Old/New Testament
7 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर असेन मी तुला फारोसाठी देव असे केले आहे; आणि अहरोन हा तुझा संदेष्टा होईल; 2 मी तुला सांगतो ते सर्व तू अहरोनाला सांग; मग माझे सर्व बोलणे तो फारोला सांगेल आणि मग फारो इस्राएल लोकांना हा देश सोडून जाऊ देईल. 3 परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसरमध्ये अनेक चमत्कार दाखवीन. तरीही फारो ऐकणार नाही. 4 तेव्हा मग मी मिसरच्या लोकांना जबर शिक्षा करीन आणि त्या देशातून माझ्या सर्व लोकांना मी बाहेर काढीन 5 तेव्हा मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे मी मिसरच्या लोकांविरुद्ध होईन आणि मग त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे मग मी माझ्या लोकांना त्यांच्या देशातून बाहेर घेऊन जाईन.”
6 मग मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. 7 ते फारोबरोबर बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षाचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षाचा होता.
मोशेच्या काठीचा साप होतो
8 परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, 9 “फारो तुम्हाला मी पाठविल्याचा पुरावा म्हणून एखादा चमत्कार करून तुमचे सामर्थ्य दाखविण्या विषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी जमिनीवर टाकण्यास सांग म्हणजे फारोच्या देखत त्या काठीचा साप होईल.”
10 तेव्हा मोशे व अहरोन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे फारोकडे गेले. अहरोनाने आपली काठी जमिनीवर टाकली. तेव्हा फारो व त्याचे सेवक यांच्या देखत त्या काठीचा साप झाला.
11 तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; तेव्हा मिसरच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर अहरोनाप्रमाणे केले. 12 त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले परंतु अहरोनाच्या काठीच्या सापाने त्यांचे साप गिळून टाकले. 13 तरीही परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
पाण्याचे रक्त होते
14 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांना जाऊ देत नाही. 15 उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नाईल नदीच्या काठी त्याला भेटावयास जा. 16 त्याला असे सांग, ‘इब्री म्हणजे इस्राएल लोकांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांना त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, असे तुला सांगण्यास मला बजावले आहे. आतापर्यंत तू परमेश्वराचे ऐकेले नाहीस. 17 तेव्हा परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे त्याला अशावरून कळेल: मी नाईल नदीच्या पाण्यावर ह्या माझ्या हातातील काठीने तडाखा मारीन तेव्हा नदीच्या पाण्याचे रक्त होईल. 18 मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसरचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.’”
19 परमेश्वर मोशेला म्हाणाला, “आपली काठी मिसरमधील नद्या, नाले, तलाव व जेथे पाणी भरून ठेवतात त्या जागेवर उगारण्यास अहरोनास सांग म्हणजे त्याने तसे केल्यावर सर्व पाण्याचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात भरलेल्या पाण्याचे देखील रक्त होईल.”
20 तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उगारली नाईल नेदीवर मारली. त्याने हे फारो व त्याचे अधिकारी यांच्यासमोर केले. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले. 21 नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकेनात. अवघ्या मिसरभर रक्तच रक्त झाले.
22 मिसरच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले. 23 मोशे व अहरोन यांनी केलेल्या चमत्काराकडे फारोने लक्ष दिले नाही; तो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला.
24 मिसरच्या लोकांना नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.
बेडकांची पीडा
25 परमेश्वराने नाईल नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.
8 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या लोकांना माझी उपासना करण्याकारिता जाऊ दे! 2 जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी सारा देश बेडकांनी भरून टाकीन व सगळया देशाला पीडीन. 3 नाईल नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत. बिछान्यात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, भट्ट्यात पाण्यांच्या भांड्यात येतील. 4 ते तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर चढतील.’”
5 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्यावर उगारण्यास सांग म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”
6 मग अहरोनाने मिसरमधील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.
7 तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.
8 मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वराला विनंति करा मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांना जाऊ देईन.”
9 मोशे फारोला म्हणाला, “हे बेडूक केव्हा दूर करावेत अशी तुमची इच्छा आहे ते मला सांगा. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करीन. मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील.”
10 फारोने उत्तर दिले, “उद्या.”
तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हाला समजेल की आमच्या परमेश्वरासारखा दुसरा देव नाही. 11 बेडूक तुम्हापासून तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक याच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
12 मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वराला प्रार्थना केली. 13 मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मेले. 14 ते सडूलागले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला. 15 बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने मोशे व अहरोन यांनी विचारल्याप्रमाणे केले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
उवांची पीडा
16 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”
17 त्यांने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवा बनल्या; त्या पशूवर व माणसांवर चढल्या.
18 जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर तसेच करण्याचा प्रयत्न केला परंतु धुळीतून त्यांना उवा बनविता आल्या नाहीत; त्या उवा पशूवर व लोकांच्या अंगावर राहिल्या. 19 तेव्हा जादुगारांनी फारोला सांगितले की हा चमत्कार देवाच्या सामर्थ्यानेच झाला आहे. परंतु फारोने मन कठीण केले व त्यांचे म्हणणे ऐकायचे नाकारले आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
गोमाशांची पीडा
20 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ; आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्याकडे जा. त्याला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे! 21 जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील. 22 परंतु मी इस्राएल लोकांशी मिसरच्या लोकांप्रमाणे वागणार नाही. तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात तेथे एकही गोमाशी असणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला समजेल की मी परमेश्वर या पृथ्वीवर आहे. 23 तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन आणि तोच माझा पुरावा असेन.’”
24 अशा रीतीने परमेश्वराने जे सांगितले होते त्याप्रमाणे त्याने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या वाड्यात व त्याच्या सेवकांच्या घरात शिरले; ते सगव्व्या देशात पसरले. गोमाशाच्या त्या थव्यांनी देशाची नासाडी केली. 25 म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
26 परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसरच्या लोकांच्या दृष्टिने किळसवाणा असेल त्यामुळे आम्ही तो मिसरच्या लोकांसमोर केला तर ते आम्हावर दगडफेक करतील व आम्हाला मारून टाकतील. 27 तर आम्हास रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ द्या. व आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला हे करावयास सांगितले आहे.”
28 तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हाला तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देतो परंतु तीन दिवसांच्या प्रवासापेक्षा जास्त पुढे जायचे नाही; तेव्हा आता जा व माझ्यासाठीही प्रार्थना करा.”
29 मोशे म्हणाला, “पाहा, मी जातो आणि तुझ्यापासून, तुझे लोक व सेवक या सर्वापासून उद्या गोमाशा दूर करण्याकरिता परमेश्वराला विंनती करतो परंतु यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांना तुम्ही अडवू नये.”
30 तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. 31 आणि परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो,त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशा दूर केल्या. तेथे एकही गोमाशी राहिली नाही. 32 परंतु फारो पुन्हा हट्टी व कठोर बनला आणि त्याने इस्राएली लोकाना जाऊ दिले नाही.
देवाची आज्ञा आणि माणसांनी बनवलेले नियम(A)
15 तेव्हा यरूशलेमाहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, 2 “तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”
3 येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? 4 कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख’ [a] आणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, ‘त्याला जिवे मारावे.’ [b] 5 पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता, ते मी देवाला अर्पण केले आहे 6 ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. 7 अहो ढोंग्यानो, तुम्हांविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.
8 ‘हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात
पण त्यांचे ह्रदय माझ्यापासून दूर आहे.
9 आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात
आणि व्यर्थच माझी उपासना करतात.’” (B)
10 तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या. 11 जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते.”
12 नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणांला कळते काय?”
13 पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. 14 त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
15 पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी या बोधकथचे स्पष्टीकरण करा.”
16 “तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहेत काय?” येशूने त्यांना विचारले. 17 “जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते. हे तुम्हांला अजून समजत नाही काय? 18 परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात. 19 कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. 20 माणसाला डागाळणाऱ्या याच गोष्टी आहेत न धुतलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही.”
2006 by World Bible Translation Center