Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 4-6

मोशेकरिता पुरावा

मग मोशे देवाला म्हणला, “तू मला पाठवले आहेस असे मी इस्राएल लोकांना सांगेन तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत; ते म्हणतील, ‘परमेश्वराने तुला दर्शन दिले नाही.’”

परंतु देव मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?”

मोशेने उत्तर दिले, “ती माझी काठी आहे.”

मग देव म्हणाला, “तुझ्या हातातली तुझी काठी जमिनीवर टाक.”

तेव्हा मोशेन तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून बाजूला पळाला. परंतु परमेश्वर मोशेला म्हणला, “तुझा हात पुढे कर व त्या सापाची शेपटी धर.”

तेव्हा मोशेने तसे केल्यावर त्या सापाची पुन्हा काठी झाली. मग देव म्हणाला, “ह्याप्रमाणे तुझ्या काठीचा उपयोग कर म्हणजे मग तू इस्राएली पूर्वजांच्या परमेश्वराला म्हणजेच अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव. याला भेटलास असा ते लोक विश्वास धरतील.”

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुला आणखी एक चिन्ह किंवा पुरावा देतो. तू तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव”

तेव्हा मोशेने आपला हात झाग्याच्या आत आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा त्यावर बफर्सारखे पांढरे डाग दिसले; [a] असा त्याचा हात बदलून गेला.

मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात तेथून काढला तेव्हा त्याच्यात बदल होऊन तो पुन्हा पूर्वी सारखा चांगला झाला.

मग देव बोलला, “तू तुझ्या काठीचा चमत्कार दाखवल्यावरही जर त्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर मग हा हाताचा चमत्कार दाखवल्यावर ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. हे दोन्ही चमत्कार दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मग नाईल नदीचे थोडे पाणी घे आणि ते जमिनीवर ओत; ओतल्याबरोबर त्याचे रक्त होईल.”

10 परंतु मोशे परमेश्वराला म्हणाला, “परंतु परमेश्वरा मी तुला खरे ते सांगतो; मी काही चांगला वक्ता नाही; मला लोकांसमोर कधीही नीट बोलता आलेले नाही. आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहीत आहे की मी सावकाश व अडखळत बोलतो आणि बोलताना मला योग्य, परिणामकारक शब्द सापडत नाहीत;”

11 मग परमेश्वर त्याला म्हणाला, “माणसाचे तोंड कोणी केले? माणसाला बहिरा, मुका, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मीच की नाही? मी ‘याव्हे’ आहे! होय ना? 12 तेव्हा मी सांगतो, तू आता जा. तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन. मी योग्य शब्द तुझ्या मुखात घालीन.”

13 परंतु मोशे म्हणाला, “माझ्या परमेश्वरा! मी तुला कळकळीची विनंती करतो की तू दुसऱ्या कोणाला पाठव. मला नको.”

14 परमेश्वर मोशेवर रागावला! परमेश्वर म्हणाला, “मी तुला आणखी मदत देतो. लेवी कुटुंबातील तुझा भाऊ अहरोन याचा मी उपयोग करतो. तो पटाईत वक्ता आहे. तो अगोदरच तुझ्याकडे येण्यास निघाला आहे. तुला भेटल्यावर त्याला आनंद होईल. 15 तो तुझ्याबरोबर फारोकडे येईल. तू काय बोलावेस ते मी तुला सांगेन: मग ते तू अहरोनाला सांग, आणि मग अहरोन योग्य शब्दात फारोशी बोलेल. 16 आणि अहरोन तुझ्या तर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्याला देवासारखा होशील. 17 तर आता जा! तुझी काठी तुझ्या सोबत घे. मी तुझ्याबरोबर आहे हे लोकांना दाखवण्यासाठी त्या काठीचा व इतर चमत्कारांचा उपयोग कर!”

मोशे मिसरला परत जातो

18 मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो इथ्रोला म्हणाला, “मला मिसरला माझ्या भाऊबंदाकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.”

इथ्रो म्हणाला, “तू शांततेने जा.”

19 तेव्हा मोशे अद्याप मिद्यानात असताना देव त्याला म्हणाला, “आता मिसरला परत जाणे तुझ्यासाठी सुरक्षिततेचे आहे. जे लोक तुला ठार मारु पाहात होते ते आता मरण पावले आहेत.”

20 तेव्हा मोशेने आपली बायको व आपल्या मुलांना गाढवांवर बसवले व त्यांना घेऊन तो मिसरला माघारी गेला. त्यांने देवाच्या सामर्थ्याने भरलेली आपली काठी बरोबर नेली.

21 मोशे मिसरचा प्रवास करत आसताना देव त्याच्याबरोबर बोलला, देव म्हणाला, “तू फारोशी बोलताना मी तुला जे चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे त्यायोगे ते चमत्कार त्याला दाखवण्याची आठवण ठेव. परंतु मी फारोचे मन अतिशय कठीण करीन; तो तुम्हाला जाऊ देणार नाही. 22 मग तू फारोला सांग की 23 परमेश्वर म्हणतो, ‘इस्राएल माझा मोठा मुलगा [b] आहे. आणि मी तुला सांगत आहे की तू माझ्या थोरल्या मुलाला माझी उपासना करण्याकरिता जाऊ दे! जर तू माझ्या प्रथम जन्मलेल्या मुलास म्हणजे माझ्या इस्राएल लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या प्रथम जन्मलेल्या म्हणजे थोरल्या मुलास ठार मारीन.’”

मोशेच्या मुलाची सुंता होते

24 मोशे मिसरच्या प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी गाठून त्याला ठार मारण्याचा [c] प्रयत्न केला. 25 परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलाची सुंता केली. मग तिने मुलाची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्याला म्हणाली, “तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहेस.” 26 सिप्पोरा असे म्हणाली कारण तिला आपल्या मुलाची सुंता करावी लागली. तेव्हा देवाने मोशेला क्षमा केली व त्याला ठार मारले नाही.

देवासमोर मोशे व अहरोन

27 परमेश्वराने अहरोनाला सांगितले होते, “तू वाळवंटात जाऊन मोशेला भेट,” म्हणून अहरोन देवाच्या डोंगरावर म्हणजे होरेब किंवा सिनाय डोंगरावर जाऊन मोशेला भेटला. मोशे भेटल्यावर अहरोनाने त्याचे चुंबन घेतले. 28 परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने अहरोनाला सांगितल्या व देवाने त्याला का पाठवले तेही सांगितले; तसेच परमेश्वराने मोशेला जे चमत्कार करून दाखवावयाची आज्ञा दिली होती त्याविषयीही त्याने अहरोनाला सांगितले.

29 मग मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएली वंशजाचे सर्व वडीलधारी एकत्र जमवले. 30 नंतर परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी अहरोनाने लोकांस कळवल्या; त्यानंतर मोशेने लोकांसमक्ष चमत्कार करून दाखवले. 31 तेव्हा देवानेच मोशेला पाठवले असल्याबद्दल त्यांची खात्री झाली. देवाने त्यांच्या हालअपेष्टा पाहिल्या आहेत व तो त्यांना भेटण्यास आला आहे हे त्यांना माहीत झाले. तेव्हा त्यांनी नमन करून देवाची उपासना केली.

फारोसमोर मोशे व अहरोन

मोशे व अहरोन इस्राएल लोकांशी बोलल्यानांतर फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्राएल लोकांचा देव [d] म्हणतो, ‘माझ्या लोकांना माझ्या सन्मानाकरिता उत्सव करावयास रानात जाऊ द्यावे.’”

परंतु फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? आणि मी त्याचे का ऐकावे? मी इस्राएल लोकांना का जाऊ द्यावे? तुम्ही परमेश्वर म्हणता तो कोण आहे हे मला माहीत नाही. म्हणून इस्राएल लोकांस मी जाऊ देत नाही.”

मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा म्हणजे इस्राएल लोकांचा देव आम्हाशी बोलला आहे. म्हणून आम्हाला रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर या करिता यज्ञार्पण करु द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर कदाचित् त्याला फार राग येईल व तो रोगराईने किंवा तलवारीने आमचा नाश करेल.”

परंतु फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही त्रास निर्माण करून घेत आहात! तुम्ही लोकांना काम करू देत नाही; तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणीत आहात! त्या गुलामांना आपल्या कामावर माघारी जाण्यास सांगा! येथे खूप कामगार आहेत आणि त्यांना काम करण्यापासून तुम्ही रोखत आहात!”

फारो लोकांना शिक्षा देतो

त्याच दिवशी इस्राएल लोकांचे काम अधिक खडतर करण्यासाठी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या लोकांना विटा बनविण्याकरिता आज पर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वतः शोधून आणण्यास सांगा. तरी परंतु पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनविल्या पाहिजेत. ते आळशी झाले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या देवाला यज्ञ करण्यासाठी त्यांना जाऊ देण्याविषयी ते मला विचारत आहेत. तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग मोशेच्या खोट्या गोष्टी ऐकण्यास त्यांना वेळ मिळणार नाही.”

10 म्हणून मिसरचे मुकादम व इस्राएली किंवा इब्री नायक इस्राएल लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारोने तुम्हाला विटा बनविण्यासाठी लागणारे गवत न देण्याचे ठरवले आहे. 11 तेव्हा तुम्हाला लागणारे गवत तुम्ही स्वतःच आणले पाहिजे म्हणून आता जाऊन तुमच्यासाठी गवत आणा परंतु पूर्वीइतक्याच विटा तुम्ही बनविल्या पाहिजेत.”

12 म्हणून मग इस्राएल लोक गवत शोधण्याकरिता सर्व मिसर देशभर पांगले. 13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरिता त्याच्या मागे सतत तगादा लावीत. 14 मिसरच्या मुकादमांनी लोकांवर इब्री म्हणजे इस्राएली नायक नेमले होते. लोकांनी केलेल्या कामासाठी त्यांना जबाबदार धरले जाई. मिसरचे मुकादम इस्राएली नायकांना मारीत व म्हणत, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवीत होता तेवढ्या आता का बनवीत नाही? तुम्ही जर त्यावेळी तेवढ्या विटा करीत होता तर मग आताही तेवढ्याच विटा करु शकला पाहिजे!”

15 मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशाप्रकारे का वागत आहा? 16 तुम्ही आम्हाला गवत देत नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा बनविण्याचा हुकूम करता. आणि आता आमचे मुकादम आम्हाला मारतात. अशा रीतीने तुमचे लोक जे करीत आहेत ते चुकीचे आहे.”

17 फारोने उत्तर दिले, “तुम्ही लोक आळशी आहा. तुम्हाला काम करायला नको आणि म्हणूनच तुम्हाला जाऊ देण्याविषयी तुम्ही मला विचारता आणि त्या करिताच तुम्हाला येथून निघून जायला आणि तुमच्या परमेश्वराला यज्ञ करावयास पाहिजे. 18 आता आपल्या कामावर माघारी जा. आम्ही तुम्हाला गवत देणार नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.”

19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा करून देणे त्यांना शक्य नव्हते.

20 फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना मोशे व अहरोन भेटले; ते नायकांसाठीच थांबले होते. 21 तेव्हा ते मोशे व अहरोनास म्हणले, “आम्हाला जाऊ द्यावे असे फारोला विचारून तुम्ही मोठे वाईट केले. फारो व त्याचे अधिकारी यांच्या मनात आमच्या विरुद्ध द्वेष निर्माण केल्याबद्दल परमेश्वर तुम्हाला शिक्षा करो. आम्हास मारून टाकण्यास तुम्ही त्यांना चांगले निमित्त दिले आहे.”

मोशे देवाकडे तक्रार करतो

22 मग मोशे परमेश्वराची प्रार्थना करीत म्हणाला, “प्रभु तुझ्या लोकांसाठी ही वाईट गोष्ट तू का केलीस? तू मला इकडे का पाठवलेस? 23 मी फारोकडे जाऊन तू मला सांगितलेल्या गोष्टी त्याला सांगितल्या. परंतु त्या वेळेपासून तो लोकांशी अधिक कठोरपणे वागत आहे. आणि त्यांच्या मदतीकरिता तू काहीच केले नाहीस!”

तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोचे काय करतो ते तू बघशील; मी माझ्या महान सामर्थ्याचा त्याच्या विरुद्ध उपयोग करीन; मग तो माझ्या लोकांना जाऊ देईल. तो त्यांना जाऊ देण्यास एवढा तयार होईल की तो त्यांना बळजबरीने घालवून देईल।”

मग देव मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दर्शन दिले; त्यांनी मला ‘एल-शदाय’ असे नाव दिले; त्यांना ‘याव्हे’ (म्हणजे ‘परमेश्वर’) हे माझे नाव माहीत नव्हते. त्यांच्याशी पवित्र करार करून मी त्यांना कनान देश देण्याचे वचन दिले. ते त्या देशात राहिले परंतु तो देश त्यांचा स्वतःचा नव्हता; ते तेथे उपरे होते. आता मला इस्राएल लोकांच्या त्रासाविषयी, मिसरमधील त्यांच्या गुलामगिरी विषयी समजले आहे आणि त्यांच्याशी केलेल्या पवित्र कराराची मला आठवण आहे. तेव्हा त्यांना सांग, मी म्हणतो, ‘मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास वाचवीन व तुम्हांस स्वतंत्र करीन; तुम्ही मिसरच्या लोकांचे गुलाम राहणार नाही. मी माझ्या महान सामर्थ्याचा उपयोग करून मिसरच्या लोकांना भयंकर शिक्षा करीन व मग तुम्हाला सोडवीन. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. मी तुमचा देव परमेश्वर आहे आणि मी तुम्हाला मिसरमधून सोडविले आहे हे तुम्हाला समजेल. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी मोठा करार करून त्यांना वचन दिले की मी त्यांना एक विशेष देश देईन; तेव्हा त्या देशात मी तुम्हाला नेईन व तो देश तुम्हाला कायमचे वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.’”

तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांना सांगितले. परंतु लोकांना एवढे काम करावे लागत होते की त्यामुळे त्यांना मोशेचे म्हणणे ऐकावयास उत्सुकता नसे म्हणून ते त्याचे ऐकेनात.

10 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 11 “जा व फारोला सांग की त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिलेच पाहिजे.”

12 परंतु मोशेने उत्तर दिले, “इस्राएल लोकांनी माझे ऐकण्यास नाकारले! तेव्हा फारोही नक्कीच माझे ऐकणार नाही! मी अजिबात चांगला वक्ता नाही.”

13 परंतु परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला आणि त्याने त्यांना इस्राएल लोकाकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्याची, तसेच फारोकडे जाऊन त्याच्याशी बोलणी करण्याची आणि इस्राएल लोकांना मिसर मधून बाहेर घेऊन जाण्याची आज्ञा दिली.

इस्राएल लोकांची काही कुळे

14 इस्राएल लोकांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रमुख पुरुंषांची नावे अशी:

इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हस्त्रोन व कर्मी. ही रऊबेनाची कुळे:

15 शिमोनाची मुले यमुवेल यामीन, ओहद, याखीन, जोहर व (कनानी स्त्री पोटी झालेला शौल.) ही शिमोनाची कुळे.

16 लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षाचे होते. लेवीच्या वंशावळी प्रमाणे त्याच्या मुलांची नांवे ही: गेर्षोन, कहाथ, व मरारी.

17 गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे: गेर्षोनाचे दोन मुलगे लिबनी व शिमी.

18 कहाथाचे मुलगे अम्राम. इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षाचे होते.

19 मरारीची मुले महली व मूशी,

लेवीची कुळे त्याच्या वंशावळी प्रमाणे ही होती.

20 अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्यासी लग्न केले तिच्या पोटी त्याला अहरोन व मोशे ही दोन मुले झाली. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला.

21 इसहाराची मुले-कोरह, नेफेग व जिख्री.

22 उज्जियेलाची मुले: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.

23 अहरोनने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबची मुलगी व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाले.

24 कोरहाची मुले: अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे.

25 अहरोनाचा मुलगा एलाजार याने पुटीयेलाच्या मुलीशी लग्न केले; तिच्या पोटी त्याला फिनहास हा मुलगा झाला.

हे सर्वलोक म्हणजे इस्राएलाचा मुलगा लेवी याची वंशावळ होय.

26 इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे देवाने ज्यांना सांगितले होते ते अहरोन व मोशे ह्याच कुळातले. 27 इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर जाऊ द्यावे असे मिसरचा राजा फारो याच्याशी जे बोलले तेच हे अहरोन व मोशे.

देव मोशेबरोबर पुन्हा बोलतो

28 मग मिसर देशात देव मोशे बरोबर बोलला. 29 तो त्याला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिसरचा राजा फारो याला सांग.”

30 परंतु मोशेने उत्तर दिले, “मी तर चांगला वक्ता नाही. फारो राजा माझे ऐकणार नाही.”

मत्तय 14:22-36

येशू सरोवरावरून चालातो(A)

22 स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले. 23 लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. 24 पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती, कारण वारा समोरून वाहत होता.

25 मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला. 26 शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते भूत, भूत असे ओरडू लागले.

27 पण येशू लगेच त्यांना म्हणाला, काळजी करू नका. मी आहे, भीऊ नका.

28 पेत्र म्हणाला, प्रभु जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग.

29 येशू म्हणाला, “ये.”

मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. 30 पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, “प्रभु, मला वाचवा.”

31 आणि लगेंच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासू माणसा, तू संशय का धरलास?”

32 मग ते नावेत बसल्यावर वारा थांबला. 33 तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”

येशू रोग्यानां बरे करीतो(B)

34 नंतर ते पलीकडे गनेसरेत येथे पोहोचले. 35 तेथील लोकांनी येशूला पाहिले व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठविला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. 36 आणि आम्हांला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center