Old/New Testament
सूर्य स्थिर राहिला तो दिवस
10 त्यावेळी यरूशलेमचा राजा अदोनीसदेक हा होता. यहोशवाने आय चा पाडाव ते पूर्ण उध्वस्त केल्याचे त्याने ऐकले. यरीहो आणि त्याच्या राजाचेही असेच झाल्याचे त्याला समजले. गिबोनच्या रहिवाश्यांनी इस्राएलांशी शांतीचा करार केल्याचे ही त्याच्या कानावर आले. आणि ते तर यरूशलेमच्या जवळच होते. 2 तेव्हा अदोनीसदेक व त्याचे लोक फार घाबरले. कारण गिबोन काही आयसारखे छोटे नगर नव्हते. ते एखाद्या राजधानीचे असावे तसे मोठे शहर [a] होते. तेथील लोक चांगले लढवय्ये होते. साहाजिकच राजा अदोनीसदेक घाबरला. 3 त्याने हेब्रोनचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनचा राजा दबीर यांना निरोप पाठवला, 4 “गिबोन ने यहोशवा व इस्राएल लोक यांच्याशी शांतीचा करार केला आहे. तेव्हा गिबोनवर हल्ला करण्यासाठी माझ्या बरोबर चला आणि मला मदत करा,” अशी मदतीची याचना त्याने केली.
5 तेव्हा यरूशलेमचा राजा, हेब्रोनचा राजा, यर्मूथचा राजा, लाखीशचा राजा तसेच एग्लोनचा राजा या अमोऱ्यांच्या पाच राजांनी आघाडी केली आणि आपले सैन्य घेऊन ते गिबोनवर चढाई करून गेले. सैन्याने त्या शहराला वेढा दिला आणि लढाईला सुरुवात केली.
6 ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, “आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या. विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे.”
7 तेव्हा यहोशवा आपल्या सर्व सैन्यानिशी गिलगालमधून बाहेर पडला. त्याच्याबरोबर खंदे लढवय्ये होते. 8 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याची भीती बाळगू नका. त्यांचा पराभव करण्याची मी तुम्हाला आनुज्ञा देत आहे. यांच्यापैकी कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही.”
9 यहोशवा आणि त्याचे सैन्य रातोरात निघून गिबोनला पोहोंचले. यहोशवा येईल अशी शत्रूला सुतराम कल्पना नव्हती. म्हणून त्याने हल्ला केला तेव्हा ते चकित झाले.
10 परमेश्वराने इस्राएलाच्या हल्ल्यामुळे त्या सैन्याची त्रेधा तिरपीट केली. इस्राएल लोकांनी त्यांचा पराभव करून घवघवीत विजय मिळवला. गिबोनपासून बेथ-होरोनच्या वाटेपर्यंत इस्राएलांच्या सैन्याने शत्रूचा पाठलाग केला, आणि अजेका व मक्केदा पर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार केले. 11 इस्राएल सैन्य बेथ-होरोनपासून अजेकापर्यंत पाठलाग करत असताना परमेश्वराने शत्रूवर आकाशातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव केला. त्या मारानेच अनेकजण ठार झाले. इस्राएल सैन्याच्या तलवारीने जितके शत्रूसैन्य प्राणाला मुकले त्यापेक्षा कितीतरी जास्त या गारांच्या वर्षावाला बळी पडले.
12 इस्राएल लोकांच्या हातून परमेश्वराने त्यादिवशी अमोऱ्यांचा पराभव केला तेव्हा यहोशवा सर्व इस्राएल लोकांसमोर उभा राहून म्हणाला,
“हे सूर्या गिबोनावर स्थिर राहा.
हे चंद्रा, स्थिर राहा तू.
अयालोनच्या खोऱ्यावर.”
13 तेव्हा लोकांनी शत्रूंचा पराभव करीपर्यंत सूर्य स्थिर राहिला, चंद्र ही थांबून राहिला. याशारच्या पुस्तकात हे लिहिलेले आहे. सूर्य पूर्ण दिवसभर आकाशाच्या मध्यभागी थांबलेला होता. 14 असे पूर्वी कधी घडले नव्हते आणि नंतर ही कधी घडले नाही. परमेश्वराने त्या दिवशी माणसाचे ऐकले. परमेश्वर खरोखरच त्यादिवशी इस्राएलच्या बाजूने लढत होता.
15 यानंतर सर्व सैन्यासह यहोशवा गिलगालच्या छावणीत परतला. 16 भर युध्दात त्या पाचही राजांनी पळ काढून मक्केदा जवळच्या गुहेत आसरा शोधला होता. 17 पण कोणी तरी त्यांना तेथे लपलेले पाहिले. ते यहोशवाच्या कानावर आले. 18 तो म्हणाला, “गुहेचे तोंड प्रचंड दगड लावून बंद करा. तिथे माणसांचा पाहारा बसवा 19 पण तुम्ही स्वतःतेथे थांबून राहू नका. शत्रूंचा पाठलाग करून त्यांच्यावर मागून हल्ला करत राहा. शत्रूला त्यांच्या नगरात परतू देऊ नका. कारण तुमच्या परमेश्वर देवाने तुम्हाला विजय मिळवून दिला आहे.”
20 यहोशवा व इस्राएल लोक यांनी शत्रूला ठार केले पण त्यातील काही कसेबसे सुटून नगरात जाऊन लपले. त्यामुळे त्यांना जीवदान मिळाले. 21 लढाई थांबल्यावर सर्व लोक मक्केदा येथे यहोशवाकडे परत आले. पण इस्राएल लोकांविरुध्द एकही शब्द काढण्याचे धैर्य कोणाचे झाले नाही.
22 यहोशवा म्हणाला, “आता ते गुहेच्या तोंडावरचे दगड हलवून त्या राजांना माझ्याकडे आणा.” 23 तेव्हा यरुशलेम. हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोनच्या त्या राजांना यहोशवाच्या माणसांनी बाहेर काढले. 24 व यहोशवासमोर हजर केले. यहोशवाने आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलावले. आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांना तो म्हणाला “पुढे व्हा आणि या राजांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा अधिकाऱ्यांनी जवळ येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
25 यहोशवा आपल्या लोकांना म्हणाला, “खंबीर राहा आणि हिंमत धरा, घाबरु नका इथून पुढे तुम्ही ज्यांच्याशी लढाल त्या शत्रूचे परमेश्वर काय करुन टाकील ते मी तुम्हाला दाखवतो आहे.”
26 मग यहोशवाने त्या पाच राजांना ठार केले. त्यांची प्रेते पाच झाडांना लटकावली. संध्याकाळपर्यंत ती तशीच लटकत ठेवली. 27 सूर्यास्ताच्या वेळी त्याने ती झाडावरुन उतरविण्यास सांगितली. ज्या गुहेत ते राजे लपले होते तिथे ती यहोशवाच्या माणसांनी टाकून दिली आणि गुहेचे तोंड मोठमोठे दगड लोटून बंद केले. ती प्रेते त्या गुहेत आजतागायत आहेत.
28 त्या दिवशी यहोशवाने मक्केदाचा पराभव केला. तेथील राजा आणि नगरातील लोक यांना यहोशवाने ठार केले. कोणीही वाचला नाही. यरीहोच्या राजाची केली तीच गत यहोशवाने मक्के दाच्या राजाचीही केली.
दक्षिणे कडील नगरांचा पाडाव
29 मग सर्व इस्राएल लोकांसह यहोशवा मक्केदाहून निघाला. ते सर्व लिब्ना येथे पोहोंचले व त्या नगरावर त्यांनी हल्ला केला. 30 परमेश्वराच्या कृपेने, हे नगर आणि त्याचा राजा यांचा इस्राएल लोकांनी पराभव केला. तेथील सर्वजण प्राणाला मुकले. कोणीही त्यातून जिवंत राहिला नाही. आणि यरीहोच्या राजाचे केले तसेच इस्राएल लोकांनी या राजाचेही केले. 31 मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक लिब्ना येथून निघून लाखीशला आले. त्या नगराभोवती वेढा देऊन मग त्यांनी चढाई केली. 32 परमेश्वराने त्यांच्या हातून लाखीशचाही पाडाव केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या शहराचा पराभव करुन सर्व लोकांना ठार केले. लिब्नाचीच पुनरावृत्ती येथे झाली. 33 गेजेरचा राजा होराम लाखीशच्या मदतीला आला होता पण यहोशवाने त्याच्या सैन्यासही पराभूत केले. त्यांच्यापैकीही कोणी वाचू शकला नाही.
34 मग लाखीशहून निघून सर्व इस्राएल लोक व यहोशवा एग्लोन येथे आले. एग्लोन भोवती तळ देऊन त्यांनी त्या शहरावर हल्ला केला. 35 त्याच दिवशी त्यांनी ते शहर काबीज करून सर्व लोकांना ठार केले. लाखीशमध्ये जसे झाले तसेच येथेही झाले.
36 एग्लोनहून ते पुढे हेब्रोनला गेले व हेब्रोनवर चढाई केली. 37 हेब्रोन शहर आणि त्याच्या भोवतालची छोटी गावे त्यांनी काबीज केली. नगरातील सर्वांचा इस्राएल लोकांनी संहार केला. एकूण एक लोक प्राणाला मुकले. एग्लोन प्रमाणेच येथेही त्यांनी शहर उध्वस्त केले व लोकांना ठार केले.
38 मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक मागे वळून दबीर येथे आले व तेथील लोकांशी लढाई केली. 39 त्यांनी ते नगर व त्याच्या आसपासची गावे घेतली तसेच राजाचा पराभव केला. नगरातील एकूण एक जणांना ठार केले. हेब्रोन आणि लिब्ना ही नगरे व तेथील राजे यांची जी गत केली तशीच दबीर व त्याच्या राजाचीही केली.
40 अशाप्रकारे यहोशवाने डोंगराळ प्रदेश नेगेव, पश्चिमेकडील व पूर्वेकडील डोंगर उताराचा भाग येथील सर्व शहरांचा व राजांचा धुव्वा उडवला. इस्राएलच्या परमेश्वर देवाने यहोशवाला सर्व लोकांचा संहार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे यहोशवाने कोणाला ही जिवंत ठेवले नाही.
41 कादेश बर्ण्यापासून गज्जापर्यंत सर्व नगरे यहोशवाने काबीज केली. मिसरमधील गोशेन प्रांतापासून गिबोन पर्यंतच्या कक्षेतील सर्व नगरे जिंकून घेतली. 42 एकाच मोहिमेत सर्व राजे व सर्व नगरे काबीज केली. इस्राएलचा देव परमेश्वर इस्राएलच्या बाजूने लढत असल्यामुळेच यहोशवाने हे केले. 43 त्यांनंतर यहोशवा सर्व इस्राएलसह आपल्या गिलगालच्या छावणीत परतला.
उत्तरेकडील शहरांचा पराभव
11 या सर्व घटना हासोराचा राजा याबीन याने ऐकल्या. तेव्हा त्याने अनेक राजांच्या फौजा एकत्र आणण्याचे ठरवले. मादोनाचा राजा योबाब, शिम्रोनाचा राजा, अक्षाफाचा राजा. 2 तसेच उत्तरेत डोंगराळ प्रदेशात व वाळवंटी भागात राज्य करीत असलेले राजे यांना याबीनने त्याप्रमाणे कळवले. किन्नेरोथ, नेगेव येथील व पश्चिमेकडील डोंगर उत्तरणीच्या भागातील राजांनाही निरोप पाठवले. पश्चिमेकडील नाफोत दोर येथील राजाला तसेच 3 पूर्व व पश्चिमेच्या कनानी लोकांच्या राजांनाही कळवले. अमोरी, हित्ती, परिज्जी व डेंगराळ प्रदेशातील यबूसी लोकांना तसेच हर्मोन डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मिस्पा जवळील हिव्वी लोकांनाही खबर दिली. 4 तेव्हा या सर्व राजांच्या फौजा एकत्र आल्या. अगणित योध्दे जमा झाले. घोडे, रथ बहुसंख्य होते. ती एक अतिविशाल सेना होती असंख्य माणसांचा समुदाय समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांसारखा पसरला होता.
5 हे सर्व राजे मेरोम या लहानशा नदीजवळ भेटले. त्या सर्वांनी तेथेच तळ ठोकला आणि ते इस्राएलविरुध्द लढाईची आखणी करू लागले.
6 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याला घाबरू नको. मी तुमच्याहातून त्यांचा पराभव करवीन. उद्या या वेळेपर्यंत तुम्ही त्या सर्वांचा संहार केलेला असेल. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडा व रथांना आगी लावा.”
7 यहोशवा व त्याचे सैन्य यांनी शत्रूला विस्मयचकित केले. मेरोम नदीपाशीच त्यांनी शत्रूवर हल्ला केला. 8 इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पराभव केला परमेश्वरानेच त्यांना हे बळ दिले. इस्राएलने त्यांचा सीदोन महानगरापर्यंत तसेच मिस्त्रपोथ-माईमापर्यंत व पूर्वेकडील मिस्पाच्या खोऱ्यापर्यंत पाठलाग केला. शत्रुसैन्यातील सर्वांचा संहार होईपर्यंत इस्राएल लोकांनी लढा दिला. 9 परमेश्वराने सांगितले होते तसेच यहोशवाने केले. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडले व रथ अगीच्या भक्ष्यस्थानी टाकले.
10 मग मागे वळून यहोशवाने हासोर घेतले. हासोरच्या राजाला त्याने ठार केले. (इस्राएलविरुध्द लढणाऱ्या सर्व राज्यांचे नेतृत्व हासोरने केले होते.) 11 इस्राएल सैन्याने या नगरातील सर्वांना ठार केले. सर्वांचा समूळनाश केला. जिवंतपणाची खूण म्हणून शिल्लक ठेवली नाही. नंतर नगराला आग लावली.
12 यहोशवाने ही सर्व नगरे घेतली तेथील सर्व राजांना ठार केले. या नगरांमधील सर्वच्या सर्व गोष्टींचा विध्वंस केला. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे त्याने हे केले. 13 पण टेकड्यांवर वसवलेली कोणतीही नगरे इस्राएल सैन्याने जाळली नाहीत. हासोर हे टेकडीवर वसलेले व त्यांनी जाळलेले एकमेव नगर ते यहोशवाने जाळले. 14 या नगरांमध्थे मिळालेली लूट इस्राएल लोकांनी स्वतःकरता ठेवली. तसेच तेथील जनावरेही घेतली. पण तेथील लोकांना मारले कोणालाही जिवंत ठेवले नाही. 15 परमेश्वराने आपला सेवक मोशे याला फार पूर्वीच ही आज्ञा दिली होती. नंतर मोशेने हे यहोशवाला सांगितले होते. यहोशवाने परमेश्वराचे ऐकले. परमेश्वराने मोशेला सांगितले ते ते सर्व यहोशवाने न चुकता केले.
16 अशाप्रकारे यहोशवाने त्या संपूर्ण प्रदेशातील सर्व लोकांचा पराभव केला. डोंगराळ प्रदेश, नेगेव, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमेकडील डोंगरपायथा, यार्देनचे खोरे. इस्राएलचा व त्याच्या आसपासचा डोंगराळ प्रदेश यावर त्याने ताबा मिळवला. 17 सेईर जवळच्या हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनच्या खोऱ्यातील बालगाद पर्यंतचा सर्व प्रदेशही यहोशवाने हस्तगत केला. तेथील सर्व राजांना बंदी करून त्यांना ठार केले. 18 अनेक दिवस या राजांशी त्याने हा लढा दिला होता. 19 या सर्व प्रदेशातील फक्त एकाच नगराने इस्राएल लोकांशी शांततेचा करार केला. ते म्हणजे गिबोन मधील हिव्वी. इतर सर्व नगरांचा युध्दात पाडाव झाला. 20 आपण समर्थ आहोत असे त्यांना वाटावे अशी परमेश्वराचीच इच्छा होती. जेव्हा ते इस्राएलविरुध्द लढायला उभे राहतील, तेव्हा त्यांच्यावर दया न दाखवता संहार करता येईल. मोशेला परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे, यहोशवा त्यांचा धुव्वा उडवेल (अशीच ती योजना होती)
21 हब्रोन, दबीर, अनाब व यहुदा या डोंगराळ प्रदेशातील भागात अनाकी लोक राहात असत. यहोशवाने त्यांच्याशी लढाई करुन तेथील लोकांचा व नगरांचा संपूर्ण संहार केला. 22 इस्राएलाच्या देशात एकही अनाकी माणूस शिल्लक उरला नाही. गज्जा, गथ व अश्दोद येथे मात्र काही अनाकी लोक जिवंत राहीले. 23 परमेश्वराने मोशेला फार पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे यहोशवाने सर्व इस्राएल देश ताब्यात घेतला. परमेश्वराने कबूल केल्या प्रमाणे हा प्रदेश इस्राएल लोकांना दिला. यहोशवाने इस्राएलाच्या वंशांप्रमाणे त्यांची हिश्श्यांमध्ये वाटणी केली. अखेर युध्द संपले आणि शांतता नांदू लागली.
इस्राएलने पराभूत केलेले राजे
12 यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेशाचा इस्राएल लोकांनी ताबा घेतला होता.आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत आणि यार्देन खोऱ्याच्या पूर्वेकडील सर्व भूभाग त्यांचा होता. त्यासाठी इस्राएल लोकांनी ज्या ज्या राजांचा पराभव केला ते असे.
2 हेशबोन नगरात राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन. आर्णोन खोऱ्याजवळच्या अरोएर पासून यब्बोक नदीपर्यंतच्या प्रदेशावर त्याची सत्ता होती. त्या खोऱ्याच्या मध्यापासून त्याची हद्द सुरु होत असे. अम्मोन्यांची सीमा याला लागून होती. गिलादच्या अर्ध्या प्रदेशावर सीहोनची सत्ता होती. 3 यार्देन नदीच्या पूर्वेला गालिली सरोवरापासून अराबाच्या समुद्रापर्यंत (मृत समुद्र) एवढ्या भागावर त्याचे राज्य होते. तसेच बेथ-यशिमोथपासून दक्षिणेस पिसगा टेकड्याच्या उत्तरणीपर्यंतचा भाग त्याच्याच हद्दीत होता.
4 बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ व एद्रई येथे तो राहात होता 5 तसेच, हर्मोन पर्वत, सलका, बाशानाचा सर्व भाग ही त्याच्याच आधिपत्याखाली होता. गशूरी व माकाथी लोक राहात तेथपर्यंत त्याची सीमा भिडलेली होती. अर्ध्या गिलादावर ही ओगची सत्ता होती. हेशबोनाचा राजा सीहोन याच्या प्रदेशाशी हा भाग थांबत होता.
6 परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक यांनी या सर्व राजांचा पराभव केला होता. नंतर तो देश रऊबेनी. गादी आणि मनश्शाचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिला होता.
7 यार्देनच्या पश्चिमेकडील देशांतील राजांचा पराभव इस्राएल लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली केला. मग तो देश बारा वंशांमध्ये विभागून यहोशवाने इस्राएल लोकांना दिला. परमेश्वराने द्यायची कबूल केलेली हीच ती भूमी. लबानोन खोऱ्यातील बालगाद आणि सेईर जवळचा हालाक डोंगर यांच्या मधला हा भाग होय. 8 डोंगराळ भाग, पश्चिमेकडील पर्वतपायथा, यार्देनचे खोरे पूर्वेकडील डोंगर वाळवंट आणि नेगेव एवढा भाग यात येतो. हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांचे वास्तव्य या प्रदेशात होते. इस्राएल लोकांनी पराभूत केलेल्या राजांची यादी अशी:
9 यरीहोचा राजा बेथेल 1
जवळील आयचा राजा 1
10 यरुशलेमचा राजा 1
हेब्रोनाचा राजा 1
11 यर्मूथाचा राजा 1
लाखीशाचा राजा 1
12 एग्लोचा राजा 1
गेजेराचा राजा 1
13 दबीराचा राजा 1
गेदेराचा राजा 1
14 हर्माचा राजा 1
अरादाचा राजा 1
15 लिब्नाचा राजा 1
अदुल्लामाचा राजा 1
16 मक्के दाचा राजा 1
बेथेलचा राजा 1
17 तप्पूहाचा राजा 1
हेफेराचा राजा 1
18 अफेकाचा राजा 1
लशारोनाचा राजा 1
19 मादोनाचा राजा 1
हासोराचा राजा 1
20 शिम्रोन-मरोनाचा राजा 1
अक्षाफाचा राजा 1
21 तानखाचा राजा 1
मगिद्दोचा राजा 1
22 केदेशाचा राजा 1
कर्मेल जवळच्या यकनामाचा राजा 1
23 दोर पर्वतावरील दोराचा राजा 1
गिलगाल येथील गोयीमचा राजा 1
24 तिरसाचा राजा 1
असे एकंदर राजे 31.
जखऱ्या व अलीशिबेला मरीया भेटते
39 त्याच वेळी मरीया तयार झाली आणि लगेच यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावी गेली. 40 तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले. 41 आणि असे झाले की, जेव्हा अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटातील बालकाने उडी मारली. आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरुन गेली.
42 ती मोठ्या आवाजात बोलली, “सर्व स्त्रियांमध्ये तू अधिक धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. 43 परंतु माझ्या बाबतीत अशी कोणती गोष्ट घडली की माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे? 44 कारण तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानी पडताक्षणीच, माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी घेतली. 45 प्रभूने तुला ज्या गोष्टी घडतील असे सांगितले त्यावर तू विश्वास ठेवलास म्हणून तू धन्य आहेस.”
मरीया देवाची स्तुति करते
46 आणि मरीया म्हणाली,
47 “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;
माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
48 कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय,
येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
49 कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात,
त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
51 त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले;
गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
52 सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे,
आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
53 त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे.
श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
54 त्याचा सेवक जो इस्राएल याला
मदत करण्यास तो आला आहे.
55 त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे
अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”
56 मरीया अलीशिबेबरोबर तीन महीने राहिली, आणि मग ती तिच्या घरी परत गेली.
2006 by World Bible Translation Center