Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
लेवीय 26-27

देवाच्या आज्ञापालनाबद्दल मिळणारी आशीर्वादाची फळे

26 “तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका; तसेच कोरीव मूर्ती किंवा स्मारक स्तंभ आठवणींचा बुरुज-उभारु नका अथवा पूजा करण्यासाठी आपल्या देशात, कोरीव पाषाण स्थापन करु नका; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!

“तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसांची पवित्र शब्बाथांची-आठवण ठेवून ते पाळावे आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!

“तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या! तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत राहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत राहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करुन येणार नाही.

“तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. तुमच्यातील पांच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.

“मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हाला भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन; 10 तुम्हाला मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हाला नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल! म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल. 11 आणखी मी तुम्हामध्ये माझा पवित्र मंडप टाकून वस्ती करीन; तुम्हापासून मी जाणार नाही! 12 मी तुमच्याबरोबर चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल. 13 मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हाला पुन्हा ताठ चालवले आहे!

देवाच्या आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा

14 “परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर मग ह्या वाईट गोष्टी तुम्हावर येतील. 15 तुम्ही जर माझे नियम मानण्यास व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मग तुम्ही माझा करार मोडाल. 16 तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हाला पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हाला यश मिळणार नाही-तुम्हाला पीक मिळणार नाही-आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील. 17 मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.

18 “ह्या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करीन. 19 मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन. 20 तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक [a] देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.

21 “तरी सुध्दा अद्याप तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हाला तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक ताडण करीन! तुम्ही जेवढी अधिक पापे कराल तेवढी अधिक शिक्षा पावाल! 22 मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना तुमच्यापासून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; ते तुमच्या अनेक लोकांना मारुन टाकतील, व त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील!

23 “एवढे करुनही तुम्हाला अद्दल घडली नाही आणि तुम्ही माझ्याविरुद्धच वागलात, 24 तर मीही तुमच्याविरुद्ध होईन आणि मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट ताडण करीन. 25 तुम्ही माझा करार मोडला म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन; तुमच्यावर सैन्ये चालून येतील असे मी करीन; सुरक्षिततेसाठी तुम्ही तुमच्या नगरात जाल पण तेव्हा मी तुमच्यावर मरीचा रोग पसरवीन; तुमचे शत्रु तुमचा पराभव करतील. 26 मी तुम्हाला धान्याचा फार थोडा वाटा देईन; तेव्हा दहा स्त्रीया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हाला तोलून देतील; ती तुम्ही खाल तुमचे पोट भरणार नाही-तुम्ही भुकेलेच राहाल!

27 “एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरुद्ध वागला, 28 तर मात्र खरोखर मी माझा राग तुम्हाला दाखवीन! मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन! 29 तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची तुम्हावर पाळी येईल. 30 तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल. 31 मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक अर्पणांचा वास घेणे मी बंद करीन. 32 मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहाण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील. 33 परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमचा नायनाट करीन; तुमचा देश ओसाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.

34 “तुम्हाला तुमच्या शत्रूच्या देशात नेतील; तुमचा देश ओसाड होईल. तेव्हा अखेरीस तुमच्या देशाला विसावा मिळेल. तो शब्बाथाचा विसावा उपभोगील. 35 देश ओसाड असे पर्यंत तुम्ही राहात असताना तुमच्या शब्बाथांनी त्याला दिला नाही इतका विसावा त्याला मिळेल. 36 तुमच्यातील जे जगूनवाचूंन उरतील त्यांचे धैर्य आपल्या शत्रूंच्या देशात खचेल; त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल; वाऱ्याने उडविल्या जाणाऱ्या पानाप्रमाणे ते इकडे तिकडे संभोवार पळतील; कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसतानाही ते पळतील. 37 कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील व कोणी त्यांच्यामागे लागले नसतानाही पळाल्यामुळे ते अडखळून एकमेंकावर पडतील.

“तुमच्या शत्रूविरुद्ध उभे ठाकण्याइतके बळ तुमच्यात नसणार. 38 राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल. 39 तेव्हा जगूनवाचून उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील ज्याप्रमाणे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.

माणसाला नेहमी आशा असते

40 “परंतु कदाचित् ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील. 41 मी, त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध-बेसुनत-हृदय लीन होऊन ते आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील. 42 तेव्हा मग मी याकोब, इसहाक व अब्राहाम ह्यांच्याशी केलेल्या कराराची आठवण करीन व त्या देशाचीही आठवण करीन.

43 “त्यांचा देश त्यांच्यावाचून ओस पडेल आणि ओस असे पर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; मग जगूनवाचून राहिलेले आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील; त्यांनी माझ्या नियमांना व विधींना तुच्छ लेखून ते पाळले नाहीत म्हणून त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांना शिक्षा झाली हे त्यांना समजेल. 44 त्यांनी खरोखर पाप केले; पण त्यांच्यापासून मी आपले तोंड फिरवणार नाही; ते आपल्या शत्रूंच्या देशात असले तरी मी त्यांचे ऐकेन. मी त्यांना समूळ नष्ट करणार नाही. त्यांच्याशी केलेला करार मी मोडणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे! 45 त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!”

46 हे विधी, नियम व निर्बध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांना सांगितले.

नवस महत्वाचे आहेत

27 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग: एखाद्या माणसाने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या माणसाचे मोल याजकाने येणेप्रमाणे ठरवावे: वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे आसावे, आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे; मुलगा पांच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे. मुलगा एक महिन्याहून मोठा व पांचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पांच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे. साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.

“परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्याला याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.

परमेश्वराला द्यावयाच्या देणग्या

“काही पशू परमेश्वराला अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वराला अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा. 10 त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बद्दल करूं नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.

11 “काही पशू परमेश्वराला अर्पण करावयास योग्य नसतात-ते अशुद्ध असतात-कोणी अशुद्ध पशूंपैकी एखादा परमेश्वराला अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा. 12 तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. 13 पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.

घराचे मोल

14 “एखाद्याने आपले घर परमेश्वराला वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. 15 परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरविलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.

मालमत्तेचे मोल

16 “एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वराला वाहिला तर त्यात किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर [b] सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल [c] रुपे अशी किमत असावी. 17 योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल. 18 परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वराला वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करुन याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे. 19 शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरविलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल. 20 त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही; 21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल!

22 “स्वतःच्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वतः खरेदी केलेले शेत त्याला परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल. 23 तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे. 24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.

25 “मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा. [d]

पशूंचे मोल

26 “लोकांना गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत. 27 तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूंपैकी असला तर याजकाने ठरविलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरविलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.

विशेष देणगी

28 “लोक परमेश्वराला काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते ह्या प्रकारची असेल; ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. 29 ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.

30 “भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एकदशांश भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे वेली ह्यांची फळे ह्यांचा एकदशांश भाग परमेश्वराकरिता आहे. 31 म्हणून एखाद्याला आपला एकदशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एकपंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.

32 “गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे असेल. 33 निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे ह्या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्याला बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.”

34 परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.

मार्क 2

येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतो(A)

नंतर काही दिवसांनी येशू कफर्णहूमास परत गेला. तो घरी आहे ही बातमी लोकांपर्यंत गेली. तेव्हा इतके लोक जमले की जागा उरली नाही. एवढेच नव्हे तर दाराबाहेरदेखील जागा नव्हती. येशू त्यांना उपदेश करीत होता. काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्याला येशूजवळ नेता येईना, मग तो होता तेथील त्याच्यावरचे छपर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता. ती खाट त्यांनी छपरातून खाली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले. येशूने त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा तो पक्षघाती मनुष्याला, म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

तेथे नियमशास्त्राचे काही शिक्षक बसले होते. ते आपसात कुजबूज करीत होते की, “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा देवाची निंदा करीत आहे. देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”

आणि येशूला त्याच क्षणी त्याच्या आत्म्यात समजले की, ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. तो त्यांस म्हणाला, “तुम्ही या गोष्टीविषयी आपसात का कुजबूज करता? तूझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा ऊठ आपला बिछाना उचल आणि आपल्या घरी जा, असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?” 10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, 11 “मी तुला सांगतो, ऊठ, तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा.”

12 मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला व सर्वाच्या समक्ष बाहेर गेला. यामुळे ते सर्व थक्क झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते.”

लेवी (मत्तय) येशूमागे जातो(B)

13 येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक तेथे त्याच्यामागे गेले आणि त्याने त्यांस शिक्षण दिले. 14 नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यांस जकातनाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्या मागे ये.” तेव्हा लेवी उठाला आणि येशूच्या मागे गेला.

15 नंतर येशू लेवीच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी लोकही येशू व त्यच्या शिष्यांबरोबर जेवत होते. कारण तेथे जे त्याच्यामागे आले होते त्यांच्यापैकी पुष्कळ जण होते, 16 काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परुशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांस म्हणाले, “येशू हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवत आहे?”

17 येशूने हे ऐकले आणि तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांस वैद्याची गरज नाही पण रोग्यांस आहे. मी नीतिमान लोकांस नाही तर पाप्यांस बोलवावयास आलो आहे.”

येशू इतर धार्मिक पुढाऱ्यांसारखा नाही(C)

18 जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपास करीत होते. ते काहीजण येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपास करतात परंतु तुझे शिष्य उपास का करीत नाहीत?”

19 येशू म्हणाला, “खरोखर जोपर्यंत वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांनी उपास करावा अशी तुमची अपेक्षा आहे काय? जोपर्यंत त्यांच्याबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांना उपास करणे शक्य नाही. 20 परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवशी उपास करतील.

21 “कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड आकसून जाईल व जुन्याला अधिक फाडील व ते अधिकच फाटेल. 22 तसेच नवा द्राक्षारस कोणीही द्राक्षारसाच्या जुन्या कातडी पिशवीत घातील नाही. जर तो असे करतो तर द्राक्षारस कातडी पिशवीला फाडील आणि द्राक्षारस व द्राक्षारसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून तो नवा द्राक्षारस नव्या पिशवीत घालतो.”

काही यहूदी येशूवर टीका करतात(D)

23 नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, जाताना त्याचे शिष्य कणसे मोडू लगले. 24 तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”

25 येशू म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्यां लोकांना भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही ऐकले नाही काय? 26 अब्याथार प्रमुख याजक असताना, तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?”

27 तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही. 28 म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचादेखील प्रभु आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center