Old/New Testament
यहूदाची कनान्यांवर चढाई
1 यहोशवा वारला. त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराची प्रार्थना केली. ते म्हणाले, “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यापैकी कोणत्या वंशाच्या लोकांनी प्रथम चढाई करावी?”
2 परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “यहूदाच्या वंशातील लोकांनी प्रथम जावे. हा प्रदेश ताब्यात घेण्यास मी त्यांना मदत करीन.”
3 यहूदाच्या लोकांनी शिमोनच्या वंशातील आपल्या बांधवांकडे मदतीची मागणी केली. ते म्हणाले, “परमेश्वराने आपल्या सर्वांना जमिनीत हिस्सा द्यायचे अभिवचन दिले आहे. आमची जमीन ताब्यात घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली तर तुमची जमीन ताब्यात घ्यायला आम्ही तुमच्या मदतीला येऊ.” तेव्हा शिमोनचे लोक या लढाईत यहूदी लोकांना साथ द्यायला तयार झाले.
4 परमेश्वराच्या मदतीने यहूदाच्या लोकांनी कनानी आणि परिज्जी यांचा पराभव केला. बेजेक नगरात यहूदाच्या लोकांनी दहा हजार माणसे मारली. 5 बेजेकचा राजा त्यांच्या हाती आला. त्याच्याशी ते लढले. तसेच कनानी व परिज्जी यांना पराभूत केले.
6 बजेकच्या राजाने पळून जायचा प्रयत्न केला. पण यहूदाच्या लोकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्या हातापायाचे अंगठे तोडले. 7 तेव्हा तो राजा म्हणाला, “मी आत्तापर्यंत सत्तर राजांच्या हातापायांचे अंगठे कापले आहेत. मी ताटाबाहेर टाकलेले अन्न त्यांना वेचून खावे लागत होते. त्या राजांबरोबर मी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल परमेश्वराने मला परतफेड केली आहे.” यहूदाच्या लोकांनी मग त्या बेजेकच्या राजाला यरुशलेम येथे नेले. तेथेच तो मरण पावला.
8 यहूदाच्या लोकांनी यरुशलेमचाही युध्दात पाडाव केला. ते ताब्यात घेतले. तलवारींचा वापर करुन त्यांनी तेथील लोकांना कापून काढले. नंतर शहराला आग लावली. 9 यहूदाचे लोक पुढे डोंगराळ प्रदेशात, नेगेबमध्ये तसेच पश्चिमेकडील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या आणखी काही कनानी लोकांवर चढाई करुन गेले.
10 मग हेब्रोन (म्हणजेच पूर्वीचे किर्याथ-आर्बा) या शहरात राहणाऱ्या कनानी लोकांशी यहूद्यांनी लढाई केली. शेशय, अहीमन आणि तलमय या तिघांना यहूद्यांनी पराभूत केले.
कालेब आणि त्याची मुलगी
11 येथून निघून यहूदाचे लोक पुढे दबीर येथे राहणाऱ्यांवर चाल करुन गेले (दबीरचे नाव पूर्वी किर्याथ-सेफर असे होते.) 12 यहूदाच्या लोकांनी उठाव करण्यापूर्वी कालेब त्यांना म्हणाला, “किर्याथ सेफरचा पाडाव व्हावा अशी माझी इच्छा आहे. जो कोणी युध्दात हे नगर घेईल त्याला मी माझी मुलगीअखसा देईन. ती त्याची पत्नी होईल.”
13 कालेबला कनाज नावाचा धाकटा भाऊ होता. त्याचा मुलगा अथनिएल. अथनिएलने किर्याथ-सेफर नगर काबीज केले. तेव्हा कालेबने अथनिएलशी अखसाचा विवाह करुन दिला.
14 ती अथनिएल जवळ राहायला गेली. अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी थोडी जमीन मागायला सांगितले. ती आपल्या वडीलांकडे गेली. ती जेव्हा गाढवावरुन उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले, “काय झाले?”
15 अखसा वडीलांना म्हणाली, “मला आशीर्वाद द्या. मला तुम्ही नेगेबमधील कोरडे वाळवंट असलेली जमीन दिली आहे. तेव्हा पाणी असलेली अशी काही जमीन मला द्या.” तेव्हा कालेबने तिला हवेतसे वरच्या व खालच्या बाजूचे झरेही दिले.
16 केनी लोकांनी खजुरीच्या झाडांचे नगर (म्हणजेच यरीहो) सोडले. ते यहूदा लोकांना सामील झाले. ते यहूदाच्या वाळवंटात तेथील लोकांबरोबर राहू लागले. अराद नगराजवळ नेगेबमध्थे हे ठिकाण आहे. (केनी हे मोशेच्या सासऱ्याच्या वंशातील लोक होते.)
17 काही कनानी लोक सफात नगरात राहात होते. तेव्हा यहूदा आणि शिमोनच्या लोकांनी या कनान्यांवर हल्ला केला. त्यांनी ते नगर पूर्णपणे उध्वस्त केले आणि त्या नगराचे नाव हर्मा ठेवले.
18 मग गज्जा व त्याभोवतालची खेडी तसेच अष्कलोन व एक्रोन ही नगरे व त्यांच्या भोवतालची खेडी हा सर्व प्रदेश यहूद्यांनी काबीज केला.
19 या लढाईत परमेश्वर यहूद्यांच्या बाजूचा होता. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील जमीन घेतली पण खोऱ्यांमधील जमीन घेण्यास ते असमर्थ ठरले. कारण तेथील लोकांकडे लोखंडी रथ होते.
20 हेब्रोन जवळची जमीन कालेबला द्यायची असे मोशेने वचन दिले होते. त्याप्रमाणे ती जमीन कालेबच्या वंशजांना मिळाली. अनाकच्या तिन्ही मुलांना कालेबच्या लोकांनी तेथून हद्दपार केले.
21 बन्यामीनचे वंशज यबूसी लोकांना यरुशलेममधून हुसकावून लावू शकले नाहीत. त्यामुळे आजतागायत ते यरुशलेममध्ये बन्यामीनी लोकां बरोबर राहात आहेत.
योसेफचे वंशज बेथेल ताब्यात घेतात
22-23 योसेफच्या वंशातील लोक बेथेल नगरावर हल्ला करायला चाल करुन गेले. (बेथेलचे नांव पूर्वी लूज असे होते.) योसेफच्या लोकांना परमेश्वराची साथ होती. योसेफच्या लोकांनी आधी काही हेर बेथेलला पाठवले. बेथेलचा पाडाव करण्याच्या दृष्टीने त्यांनी टेहेळणी केली. 24 ती करत असताना त्यांना एक माणूस नगराबाहेर येताना दिसला. त्याला ते म्हणाले, “आम्हाला या नगरात जायची गुप्त वाट दाखव आम्ही या नगरावर हल्ला करणार आहोत. तू आम्हाला एवढी मदत केलीस तर आम्ही तुला धक्का लावणार नाही.”
25 तेव्हा त्या माणसाने हेरांना एक गुप्त वाट दाखवली. योसेफच्या लोकांनी बेथेलमधील लोकांना तलवारीने कापून काढले. पण या माणसाला कोणतीही इजा पोचू दिली नाही. तसेच त्याच्या कुटुंबियांनाही त्रास दिला नाही. त्या सर्वांना त्यांनी कोठेही निघून जायला मोकळीक दिली. 26 तेव्हा तो माणूस त्याच्या कुटुंबासह हित्ती लोकांच्या प्रदेशात गेला व तेथे त्याने एक नगर उभे केले. त्याने त्या नगराचे नाव लूज असे ठेवले आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.
इतर वंशाच्या लोकांची कनान्यांशी लढाई
27 बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ही नगरे आणि त्यांच्या भोवतालची खेडी यातही कनानी लोक राहात होते. मनश्शेच्या वंशातील लोक या सर्वांना नगर सोडून द्यायला भाग पाडू शकले नाहीत. आणि त्यामुळे कनानी लोक तिथेच राहिले. त्यानी आपला प्रदेश सोडायचे नाकारले. 28 पुढे इस्राएल लोक समर्थ बनले तेव्हा त्यांनी या लोकांना आपले गुलाम म्हणून काम करायला लावले. पण कनानी लोकांना शहर सोडून जायला ते भाग पाडू शकले नाहीत.
29 एफ्राईमच्या वंशजांच्या बाबतीतही असेच घडले. गेजेर मध्ये कनानी राहात होते. त्यांना एफ्राईमचे वंशज देशातून बाहेर काढू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी लोक एफ्राईम लोकांबरोबर गेजेरमध्ये राहू लागले.
30 हीच गोष्ट जबुलूनच्या वंशजांच्या बाबतीतही घडली. कित्रोन आणि नहलोल या शहरांमध्ये ही काही कनानी राहात होते. त्यांना जबुलूनचे लोक बाहेर घालवू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी जबुलून लोकांबरोबरच राहिले. जबुलून लोकांनी त्यांना आपल्या कामांसाठी गुलाम केले.
31 आशेर लोकांच्या बाबतीतही हेच झाले. अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब या नगरांमधील लोकांना आशेर यांनी बाहेर काढले नाही. 32 कनान्यांना त्यांनी सक्तीने देश सोडायला लावला नाही. तेव्हा कनानी त्यांच्या बरोबरच राहिले.
33 नफतालींच्या बाबतीत हेच झाले. बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथ येथील लोकांना त्यांनी जबरदस्तीने बाहेर घालवले नाही. नफताली त्या नगरांमधील लोकांबरोबर राहू लागले. तेथील कनानी लोक नफतालींचे गुलाम झाले.
34 अमोरी लोकांनी दानच्या वंशजांना डोंगराळ भागातच राहाणे भाग पाडले. त्यांना तेथेच राहावे लागले कारण अमोरी त्यांना खाली खोऱ्यात उतरुन वस्ती करु देईनात. 35 अमोरी लोकांनी हेरेस, अयालोन व शालबीम या डोंगरांमध्ये राहायचे ठरवले. पुढे योसेफचे वंशज जसे आणखी समर्य बनले तसे त्यांनी अमोऱ्यांना आपले दास म्हणून कामाला जुंपले. 36 अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीम खिंडीपासून सेलापर्यंत व सेलावरुन पुढे डोंगराळ प्रदेशापर्यंत होती.
बोखीम येथे परमेश्वराचा दूत
2 परमेश्वराचा दूत गिलगाल नगरातून बोखीम या नगरात आला. इस्राएल लोकांना त्याने परमेश्वराचा संदेश सांगितला. संदेश असा होता; “मी तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशापर्यंत तुम्हाला आणले. तुमच्याशी केलेला करार मी मोडणार नाही असे मी तुम्हाला सांगितले होते. 2 त्यामुळे तुम्ही त्या प्रदेशात राहणाऱ्यां लोकांशी करार करू नका. त्यांच्या वेद्यां उध्वस्त करा असे मी तुम्हाला स्पष्ट सांगितले होते, पण तुम्ही माझे ऐकले नाही.”
3 “म्हणून मी म्हणतो, ‘आता या लोकांना त्यांचा देश सोडून जायला मी भाग पाडणार नाही. तुमच्यापुढे ते समस्या निर्माण करतील. त्यांचा पाश तुमच्याभोवती पडेल. त्यांच्या खोट्या देवता जाळ्यांप्रमाणे तुम्हाला अडकवून टाकतील.’”
4 देवदूताने परमेश्वराचा हा संदेश इस्राएल लोकांना ऐकवल्यावर ते आक्रोश करु लागले. 5 म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्यांनी बोखीम असे ठेवले. बोखीम येथे त्यांनी परमेश्वरासाठी यज्ञ केले.
आज्ञाभंग आणि पराभव
6 मग यहोशवाने सर्वाना घरी जायला सांगितले. तेव्हा सर्व वंशांचे लोक आपापल्या वतनाचा ताबा घ्यायाला परतले. 7 यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मृत्यूनंतर. वडीलधारी मंडळी जिवंत असे पर्यंत इस्राएलचे लोक परमेश्वराची उपासना करत होते. या वृध्द मंडळीनी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या होत्या. 8 परमेश्वराचा सेवक नूनपुत्र यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन वाराला. 9 इस्राएल लोकांनी त्याचे दफन केले. तिम्नाथ-हेरेस येथे, गाश डोंगराच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याला मिळालेल्या जमिनीत त्याला त्यांनी पुरले.
10 जुन्या पिढीतील सर्व मृत्यू पावल्यानंतर नवीन पिढी पुढे आली. त्यांना परमेश्वराविषयी आणि परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी काय केले याविषयी काहीही माहिती नव्हती. 11 तेव्हा या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशी दृष्कृत्ये केली आणि बआल या दैवताच्या भजनी लागले. हे निंद्य कृत्य करताना त्यांना परमेश्वराने पाहिले. 12 परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणले होते. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराची उपासना केली होती. पण आता या इस्राएल लोकांनी परमेश्वराचे अनुसरण करण्याचे सोडून दिले होते. आणि त्यांच्या अवती भोवतीच्या लोकांच्या खोट्या दैवतांची पूजा करायला सुरुवात केली होती. याचा परमेश्वराला संताप आला. 13 इस्राएल लोकांनी आता परमेश्वराला सोडून बआल आणि अष्टारोथ यांची उपासना करायला सुरुवात केली.
14 परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रू चाल करुन येऊ लागला व त्यांना लुटू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रूंकडून ते पराभूत होऊ लागले. इस्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना. 15 लढाईत त्यांना नेहमी अपयश येऊ लागले. परमेश्वराची साथ आता त्यांना नसल्यामुळे ते पराजित होऊ लागले. त्यांच्या भोवती राहणाऱ्या लोकांच्या दैवतांची सेवा केल्यास इस्राएल लोकांना पराभव पत्करावा लागेल हे परमेश्वराने आधीच बजावले होते.
16 तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक केली. हे नेते इस्राएलांचा ताबा घेणाऱ्या शत्रुंपासून त्यांची सुटका करीत. 17 इस्राएल लोक या न्यायाधीशांनाही जुमानीतनासे झाले. आपल्या परमेश्वराशी इस्राएल लोक निष्ठावंत राहिले नाहीत ते इतर दैवतांच्या भजनी लागले. [a] पूर्वी या इस्राएल लोकांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळत असत. पण आता त्यांच्या वागणुकीत बदल झाला आणि परमेश्वराने सांगितलेला मार्ग त्यांनी सोडून दिला.
18 अनेकदा शत्रु इस्राएलांचा जाच करत. अशावेळी ते मदतीलाठी परमेश्वराचा धावा करीत आणि तेव्हा त्यांची दया येऊन परमेश्वर त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला पाठवी. परमेश्वर या न्यायाधीशांच्या बरोबर होता. म्हणून इस्राएल लोकांचे दरवेळी शत्रूंपासून रक्षण झाले. 19 पण प्रत्येक न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा पुन्हा पापाकडे झुकत आणि अन्य दैवतांची उपासना करत आणि त्यांची सेवा करत असत. त्यांच्या पूर्वजांपेक्षाही ते अधिक वाईट वागत असत. त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे आपल्या दुर्वतनात फरक करायला त्यांनी नकार दिला.
20 तेव्हा परमेश्वराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला व तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही. 21 तेव्हा मी यापुढे त्यांच्या शत्रूंचा पराभव करुन इस्राएल लोकांचा मार्ग मोकळा करत जाणार नाही. यहोशवा वारला तेव्हा जी राष्ट्रे या भूमीत होती त्यांना मी येथेच राहू देईन. 22 इस्राएल लोकांच्या कसोटीसाठी मी या राष्ट्रांचा वापर करीन. आपल्या पूर्वजांप्रमाणे आताचे इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळतात का ते बघू.” 23 तेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्या त्या ठिकाणी राहू दिले. त्यांना तो देश लगेच सोडून जायची बळजबरी केली नाही. त्यांचा पराभव करायला परमेश्वराने यहोशवाच्या सैन्याला साहाय्य केले नाही.
3 परमेश्वराने इतर राष्ट्रातील त्या लोकांना इस्राएलींचा प्रदेश सोडण्यास भाग पाडले नाही. परमेश्वराला इस्राएल लोकांची परिक्षा घ्यायची होती. या पिढीतील इस्राएल लोकांनी कनानातील देश काबीज करण्यासाठी लढाईत भाग घेतला नव्हता. तेव्हा त्या राष्ट्रांमधील लोकांना परमेश्वराने तेथेच राहू दिले. (कधी युद्ध माहीत नसलेल्या या इस्राएल लोकांना धडा शिकवण्यासाठी परमेश्वराने असे केले.) तेथे राहू दिलेल्या राष्ट्रांची नावे अशी. 3 पलिष्ठ्यांचे पाच राजे, सर्व कनानी लोक, सीदोनी, व बआल-हर्मोनच्या डोंगरापासून ते लेबो हमाथपर्यंतच्या लबानोन डोंगरावर राहणारे हिव्वी. 4 या योगे इस्राएल लोकांची परीक्षा पाहावी आणि मोशेमार्फत त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही हे पाहावे म्हणून परमेश्वराने असे केले.
5 कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या लोकांबरोबर इस्राएल लोक राहिले. 6 इस्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्ने केली. तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इस्राएल लोक उपासना करु लागले.
पहिला न्यायाधीश अथनिएल
7 इस्राएल लोक दुर्वर्तन करत आहेत हे परमेश्वराने पाहिले. ते त्यांचा देव परमेश्वर ह्याला विसरले आणि बआल हे दैवत व अशेरा देवी यांची उपासना करु लागले. 8 त्यामुळे परमेश्वर इस्राएल लोकांवर संतप्त झाला. मेसोपटेमियाचा राजा कुशन-रिशाथईम याचे करवी परमेश्वराने इस्राएल लोकांचा पराभव होऊ दिला व त्याची सत्ता त्यांच्यावर आणली. इस्राएल लोक आठ वर्षे त्याच्या अंमलाखाली होते. 9 तेव्हा इस्राएल लोकांनी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने अथनिएलला त्यांच्या रक्षणासाठी पाठवले. कालेबचा धाकटा भाऊ कनाज याचा अथनिएल मुलगा होता. त्यांने इस्राएल लोकांचे रक्षण केले. 10 अथनिएलावर परमेश्वराचा आत्मा आला आणि तो इस्राएल लोकांचा न्यायाधीश झाला. त्याने इस्राएली सैन्याला लढाईस नेले. परमेश्वराच्या मदतीने अथनिएल ने कुशन-रिशाथईमचा पराभव केला. 11 आणि कनाजपुत्र अथनिएलच्या मृत्यूपर्यंत चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता होती.
दुसरा न्यायाधीश एहूद
12 पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे आचरण करु लागले. ते परमेश्वराने पाहिले. तेव्हा मवाबचा राजा एग्लोन याला इस्राएल लोकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य परमेश्वराने दिले. 13 अम्मोनी आणि अमालेकी लोकांची मदत त्याला मिळाली. त्यांनी इस्राएल लोकांवर एकत्रित हल्ला केला. एग्लोनच्या सैन्याने इस्राएलवर विजय मिळवला व त्यांना यरीहो हे खजुरीच्या झाडांचे नगर सोडायला भाग पाडले. 14 पुढे एग्लोन या मवाबच्या राजाने इस्राएलींवर अठरा वर्षे राज्य केले.
15 त्यांनी पुन्हा परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने एहूदला लोकांच्या रक्षणासाठी पाठवले. एहूद हा डावरा असून, बन्यामीनच्या वंशातील गेरा याचा मुलगा होता. इस्राएल लोकांनी एहूदला नजराणा घेऊन एग्लोनकडे पाठवले. 16 एहूदने एक अठरा इंच [b] लांबीची दुधारी तलवार बनवून घेतली आणि ती उजव्या मांडीवर कपड्याखाली झाकली जाईल अशी बांधली.
17 मग मवाबचा राजा एग्लोन याच्याकडे तो नजरणा घेऊन गेला. (एग्लोन हा अतिशय लठ्ठ होता.) 18 एहूदने एग्लोनला नजराणा दिला व तो बरोबर घेऊन आलेल्यांना त्याने पाठवून दिले. 19 त्यांनी राजवाडा सोडला जेव्हा एहूद गिलगालमधील मुर्तीजवळ आला तेव्हा तो मागे फिरला आणि राजाला भेटण्यासाठी परत गेला. एहूद राजा एग्लोनला म्हणाला, “हे राजा, मी तुझ्यासाठी एक गुप्त संदेश आणला आहे.”
राजाने त्याला गप्प बसायची खूण करुन सर्व नोकरचाकरांना दालनाच्या बाहेर जायला सांगितले. 20 एहूद राजाच्या अगदी जवळ गेला. एग्लोन आता आपल्या राजवाड्याच्या दालनात अगदी एकटा होता.
तेव्हा एहूद म्हणाला, “तुला देवाकडून एक संदेश आहे.” राजा सिंहासनावरुन उठला आता तो एहूदच्या अगदी निकट होता. 21 राजा उठल्याबरोबर उजव्या मांडीवर बांधलेली तलवार एहूदने डाव्या हाताने उपसली आणि राजाच्या पोटात खुपसली. 22 तलवारीचे पाते थेट मुठीपर्यंत राजाच्या शरीरात घुसले. राजाच्या अंगातील चरबीने पाते बरबटले. तेव्हा एहूदने ती तशीच तेथे राहू दिली.
23 मग तो बाहेर पडला आणि दालनाचे दरवाजे बंद करुन त्याने त्यांना कुलूप लावले. 24 एहूद बाहेर पडल्याबरोबर सेवक आत शिरले. पाहतात तो दरवाजे बंद केलेले. ते पाहून, राजा स्वच्छतागृहात असेल असे त्यांना वाटले. 25 ते तसेच बाहेर बराच वेळ थांबले. शेवटी त्यांना काळजी वाटायला लागली. किल्ली आणून त्यांनी कुलूप उघडून दार उघडले. आत शिरतात तर जमिनीवर त्यांना राजाचा मृतदेह पसरलेला दिसला.
26 नोकर राजाच्या दालनाबाहेर वाट पाहात होते तेवढ्या वेळात एहूद निसटून जाऊ शकला. मूर्तीवरुन पुढे जाऊन तो सेईराकडे निघाला. 27 तो सेईरा येथे पोचला तेव्हा लगेच त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. इस्राएल लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते खाली उतरले, एहूद त्यांच्या पुढे निघाला. 28 तो म्हणाला, “माझ्या मागोमाग या, आपला शत्रू मवाब याला पराभूत करायला परमेश्वराने आपल्याला मदत केली आहे.”
तेव्हा इस्राएल लोक त्याच्या पाठोपाठ निघाले. यार्देन नदी सहजगत्या पार करुन जिथून मवाब प्रदेशात जाता येते अशा सर्व जागांचा त्यांनी ताबा घेतला. कोणालाही त्यांनी यार्देन पार करु दिली नाही. 29 मवाबांपैकी जवळजवळ दहाहजार शूर आणि कणखर लोकांना इस्राएल लोकांनी ठार केले. एकही मवाब व्यक्ती पळून जाऊ शकला नाही. 30 त्या दिवसापासून इस्राएल लोकांचे मवाबांवर राज्य सुरु झाले. पुढे ऐंशी वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदली.
तिसरा न्यायाधीश शमगार
31 एहूदनंतर आणखी एक जण इस्राएल लोकांच्या रक्षणाला आला तो म्हणजे अनाथचा मुलगा शमगार, त्याने बैलाच्या आरीने पलिष्ट्यांपैकी सहाशे जणांना मारले.
येशूची परीक्षा(A)
4 येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले. 2 तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.
3 सैतान त्याला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस, तर या दगडांची भाकर करुन दाखव.”
4 येशून त्याला उत्तर दिले, “असे लिहिले आहे:
‘मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.’” (B)
5 मग सैतान त्याला वर घेऊन गेला. आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली. 6 सैतान त्याला म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. 7 जर तू माझी उपसना करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
8 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे:
‘तू प्रभु तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे,
आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.’” (C)
9 नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार! 10 असे लिहिले आहे:
‘तो मुझे संरक्षण करण्याची
देवादूतांना आज्ञा करील.’ (D)
11 आणि असेही लिहीले आहे:
‘ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील,
त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.’” (E)
12 येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे,
‘तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.’” (F)
13 म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
येशू गालीलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो(G)
14 मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. 15 त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुति केली.
येशू आपल्या गावी जातो(H)
16 मग तो नासरेथला गेला. जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाथ दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला, तो वाचण्यासाठी उभा राहिला, 17 आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे:
18 “प्रभूचा आत्मा मजवर आहे,
कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी
बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी,
आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी,
जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी
19 आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे.” (I)
20 मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. 21 त्यांने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली: “तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले.”
22 तेव्हा प्रत्येकाने त्याच्याविषयी चांगले उद्गार काढले. आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले. आणि ते म्हणाले, “हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?”
23 तो त्यांना म्हणाला, “अर्थात, तुम्ही मला ही म्हण लागू कराल; ‘वैद्या, स्वतःला बरे कर.’ ‘कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.’” मग तो म्हणाला, 24 “मी तुम्हांला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारला जात नाही.
25 “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षेपर्यंत पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता 26 तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्याला सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
27 “अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
28 जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार रागावले. 29 ते लोक उठले आणि त्यांनी त्याला (येशूला) शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले. 30 परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
2006 by World Bible Translation Center