Old/New Testament
तीन वंशाचे लोक स्वस्थानी परततात
22 यहोशवाने मग रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक यांना एकत्र बोलवले. 2 त्यांना तो म्हणाला, “परमेश्वराचा सेवक मोशे याने तुम्हाला जे जे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही वागलात. माझ्याही सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात. 3 आजपर्यंत तुम्ही आपल्या इस्राएल बांधवांनाही पाठिंबा दिलात. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काटेकोरपणे पाळल्या आहेत. 4 सर्व कठीण प्रसंगातून शांतता देण्याचे तुमच्या परमेश्वर देवाने इस्राएल लोकांना वचन दिले होते. आणि परमेश्वराने आपला शब्द खरा केला आहे. तेव्हा आता तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता. यार्देनच्या पूर्वेकडील प्रदेश परमेश्वराचा सेवक मोशेने तुम्हाला दिला आहे. तेथे तुम्ही आता जाऊ शकता. 5 पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोशेचे नियम पाळत चला. परमेश्वर देवावर प्रेम करा आणि त्याच्या आज्ञा पाळा. परमेश्वराच्या मार्गाने जा आणि मनोभावे त्याची सेवा करा.”
6 एवढे बोलून यहोशवाने त्यांना निरोप दिला आणि ते निघाले. ते आपल्या घरी परतले 7 बाशानची भूमी मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिली होती. उरलेल्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यार्देनच्या पश्चिमेकडील काही जमीन यहोशवाने दिली. त्यांना आशीर्वाद देऊन यहोशवाने निरोप दिला. 8 तो म्हणाला, “तुम्हाला सर्व ऐश्वर्य मिळाले आहे. भरपूर गुरेढोरे आहेत सोने, रुपे, मौल्यवान दागदागिने तुमच्याकडे आहेत. सुंदर, तलम वस्त्रे आहेत. शत्रूच्या लुटीतील अनेक वस्तू तुम्ही घेतल्या आहेत. त्यांची आपापसात वाटणी करुन आता आपापल्या ठिकाणी परत जा.”
9 तेव्हा रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी इस्राएल लोकांचा निरोप घेऊन प्रस्थान केले. ते कनान देशातील शिलो येथे होते. तेथून निघून ते गिलाद कडे गेले. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जो प्रांत त्यांना द्यायला सांगितला होता तेथे म्हणजेच आपल्या वतनाकडे ते परत गेले.
10 रऊबेन, गाद आणि मनश्शे या वंशातील लोक गालिलोथ ठिकाणी आले. कनान देशातील यार्देन नदीच्या जवळ हे आहे. या ठिकाणी त्यांनी एक मोठी वेदी बांधली. 11 या तीन वंशांच्या लोकांनी ही वेदी बांधल्याची बातमी शिलो येथे असलेल्या इतर इस्राएल लोकांनी ऐकली. कनान देशाच्या सीमेजवळ गलिलोथ येथे ही वेदी बांधल्याचे त्यांच्या कानावर आले. इस्राएलांच्या भागात यार्देन नदी जवळ हे ठिकाण होते. 12 या बातमीने क्रुध्द होऊन सर्व इस्राएल लोकांनी एक होऊन या तीन वंशांच्या लोकांवर चढाई करण्याचे ठरवले.
13 इस्राएल लोकांनी रऊबेन, गाद व मनश्शे यांच्या वंशजांशी बोलणी करण्यास काही जणांना पाठवले. एलाजार याजकाचा मुलगा फिनहास हा त्यांचा प्रमुख होता. 14 त्याखेरीज, शिलो येथे असलेल्या इस्राएलांच्या प्रत्येक कुळातून एक अशा दहा जणांनाही पाठवले. हे दहाजण आपापल्या कुळाचे प्रमुख होते.
15 अशी अकरा माणसे गिलाद येथे गेली. रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांच्याशी बोलणी करताना ते म्हणाले, 16 “सर्व इस्राएल लोकांची विचारणा आहे की. परमेश्वराविरुद्ध असलेली ही गोष्ट तुम्ही का केलीत? तुम्ही हे बंड का केलेत? परमेश्वराच्या शिकवणी विरूध्द ही वेदी तुम्ही का बांधलीत? 17 पौराला काय झाले ते आठवते ना? त्या पापाचे फळ आपण अजून भोगत आहोत. त्या भंयकर पापाची शिक्षा म्हणू आपल्यावर आजारपण ओढवले. त्यातून आपण अजूनही पूर्णतः बरे झालो नाही. 18 आणि तरी तुम्ही तेच करतात! हे परमेश्वराविरुद्ध बंड आहे. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणार आहात काय? तुम्ही हे थांबवले नाहीत तर सर्व इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप होईल.
19 “परमेश्वराच्या उपासनेला तुमची भूमी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर आमच्या भागात या. आमच्या भागात परमेश्वराचे निवासस्थान आहे आमच्या वाट्याची थोडी जमीन घेऊन हवे तर राहू शकता. पण परमेश्वराच्या शिकवणुकी विरुद्ध वागू नका. आता आणखी वेदी बांधू नका. परमेश्वर देवाच्या निवासमंडपात आमच्या येथे एक वेदी आहेच.
20 “जेरहाचा मुलगा आखान आठवतो का? त्याने, नष्ट करुन टाकायच्या वस्तू विषयीची आज्ञा पाळायचे नाकारले. देवाची आज्ञा त्याने एकट्याने मोडली पण शिक्षा मात्र सर्व इस्राएल लोकांना झाली. आखान, त्याच्या पापामुळे मेला पण आणखीही बरीच माणसे मरण पावली.”
21 तेव्हा रऊबेन गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी या अकरा जणांना उत्तर दिले. ते म्हणाले, 22 “परमेश्वर हाच आमचा देव आहे. [a] परमेश्वर हाच आमचा समर्थ परमेश्वर आहे. आणि आम्ही हे का केले हे देवाला माहीत आहे. तुम्हीही समजून घ्या. आम्ही केले ते उचितच आहे हे तुमच्या लक्षात येईल. आम्ही चुकलो अशी तुमची खात्री पटली तर आम्हाला जिवंत ठेवू नका. 23 आम्ही देवाचा नियम मोडला असेल तर परमेश्वरानेच आम्हाला शिक्षा करावी. 24 आम्ही ही वेदी होमार्पण धान्यार्पण किंवा शांति-अर्पण करण्यासाठी बांधली असे तुम्हाला वाटते का? नाही, आम्ही ती त्यासाठी बांधली नाही. मग का बांधली बरे? उद्या कदाचित् तुमचे वंशज आम्हाला आपल्यापैकीच एक म्हणून ओळखणार नाहीत अशी आम्हाला भीती वाटली. तुम्ही कोण इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवाची आराधना करणारे? असे कदाचित् ते विचारतील. 25 देवाने आम्हाला यार्देनच्या पलीकडच्या तीरावरची जमीन दिली आहे. नदीमुळे आपण वेगळे पडलो आहोत. उद्या तुमची मुले मोठी होऊन तुमच्या प्रदेशावर सत्ता गाजवू लागली की, आम्हीही तुमच्यापैकीच आहोत हे ती विसरतील मग ते म्हणतील, ‘हे रऊबेन आणि गाद इस्राएलांपैकी नव्हेत’ आणि तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराची आराधना करायला प्रतिबंध करतील.
26 “म्हणून ही वेदी बांधायचे ठरवले. पण यज्ञार्पणे किंवा होमार्पणे करण्याच्या हेतूने ती बांधली नाही. 27 तुमचा आणि आमचा परमेश्वर एकच आहे हे दाखवणे हा वेदी बांधण्यामागचा उद्देश होता. तुम्हा आम्हाला व पुढच्या पिढ्यांना ही वेदी साक्ष राहील की हा आपला परमेश्वर आहे. आम्ही परमेश्वराला यज्ञार्पणे, अन्नार्पणे, शांतिअर्पणे करु. तुमच्याप्रमाणेच आम्हीही इस्राएल लोकांपैकी आहोत हे तुमच्या वंशजांना कळावे अशी आमची इच्छा आहे. 28 आम्ही इस्राएल नाही असे उद्या तुमची मुले म्हणाली तर आमची मुले म्हणतील, ‘ही पाहा आमच्या वाडवडिलांनी बांधलेली वेदी. ही वेदी तंतोतंत परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानामधील वेदीसारखीच आहे. ही आम्ही यज्ञासाठी वापरत नाही. आम्ही ही इस्राएलचाच एक भाग आहोत याची ही साक्ष आहे.’
29 “परमेश्वराविरुद्ध बंड करावे असे खरोखरच आम्हाला वाटत नाही. त्याच्या मार्गाने जायचे आम्ही थांबवणार नाही. परमेश्वराच्या निवासस्थानासमोरची वेदी हीच खरी हे आम्हाला माहीत आहे. तीच परमेश्वर देवाची आहे.”
30 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचे लोक काय म्हणाले ते फिनहास याजक व त्याच्या बरोबर आलेले इतर प्रमुख यांनी ऐकले. त्यांना ते पटले. या लोकांचे म्हणणे खरे आहे असे त्यांचे समाधान झाले. 31 तेव्हा फिनहास याजक त्यांना म्हणाला, “परमेश्वराची आपल्याला साथ आहे हे आता आपण जाणतो. तुम्ही त्याच्याविरुध्द बंड केले नाही हे आम्हाला कळले. आता परमेश्वर इस्राएल लोकांना शिक्षा करणार नाही, म्हणून आम्हाला आनंद वाटतो.”
32 मग फिनहास आणि सर्व प्रमुख आपल्या घरी परतले. रऊबेनी आणि गादी यांना गिलाद मध्ये सोडून कनान येथे आले. त्यांनी इस्राएल लोकांना सर्व हकीकत सांगितली. 33 इस्राएल लोकांचेही त्याने समाधान झाले. आनंद वाटून त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. रऊबेनी, गादी आणि मनश्शे या लोकांविरुद्ध चढाई न करण्याचे त्यांनी ठरवले. ते लोक जेथे राहात होते तो प्रदेश नष्ट न करण्याचे त्यानी ठरवले.
34 रऊबेनी आणि गादी यांनी या वेदीला नाव दिले, ते असे, “परमेश्वर हाच देव आहे असा आमचा विश्वास आहे ह्याची ही साक्ष.”
यहोशवाचे लोकांना प्रोत्साहन
23 परमेश्वराने इस्राएल लोकांना भोवतालच्या शत्रूंपासून विसावा दिला. त्यांना सुरक्षित केले. अशी अनेक वर्षे लोटली, आता यहोशवा बराच वृध्द झाला होता. 2 तेव्हा एकदा, इस्राएल लोकांमधील वडीलधारी मंडळी, कुटुंबप्रमुख, न्यायाधीश, अंमलदार या सर्वांना यहोशवाने भेटीसाठी एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मी आता म्हातारा झालो. 3 परमेश्वराने आपल्या शत्रूंची काय परिस्थिती करुन टाकली ते तुम्ही पाहीले. आपल्याला मदत करण्याच्या उद्देशाने त्याने ते केले. तुमचा परमेश्वर देव तुमच्यासाठी लढला. 4 यार्देन नदी आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र यांच्या मधली जमीन तुम्ही काबीज करू शकता हे मी तुम्हाला सांगितल्याचे तुमच्या लक्षात असेलच. ती भूमी तुम्हाला द्यायचे मी वचन दिले आहे, पण अजून तुम्ही ती ताब्यात घेतली नाही. 5 तेथील रहिवाश्यांना तुमचा परमेश्वर देव घालवून देईल. तुम्ही ती आपल्या ताब्यात घ्याल. तेथील. लोकांना परमेश्वर हुसकावून लावील. तुमच्यासाठी त्याने हे करायचे कबूल केले आहे.
6 “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. मोशेच्या नियमशास्त्रान जे जे लिहिले आहे त्या सर्वांचे पालन करा. त्याच्याकडे पाठ फिरवू नका. 7 इस्राएल नसले लीही काही माणसे अजून आपल्यात आहेत. ती त्यांच्या दैवतांची पूजा करतात. अशा लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्या दैवतांची सेवा किंवा पूजा करु नका. 8 आपल्या परमेश्वर देवाचीच उपासना करा. पूर्वी तुम्ही हे केले आहे व पुढेही करत राहा.
9 “परमेश्वराने तुम्हाला तुमच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांचा पराभव करायला मदत केली आहे. त्याने त्या लोकांना बाहेर पडायला भाग पाडले. कोणीही तुम्हाला आतापर्यंत पराभूत करु शकले नाही. 10 परमेश्वराच्या साहाय्याने, एक इस्राएल माणूस शत्रूच्या हजार सैनिकांना सळो की पळो करु शकतो. कारण खुद्द तुमचा परमेश्वर देवच तुमच्या वतीने लढतो. असे करायचा परमेश्राने शब्द दिला आहे. 11 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वरावरच प्रेम करत राहा.
12 “आपल्या परमेश्वराच्या उपासनेत खंड पडू देऊ नका. इस्राएली, खेरीज इतर लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्याशी लग्न संबंध ठेवू नका. पण या लोकांशी मैत्री ठेवलीत तर 13 शत्रूला पराभूत करायला तुमचा परमेश्वर देव तुम्हाला मदत करणार नाही. हे लोक तुमच्यासाठी सापळा ठरतील डोव्व्यांत धूर आणि धूळ जाऊन त्रास व्हावा तसा तुम्हाला या लोकांमुळे त्रास होईल. मग तुम्हाला ही चांगली भूमी सोडावी लागेल. परमेश्वराने तुम्हाला ती दिली. पण त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुम्ही देशोधडीला लागाल.
14 “माझी अखेर आता जवळ येऊन ठेपली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी बऱ्याच महान गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता व खरोखरच त्यावर विश्वास ठेवता. त्याने दिलेला शब्द पाळण्यात कुठेही कसूर केली नाही हे तुम्हाला माहीत आहेच. आपल्याला दिलेले प्रत्येक वचन त्याने पुरे केले. 15 परमेश्वर देवाने आपल्याला जी काही चांगली वचने दिली ती सर्व प्रत्यक्षात आली. पण तसेच त्याचे दुसरे वचनही प्रत्यक्षात आल्याखेरीज राहणार नाही. आपण चुकीने वागलो तर आपल्यावर संकटे ओढवतील असाही त्याने शब्द दिला आहे. त्याने दिलेली ही चांगली सुपीक जमीन सोडून आपल्याला जावे लागेल असेही त्याने शपथपूर्वक उच्चारले आहे. 16 तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाशी केलेल्या कराराचा भंग केलात तर असे घडेल. इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुम्ही या जमीनीला मुकाल. तेव्हा त्या इतर दैवतांची चुकूनसुध्दा पूजा करु नका. तसे केलेत तर आपल्या परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल. आणि मग त्याने दिलेल्या या चांगल्या प्रदेशातून तो तुमची हकालपट्टी करेल.”
यहोशवाचा अखेरचा निरोप
24 यहोशवाने इस्राएल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्राएलीं पैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली.
2 मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो. फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते. 3 पण मी, परमेश्वराने, तुमचा पूर्वज अब्राहाम याला नदीपलीकडल्या प्रदेशातून बाहेर काढले. कनान देशात त्याला बराच प्रवास घडवला आणि त्याला बरीच मुलेबाळे दिली. त्याला मी इसहाक हा त्याचा पुत्र दिला. 4 मग याकोब आणि एसाव हे दोन पुत्र इसहाकाला दिले. सेईर डोंगरा भोवतालची जमीन मी एसावला दिली. याकोब आणि त्याची मुलेबाळे येथे राहिली नाहीत. ती मंडळी मिसर देशात गेली.
5 “मग मी मोशे आणि अहरोन यांना मिसरला पाठवले. त्यांच्यामार्फत मला माझ्या लोकांना मिसरमधून बाहेर काढायचे होते. त्यासाठी मी मिसरमधील लोकांना भयंकर त्रासदायक गोष्टींनी पिडले. आणि तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. 6 अशाप्रकारे तेथून सुटका झाल्यावर ते समुद्रापर्यंत आले तरी मिसरमधील लोक त्यांचा पाठलाग करत होते. रथ, घोडेस्वार यांच्यासह त्यांनी पाठलाग केला. 7 तेव्हा त्यांनी माझा म्हणजे परमेश्वराचा धावा केला. म्हणून मी मिसरमधील लोकांना अनेक संकटांनी हैराण केले. समुद्राला त्यांना आच्छादून टाकायला लावले आणि त्यांना त्याने बुडवले. मिसरच्या सैन्याची मी काय स्थिती केली ती तुम्ही डोव्व्यांनी पाहिलीच आहे.
“त्यानंतर तुम्ही बरेच दिवस वाळवंटात काढलेत. 8 मग मी तुम्हाला यार्देन नदीच्या पूर्वेकडील अमोरी लोकांच्या प्रदेशात आणले. त्यांनी तुमच्याशी युध्द केले पण मी तुमच्यामार्फत त्यांचा पराभव केला. त्यांचा संहार करायचे सामर्ध्य मी तुम्हाला दिले. मग तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.
9 “त्यानंतर मवाबाचा राजा आणि सिप्पोरचा मुलगा बालाक याने इस्राएल लोकां विरुद्ध लढण्याची तयारी केली. त्याने बौराचा मुलगा बलाम याला बोलावणे पाठवून तुम्हाला शाप द्यायला सांगितले. 10 पण मी परमेश्वराने, बलामाचे म्हणणे ऐकायचे नाकारले. तेव्हा बलामाने तुम्हाला आशीर्वादच दिला. आणि मी तुमचे रक्षण करून तुम्हाला संकटातून बाहेर काढले.
11 “मग तुम्ही यार्देन नदी पार करुन यरीहो येथे आलात. यरीहा मधील लोकांनी तुमच्याशी लढाई केली. अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी, यबूसी यांनीही लढाई केली. पण माझ्यामुळे तुम्ही त्यांचा पराभव करु शकलात. 12 तुमचे सैन्य चाल करून गेल्यावर मी त्याच्यापुढे गांधील माश्शा पाठवल्या. त्यांनी हैराण होऊन ते लोक चालते झाले. तेव्हा तलवार किंवा धनुष्य न वापरताच तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.
13 “मी परमेश्वराने, तुम्हाला ती जमीन दिली. तुम्हाला ती मिळवायला परिश्रम करावे लागले नाहीत. माझ्यामुळे ती तुम्हाला मिळाली. ती शहरे तुम्ही बांधली नाहीत-ती मी दिली. आता त्या जमिनीवर आणि त्या नगरांमध्ये तुम्ही राहात आहात. द्राक्षमळे आणि जैतून वृक्षांच्या बागा तुम्हाला मिळाल्या पण त्या तुम्हाला लावाव्या लागलेल्या नाहीत.”
14 मग यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही आत्ताच परमेश्वराचे शब्द ऐकलेत. तुम्ही त्याची आदरपूर्वक उपासना केली पाहिजे आणि प्रामाणिक पणाने त्याची सेवा केली पाहिजे. तुमच्या पूर्वजांनी ज्या खोट्या दैवतांची पूजा केली त्यांचा त्याग करा. फरात नदीच्या पलीकडे आणि मिसरमध्ये ते फार पूर्वी घडून गेले. आता फक्त या परमेश्वराचीच सेवा करा.
15 “पण कदाचित् या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहात असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करु.”
16 मग लोकांनी उत्तर दिले, “हाच आमचा परमेश्वर त्याच्या सेवेत खंड पडणार नाही आम्ही इतर दैवतांची पूजा करण्यासाठी आपल्या परमेश्वराला सोडणार नाही. 17 आमच्या पूर्वजांना याच परमेश्वर देवाने मिसरमधून बाहेर आणले. ते आम्ही जाणतो. तेथे आम्ही दास होतो. पण परमेश्वराने तेथे आमच्यासाठी चमत्कार घडवले. आम्हाला तेथून बाहेर आणले. एवढेच नव्हे तर इतर प्रदेशांतून आम्ही प्रवास करताना त्यानेच आमचे रक्षण केले. 18 तेथील रहिवाश्यांना पराभूत करायला त्यानेच आम्हाला साहाय्य केले. आता आम्ही आहोत त्या भूमीवरील अमोरी लोकांचा पराभव करायलाही परमेश्वराचीच आम्हाला मदत झाली. तेव्हा आम्ही याच परमेश्वराची सेवा करणार. तोच आमचा देव आहे.”
19 त्यावर यहोशवा म्हणाला, “हे खरे नाही. सतत या परमेश्वराची सेवा करत राहणे तुम्हाला जमणार नाही. हा परमेश्वर देव पवित्र आहे. आपल्या लोकांनी इतर दैवतांची पूजा करण्याचा त्याला तिरस्कार वाटतो. तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलीत तर तो तुम्हाला क्षमा करणार नाही. 20 तुम्ही या परमेश्वराचा त्याग करुन इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. परमेश्वर तुमचा नाश करील. आजवर त्याने तुमचे भले केले आहे पण त्याच्या विरुद्ध गेलात तर तो तुमचा नाश करील.”
21 तेव्हा लोक यहोशवाला म्हणाले, “नाही! आम्ही या परमेश्वराचीच सेवा करु.”
22 यहोशवा त्यांना म्हणाला, “एकदा प्रत्येकाने स्वतःकडे आणि येथे जमलेल्या लोकांकडे पाहावे. या परमेश्वराचीच सेवा करायचे ठरवले आहे याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनात खात्री आहे का? तुम्ही सर्वजण याला साक्षी आहात का?”
लोक उत्तरले, “होय निःसंशय! आम्ही सर्वांनी याच परमेश्वराची सेवा करायचे ठरवले आहे.”
23 तेव्हा यहोशवाने त्यांना सांगितले, “तर मग तुमच्यापैकी कोणाजवळ खोटे दैवत असतील तर ते टाकून द्या. इस्राएलांच्याच परमेश्वर देवावर मनोभावे निष्ठा ठेवा.”
24 लोक यहोशवाला म्हणाले, “आम्ही या परमेश्वर देवालाच मानतो. आम्ही त्याचेच फक्त ऐकू.”
25 मग यहोशवाने त्या दिवशी शखेम या नगतरात लोकांशी करार केला. त्यांनी पाळायचे नियम सांगितले. 26 त्याने ही वचने परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिली. मग एक मोठा दगड निवडून तो परमेश्वराच्या निवासस्थाना जवळच्या एला वृक्षाखाली उभा केला. हा दगड या कराराची साक्ष होय.
27 मग यहोशवा सर्वांना उद्देशून म्हणाला, “आज आपण जे बोललो ते सर्व या दगडामुळे तुमच्या लक्षात राहील. परमेश्वर आज आमच्याशी बोलला तेव्हा हा दगड येथेच होता. तेव्हा आजच्या घटनेचे स्मरण म्हणून हा दगड राहिल. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. तुम्ही परमेश्वर देवाकडे पाठ फिरवायला लागलात तर हा तुम्हाला थोपवील.”
28 एवढे झाल्यावर यहोशवाने लोकांना घरी परतायला सांगितले. तेव्हा सर्वजण आपापल्या ठिकाणी परत गेले.
यहोशवाचा मृत्यू
29 यानंतर नूनाचा पूत्र यहोशवा मरण पावला. त्याचे वय तेव्हा एकशेदहा वर्षे होते. 30 तिम्नथ सेरह या आपल्या वतनाच्या गावी त्याचे दफन करण्यात आले. गाश डोंगराच्या उत्तरेला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात हे ठिकाण आहे.
31 यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतरही इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराने इस्राएलासाठी काय केले हे पाहिलेली वडीलधारी माणसे जिवंत असताना लोक परमेश्वराची उपासना करत राहिले.
योसेफ घरी परततो
32 इस्राएल लोकांनी मिसरमधून बाहेर पडताना योसेफच्या अस्थी बरोबर बाळगल्या होत्या. त्या त्यांनी शखेम येथे पुरल्या. शखेम नावाच्या माणसाचे वडील हमोर याच्या मुलाबाळांकडून याकोबने हा भूभाग शंभर रौप्यमुद्रांना विकत घेतला होता. हा प्रदेश योसेफच्या मुलाबाळांच्या मालकीचा झाला.
33 अहरोनाचा मुलगा एलाजार हाही मरण पावला. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गिबा येथे त्याचे दफन करण्यात आले. एलाजारचा पुत्र फिनहास याला गिबा हा प्रदेश मिळाला.
योहानाचा संदेश(A)
3 तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी,
जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता,
आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना,
आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता,
व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
2 हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले. 3 तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात गेला, व लोकांना त्यांच्या पापांपासून क्षमा मिळण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला. 4 हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले:
“वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला,
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
त्याचे रस्ते सरळ करा.
5 प्रत्येक दरी भरुन येईल,
आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल
वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील
ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
6 आणि सर्व लोक देवाचे तारण पाहतील!’” (B)
7 त्याच्याकडून बाप्तिस्मा करुन घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला: “अहो, सापाच्या पिल्लांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करुन घेण्यासाठी तुम्हांला कोणी सावध केले? 8 पश्चातापास योग्य असे फळ द्या, आणि आपापसात असे म्हणू नका की, ‘आमच्यासाठी अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ मी तुम्हांला सांगतो की, अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव या खडकांचा उपयोग करण्यास समर्थ आहे. 9 आणि झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड अगोदरच ठेवलेली आहे. आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून आगीत टाकले जाईल.”
10 जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
11 त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
12 काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13 तो त्यांना म्हणाला, “गरजेपेक्षा जास्त जमा करु नका.” हेच तुम्हांला सांगितले आहे.
14 काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?”
योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”
15 लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”
16 त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. 17 त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.” 18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करुन सुवार्ता सांगितली.
योहानाचा कार्य कशा संपलि
19 योहानाने हेरोद या सताधीशाची कानउघडणी केली. कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशी-हेरोदीयाशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या. 20 हे सर्व करुन सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
योहानाकरवी येशूचा बाप्तिस्मा(C)
21 तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता, तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. 22 आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”
योसेफाच्या घराण्याचा इतिहास(D)
23 जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे.
योसेफ एलीचा मुलगा होता.
24 एली मत्ताथाचा मुलगा होता.
मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
लेवी मल्खीचा मुलगा होता.
मल्खी यन्रयाचा मुलगा होता.
यन्रया योसेफाचा मुलगा होता.
25 योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता.
मत्तिथ्य अमोसाचा मुलगा होता.
अमोस नहूमाचा मुलगा होता.
नहूम हेस्लीचा मुलगा होता.
हेस्ली नग्गयाचा मुलगा होता.
26 नग्गय महथाचा मुलगा होता.
महथ मत्तिथ्याचा मुलगा होता.
मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता.
शिमयी योसेखाचा मुलगा होता.
योसेख योदाचा मुलगा होता.
27 योदा योहानानचा मुलगा होता.
योहानान रेशाचा मुलगा होता.
रेशा जरुब्बाबेलाचा मुलगा होता.
जरुब्बाबेल शल्तीएलाचा मुलगा होता.
शल्तीएल नेरीचा मुलागा होता.
28 नेरी मल्खीचा मुलगा होता.
मल्खी अद्दीचा मुलगा होता.
अद्दी कोसोमाचा मुलगा होता.
कोसोम एल्मदामाचा मुलगा होता.
एल्मदाम एराचा मुलगा होता.
29 एर येशूचा मुलगा होता.
येशू अलिएजराचा मुलगा होता.
अलिएजर योरीमाचा मुलगा होता.
योरीम मत्ताथाचा मुलगा होता.
मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
30 लेवी शिमोनाचा मुलगा होता.
शिमोन यहूदाचा मुलगा होता.
यहूदा योसेफाचा मुलगा होता.
योसेफ योनामाचा मुलगा होता.
योनाम एल्याकीमाचा मुलगा होता.
31 एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता.
मल्ल्या मिन्नाचा मुलगा होता.
मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता.
मत्ताथ नाथानाचा मुलगा होता.
नाथान दाविदाचा मुलगा होता.
32 दावीद इशायाचा मुलगा होता.
इशाय ओबेदाचा मुलगा होता.
ओबेद बवाजाचा मुलगा होता.
बवाज सल्मोनाचा मुलगा होता.
सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.
33 नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता.
अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता.
अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता.
हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता.
पेरेस यहूदाचा मुलगा होता.
34 यहूदा याकोबाचा मुलगा होता.
याकोब इसहाकाचा मुलगा होता.
इसहाक अब्राहामाचा मुलगा होता.
अब्राहाम तेरहाचा मुलगा होता.
तेरह नाहोराचा मुलगा होता.
35 नाहोर सरुगाचा मुलगा होता.
सरुग रऊचा मुलगा होता.
रऊ पेलेगाचा मुलगा होता.
पेलेग एबराचा मुलगा होता.
एबर शेलहाचा मुलगा होता.
36 शेलह केनानाचा मुलगा होता.
केनान अर्पक्षदाचा मुलगा होता.
अर्पक्षद शेमाचा मुलगा होता.
शेम नोहाचा मुलगा होता.
नोहा लामेखाचा मुलगा होता.
37 लामेख मथुशलहाचा मुलगा होता.
मथुशलह हनोखाचा मुलगा होता.
हनोख यारेदाचा मुलगा होता.
यारेद महललेलाचा मुलगा होता.
महललेल केनानाचा मुलगा होता.
38 केनान अनोशाचा मुलगा होता.
अलोश शेथाचा मुलगा होता.
शेथ आदामाचा मुलगा होता.
आदाम देवाचा मुलगा होता.
2006 by World Bible Translation Center