Old/New Testament
योनाथानची दावीदला मदत
19 शौलाने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे. 2-3 त्याने दावीदला सावध केले. त्याला सांगितले, “जपून राहा. शौल तुला मारायची संधी शोधत आहे. सकाळी तू शेतात जाऊन लप. मी ही वडीलांना घेऊन शेतात येतो. तू लपला असशील तेथे येऊन थांबतो. तुझ्याबद्दल मग मी वडीलांशी बोलेन. त्यांच्याकडून काही कळले की तुला सांगीन.”
4 योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे. 5 गल्याथ पलिष्ट्याचा वध करताना त्याने आपले प्राण पणाला लावले. परमेश्वराने इस्राएलला विजय मिळवून दिला. तुम्हालाही ते पाहून आनंद झाला. मग तुम्ही त्याला का दुखावता? तो निरपराध आहे. त्याला कशासाठी मारायचे?”
6 शौलाने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदाच्या जिवाला धोका नाही.”
7 तेव्हा योनाथानने दावीदला बोलवून सर्व काही सांगितले. मग त्याला तो शौलाकडे घेऊन गेला. पूर्वीप्रमाणेच तो त्याच्याकडे राहू लागला.
पुन्हा दावीदाला मारायचा शौलाचा प्रयत्न
8 पुन्हा युध्द सुरु झाले आणि दावीद पलिष्ट्यांशी लढायला गेला. पलिष्ट्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला. 9 पण शौलवर परमेश्वराच्या दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल आपल्या घरात बसला होता. त्याच्या हातात भाला होता. दावीद वीणा वाजवत होता. 10 शौलने हातातील भाला फेकून दावीदला भिंतीत चिणायचा प्रयत्न केला. पण दावीद उडी मारुन निसटला. भाल्याचा नेम चुकून तो भिंतीत गेला. त्या रात्री दावीद पळून गेला.
11 शौलाने काही जणांना दावीदाच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदाच्या बायकोने, मीखलने. दावीदाला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले, नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली. 12 तिने त्याला खिडकीतून पळून जायला मदत केली. दावीद निसटला आणि पळाला. 13 मीखलने घरातील देवतेची मूर्ती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांघरुण घातले. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.
14 दावीदाला पकडून आणण्यासाठी शौलाने जासूद पाठवले. पण मीखलने दावीद आजारी असल्याचे सांगितले.
15 जासूद परतले. त्यांनी राजाला वर्तमान सांगितले. राजाने त्यांना दावीदला पाहून यायला फर्मावले. शौल म्हणाला, “त्याला माझ्यापुढे हजर करा. त्याला शक्य नसेल तर पलंगावर झोपवूनच आणा. मग मीच त्याला मारतो.”
16 जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
17 शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदाला पळून जायला मदत केलीस.”
मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.”
दावीद रामा येथे जातो
18 दावीद जो पळाला तो रामा येथे शमुवेलकडे गेला. शमुवेलला त्याने शौलाने जे जे केले ते सर्व सांगितले. मग शमुवेल आणि दावीद संदेष्ट्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेले. दावीद तेथे राहिला.
19 दावीद रामा नजीकच्या छावणीवर असल्याचे शौलाला कळले. 20 त्याने दावीदाच्या अटकेसाठी माणसे पाठवली. पण ती माणसे तिथे पोहोंचली तेव्हा संदेष्टे संदेश देत होते. शमुवेल त्यांचे नेतृत्व करत उभा होता. शौलाच्या निरोप्यांवर ही परमेश्वराच्या आत्म्याचा संचार होवून ते ही संदेश देऊ लागले.
21 शौलाच्या हे कानावर आल्यावर त्याने दुसरे दूत पाठवले. त्यांचीही तीच गत झाली. तेव्हा शौलाने तिसऱ्यांदा जासूद पाठवले. तेही तसेच करु लागले. 22 शेवटी शौल स्वतःच रामा येथे आला. सेखू येथील खड्या जवळच्या मोठ्या विहिरीशी तो आला तेव्हा त्याने शमुवेल आणि दावीदाचा ठावठिकाणा विचारला.
लोक म्हणाले, “ते रामाजवळच्या तळावर आहेत.”
23 तेव्हा शौल तेथे पोचला. परमेश्वराच्या आत्म्याचा संचार शौलमध्येही होऊन तोही संदेश देऊ लागला. रामा येथे पोचेपर्यंत त्याचे तेच चालले होते. 24 नंतर त्याने अंगावरची वस्त्रे उतरवली. शमुवेलच्या समोर तो संदेश देऊ लागला.
दिवसभर आणि रात्रभर तो विवस्त्र अवस्थेत होता म्हणून लोक म्हणू लागले, “शौलही संदेष्टयांपैकी आहे की काय?”
योनाथान आणि दावीद यांच्या मधला करार
20 दावीद रामा येथील शिबिरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझं काय चुकल? माझा अपराध तरी काय? तुझे वडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”
2 योनाथान म्हणाला, “हे काय भलतेच? ते कशाला तुझ्या जिवावर उठतील? मला सांगितल्या शिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नाहीत. कोणतीही महत्वाची किंवा क्षुल्लक गोष्ट असो, ते ती मला सांगतातच. मग तुझा वध करायची बाब ते कशी माझ्यापासून लपवून ठेवतील? तेव्हा हे काही खरं नव्हे!”
3 तेव्हा दावीद म्हणाला, “आपण मित्र आहोत ही गोष्ट तुझे वडील चांगली जाणून आहेत. ते स्वतःशी म्हणाले, ‘योनाथानला हे कळता कामा नये. त्याला कळले तर तो हे दावीदला सांगेल.’ पण परमेश्वराची आणि तुझ्या जीविताची शपथ घेवून सांगतो, मृत्यू माझ्याभोवती घोटाळतो आहे.”
4 योनाथान मग दावीदाला म्हणाला, “तू काय म्हणशील ते करायला मी तयार आहे.”
5 मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित्त मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो 6 मी नसल्याचे तुझ्या वडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलहेमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्या कुटुंबाचा मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’ 7 तुझ्या वडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख. 8 योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”
9 यावर योनाथान म्हणाला, “अस घडणार नाही. ते तुझ्या वाईटावर आहेत असं माझ्या लक्षात आलं तर मी तूला तसं सांगीन.”
10 दावीद म्हणाला, “तुझ्याशी ते कठोरपणे वागले तर मला कोण खबर देईल?”
11 तेव्हा योनाथानने सुचवले, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.
12 तिथे योनाथान दावीदला म्हणाला, “देव जो, इस्राएलचा परमेश्वर या समोर मी तुला वचन देतो. माझ्या वडीलांच्या तुझ्याबद्दल काय भल्याबुऱ्या भावना आहेत ते मी जाणून घेईन. मग तीन दिवसात तुला तसं इथे याच शेतात कळवीन. 13 त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना देईन. तुला सुखरुप निसटू देईन. माझ्याहातून यात हयगय झाल्यास परमेश्वर मला त्याची शिक्षा देवो. माझ्या वडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो. 14 मी हयात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू दे. मी गेल्यावरही 15 माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर तुझ्या वैऱ्यांचा पृथ्वीतलावरुन नि:पात करील. 16 मग त्या वेळी योनाथानच्या कुटुंबाला दावीदपासून वेगळे व्हावे लागले तरी बेहत्तर. देव दावीदाच्या शत्रूंना शासन करो.” मग योनाथानने दावीदाच्या घराण्याशी करार केला.
17 योनाथानने मग दावीदला परस्परांवरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वतः इतकेच प्रेम होते म्हणून त्या प्रेमापोटी त्याने असे केले.
18 योनाथान दावीदला म्हणाला, “उद्या अमावास्येची मेजवानी आहे. पंक्तीतील तुझे आसन रिकामे असेल त्यामुळे तुझी अनुपस्थिती माझ्या वडीलांच्या लक्षात येईल. 19 या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा. 20 तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन. 21 आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन. सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन, ‘तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत. तर ये व तो घे.’ जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्यावर, कोणताही धोका तेव्हा नसेल. 22 पण काही धोका असल्यास मी म्हणेन, ‘बाण आणखी पुढे आहेत. जा, जाऊन आण.’ तसे मी म्हटले तर मात्र तू निघून जा. प्रत्यक्ष परमेश्वरच तुला लांब पाठवत आहे असे समज. 23 आपल्या दोघांमधला हा करार लक्षात ठेव. परमेश्वर याला साक्ष आहे.”
24 त्यानंतर दावीद शेतात लपून बसला.
मेजवानीच्या प्रसंगी शौलचा दृष्टिकोण
अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला. 25 भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते. 26 त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, “काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल.”
27 दुसऱ्या दिवशी पुन्हा दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, “इशायचा मुलगा या प्रंसगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?”
28 योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली. 29 तो म्हणाला, ‘मला जायला हवे. बेथलहेमला आमच्या कुटुंबात यज्ञ आहे. माझ्या भावाने मला यायची आज्ञा केली आहे. आपल्या मैत्रीला स्मरुन तू मला भावांना भेटायला जायची परवानगी दे.’ दावीद आज राजाच्या पंक्तीला नाही याचे हे कारण आहे.”
30 शौल योनाथानवर संतापला. तो म्हणाला, “अरे दासीपुत्रा, तू माझी अवज्ञा करतोस? आणि तू तिच्यासारखाच निपजलास. तू दावीदाच्या बाजूचा आहेस हे मला माहीत आहे. तू तुला आणि तुझ्या आईला लाज आणली आहेस. 31 हा इशायचा मुलगा जिवंत असेपर्यंत तू राज्यावर येणार नाहीस. आत्ताच्या आत्ता दावीदला आणून हजर कर. त्याला मेलेच पाहिजे.”
32 योनाथान आपल्या वडीलांना म्हणाला, “त्याने काय केले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?”
33 यावर शौलाने योनाथानवर आपला भाला फेकला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा, दावीदाला मारायचा आपल्या वडीलांनी निश्चय केला आहे हे योनाथानच्या लक्षात आले. 34 संतापाने तो पंक्तीतून चालता झाला. त्या रागात त्याने अन्नाला स्पर्शसुध्दा केला नाही. शौलाने आपल्याला शरमिंदे केले आणि दावीदाला मारायचे ठरवले म्हणून त्याला फार राग आला.
दावीद आणि योनाथान निरोप घेतात
35 दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलालापण आणले. 36 त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले. 37 बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, “बाण आणखी पुढेच आहेत.” 38 मग तो म्हणाला, “जा धावत जा, लौकर आणि नुसता उभा राहू नको.” मुलाने मग बाण उचलून गोळा करुन आणले. 39 काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान आणि दावीदला ते कळत होते. 40 योनाथानने धनुष्यबाण त्या मुलाकडे दिले आणि त्याला तो म्हणाला, “आता तू गावात परत जा.”
41 मुलगा दिसेनासा झाल्यावर दावीद डोंगराच्या पलीकडे लपला होता तिथून बाहेर आला. त्याने योनाथानला तीनदा वाकून अभिवादन केले. मग त्यांनी परस्परांचे मुके घेतले. दोघेही रडू लागले. पण दावीदाचा आक्रोश योनाथानपेक्षा जास्त होता.
42 योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”
दावीद अहीमलेख याजकाकडे जातो
21 मग दावीद निघून गेला आणि योनाथान आपल्या गावी परत आला. दावीद नोब नामक गावी अहीमलेख या याजकाला भेटायला गेला.
अहीमलेख त्याला भेटायला चार पावले पुढे चालून गेला. अहीमलेखला भीतीने कापरे भरले होते. दावीदला त्याने विचारले, “तू एकटाच का? तुझ्याबरोबर कोणीच नाही हे कसे?”
2 दावीदाने सांगितले, “राजाच्या खास आज्ञेवरुन मी आलो आहे. त्यानुसार हे काम गुप्त ठेवायचे आहे. त्याबद्दल कोणालाही काही कळू द्यायचे नाही. माझी माणसे विशिष्ट संकेतस्थळी मला भेटणार आहेत. 3 आता आधी तुझ्या जवळ खायला द्यायला काय आहे ते सांग. पाच भाकरी किंवा जे असेल ते दे.”
4 तेव्हा याजक म्हणाला, “साधी भाकर तर आत्ता नाही पण पवित्र भाकर आहे. तुझ्या अधिकाऱ्यांचा बायकांशी संबंध आला नसेल तर त्यांना ती चालेल.”
5 दावीद म्हणाला, “आमचा बायकांशी संपर्क आलेला नाही. युध्दावरच काय पण अगदी सामान्य मोहिमेवर निघालो तरी आमची माणसे शुचिर्भूत असतात. मग या खास कामाबद्दल तर बोलायलाच नको.”
6 पवित्र भाकरी खेरीज दुसरी भाकर नव्हतीच. तेव्हा याजकाने दावीदला तीच दिली परमेश्वरापुढच्या पवित्र मेजावर याजक रोजच्या रोज ताजी भाकर ठेवत, त्यातली ही होती.
7 दवेग नावाचा शौलाचा एक अधिकारी त्या दिवशी तेथे होता. तो अदोमी असून शौलाच्या मेंढपाळांचा प्रमुख होता. परमेश्वरासमोर त्याला थांबवून ठेवलेले [a] होते.
8 दावीदाने अहीमलेखला विचारले, “इथे भाला किंवा तलवार आहे का? राजाचे काम फार निकडीचे असल्यामुळे मला तातडीने निघावे लागले. त्यामुळे मी माझे शस्त्र बरोबर आणू शकलो नाही.”
9 पुरोहित म्हणाला, “गल्याथ या पलिष्ट्याला तू एलाच्या खोऱ्यात मारलेस तेव्हा त्याची तलवार काढून घेतलीस. तीच काय ती इथे आहे. एफोदच्या मागे एका कापडात ती गुंडाळून ठेवलेली आहे. हवीतर ती घे.”
दावीद म्हणाला, “तीच दे. तिच्यासारखी दुसरी तलवार नाही.”
गथ येथील शत्रुकडे दावीद पळ काढतो
10 शौलाकडून दावीद पळाला, तो गथचा राजा आखीश याच्याकडे आला. 11 आखीशच्या अधिकाऱ्याला हे आवडले नाही. त्याचे अधिकारी म्हणाले, “हा दावीद, इस्राएल भूमीचा राजा. इस्राएल याचे गुणगान गातात. नाचत गात ते याच्याविषयी म्हणतात,
“शौलाने हजार शत्रूंना मारले
तर दावीदाने लाखोंचा वध केला.”
12 दावीदाने त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. गथचा राजा आखीश याला सामोरे जायची त्याला भीती वाटली. 13 म्हणून राजा व त्याचा दरबार यांच्यापुढे त्याने वेड्याचे सोंग वठवले. प्रवेशद्वारावर थुंकला, दाढीवर लाळ ओघळू दिली.
14 आखीश हे पाहून आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे. याला इथे कशाला येऊ दिलेत? 15 वेड्यांची इथे कमतरता आहे की काय? माझ्यासमोर याचे वेडेचाळे चालायचे नाहीत. त्याला पुन्हा इथे येऊ देऊ नका.”
आम्हांला पुरावा दे(A)
29 जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही. 30 कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल.
31 “दक्षिणेकडची राणी [a] न्यायाच्या दिवशी या पिढीविरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करील. कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा कोणी एक येथे आहे.
32 “न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहतील व त्यांचा धिक्कार करतील. कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला पण आता योनापेक्षाही थोर असा कोणी येथे आहे.
जगासाठी प्रकाश असे व्हा(B)
33 “कोणी दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, उलट तो दिवठणीवर ठेवतात. यासाठी की जे कोणी आत येतात त्यांना प्रकाश दिसणे शक्य व्हावे. 34 डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे. 35 पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या. 36 जर तुमचे सर्व शरीर प्रकाश आहे आणि जर त्याचा एकही भाग अंधार नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुझ्यावर प्रकाशतात, तसे ते पूर्णपणे प्रकाशतील.”
येशू परुश्यांवर टीका करतो(C)
37 जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला. 38 परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले. 39 तेव्हा प्रभु त्याला म्हणाला, “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात. 40 तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का? 41 पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
42 “परुश्यांनो तुम्हाला धिक्कार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
43 “परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. 44 तुमचा धिक्कार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”
45 नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”
46 तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही. 47 तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता. 48 अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. 49 यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, ‘मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवीन. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
50 “तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दल दंड भरुन द्यावा लागेल. 51 म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल.
52 “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वतःही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”
53 येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले. 54 तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.
2006 by World Bible Translation Center