Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 9-11

शेती-पशूमध्ये मरीची पीडा

नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलाण्यास सांगितले, “इस्राएलांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे!’ तू जर त्यांना जाण्यापासून सतत असाच अडवीत राहशील व त्यांना जाऊ देणार नाहीस. तर शेतावरील पशूंविरुद्ध परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा वापर करील. परमेश्वर तुझे घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरे यांना भयंकर आजाराने त्रस्त करील. परंतु तो इस्राएल लोकांच्या व मिसरच्या लोकांच्या पशूत भेद करील; इस्राएल लोकांच्या पशूपैकी एकही पशू मरणार नाही. याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. ह्या देशात उद्या हे सर्व घडून येईल.”

दुसऱ्या दिवशी सकाळी मिसरमधील शेतीवरील सर्व पशू मेले. परंतु इस्राएल लोकांच्या मालकीच्या पशूंपैकी एकही मेला नाही. इस्राएल लोकांच्या पशूपैकी एखादा मेला काय हे पाहण्यासाठी फारोने माणसे पाठवली. परंतु त्यांच्या पशूंपैकी एकही मेला नाही. तरीपण फारो हट्ट व कठीण मनाचाच राहिला. त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.

गळवांची पीडा

नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारो देखत आकाशाकडे उधळावी. त्या राखेचा धुराळा बनेल व तो सगळ्या मिसरभर पसरेल आणि त्याच्या स्पर्शाने माणसांना व गुरांना फोड येऊन गळवे होतील.”

10 तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे माणसांना व जनावरांना फोड व गळवे येऊ लागली. 11 जादूगार मोशेला तसे करण्यापासून अडवू शकले नाहीत कारण त्यांनाही गळवे आली होती. सर्व मिसरभर ही गळवे आली. 12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांना जाऊ दिले नाही. परमेश्वराने पूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.

गारांची पीडा

13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सकाळी उठ व फारोकडे जा; आणि त्याला सांग की इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे! 14 तू हे केले नाहीस तर मग मी माझे सारे सामर्थ्य तुझ्याविरुद्ध तुझे सेवक व तुझ्या लोकांच्याविरुद्ध वापरीन. तेव्हा मग तुला माहीत होईल की या जगात माझ्यासारखा दुसरा देव नाही. 15 मी माझे सगळे सामर्थ्य वापरून असा आजार तुम्हावर पाठवू शकतो की त्यामुळे तू व तुझी प्रजा या पृथ्वीवरून नष्ट व्हाल. 16 परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे. मग सर्व जगाला मी कोण आहे हे कळेल. 17 तू अजूनही माझ्या लोकांविरुद्ध आहेस. तू त्यांना अजूनही मोकळे करून जाऊ देत नाहीस. 18 म्हणून उद्या ह्याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरवर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही. 19 तेव्हा आता तू तुझी गुरेढोरे सुरक्षित जागी ठेवलीच पाहिजेस; शेतात तुझ्या मालकीचे काही असल्यास ते सुरक्षित जागी ठेवलेच पाहिजेस, कारण जर एखादा माणूस किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यांवर गारांचा भडीमार पडेल.’”

20 फारोच्या सेवकापैकी काहींनी परमेश्वराच्या संदेशाचा मान ठेवून लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले. 21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, शेरडेमेंढरे मरून गेली.

22 परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुराढोरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”

23 तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला. 24 गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरवर कधी आले नव्हते. 25 त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसरमधील शेतात जे होते ते सर्व नष्ट केले. तसेच माणसे, जनावरे व झाडे झुडपे नष्ट केली; आणि मोठमोठी झाडे मोडून पडली. 26 गारांच्या वर्षावाच्या तडाख्यापासून वाचलेला भाग एकच आणि तो म्हणजे इस्राएली लोक राहात असलेला गोशेन प्रांत; तेथे गारांचा वर्षाव झाला नाही.

27 फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “ह्यावेळी मी पाप केले आहे. परमेश्वराचे खरे आहे; मी व माझे लोक, आम्ही चुकलो आहोत. 28 हा देवाकडून झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला! हे वादळ थांबविण्यास देवाकडे विनंती करा आणि मग मी तुम्हाला जाऊ देतो.”

29 मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे. 30 परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वराचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.”

31 यावेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसाला बोंडे आली होती. ह्या पिकांचा आता नाश झाला. 32 परंतु साधा गहू व जर्मन गहू इतर धान्यापेक्षा उशीरा पिकतात; त्याची उशीरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही.

33 मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली. आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.

34 पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन पुन्हा कठोर केले. 35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांना मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणे हे झाले.

टोळांची पीडा

10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे व त्याच्या सेवकांची मने मी कठीण केली आहेत. मी हे यासाठी केले आहे की मला त्यांना माझ्या चमत्कारांचे सामर्थ्य दाखवावयाचे होते. तसेच तुम्ही तुमच्या मुलांना व नातवंडांना मी मिसरमध्ये केलेल्या चमत्कारांचे व अद्भुत गोष्टींचे वर्णन सांगावे. मग तुम्हा सर्वांना कळेल की मी परमेश्वर आहे.”

मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्याला सांगितले, “इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘अजून किती दिवस तू माझे ऐकणार नाहीस? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे. जर तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर उद्या मी तुझ्या देशावर टोळ धाड आणिन. ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील कि तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्याला टोळ खाऊन टाकतील. शेतातील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील. ते टोळ तुझा वाडा, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, वाडे या सर्वात भरून जातील. तुझ्या वाडवडीलांनी आज पर्यंत पाहिले असतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील. मिसरमध्ये लोकवस्ती होऊ लागली त्या काळापासून आता पर्यंत कधीही नव्हते, तेवढे अधिक ते टोळ असतील.’” नंतर फारो समोरून मोशे निघून गेला.

फारोच्या सेवकांनी फारोला विचारले, “कोठवर आम्ही ह्या इस्राएल लोकांच्या सापळयात अडकून राहावे? त्यांना आपल्या देव परमेश्वराची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे जर आपण त्यांना जाऊ देणार नाही तर मग आपणास समजण्यापूर्वी मिसर देशाचा नाश होईल.”

तेव्हा फारोने मोशे व अहरोन यांना पुन्हा बोलावून आणण्यास आपल्या काही सेवाकांना सांगितले. फारो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु नक्की कोण कोण जाणार आहे ते मला सांगा.”

मोशेने उत्तर दिले, “आमची तरूण व म्हातारी मंडळी यांना तसेच आम्ही आमची मुलं, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे व गाईगुरे यांनाही आमच्या बरोबर घेऊन जाऊ; आम्ही झाडून सर्वजण जाऊ कारण परमेश्वराचा उत्सव सर्वाकरिता आहे.”

10 फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ देण्यापूर्वी खरेच परमेश्वर मजपासून तुमचे रक्षण करो! हे पाहा, तुम्ही काही तरी वाईट असा कट करीत आहात. 11 तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. आणि हीच तर तुम्ही मला विंनती केली होती. तेव्हा तुम्हा सर्वाना मी जाऊ देणार नाही.” त्यानंतर फारोने मोशे व अहरोन यांना घालवून दिले.

12 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे मग मिसरवर टोळ धाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”

13 मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले. 14 ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत. 15 त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरमधील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही.

16 फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. 17 तेव्हा ह्या वेळी माझ्या पापंबद्दल मला क्षमा करा आणि हे मरण (टोळ) माझ्यापासून दूर करण्याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करा.”

18 मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. 19 तेव्हा परमेश्वराने वाऱ्यात बदल केला. त्याने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळ वाहवून तांबड्या समुद्रात टाकले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही. 20 तरी परंतु परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.

अंधाराची पीडा

21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हाला चाचपडत जावे लागेल.”

22 तेव्हा मोशेने तसे कले आणि अंधाऱ्याढगाने अवघ्या मिसरदेशाला तीन दिवस गडप केले. 23 कोणालाही दुसरे काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस कोठेह गेले नाही; परंतु इस्राएल लोक जेथे राहात होते त्या सर्व भागावर म्हणजे गोशेन प्रांतात सर्वत्र भरपूर प्रकाश होता.

24 तेव्हा पुन्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमची शेरडेमेंढरे व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.”

25 मोशे म्हणाला, “आमचेच पशू नव्हे तर तू देखील आम्हांस यज्ञपशू व होमबळी देशील; आणि त्यांचा आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याला अर्पणासाठी उपयोग करु! 26 यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमचे पशूही आमच्या बरोबर नेऊ. जनावराचा एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमच्या परमेश्वराला यज्ञ व होमार्पणासाठी काय लागेल हे आता येथून आम्हाला सांगता येणार नाही; परंतु तेथे गेल्यावरच आम्हाला काय हवे व काय नको हे समजेल. म्हणून ह्या सर्वगोष्टी आम्हाला आमच्या सोबत नेल्याच पाहिजेत.”

27 परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांना जाऊ देईना! 28 मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!”

29 मोशे म्हणाला, “तू एक गोष्ट बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”

प्रथम जन्मलेल्यांचे मरण

11 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसर देशावर आणखी एक पीडा आणणार आहे. ह्या पीडेनंतर मात्र फारो तुम्हाला मिसरमधून जाऊ देईल; खरे म्हणजे तो तुम्हाला मिसर देशातून बाहेर घालवून देईल. तू माझा हा निरोप इस्राएल लोकांना सांग, ‘तुम्ही पुरुष व स्त्रिया यांनी आपल्या मिसरच्या रहिवासी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून सोन्याचांदीच्या वस्तू मागून घ्याव्यात. मिसरच्या लोकांनी तुम्हाशी दयाळूपणे वागावे व तुम्हाला त्या वस्तू द्याव्यात अशी परमेश्वर त्यांची मने वळवील. मिसरचे सर्व लोक आणि फारोचे सेवक देखील मोशे महान माणूस असल्याचे अगोदर पासून मानीत होते.’”

मोशे लोकांना म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘आज रात्री मी मिसर देशातून फिरेन आणि मिसरमधील प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा मरण पावेल. (मिसर देशाचा राजा) फारो याचा प्रथम जन्मलेला मुलगा याच्यापासून तर दळण दळणाऱ्या दासीच्या प्रथम जन्मलेल्या मुलापर्यंत सर्व मुलगे मरण पावतील. प्रथम जन्मलेले पशू देखील मरतील. मिसर देशभर पूर्वी कधीही झाला नव्हता एवढा आणि भविष्यात कधीही होणार नाही एवढा धायमोकलून रडण्याचा आक्रोश होईल. परंतु इस्राएल लोकांना किवा त्यांच्या जनावरांना काहीच अपाय होणार नाही. कुत्रा देखील त्यांच्यावर भुंकणार नाही यावरून मी इस्राएली लोकात व मिसरच्या लोकात कसा भेद ठेवलेला आहे हे तुम्हास कळून येईल. मग हे सर्व तुमचे दास (म्हणजे मिसरचे लोक) माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, “तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग (मी) त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.’”

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोने तुझे ऐकले नाही. का? ते तुला माहीत आहे का? कारण की मी त्याला मिसरमध्ये माझे महान सामर्थ्य दाखवावे.” 10 आणि म्हणूनच मोशे व अहरोन यांनी फारोपुढे अद्भुत चिन्हें केली; आणि म्हणूनच परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मिसरमधून इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.

मत्तय 15:21-39

येशू यहूदी नसलेल्या स्त्रीला मदत करतो(A)

21 नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनच्या भागात गेला. 22 तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने पछाडली आहे.”

23 पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंति केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”

24 पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेढरांकडे पाठविले आहे.”

25 मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभु, माझे साहाय्य करा.”

26 परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही.”

27 ती स्त्री म्हणाली, “होय प्रभु, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात.”

28 तेव्हा येशूने तिला म्हटले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो.” आणी तिची मुलगी बरी झाली.

येशू अनेकांना बरे करतो

29 नंतर येशू तेथून निघुन गालील सरोवराकडे गेला. येशू डोंगरावर गेला आणि तेथे बसला.

30 मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. 31 मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले. व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले, आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचा गौरव केले.

येशू चार हजारांहून अधिकांना जेवू घालतो(B)

32 मग येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो. कारण ते आज तीन दिवस झाले माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही. कारण ते वाटेत कदाचित मूर्च्छित होतील.”

33 शिष्य त्याला म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”

34 तेव्हा येशू म्हाणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”

ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही मासे आहेत.”

35 मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. 36 मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या. 37 तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाट्या गोळा केल्या. 38 आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते. 39 मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center