Old/New Testament
आज्ञापालनाबद्दल आशीर्वाद
28 “आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल. 2 तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकलेत तर तुम्हांला हे आशीर्वाद मिळतील:
3 “तुम्हाला तुमच्या नगरात
आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील.
4 परमेश्वराच्या आशीर्वादाने
तुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील.
त्याच्या आशीर्वादाने
तुमची भूमी सफल होईल.
तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने
भरपूर पिल्ले होतील
व ह्या वासरा-करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील.
5 तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने
सदोदित भरलेल्या राहतील.
6 तुम्ही आत याल आणि बाहेर जाल तेव्हा तुम्हाला
सदासर्वकाळ परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल.
7 “तुमच्यावर चाल करुन येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हाला परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी सैरावैरा पळत सुटेल.
8 “परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात तुमची भरभराट होईल. 9 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हाला आपली पवित्र प्रजा करुन घेईल. 10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रातील लोकांना तुमचा धाक वाटेल.
11 “परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हाला भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल. 12 आपले आशीर्वादाचे भांडार तो तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही. 13 आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा. 14 या शिकवणीपासून परावृत होऊ नका. डावी उजवी कडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका.
आज्ञाभंगाबद्दल शाप
15 “पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील.
16 “नगरात आणि शेतात
तुम्ही शापित व्हाल.
17 तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती शापित होतील
आणि त्या रिकाम्या राहतील.
18 परमेश्वराच्या शापाने
तुम्हाला फार संतती होणार नाही,
जमिनीत पीक चांगले येणार नाही,
गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही.
वासरे-करडे शापित होतील.
19 बाहेर जाताना आणि आत येताना
परमेश्वर तुम्हाला शाप देईल.
20 “तुम्ही दुष्कृत्ये करुन परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात अडचणी येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलित होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल. 21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हाला भयंकर रोगराईने ग्रस्त करील. 22 परमेश्वर तुम्हाला रोग, ताप, सूज यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील. 23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल. 24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.
25 “शत्रू तुम्हांला पराभूत करतील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील. 26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्र्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.
27 “परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांना गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हाला करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हांला शासन करील. 28 वेड, अंधत्व, भांबावलेपण यांनी तुम्ही ग्रस्त व्हाल. 29 भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हाला एकसारखे नागवतील, दुखावतील. आणि तुम्हाला कोणी त्राता राहणार नाही.
30 “तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यात राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. 31 लोक तुमच्यादेखत तुमच्या गायी कापतील पण त्याचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्या मेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हाला कोणी सोडवणारा नाही.
32 “तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसामागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील. पण ती सापडणार नाहीत. आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.
33 “तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील. 34 जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल. 35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हाला शासन करील.
36 “तुम्ही तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठ पाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल. 37 तुमच्यावर येणारी संकटे पाहून तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा तुम्ही विषय व्हाल.
अपयशाचा शाप
38 “तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील. 39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यात खूप मेहनत कराल. पण द्राक्षं किंवा द्राक्षारस तुम्हाला मिळणार नाही. कारण कीड ते खाऊन टाकील. 40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण फळ जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील. 41 तुम्हाला मुलं-बाळं होतील पण ती तुम्हाला लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल. 42 टोळधाडीने तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होईल. 43 तुमच्या गावात राहाणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल. 44 ते तुम्हाला कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून राहाल.
45 “तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही तर हे सर्वशाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील. 46 तुम्हाला व तुमच्या वंशजांना हे परमेश्वराचे शाप कायमचे भोवतील. ते पाहून इतर लोक आश्चर्यचकित होतील.
47 “सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून 48 परमेश्वराने पाठविलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे व्हाल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखंड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हांला वागवावे लागेल.
शत्रू राष्ट्राचा शाप
49 “दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील. 50 ते क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत. 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही.
52 “ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल. 53 तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.
54 “तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत. 55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही-अगदी आपल्या घरातल्यांनाही-वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.
56 “तुमच्यामधील अतिशय कोमल ह्रदयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल. 57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.
58 “या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि विस्मयकारी तुमचा देव परमेश्वर ह्याचा आदर करा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर 59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर संकटे कोसळतील, भयंकर रोगराई पसरेल. 60 अशा रोगराईला आणि उपद्रावांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हाला धास्ती वाटत असे. त्या सगळ्यातून तुम्हाला पुन्हा जावे लागेल. 61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील. 62 आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक राहाल.
63 “तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल. 64 परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.
65 “या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल. 66 तुम्ही नेहमी संकटग्रस्त आणि धास्तावलेले राहाल. तुम्हाला जिवाची खात्री वाटणार नाही. रात्रंदिवस तुम्ही झुरणीला लागाल. 67 सकाळी तुम्ही म्हणाल, ‘ही रात्र असती तर बरे!’ आणि रात्री म्हणाल, ‘ही सकाळ असती तर किती बरे!’ तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल. 68 परमेश्वर तुम्हाला जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हाला पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूंचे दास म्हणून स्वतःची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.”
मवाबातील करार
29 इस्राएलांशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात आणखी एक पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो हा पवित्र करार होय.
2 मोशेन सर्व इस्राएलांना जवळ बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मिसरमध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे. 3 ती संकटे, चमत्कार आणि विस्मयकारक गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. 4 पण नेमके काय झाले हे तुम्हांला आजही समजू शकलेले नाही. तुम्ही जे पाहिलेत आणि ऐकलेत त्याचे खरे आकलन परमेश्वराने तुम्हाला होऊ दिलेले नाही. 5 परमेश्वराने तुम्हांला वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत. 6 तुम्हीं भाकरी खाल्ली नाही की द्राक्षारस अथवा मद्य प्यायले नाही. पण परमेश्वराने तुमची काळजी वाहिली. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून त्याने असे केले.
7 “तुम्ही येंथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग आपल्यावर चढाई करुन आले. पण आपण त्यांचा पराभव केला. 8 त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना ते इनाम म्हणून दिला. 9 या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला सर्व कार्यात असेच यश मिळत राहील.
10 “आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडीलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात. 11 तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्यातील सर्व उपरे हे ही इथे आहेत. 12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे. 13 त्याद्वारे तो तुम्हांला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हांला आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे. 14-15 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी-आज इथे उपस्थित असलेल्यांबरोबरच नव्हे तर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर नसलेल्या आपल्या वंशजांसाठीही आहे. 16 आपण मिसरमध्ये कसे राहात होतो ते तुम्हांला आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला याचीही तुम्हांला आठवण आहे. 17 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या आपल्याला तिरस्करणीय असलेल्या मूर्तीही पाहिल्यात. 18 आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात.
19 “एखादा हे बोलणे ऐकूनही, ‘मी मला हवे तेच करणार. माझे काहीही वाकडे होणार नाही’ असे स्वतःचे समाधान करुन घेत असेल. पण त्याने हे लक्षात ठेवावे की त्याचा त्याला त्रास तर होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळते या न्यायाने निरपराध्यांनाही त्रास होईल. 20-21 परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वतःच्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.
22 “या देशाची कशी वाट लागली हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती आणि परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील. 23 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.
24 “‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील. 25 त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते. 27 म्हणून त्यांच्यावर तो क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्या बाबतीत खरी करुन दाखवली. 28 क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?
29 “काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.
54 थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे थेट मुख्य याजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र पहारेकऱ्याबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना. 56 पुष्कळांनी त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती.
57 नंतर काही जण उभे राहीले आणि त्याच्या विरूद्ध साक्ष देऊन म्हणाले, “आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की, 58 ‘हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन.’” 59 परंतु तरीही या बाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता.
60 नंतर मुख्य याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरूद्ध आरोप करताहेत हे कसे?” 61 परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही.
नंतर मुख्य याजकाने पुन्हा विचारले, “धन्य देवाचा पुत्र तो तू रिव्रस्त आहेस काय?”
62 येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
63 मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणांला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे? 64 तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हांला काय वाटते?”
सर्वांनी त्याला मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्माविली. 65 काही जण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्के मारू लागले व त्याला म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” पाहारेकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मारले.
येशूला ओळखतो हे सांगण्यास पेत्र घाबरतो(A)
66 पेत्र अंगणात असतानाच मुख्य याजकांच्या दासींपैकी एक आली. 67 आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”
68 परंतु पेत्राने ते नाकारले, आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.
69 जेव्हा दासीने त्याला पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.” 70 पेत्राने पुन्हा ते नाकारले.
नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”
71 पेत्र स्वतःची निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या माणसाविषयी बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!”
72 आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दु:खी झाला व ढसढसा रडला.
2006 by World Bible Translation Center