Old/New Testament
दबोरा, स्त्री न्यायाधीश
4 एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली. 2 तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता. 3 सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.
4 तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती. 5 एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते. 6 तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा. 7 मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.”
8 त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नसलीस तर मात्र करणार नाही.”
9 दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.”
आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली. 10 तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.
11 हेबेर नावाचा एक माणूस केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होबाबचे वंशज होते. होबाब म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेबेरने तळ दिला होता.
12 अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले. 13 तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.
14 तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन दहाहजार माणसांसह निघाला. 15 त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला. 16 बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने व त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.
17 पण सीसरा पळून गेला होता. तो हेबेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेबेर आणि हासोरचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबेध होते. म्हणून सीसरा तेथे गेला. 18 याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.
19 सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.
20 तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा आणि ‘आत कोणी आहे का?’ असे कोणी विचारले तर ‘नाही’ म्हणून सांग.”
21 मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.
22 तेवढ्यात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.
23 त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला. 24 या याबीनला नामोहरम करत शेवटी त्याचा नाश करीपर्यंत इस्राएल लोकांचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.
दबोराचे गीत
5 इस्राएल लोकांनी सीसराचा पराभव केला त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामचा मुलगा बाराक यांनी हे गीत गायले:
2 “इस्राएलचे लोक युध्दाला तयार झाले [a]
ते स्वेच्छेने युध्दासाठी सज्ज झाले.
परमेश्वराचा धन्यवाद करा.
3 “राजांनो ऐका,
लक्ष द्या अधिपतींनो,
मी परमेश्वराचे,
इस्राएल लोकांच्या परमेश्वराचे
गीत स्वतः गाईन.
त्याचे स्तुति स्तोत्र म्हणीन.
4 “परमेश्वरा, पूर्वी जेव्हा तू सेईरमधून आलास,
अदोम भूमीतून तू कूच केलेस.
तेव्हा पृथ्वी थरारली.
आकाशाने वर्षाव केला
ढगातून वृष्टी झाली.
5 पर्वतांचाही थरकाप झाला परमेश्वरापुढे.
सीनाय पर्वताच्या देवापुढे.
इस्राएलांचा देव परमेश्वरापुढे.
6 “अनाथचा मुलगा शमगार याच्या
आणि याएलच्या कारकिर्दीत राजमार्ग
ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले.
7 “दबोरा तू येईपर्यंत इस्राएलची माता म्हणून तू उभी राहीपर्यंत [b]
इस्राएलमध्ये सैनिक नव्हते.
नावालाही सैनिक नव्हते.
8 “नगराच्या वेशीपाशी युध्द करायला
परमेश्वराने नवे नेते निवडले. [c]
तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत
कोणाकडेही भाला किंवा ढाल नव्हती.
9 “ज्यांनी स्वेच्छेने युध्दावर जाण्याचे पत्करले
त्या इस्राएल लोकांच्या सेनाधिपती बरोबर माझे हृदय आहे.
परमेश्वराचा धन्यवाद करा.
10 “पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांनो,
खोगिराच्या बिछायतीवर बसणाऱ्यांनो
आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या.
11 गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा
नाद ऐकू येतो.
जेंव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या
लोकांनी लढाई केली
आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात,
आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात.
12 “ऊठ दबोरा,
जागी हो, गाणे म्हण!
बाराका ऊठ,
अबीनवामाच्या मुला शत्रूंना बंदिवान कर.
13 “उरलेल्या मानकऱ्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा.
परमेश्वराचे लोकहो, तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा.
परमेश्वराने इस्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला.
इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले.
14 “अमालेकच्या डोंगराळ प्रदेशातून एफ्राइमचे लोक आले.
हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले
माखीरच्या वंशातूनही सेनापती आले.
जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकारदंड घेऊन आले.
15 इस्साखारच्या नेत्यांचा दबोराला पाठिंबा होता.
तसेच ते बाराकशीही प्रामाणिक होते.
ते खोऱ्यात पायी चालत आले.
“रऊबेनी, तुमच्याही सैन्यात अनेक शूर सैनिक आहेत.
16 मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळ [d] बसून का राहिलात?
शूर रऊबेनी टोळीच्या सैनिकांनी युध्दाचा गांभीर्याने विचार केला.
पण तरी शेव्व्यामेंढ्यांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले.
17 गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले.
आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलबतांजवळ नुसते बसून का राहिलात?
आशेर लोक समुद्रकाठी,
सुरक्षित बंदरात तळ ठोकून राहिले.
18 “पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युध्दात प्राणांची
पर्वा न करता पराक्रम केला.
19 कनानी राजेही लढाईत उतरले.
कनानच्या राजांनी तनाखमध्ये,
मगिद्दोच्या जलाशयाजवळ लढाई केली.
पण कोणतीही लूट बरोबर घेऊन ते गेले नाहीत.
20 स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या
कक्षेतून सीसराशी लढले.
21 किशोन या प्राचीन नदीने सीसराच्या
सैन्याला वाहून नेले.
चला, प्राणपणाने झुंजू या.
22 घोड्यांचे खूर जमिनीवर आपटले.
सीसराच्या दणकट घोड्यांना पळता भुई थोडी झाली.
23 “परमेश्वराच्या दूताने सांगितले, ‘मेरोज शहराला,
त्यातील रहिवाश्यांना शाप द्या,
ते सैनिकांबरोबर परमेश्वराच्या मदतीला
धावून आले नाहीत.’
24 याएल ही केनी हेबेरची पत्नी सर्व
स्त्रियांमध्ये तिचा धन्यवाद होईल.
25 सीसराने पाणी मागितले
याएलने त्याला दूध दिले
राजाला साजेशा पात्रात
तिने त्याला साय दिली
26 मग याएलने आपला हात पुढे केला आणि तंबूची मेख घेतली.
कारागिराची हातोडी उजव्या हातात घेतली.
सीसरावर तिचा प्रयोग केला.
त्याच्या डोक्यावर आरपार घाव घातला.
27 याएलच्या पायांमध्ये तो कोसळला.
तो पडला तिथेच तो राहिला याएलच्या पायाशी
तो कोसळला तिथेच तो पडला.
तेथे तो आडवा झाला तिथेच गतप्राण झाला.
28 “सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला.
सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली
‘सीसराच्या रथाला एवढा उशीर का?
त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?’
29 “तिच्या चाणाक्ष दासीने,
होय दासीने, तिला उत्तर दिले.
30 ‘माझी खात्री आहे.
त्यांनी युध्द जिंकले.
आता ते पराभूत लोकांकडून लूट गोळा करत आहेत ती आपसात वाटून घेत आहेत.
प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत.
बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली.
होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे,
पराक्रमी सीसराला पांघरण्यासाठी.’
31 “परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो!
आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोत्तर सामर्थ्यवान होवोत!”
अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.
मिद्यानचे इस्राएल लोकांशी युध्द
6 नंतर पुन्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराने निषिध्द म्हणून सांगितलेल्या गोष्टी केल्या. तेव्हा परमेश्वराने मिद्यानच्या लोकांच्या अंमलाखाली त्यांना सलग सात वर्षे ठेवले.
2 मिद्यानचे लोक बलशाली होतेच, पण इस्राएल लोकांशी क्रौर्यानेही वागत. तेव्हा इस्राएल लोकांनी लपून बसण्यासाठी डोंगरांमध्ये गुहा केल्या. गुहांमध्ये आणि दुर्गम अशा ठिकाणी ते अन्नधान्य ठेवत. 3 कारण मिद्यानी आणि पूर्वेकडील अमालेकी वारंवार त्यांच्या पिकांची नासधूस करत. 4 ते या प्रदेशात तळ देत आणि इस्राएल लोकांनी पेरलेल्या पिकांचा नाश करत. थेट गज्जा पर्यंतच्या जमिनीतील उत्पन्नाची वाट लावली. त्यामुळे इस्राएल लोकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही. शेव्व्यामेंढ्या, गुरेढोरे, गाढवे देखील त्यांना राहिली नाहीत. 5 आपला कुटुंब कबिला आणि जनावरे यांच्या सकट मिद्यानी लोकांनी येऊन तेथे तळ ठोकला. टोळधाडीसारखे ते घुसले. ते लोक व त्यांचे उंट यांची संख्या अक्षरश: अगणित होती. त्यांनी या प्रदेशात येऊन त्यांची नासधूस करायला सुरुवात केली. 6 त्यामुळे इस्राएल लोक कंगाल झाले. त्यांनी मदतीसाठी परमेश्वराच्या नावाने आक्रोश करायला सुरुवात केली.
7 मिद्यानी लोकांच्या छळणुकीमुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. 8 तेव्हा परमेश्वराने एका संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवले. तो संदेष्टा इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे. ‘मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. तेथून मी तुम्हाला सोडवून बाहेर आणले. 9 मिसरच्या समर्थ लोकांपासून तुमची सुटका केली. नंतर कनानी लोकांनी तुम्हाला जाच केला. पुन्हा मी तुम्हाला वाचवले. त्यांना मी तो देश सोडायला लावला, आणि त्यांची भूमी तुम्हाला दिली.’ 10 मग मी तुम्हाला सांगितले, ‘मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही अमोरी लोकांच्या देशात राहाल पण त्यांच्या दैवतांची उपासना करु नका.’ पण तुम्ही माझे ऐकले नाही.”
परमेश्वराच्या दूताची गिदोनशी भेट
11 याच सुमाराला गिदोन नावाच्या माणसाकडे परमेश्वराचा दूत आला. आणि अफ्रा येथे योवाशच्या मालकीच्या ओक वृक्षाखाली बसला. योवाश अबियेजरच्या कुळातील होता. गिदोन योवाशचा मुलगा होता. गिदोन द्राक्षकुंडात गव्हाची झोडणी करत होता. परमेश्वराचा दूत गिदोनच्या शेजारी बसला. गिदोन मिद्यानांपासून गहू लपवून ठेवत होता. 12 त्याला दर्शन देऊन परमेश्वराचा दूत म्हणाला, “हे वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”
13 तेव्हा गिदोन म्हणाला, “परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर मग आमच्यावर ही वेळ का यावी? आमच्या पूर्वजांसाठी त्याने मोठे चमत्कार केले असे ऐकले आहे. परमेश्वराने आमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले असे ते सांगतात. पण परमेश्वराने तर आमची साथ सोडली आहे. मिद्यानी लोकांच्या तावडीत आम्ही सापडलो आहोत.”
14 मग परमेश्वर गिदोनकडे वळला व म्हणाला, “तुझ्या शक्तीचा वापर कर मिद्यानी लोकांपासून इस्राएल लोकांची सोडवणूक कर. त्यांना वाचवण्यासाठी मी तुला पाठवत आहे.”
15 पण गिदोन उत्तरादाखल म्हणाला, “मला क्षमा कर कारण मी इस्राएल लोकांना कसा काय वाचवू शकणार? मनश्शेच्या वंशात सगळ्यात दुबळे माझे कूळ आहे आणि मी घरातला सर्वात धाकटा.”
16 तेव्हा परमेश्वर गिदेनला म्हणाला, “मी तुझ्या बरोबर आहे तू मिद्यानी लोकांचा पराभव करू शकशील आपण एकाच माणसाशी लढत आहोत असे तुला वाटेल.”
17 गिदोन परमेश्वराला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली तर तू खरोखरच परमेश्वर असल्याची मला खात्री पटवून दे. 18 आणि कृपा करून येथेच थांब. तुला अर्पण करायला मी भेट घेऊन येतो. तोपर्यंत येथून निघून जाऊ नको.”
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी थांबतो.”
19 मग गिदोन गेला आणि त्याने एक करडू शिजवले. शिवाय, वीस पौंड पीठ घेऊन त्याच्या बेखमीर भाकरी केल्या मग शिजवलेले मांस एका टोपलीत आणि त्याचा रस्सा एका पातेल्यात घेतला. मग बेखमीर भाकरींसह ते सर्व अन्न ओक वृक्षाखाली येऊन परमेश्वराला दिले.
20 परमेश्वराचा दूत तेव्हा गिदोनला म्हणाला, “ते मांस आणि बेखमीर भाकरी त्या खडकावर ठेव आणि त्यावर रस्सा ओत.” गिदोनने त्याप्रमाणे केले.
21 परमेश्वराचा दूताच्या हातात एक काठी होती. तिच्या टोकाने त्याने मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला. तत्क्षणी खडकातून अग्नी प्रकट झाला. मांस व भाकरी जळून भस्मसात झाले आणि परमेश्वराचा दूत अदृश्य झाला.
22 तेव्हा गिदोनच्या लक्षात आले की इतका वेळ आपण परमेश्वराच्या दूताशी बोलत होतो. तेव्हा तो चित्कारला, “सर्व शक्तिमान परमेश्वरा! मी परमेश्वराच्या दूताला समोरासमोर पाहिले!”
23 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “शांत हो! घाबरु नकोस. तू मरणार नाहीस.”
24 त्याठिकाणी गिदोनने परमेश्वराच्या उपासनेसाठी वेदी बांधली. तिचे नाव “परमेश्वर म्हणजे शांती” असे ठेवेले अफ्रा येथे ही वेदी अजूनही आहे. अफ्रा म्हणजे अबियेजेर कुटुंबाचे वसतिस्थान आहे.
गिदोन बाल दैवताची वेदी उध्वस्त करतो
25 त्याच रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला. तो म्हणाला, “तू तुझ्या वडीलांचा, सात वर्षाचा पूर्ण वाढलेला बैल घे. तुझ्या वडीलांनी बआल या खोट्या दैवताची वेदी बांधली आहे. तिच्या शेजारी लाकडी स्तंभही आहे. अशेरा या देवीच्या सन्मानार्थ तो आहे. बैलाकरवी तू तुझ्या वडीलांच्या मालकीची ती वेदी नष्ट कर आणि अशेरा स्तंभाची मोडतोड कर. 26 मग परमेश्वर देवासाठी योग्य अशा वेदीची उंचवट्यावर उभारणी कर. त्या वेदीवर या बैलाचा बळी देऊन त्याला जाळ. या यज्ञापर्णासाठी अशेरा स्तंभाच्या लाकडांचा वापर कर.”
27 तेव्हा आपल्या दहा सेवकांच्या मदतीने गिदोनने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने ते केले खरे पण घरातील आणि नगरातील माणसे बघतील या भीतीने हे काम त्याने दिवसाढवळ्या न करता रात्री केले.
28 सकाळी लोक उठून बघतात तर बआलची वेदी उध्वस्त झोलेली! वेदीच्या शेजारचा अशेरा स्तंभ मोडून पडलेला. गिदोनने बांधलेली वेदी आणि तिच्यावर अर्पण केलेल्या बैलालाही त्यांनी पाहिले.
29 नगरातील लोक मग एकमेकांना विचारू लागले. “आपली वेदी कोणी पाडली? आपला अशेरा स्तंभ कोणी मोडला? या नवीन वेदीवर बैलाचे यज्ञार्पण कोणी केले?” असे अनेक प्रश्न ते आपले कुतूहल शमवायला विचारु लागले.
कोणीतरी त्यांना सांगितले, “योवाशचा मुलगा गिदोन याने हे केले आहे.”
30 तेव्हा नगरवासी योवाशकडे येऊन त्याला म्हणाले, “तुझ्या मुलाला बाहेर आण. त्याने बआल वेदीची आणि तिच्या शेजारच्या अशेरा स्तंभाची मोडतोड केलेली आहे. तेव्हा त्याला मृत्युदंड दिलाच पाहिजे.”
31 तेव्हा भोवतालच्या जमावाला योवाश म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेणार का? त्याला तारणार का? जो बआलाची बाजू घेईल त्याला सकाळपर्यंत मृत्युदंड दिला जावा. बआल जर खरा देव असेल तर जेव्हा लोक वेदीची मोडतोड करायचा प्रयत्न करतील तेव्हा स्वतःचे रक्षण त्याने स्वतःच करुन दाखवावे.” 32 योवाश पुढे म्हणाला, “जर गिदोनने बआलच्या वेदीचा विध्वंस केला आहे तर बआलाच त्याच्याशी वाद करु द्या.” त्या दिवसापासून योवाशने गिदोनला नवे नाव दिले ते म्हणजे यरुब्बाल.
गिदोनकडून मिद्यानी लोक पराभूत होतात
33 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर लोक एकत्र येऊन इस्राएल लोकांविरुध्द लढण्यास सज्ज झाले. यार्देन पलीकडे जाऊन त्यांनी एज्रीलच्या खोऱ्यात तळ दिला. 34 गिदोनच्या ठायी परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि गिदोन सामर्थ्यवान बनला. अबियेजर कुटुंबातील लोकांना आपल्या मागोमाग येण्याचे आवाहन करण्यासाठी त्याने रणशिंग फुंकले. 35 मनश्शेच्या वंशातील सर्व लोकांकडे त्याने दूत रवाना केले. दूतांनी त्या लोकांना शस्त्रास्त्रे घेऊन युध्दासाठी सज्ज राहायला सांगितले. आशेर, जबुलून आणि नफताली यांच्या कडेही गिदोनने आपल्या दूतांकरवी असाच निरोप पाठवला. तेव्हा तेही सर्व लोक गिदोनला येऊन मिळाले.
36 मग गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्या हातून तू इस्राएल लोकांना वाचवणार आहेस, याची मला साक्ष पटव. 37 मी आता खव्व्यात कातरलेली लोकर ठेवतो. सर्व जमीन कोरडी राहून फक्त लोकरीवर दव पडलेले आढळले तर मला समजेल की इस्राएल लोकांचा बचाव करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे तू माझा उपयोग करणार आहेस.”
38 आणि नेमके तसेच घडले. गिदोन दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठला आणि त्याने लोकर दाबून पाहिली तर त्यातून वाटीभर पाणी निघाले.
39 ते पाहून गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्यावर रागवू नको. मला आणखी एक गोष्ट विचारू दे. लोकरीद्वारे मला आणखी एकदा तुझी परीक्षा घ्यायची आहे. ह्या वेळी आजूबाजूची जमीन दवाने भिजलेली असताना लोकर मात्र कोरडी राहू दे.”
40 परमेश्वराने त्या रात्री तसेच करुन दाखवले. फक्त लोकर तेवढी कोरडी राहून भोवतालची जमीन दवाने ओली झाली होती.
येशू अशुद्ध आत्मा असलेल्या मनुष्याला बरे करतो(A)
31 नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो त्यांना शब्बाथ दिवशी शिक्षण देत असे. 32 ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवीत असे.
33 सभास्थानात एक मनुष्य होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता. 34 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.” 35 येशूने त्याला दटावले आणि म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला.
36 सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, “हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात.” 37 अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली.
येशू एका स्त्रीला बरे करतो(B)
38 येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले. 39 येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.
इतर अनेकांना येशू बरे करतो
40 सूर्य मावळतीला जात असताना, ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. 41 कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, “तू देवाचा पुत्र आहेस.” परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही कारण त्यांना माहीत होते की, तो ख्रिस्त आहे.
येशू इतर शहरांमध्ये जातो(C)
42 जेव्हा दिवस उगवला तेव्हा तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले. आणि त्याने त्यांच्यातून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. 43 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे. कारण याच कारणासाठी मला पाठविले आहे.”
44 आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.
2006 by World Bible Translation Center