Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 5-6

स्वच्छतेसंबंधीचे नियम

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांनी आपली छावणी आजारापासून रोगराईपासून स्वच्छ ठेवावी अशी मी आज्ञा देतो: त्यांना सांग की कोणी महारोगी, कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांना त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून दयावे; मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार व विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहात आहे.”

तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांना छावणी बाहेर काढून टाकिले.

अपराधाची भरपाई

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरुद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल. तेव्हा त्या माणसाने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी व त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याला ती सर्व दयावी. पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी माणसाने ती भरपाई परमेश्वराला अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.

“जर कोणी इस्राएल परमेश्वराला समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल. 10 कोणी अशा देणग्या द्याव्यात असे नाही परंतु जर त्याने त्या आणिल्या तर त्या याजकाच्या होतील.”

संशयी नवरे

11 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 12 “इस्राएल लोकांना असे सांग की एखाद्या माणसाच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला. 13 म्हणजे तिने दुसऱ्या माणसाशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेविली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वतः तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही; 14 परंतु आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे अशी शंका कदाचित तिच्या नवऱ्याला येऊ लागेल व तो तिचा द्वेष करील; ती शुद्ध नाही व आपल्याशी विश्वासू नाही असे त्याला वाटू लागेल; 15 जर असे झाले, तर त्या माणसाने आपल्या बायकोला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून आठ वाट्या-एक दशांश एफा जवाचे पीठ घेऊन जावे; त्या पिठावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; हे जवाचे पीठ म्हणजे परमेश्वराकरिता अन्नार्पण होय. हे द्वेषामुळे त्या माणसाने परमेश्वराला दिले आहे. आपली बायको आपल्याशी विश्वासू राहिली नाही असा त्याचा विश्वास आहे असे ह्या अन्नार्पणामुळे दिसेल.

16 “याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे. 17 मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवास मंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यात टाकावी. 18 याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले सातूचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी त्याने पवित्र पाण्याचे पात्र आपल्या हातात घ्यावे; स्त्रिला पीडा देऊ शकणारे असे ते विशेष प्रकारचे प्राणी आहे.

19 “मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सुचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; ‘तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरुद्ध पाप करुन दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग ह्या अतिशय पीडा देणाऱ्या पवित्र पाण्यापासून तुला काही अपाय होणार नाही. 20 परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरुद्ध पाप केले असेल-तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू शुद्ध नाहीस. 21 म्हणून तू हे पाणी पिशील तेव्हा तुला अनेक प्रकारचा त्रास होईल तुला मूल होऊ शकणार नाही; तू गरोदर असशील तर तुझे मूल मरुन जाईल; तुझे लोक तुला बाहेर टाकतील व तुझी निंदा करतील.’

“मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे विशेष शपथ घ्यावयास सांगावे; तिने जर लबाडी केली तर ह्या सर्व वाईट गोष्टी तिच्यावर येतील असे तिने कबूल करावे; 22 याजकाने म्हणावे, ‘तुला त्रास देणारे हे पाणी तू प्यालीच पाहिजेस; जर तू पाप केले असशील तर तुला मुले होऊ शकणार नाहीत आणि जर तुझ्या उदरात मूल असेल तर ते जन्मण्यापूर्वीच मरुन जाईल.’ मग त्या स्त्रीने म्हणावे ‘आमेन’ म्हणजे आपण म्हणता तसे मला होवो.

23 “मग याजकाने दिलेल्या सुचनेचे शब्द आणि त्या स्त्रीने उच्चारलेल्या शपथेचा शब्द गुडांळी कागदावर लिहावेत व गुंडाळीवरील ते शब्द त्या पाण्यात धुवावेत. 24 मग पीडा देणारे ते शापित पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि ती अपराधी असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल.

25 “नंतर याजकाने ते (द्वेषाबद्दलचे अन्नार्पण) त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदी जवळ घेऊन जावे. 26 मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन ते वेदीवर ठेवावे व त्याचा होम करावा. त्या नंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे: 27 जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल. ते तिच्या पोटात जाईल आणि तिला खुप त्रास होईल. तिच्या पोटात मूल असेल तर तें जन्मण्याआधीच मरेल आणि तिला कधीही मुले होणार नाहीत. सर्व लोक तिला शाप देतील. 28 परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती पूर्वीसारखीच होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल. 29 तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी. 30 किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या माणसाने अशी कारवाई करावी; याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरुद्ध कारवाई करावी. 31 मग नवरा अधर्म करण्यापासून मुकत होईल परंतु जर स्त्रीने [a] पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.”

नाजीरासंबंधी नियम

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांस असे सांग की कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने आपणास इतरापासून वेगळे होऊन काही काळपर्यंत पूर्णपणे परमेश्वरास वाहून घ्यावयाचा नवस केला तर त्याने किंवा तिने सर्वकाळ परमेश्वराच्या सेवेसाठी वाहून घ्यावे. त्यांना नाजीर म्हणावे. त्या काळात नाजीराने द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; द्राक्षारसाचा किंवा कडक मद्याचा शिरकाही पिऊ नये; द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये; तसेच ताजी किंवा सुकी द्राक्षेही खाऊ नयेत. त्या वेगळेपणाच्या विशेष काळात त्याने द्राक्षापासून बनविलेला कोणताच पदार्थ खाऊ नये. एवढेच नव्हे तर त्याने द्राक्षाच्या बिया किंवा द्राक्षाचे सालपट देखील खाऊ नये.

“स्वतःला वेगळे केलेल्या त्या काळात नाजीराने आपले केस कापू नयेत. त्याच्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे. त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत; ते केस त्याने देवाला केलेल्या विशेष नवसाची खूण आहे. स्वतःला वाहवून घेतलेल्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत.

“वेगळेपणाच्या त्या काळात नाजीराने परमेश्वराला वाहून घेतल्यामुळे प्रेताजवळ जाऊ नये. त्याचा स्वतःचा बाप, आई, भाऊ किंवा बहीण ह्यातून कोणी मरण पावल्यास त्याने त्यांनाही शिवू नये; तो शिवेल तर तो अपवित्र होईल. आपण पूर्णपणे परमेश्वराच्या सेवेसाठी स्वतःला वेगळे केले आहे, हे त्याने दाखवावे व वेगळे राहाण्याचा पूर्णकाल त्याने परमेश्वराला संपूर्णपणे वाहून घ्यावे. तोपर्यंत त्याने परमेश्वराचीच सेवा करावी. एखाद्या वेळी असे होईल की नाजीराबरोबर असलेला एखादा माणूस एकाएकी मरण पावला; आणि जर नाजीराने त्याला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल जर असे झाले तर नाजीराने आपल्या नवसाची खूण असलेल्या आपल्या डोक्याचा केसांचे मुंडण करावे. ते मुंडण त्याने सातव्या दिवशी करावे कारण त्या दिवशी तो पवित्र होईल. 10 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले आणून दर्शनमंडपाच्या दारापाशी ती याजकाला द्यावीत. 11 मग याजकाने एकाचा पापार्पण म्हणून व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे पापार्पण म्हणजे त्याच्या पापाबद्दलचे प्रायश्चित होय; कारण तो प्रेताजवळ गेला होता. त्याचवेळी त्या नाजीराने पुन्हा नव्याने देवाची सेवा करण्यासाठी विशेष नवस म्हणून आपल्या डोक्याचे केस देवाला अर्पण करावेत. 12 याचा अर्थ त्या माणसाने परमेश्वराच्या सेवेसाठी वेगळे होण्यासाठी स्वतःला परमेश्वराला द्यावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणून द्यावा. तरी पण त्याचे नाजीरपणाचे आधीचे दिवस वाया जातील. त्याने आता नव्याने नवस करुन नाजीरपणाचा वेगळा वेळ द्यावा कारण नाजीरपणाच्या पहिल्या काळात त्याचा प्रेताला स्पर्श झाला होता.

13 “मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी जावे. 14 तेथे त्याने पुढीलप्रमाणे अर्पणे करावीत.

त्याने एक वर्षाचा निर्दोष मेंढा होमबली म्हणून आणावा:

एक वर्षाची निर्दोष मेंढी पापबली म्हणून आणावी;

आणि शांत्यार्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.

15 एक टोपलीभर बेखमीर भाकरी म्हणजे तेलात मळलेल्या मैद्याच्या पोळ्या व वरुन तेल लाविलेल्या चपात्या

त्याच प्रमाणे त्या बरोबर अर्पणाचा भाग म्हणून अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत.

16 “मग ही सर्व अर्पणे याजकाने परमेश्वराला अर्पण करावीत; त्याने पापबली व होमबली परमेश्वराला अर्पावेत; 17 तशीच बेखमीर भाकरीची टोपलीही परमेश्वराला अर्पण करावी; मग शांत्यार्पणासाठी परमेश्वराकरिता मेंढा अर्पावा व त्या बरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण अर्पण करावे.

18 “मग नाजीराने निवास मंडपाच्या दारापाशी जावे; तेथे त्याने परमेश्वरासाठी नवस म्हणून वाठविलेल्या आपल्या केसाचे मुंडण करावे. ते केस त्याने शांत्यापर्णाच्या खाली असलेल्या जाळावर टाकावेत.

19 “नाजीराने आपल्या केसाचे मुंडण केल्यावर याजकाने त्याला मेंढ्याचा शिजविलेला फरा व टोपलीतून एक बेखमीर पोळी व एक बेखमीर चपाती द्यावी. 20 मग याजकाने ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. हे सर्व पदार्थ पवित्र आहेत व ते याजकासाठी आहेत. त्याच प्रमाणे मेंढ्याचे ऊर व मांडीही परमेश्वरासमोर ओवाळावी; हे सर्व पदार्थ पवित्र आहेत व ते याजकासाठी आहेत. त्या नंतर नाजीर झालेला होता तो माणूस द्राक्षारस पिण्यास मोकळा आहे.

21 “जर एखादा माणूस नाजीर होऊन परमेश्वराची सेवा करण्यास वेगळा होण्याचा नवस करावयाचे ठरवील तर त्याने ही सर्व अर्पणे परमेश्वरासाठी अवश्य द्यावीत; पण एखादा माणूस ह्याही पेक्षा अधिक अर्पणे देऊ शकत असेल व जर त्याने काही अधिक द्यावयाची शपथ घेतली असेल तर मग त्याने आपली शपथ पूर्ण करावी. नाजीर होण्याच्या नवसाची शपथ घेण्याविषयी हा नियम आहे.”

याजकांनी द्यावयाचे आशीर्वाद

22 परमेश्वर मोशेला म्हणाला, 23 “अहरोन व त्याच्या मुलांना इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे आशीर्वाद देण्यास सांग; त्यांनी म्हणावे:

24 ‘परमेश्वर तुला आशीर्वाद देवो
    व तुझे संरक्षण करो;
25 परमेश्वर आपला मुख प्रकाश तुजवर पाडो
    व तुजवर दया करो;
26 परमेश्वर आपले मुख तुजकडे करो
    व तुला शांति देवो.’”

27 मग परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना अहरोन व त्याच्या मुलांनी अशा प्रकारे माझ्या नांवाचा उपयोग करावा; म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

मार्क 4:1-20

बी पेरणाऱ्या शेतकऱ्याविषयीची बोधकथा(A)

दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते. त्याने बोधकथेवरून पुष्कळ गोष्टी शिकविल्या. शिक्षण देताना तो म्हणाला,

“ऐका! एक शेतकरी आपले बी पेरावयास गेला. तो पेरीत असता काही वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले. दुसरे काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले पण सूर्य उगवल्यावर ते करपले आणि मूळ रूजले नसल्यामुळे ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडपे अधिक वाढली आणी त्यांनी त्याची वाढ खुंटविली. व त्याला पीक आले नाही पण काही बी चांगल्या जमीनीवर पडले, ते उगवले, वाढले आणि भरपूर पीक आले आणि त्याचे कोठे तीसपट, कोठे साठपट आणि कोठे शंभरपट पीक आले.”

मग तो म्हणाला, “ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!”

येशू बोधकथांचा उपयोग का करतो हे सांगतो(B)

10 जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याच्याभोवती बारा शिष्यांसह जे इतर होते त्यांनी त्या बोधकथांविषयी त्याला विचारले.

11 तो त्यास म्हणाला, “केवळ तुम्हांस देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे (अधिकार) देण्यात आले आहेत, पण बाहेराच्यांना गोष्टीरूपात सांगितले आहे. 12 यासाठी की,

‘ते पाहत असता पाहतील पण त्यांना कधीच दिसणार नाही
    ते ऐकत असता ऐकतील पण त्यांना कधीच समजणार नाही
जर त्यांनी पाहिले आणि त्यांना समजले
    तर त्यांच्यात कदाचित बदल होईल आणि त्यांना क्षमा करण्यात येईल.’” (C)

बियांविषयीच्या बोधकथेचे येशू स्पष्टीकरण करतो(D)

13 मग तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला ही बोधकथा समजत नाही काय? तर मग तुम्हांला दुसरी कोणतीही गोष्ट कशी समजेल? 14 पेरणारा वचन पेरतो. 15 काही लोक वाटेवर पेरलेल्या बियांसारखे जेथे वचन पेरले आहे अशासारखे आहेत. जेव्हा ते ऐकतात तेव्हा लगेच सैतान येतो आणि त्यांच्यात पेरलेले वचन घेऊन जातो.

16 “काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात. 17 पण त्यांनी ते वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू (मुळावु) न दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.

18 “इतर लोक काटेरी झुडपात बी पेरल्याप्रमाणे आहेत. ते असे आहेत की, जे वचन ऐकतात. 19 परंतु या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह, आणि इतर गोष्टींची इच्छा या गोष्टी आड येतात, व वचन खुंटवितात व ते फळ देत नाहीत.

20 “आणि इतर दुसरे चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियांसारखे आहेत. ते असे आहेत की जे वचन ऐकतात, स्वीकारतात, आणि फळ देतात. कोणी तीसपट. साठपट, कोणी शंभरपट.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center