Old/New Testament
याकोब आपल्या मुलांना आशीर्वाद देतो
49 मग याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले. तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्या जवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल हे मी तुम्हास सांगतो.”
2 “याकोबाच्या मुलांनो! तुम्ही सर्व एकत्र या
आणि तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.
रऊबेन
3 “रऊबेना! तू माझा पाहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस:
पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस.
तू सर्वापेक्षा अधिक शक्तीवान
व सर्वापेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस;
4 परंतु तुझ्या भावना पुराच्या अनावर
व बेबंद लाटांप्रमाणे आहे;
तू माझा मुलांमध्ये श्रेष्ठ किंवा सर्वात
अधिक महत्वाचा मुलगा होणार नाहीस कारण
तू आपल्या बापाच्या
एका बायकोपाशी जाऊन निजलास;
तू आपल्या बापाच्या अंथरुणाचा
आदर करुन मान राखला नाहीस.
शिमोन व लेवी
5 “हे भाऊ आहेत; या दोन भावांना
तरवारींने लढण्याची आवड आहे.
6 त्यांनी गुपचूप वाईट गोष्टी करण्याचे ठरवले;
त्यांचे हे बेत माझ्या जीवाला मान्य नाहीत;
तसेच त्यांच्या गुप्त बैठका मला मान्य नाहीत;
त्यांनी रागाच्या भरात माणसांची कत्तल केली;
गंमत म्हणून त्यांनी पशूंना जखमी केले;
7 त्यांचा राग शाप आहे;
ते अति रागाने वेडे होतात तेव्हा अतिशय क्रूर बनतात;
याकोबाच्या जमिनीत त्यांना वाटा मिळणार नाही.
ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.
यहूदा
8 “यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील;
तू तुझ्या शत्रूंचा पराभव करशील;
तुझे भाऊ तुला लवून नमन करतील.
9 यहूदा, तू आपली शिकार मारलेल्या सिंहासारखा आहेस;
माझ्या मुला, आपल्या शिकारीचा पशू मारुन त्याच्यावर उभा असलेल्या सिंहासारखा तू आहेस;
यहूदा विसावा घेणाऱ्या सिंहासारखा आहे
आणि त्याला त्रास देण्याइतका शूर दूसरा कोणीही नाही.
10 यहूदाचे कुटुंबीय राजे होतील
आणि योग्य राजा येईपर्यंत
त्याच्या कुळातील राजवेत्र जाणार नाही मग बहुतेक
जण त्याच्या आज्ञेत राहतील व त्याची सेवा करतील.
11 तो आपले गाढव अगदी चांगल्या द्राक्षवेलीस बांधून ठेवील;
तो उंची द्राक्षारसाने आपले कपडे धुईल;
12 द्राक्षमद्य घेतल्याने त्याचे डोळे त्या द्राक्षमद्यापेक्षा अधिक लालबुंद होतील;
त्याचे दात दूधपिण्यामुळे दूधापेक्षा अधिक सफेद होतील.
जबुलून
13 “जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल;
त्याचा समुद्र किनारा जहाजासाठी सुरक्षित बंदर असेल.
त्याच्या जमिनीची हद्द सिदोन नगरपर्यंत असेल.
इस्साखार
14 “इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल;
जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल.
15 आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे,
आपला देश आनंददायक आहे असे तो पाहिल.
आणि मग जड बोजा वाहून नेण्यास
व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार होईल.
दान
16 “दान इस्राएलाच्या इतर वंशाप्रामाणे
आपल्या लोकांचा न्याय करील.
17 तो रस्ताच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे,
वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल;
तो घोड्याच्या टाचेला दंश करील;
त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरुन खाली कोसळेल;
18 “हे परमेश्वरा, तुझ्या कडून उध्दार होण्याची मी वाट पाहात आहे.
गाद
19 “लुटारुंची टोळी गाद वर हल्ला करेल, [a]
परंतु तो त्यांना पळवून लावील.
आशेर
20 “आशेराची जमीन उत्तम अन्न भरपूर उपजवील;
राजाला योग्य असे चांगले अन्नपदार्थ त्याजकडे असतील.
नफताली
21 “नफताली मोकळ्या सुटलेल्या बागडणाऱ्या हरिणीप्रमाणे होईल;
त्याचे शब्द म्हणजे त्याचे बोलणे हरिणींच्या पाडसाप्रमाणे गोड व सुंदर असेल.
योसेफ
22 “योसेफ अतिशय यशस्वी झाला आहे;
तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे;
ती कुंपणावरही पसरते.
23 पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध झाले व त्याच्याशी लढले;
धनुर्धारी लोकांनी त्याचा द्धेष केला;
24 परंतु आपल्या वळकट धनुष्याच्या
आणि कुशल बाहुंच्या जोरावर त्याने युद्व जिंकिले.
त्याला याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ,
इस्राएलाचा खडक व तुमच्या बापाचा देव याजकडून तुम्हाला शक्ती मिळते.
25 सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून
व खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो
तसेच स्तनांचा व गर्भाचा
आशीर्वाद तो तुला देवो.
26 माझ्या आईबापाच्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडल्या व अनेक चांगल्या गोष्टी त्यांना मिळाल्या;
आणि मी तुझा बाप, मला त्यांच्यापेक्षा अधिक आशीर्वाद मिळाला;
तुझ्या भावांनी तुला काही ठेवले नाही.
परंतु माझे सर्व आशीर्वाद तुझ्यावर पर्वता एवढे होतील.
बन्यामीन
27 “बन्यामीन एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखा आहे.
तो सकाळी आपले भक्ष्य मारुन खाईल
व राहिलेले संध्याकाळी वाटून टाकील.”
28 हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत; आणि हया गोष्टी त्यांचा बाप त्यांच्याशी बोलला; त्याने प्रत्येक मुलाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला. 29 मग इस्राएलाने त्यांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “मी मरेन तेव्हा तुम्ही मला माझ्या लोकात नेऊन ठेवावे. एफ्राम हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे. 30 ती गुहा कनान देशात मम्रेच्या राईजवळील मकपेला येथील शेतात आहे. आपल्या घराण्याला कबरस्तान असावे म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रामकडून विकत घेतले. 31 अब्राहाम व त्याची बायको सारा, यांना त्या गुहेह पुरले आहे. इसहाक आणि त्याची बायको रिबेका यांनाही तेथेच पुरले आहे. आणि माझी बायको लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे. 32 ती गुहा हेथी लोकाकडून विकत घेतलेल्या शेतात आहे.” 33 आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर इस्राएल आपले पाय पलंगावर घेऊन झोपला व मरण पावला.
याकोबाची प्रेतक्रिया
50 इस्राएल मरण पावला तेव्हा योसेफ फार दु:खी झाला. तो आपल्या बापाला कवटाळून खूप रडला; त्याने बापाची चुंबने घेतली. 2 योसेफाने आपल्या सेवाकांतील वैद्यांना आपल्या बापाचे प्रेत मसाला लावून, व भरुन तयार ठेण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरुन, पुरण्यासाठी तयार केले. 3 अशा खास पद्धतीने प्रेत तयार केल्यानंतर ते पुरण्या पूर्वी मिसरचे लोक चाळीस दिवस थांबत असत. त्यांनतर मिसरच्या लोकांनी त्यांच्या रीतीप्रमाणे याकोबासाठी सत्तर दिवस शोक केला.
4 सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला. तेव्हा योसेफ फारोच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “फारोला हे सांगा, 5 ‘माझा बाप मरावयास टेकला असताना मी त्याला वचन दिले होते की मी त्याला कनान देशातील त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या गुहेत पुरेन. तेव्हा कृपया माझ्या बापास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत आल्यावर तुम्हाला भेटेन.’”
6 फारोने उत्तर दिले, “तू आपल्या बापाला दिलेले वचन पूर्ण कर; तू जाऊन आपल्या बापाने सांगितल्या प्रमाणे त्याला पुरुन ये.”
7 तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला; तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले; 8 आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. (फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते.) 9 तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणाही घोडयावर बसून मोठया संख्येने योसेफाबरोबर गेले.
10 ते यार्देन (जॉईन) नदीच्या पूर्वेस गोरेन आताद येथील खळ्यावर गेले. या ठिकाणी इस्राएलाचा प्रेतक्रिया विधी झाला. हा प्रेतक्रियेचा विधी सात दिवस चालला. 11 कनान देशात राहाणाऱ्या लोकांनी गोरेन आताद येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचे प्रेतक्रिया विधी व संस्कार फारच दु:खाने भरलेले आहेत.” त्यामुळे आता त्या जागेला अबेल मिस्राईम असे नाव पडले आहे.
12 अशाप्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या बापाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले; 13 त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. 14 आपल्या बापाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्या बरोबर गेलेला सर्वसमुदाय मिसरला माघारी गेला.
योसेफाच्या भावांना योसेफाची भीती वाटते
15 याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले. फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरुन आता सुद्धा आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले कदाचित “योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” 16 तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणे प्रमाणे निरोप पाठवला. “तुझ्या बापाने मरण्यापूर्वी आम्हाला अशी आज्ञा दिली 17 तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या बापाच्या देवाचे दास आहोत.”
योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दु:ख झाले व तो रडला. 18 योसेफाचे भाऊ त्यांजकडे गेले व ते त्याच्या पाया पडले, मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.”
19 मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका; मी देव नाही, म्हणजे शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही! 20 तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आजही देवाची तीच योजना आहे. 21 तेव्हा भिऊ नका; मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” योसेफ त्याच्या भावांशी ममतेने बोलला त्यामुळे त्याच्या भावांना बरे वाटले.
22 योसेफ आपल्या बापाच्या कुटुंबीयासह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला. 23 योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली; आणि त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने मारखीराची मुले ही पाहिली.
योसेफाचे मरण
24 योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हाला ह्या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”
25 मग योसेफाने आपल्या वंशजास वचन देण्यास सांगितले. तो म्हणाला, “देव जेव्हा तुम्हाला येथून काढून पुढे घालून त्या नवीन देशात घेऊन जाईल तेव्हा माझे शरीर तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाल असे मला वचन द्या.”
26 योसेफ एकशेदहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते शवपेटीत मिसरमध्ये ठेवले.
येशूच्या आणखी काही बोधकथा(A)
31 मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला. 32 मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते. इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात.”
33 मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले.”
34 लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला. 35 ते यासाठी की, संदेष्ट्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की,
“गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन,
जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन.” (B)
येशू बोधकथा समजावून सांगतो
36 मग येशू लोकांना सोडून घरात गेला. त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि म्हणाले, “शेतातील निदणाची बोधकथा आम्हांला नीट समजावून सांगा.”
37 येशूने उत्तर दिले, “शेतामध्ये चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. 38 आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलगे आहेत. 39 हे निदण पेरणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळाची समाप्ति आहे व कापणी करणारे देवदूत आहेत.
40 “म्हणून जसे निदण गोळा करून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शेवटी होईल. 41 मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील. 42 आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. 43 तेव्हा नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐका.
गुप्त ठेवी आणि मोती यांच्या बोधकथा
44 “स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.
45 “आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे, 46 एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्व काही विकतो आणि तो मोती विकत घेतो.
माशाच्या जाव्याविषयीची बोधकथा
47 “तसेच, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात. 48 ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले. 49 या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नितीमान लोकांतून वेगळे करतील. 50 वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
51 येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?”
तेव्हा ते म्हणाले, “होय.”
52 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक ज्याला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकविण्यात आले आहे तो घरमालकासारखा आहे. त्याच्याकडे अनेक जुन्या व नव्या गोष्टी घरातील तिजोरीत ठेवलेल्या आहेत.”
येशू आपल्या गावी जातो(C)
53 येशूने लोकांना बोध करण्याचे व गोष्टी सांगून शिकविण्याचे संपवल्यानंतर तो निघून गेला. 54 त्याने आपल्या गावी येऊन त्यांच्या सभास्थानामध्ये असे शिकविले की, ते चकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व ही सामर्थ्याची कृत्ये याला कशी आली? 55 हा त्या सुताराचा मुलगा ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? आणि याकोब व योसेफ आणि शिमोन व यहूदा याचे भाऊ आहेत ना? 56 याच्या सर्व बहिणी आपल्यात आहेत ना? मग याला या सर्व गोष्टी कशा आल्या असे ते त्याच्याविषयी गोंधळात पडले.” 57 त्यांनी त्याला मानण्याचे नाकारले. पण येशू त्यांना म्हणाला, “इतर लोक संदेष्ट्याचा सन्मान करतात. पण त्याच्या स्वतःच्या गावात किंवा घरात त्याचा सन्मान होत नाही.” 58 तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे जास्त चमत्कार केले नाहीत.
2006 by World Bible Translation Center