Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 19-20

इस्राएलशी देवाचा पवित्र करार

19 मिसरमधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायाच्या रानात पोहोंचले. ते लोक रफीदीम सोडून सीनायच्या रानात आले होते; त्यांनी होरेब म्हणजे सीनाय पर्वताजवळ आपला तळ दिला. मग मोशे पर्वतावर देवाला भेटावयास गेला तो पर्वतावर असताना देव त्याला म्हणाला, “तू या इस्राएल लोकांना म्हणजे याकोबाच्या वंशजांना सांग, ‘मी माझ्या शत्रुंचे काय करतो ते तुम्ही पाहिले आहे. मिसरच्या लोकांचे मी काय केले आहे आणि गरुड पक्षी आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी जसा नेतो तसेच मिसरच्या लोकांच्या तावडीतून सुरक्षितपणे तुम्हाला येथे आणले तेही तुम्ही पाहिले आहे. म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे व माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल. तुम्ही एक पवित्र राष्ट्र-याजक लोकांचे राज्य व्हाल’ या सर्व गोष्टी, मोशे, तू इस्राएल लोकांस सांग.”

तेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला, व त्याने इस्राएल मधील वडिलधाऱ्या माणसांना म्हणजे पुढाऱ्यांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या; आणि सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले; ते म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”

मग मोशे पुन्हा पर्वतावर देवाला भेटावयास गेला आणि लोक त्याच्या आज्ञा पाळतील असे त्याने देवाला सांगितले. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व इस्राएल लोकांना ऐकू जाईल; मी हे ह्यासाठी करीन की त्यामुळे तू सांगितलेल्या सर्व गोष्टीवर ते नेहमी विश्वास ठेवतील.”

मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.

10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “आज आणि उद्या माझ्या विशेष भेटीसाठी लोकांना पवित्र कर; त्यांनी कपडे स्वच्छ धुवावेत. 11 व तिसऱ्या दिवशी माझ्या भेटीसाठी तयार राहावे कारण तिसऱ्या दिवशी परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल आणि सर्व लोक मला पाहतील. मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. 12-13 परंतु लोकांना पर्वतापासून दूर राहाण्यास तू सांग; तेथे तू एक सीमारेषा काढ आणि लोकांनी ती ओलांडू नये असे तू त्यांना बजावून सांग; जर कोणा माणसाचा किंवा जनावराचा पर्वताला स्पर्श झाला तर त्याला दगडाने किंवा बाणाने मारून टाकावे. परंतु त्याला कोणीही स्पर्श करु नये. शिंगाचा आवाज ऐकू येईपर्यंत लोकांनी थांबावे. तो आवाज ऐकल्यावर ते पर्वत चढून जाऊ शकतील.”

14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.

15 मग मोशे लोकांना म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तो पर्यंत पुरुषांनी स्त्रियांना स्पर्श करु नये.”

16 तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट व गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले. 17 नंतर मोशेने लोकांना छावणीतून बाहेर काढून देवाला भेटावयास पर्वताजवळच्या जागी नेले. 18 सीनाय पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर पर्वतातून वर आला. परमेश्वर पर्वतावर अग्नीतून उतरला म्हणून असे झाले; आणि सर्व सीनाय पर्वत थरथरु लागला. 19 शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. मोशे देवाबरोबर जेंव्हा जेंव्हा बोलला तेंव्हा तेंव्हा देवाने त्याला मेघगर्जनेसारख्या आवाजाने उत्तर दिले.

20 याप्रमाणे परमेश्वर स्वर्गातून सीनाय पर्वताच्या शिखरावर उतरला आणि त्याने मोशेला बोलावून आपल्या बरोबर पर्वताच्या शिखरावर येण्यास सांगितले. तेव्हा मोशे पर्वतावर गेला.

21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग की त्यांनी माझ्याजवळ येऊ नये व माझ्याकडे बघू नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील. 22 तसेच याजक लोकांनाही सांग की माझ्या भेटीस माझ्याजवळ येताना आपणांस पवित्र करून यावे; तसे केले नाही तर मी त्यांना शिक्षा करीन.”

23 मोशेन परमेश्वराला सांगितले, “परंतु लोक पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तू स्वतः आम्हाला एक सीमारेषा आखावयास व लोकांनी ती रेषा ओलाडूंन पवित्र भूमिवर येऊ नये असे सांगितलेस.”

24 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांना इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.”

25 तेव्हा मोशे लोकांकडे खाली गेला व त्याने त्यांना या गोष्टी सांगितल्या.

दहा आज्ञा

20 मग देव म्हणाला,

“मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.

“माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस.

“तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस; त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; [a] मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो; परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.

“परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग्य गोष्टीसाठी करु नकोस; जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही.

“शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव; आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस; 10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम व तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे व तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये; 11 कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.

12 “तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.

13 “कोणाचाही खून करु नकोस.

14 “व्यभिचार करु नकोस.

15 “चोरी करु नकोस.

16 “तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.

17 “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”

लोकांना देवाची भीती वाटते

18 ह्या वेळेपर्यंत तेथील लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला व पर्वतातून धूर वर चढताना पाहिला; तेव्हा लोक घाबरले व भीतीने त्यांचा थरकांप झाला. ते पर्वतापासून दूर उभे राहिले. 19 नंतर लोक मोशेला म्हणाले, “तुला जर आमच्याशी बोलावयाचे असेल तर तू खुशाल बोल; आम्ही ऐकू; परंतु कृपा करून देवाला आमच्याशी बोलू देऊ नकोस; तो बोलेल तर आम्ही मरुन जाऊ.”

20 मग मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका! कारण परमेश्वर तुम्हावर प्रीती करतो हे दाखविण्यासाठी आणि तुम्ही त्याचा मान राखून त्याचे भय धरावे व पाप करु नये हे दाखविण्यासाठी तो आला आहे.”

21 नंतर मोशे, ढगांच्या दाट अंधारात, जेथे देव होता तेथे त्याला भेटावयास गेला, तो पर्यंत लोक पर्वतापासून लांब उभे राहिले. 22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. 23 माझ्या स्पर्धेत तुम्ही सोन्या चांदीच्या मूर्ती करु नये असे खोटे देव तुम्ही करता कामा नये.

24 “माझ्यासाठी मातीची एक विशेष वेदी बांधा आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; माझी आठवण व्हावी म्हणून मी सांगतो त्या प्रत्येक जागी हे करा मग मी येईन व तुम्हाला आशीर्वाद देईन. 25 तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती चिऱ्याच्या दगडाची नसावी; जर वापरावयाचा दगड चिऱ्याचा बनविण्यासाठी तू त्याला कसले हत्यार लावशील तर ती वेदी मी मान्य करणार नाही. 26 आणि वेदीकडे जाण्यासाठी तुम्ही पायऱ्या करु नका कारण पायऱ्यांवरून वेदीकडे चढून जाताना लोकांना तुमची नन्गता दिसेल.”

मत्तय 18:21-35

क्षमा नकरणाऱ्या नोकराचा दाखला

21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय?”

22 येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा [a] अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा.”

23 “म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे नोकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले. 24 जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे 10,000 चांदीच्या नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले. 25 त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी.

26 “परंतु त्या नोकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, ‘मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हांला परत करीन.’ 27 त्या मालकाला आपल्या नोकराबद्दल वाईट वाटले, म्हणून त्याने त्या नोकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले.

28 “नंतर त्याच नोकराचे काही शेकडे रुपये देणे लागत असलेला दुसरा एक नोकर पहिल्या नोकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या नोकराचा गळा पकडला आणि तो त्याला म्हाणाला, ‘तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे.’

29 “परंतु दुसरा नोकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, ‘मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हांला देणे लागतो ते परत करीन.’

30 “पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले. तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते. 31 घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या नोकरांनी पाहिला तेव्हा ते फार दु:खी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले.

32 “तेव्हा पहिल्या नोकारच्या मालकाने त्याला बोलाविले व तो त्याला म्हणाला, ‘दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. 33 म्हणून तू तुझ्याबरोबरच्या नोकारालाही तशीच दया दाखवायची होतीस.’ 34 मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या नोकाराला तुरूंगात टाकले, आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरूंगातून सोडले नाही.

35 “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center