेश्वराने माझी साथ सोडली आहे. त्याच्याकडून मला प्रतिसाद मिळत नाही. स्वप्न किंवा संदेष्टे यांच्यामार्फत मला उत्तरे मिळत नाहीत. म्हणून मी तुला बोलावले. मी काय करु ते तू सांग.”
16 शमुवेल म्हणाला, “परमेश्वराने तुझा त्याग केला आहे. तो आता दावीद या तुझ्या शेजाऱ्याच्या बाजूचा आहे. तेव्हा मला का त्रास देतोस? 17 परमेश्वराने माझ्या द्वारे जे जे सांगितले होते तेच तो आता करत आहे. तुझ्या हातातून राज्य खेचून घेऊन ते तो तुझ्या लगतच्या दुसऱ्यांच्या हाती सोपवत आहे हा शेजारी म्हणजे दावीद. 18 तू परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. परमेश्वराचा क्रोध किती आहे ते दाखवायला तू अमालेक्यांचा नाश करायाला हवा होतास, तसा तू केला नाहीस. म्हणून परमेश्वर आज तुझ्याशी असे वागत आहे. 19 पलिष्ट्यांच्या हातून प्रभु तुझा आणि इस्राएल सैन्याचा पराभव करील आणि उद्या तू आणि तुझी मुले इथे माझ्याबरोबर असाल.”
20 हे ऐकून शौलने जमिनीवर लोळण घेतली. शमुवेलच्या भाकिताने त्याला कापरे भरले. त्याआधी दिवसभर आणि रात्र भर त्याने काही खाल्ले नव्हते म्हणून त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते.
21 तेव्हा ती बाई शौलजवळ आली. तो घाबरल्याचे तिने पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “पाहा, मी तुझ्या सेवेत आहे. तुझे म्हणणे मी ऐकले आहे. मला जे करायला सांगितले ते मी जीव धोक्यात घालून केले आहे. 22 आता कृपा करुन माझे ऐक. मी खायला देते ते खा तरच तुला वाटचाल करायला तरतरी येईल.”
23 पण शौलने खायचा आग्रह निग्रहाने धुडकावून लावला.
शेवटी शौल बरोबरच्या सेवकांनीही तिच्याच सारखी त्याला खायची विनंती केली. तेव्हा अखेर शौलने त्यांचे म्हणणे मानले. जमिनीवरुन उठून तो पलंगावर बसला. 24 एक चांगले धष्टपुष्ट वासरु त्या बाईकडे होते ते तिने पटकन् मारले. मग पीठ मळून त्याची खमीर विरहित भाकर भाजली. 25 शौल आणि त्याचे सेवक यांना खायला दिले. त्या सर्वांनी ते खाऊन त्याच रात्री तिचा निरोप घेतला.
“दावीद आमच्या बरोबर येत नाही!”
29 पलिष्ट्यांनी आपल्या सर्व सैन्याला अफेक येथे एकत्र आणले. इज्रेल येथे एका झऱ्याजवळ इस्राएलांनी छावणी टाकली. 2 आपल्या शंभर शंभर आणि हजार हजार माणसांच्या समूहा बरोबर पलिष्टी अधिकारी चालले होते. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर पिछाडीला होती.
3 तेव्हा पलिष्ट्यांच्या सरदारांनी विचारले, “या इब्रींचे येथे काय काम?”
आखीशने त्यांना सांगितले, “हा दावीद हा शौलच्या अधिकाऱ्यांपैकी एक होता. आता माझ्या बरोबर तो बराच काळ आहे. शौलला सोडून तो येथे आल्यापासून त्याच्यात मला काही वावगे आढळले नाही.”
4 पण त्या सरदारांना आखीशचा फार राग आला. ते म्हणाले, “या दावीदला परत पाठवा. त्याला दिलेल्या नगरात त्याने परत जावे. आमच्या बरोबर तो युध्दावर येता कामा नये. तो इथे राहिला तर शत्रूलाच आपल्या छावणीत घेतल्यासारखे होईल. आपली माणसे मारुन तो त्यांच्या राजाला, शौलला, खूश ठेवील.
5 ‘शौलाने हजार शत्रू मारले,
तर या दावीदाने लाखोंचा वध केला’
असे एक गाणे गात इस्राएल लोक जल्लोष करतात तोच हा दावीद.”
6 तेव्हा आखीश दावीदला बोलावून म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू माझ्याशी सचोटीने वागला आहेस. माझ्या सैन्यात तुला भरती करुन घेणे मला आवडले असते. तू मला सामील झाल्यापासून मला तुझ्यात आक्षेपार्ह काही आढळले नाही. पण पलिष्टी अधिकाऱ्यांचे तुझ्याबद्दल चांगले मत नाही. 7 तेव्हा तू शांतपणे माघारी फीर. पलिष्टी अधिकाऱ्यांना काहीही उपद्रव देऊ नको.”
8 तेव्हा दावीदाने विचारले, “माझे काय चुकले? मी तुमच्याकडे आलो त्या दिवसापासून आजतागायत माझ्यात तुम्हाला काही दोषास्पद आढळले का? माझे स्वामी महाराज यांच्या शत्रूंचा मुकाबला मी का करु नये?”
9 आखीशने त्याला सांगितले, “मला तू आवडतोस. तू देवाने पाठवलेल्या दूतासारखाच आहेस. पण दावीदाने आमच्या बरोबर युध्दावर येऊ नये असे पलिष्टी सरदारांचे म्हणणे आहे. 10 उद्या सकाळी लौकर उठून तू आणि तुझ्या बरोबरची माणसे परत जा. तुम्हाला दिलेल्या नगरात जा. या सरदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष कर. तू भला माणूस आहेस उद्या उजाडताच निघून जा.”
11 तेव्हा दावीद आपल्या बरोबरच्या लोकांसह पहाटेच पलिष्ट्यांच्या देशात परतला आणि पलिष्ट्यांनी इज्रेलवर चढाई केली.
तुमची अंतःकरणे बदला
13 त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलाताने [a] आधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते. 2 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरांनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते? 3 नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल. 4 किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते? 5 नाही, मी तुम्हांला सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.”
निरुपयोगी झाड
6 नंतर त्याने ही बोधकथा सांगितली, “एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर फळ असेल म्हणून तो पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही. 7 म्हणून तो माळयाला म्हणाला, ‘पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक. त्याचा उगीच भुईला भार कशाला?’ 8 माळयाने उत्तर दिले, ‘मालक, या एका वर्षासाठी ते राहू द्या. मग मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन. 9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.’”
येशू एका स्त्रीला शब्बाथ दिवशी बरे करतो
10 शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. 11 तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने अठरा वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. 12 येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस!” 13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली. आणि ती देवाची स्तुति करु लागली.
14 नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बाथ दिवशी तिला बरे केले होते. तो लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”
15 येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. “ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? 16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?” 17 तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करु लागला.
देवाचे राज्य कशासारखे आहे?(A)
18 मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करु 19 देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला, तो वाढला आणि त्याचे झाडे झाले. आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”
20 तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करु 21 ते खमिरासारखे आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
अरुंद दरवाजा(B)
22 येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवीत होता.
2006 by World Bible Translation Center