Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 25-26

अब्राहामाचे कुटुंब

25 अब्राहामाने पुन्हा लग्न केले, त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव कटूरा होते. कटुरेला जिब्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शुह ही मुले झाली; यक्षानास शबा व ददान ही दोन मुले होती; अश्शूरी व लऊमी लदूशी लोक हे ददानाचे वंशज होते; एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे मुलगे होते; ही सर्व मुले अब्राहामापासून कटूरेला झाली. 5-6 मरण्यापूर्वी अब्राहामाने आपल्या गुलाम स्त्रियांच्या मुलांसाठी काही देणग्या दिल्या; त्याने या मुलांना इसहाकापासून वेगळे करुन दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले; नंतर त्याने आपली सगळी मालमत्ता इसहाकाला दिली.

अब्राहाम एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला; त्याला दीर्घकाळ सुखी व समाधानी जीवन लाभले; मग तो अशक्त होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला; इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्याला सोहराचा मुलगा एप्रोन हित्ती याच्या मम्रेच्या पूर्वेकडे असलेल्या शेतातील मकपेला गुहेत सारेच्या जवळ पुरले; 10 अब्राहामाने हित्ती लोकांकडून विकत घेतलेली हीच ती गुहा. 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि त्यानंतर ही इसहाक बैर-लहाय-रोई येथेच राहू लागला.

12 अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची ही वंशावळ; 13 इश्माएलाच्या मुलांची नावे अशी. नबायाथ हा त्याचा पहिला मुलगा; नंतर केदार जन्मला, मग अदबील, मिबसाम, 14 मिश्मा, दुमा, मस्सा, 15 हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा; 16 अशी इश्माएलाच्या पुत्रांची नावे होती; प्रत्येक मुलाच्या परिवार गटाचा एक तळ होता; पुढे त्याचेच एक गांव बनले; हे बारा पुत्र आपापल्या लोकासहीत बारा वंशाचे संस्थापक सरदार झाले. 17 इश्माएल एकशें सदतीस वर्षे जगला नंतर तो मेला आणि आपल्या पूर्वजांमध्ये गोळा झाला; 18 त्याचे वंशज सर्व वाळवंट भागात तळ देत राहिले; हा भाग मिसर जवळील हवीलापासून शूरपर्यंत आहे आणि तो शूरपासून पार अश्शूरपर्यंत जातो. अश्शूर इश्माएलाचे वंशज अधूनमधून आपल्याच भाऊबंदावर हल्ला करीत असत.

इसहाकाचा वंश

19 इसहाकाची घराणी अशी, अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता. 20 तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अराम येथील अरामी बथुवेलाची कन्या व लाबान याची बहीण रिबका इजशी लग्न केले. 21 इसहाकाच्या बायकोला मूलबाळ होईना म्हणून इसहाकाने रिबकेसाठी परमेश्वराची प्रार्थना केली; परमेश्वराने इसहाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबका गर्भवती झाली.

22 ती गरोदर असताना तिच्या उदरातील दोन मुले एकमेकांशी झगडू लागली; तेव्हा परमेश्वराची प्रार्थना करुन ती म्हणाली, “परमेश्वरा, मला हे असे का होत आहे?” 23 परमेश्वर तिला म्हणाला,

“दोन राष्ट्राचे राज्यकर्ते
    तुझ्या उदरातून जन्म घेतील;
एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल;
    वडील मुलगा धाकट्याची सेवा करील.”

24 मग रिबकेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला जुळी मुले झाली; 25 पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता, त्याचे अंग जणूकाय केसाळ झग्यासारखे होते; म्हणून त्याचे नाव एसाव (म्हणजे केसाळ) असे ठेवले. 26 पाठोपाठ दुसरा मुलगा जन्मला तेव्हा त्याने एसावाची टाच हाताने घट्ट धरली होती; म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. रिबकेला ही जुळी मुले झाली तेव्हा इसाहक साठ वर्षांचा होता.

27 ही जुळी मुले वाढत जाऊन मोठी झाली तेव्हा एसाव तरबेज शिकारी झाला; शेताशेतातून व रानावनातून फिरण्याची त्याला आवड होती. पण याकोब शांत होता तो त्याच्या तंबूत राहिला. 28 एसाव इसहाकाचा आवडता होता; त्याने शिकार करुन आणलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इसहाकाला आवडत असे; परंतु याकोब रिबकेचा आवडता होता.

29 एके दिवशी एसाव शिकारीहून परत आला; तो फार थकलेला होता व भुकेने अगदी गळून गेला होता. याकोब मसुरीच्या लाल डाळीचे वरण शिजवीत होता. 30 तेव्हा एसाव याकोबाला म्हणला, “मी भुकेने व्याकूळ झालो आहे तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास घेऊ दे;” यावरुन लोक त्याला अदोम (म्हणजे तांबडा) म्हणत.

31 परंतु याकोब म्हणाला, “त्याबद्दल तू मला आजच तुझा ज्येष्ठपणाचा हक्क दिला पाहिजेस.”

32 एसाव म्हणाला, “भुकेने माझा प्राण चालला आहे, मी जर मेलो तर माझ्या बापाची मालमत्ता मला काय उपयोगाची? तेव्हा मी माझ्या ज्येष्टपणाचा हक्क तुला देतो.”

33 परंतु याकोब म्हणाला, “तर प्रथम, तू तुझा ज्येष्ठपणाचा वारसा हक्क मला देशील अशी शपथ माझ्याशी वाहा.” तेव्हा एसावाने तशी शपथ वाहिली; अशा रीतीने एसावाने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या सगळ्या मालमत्तेचा व ज्येष्टपणाचा आपला वारसा हक्क आपला धाकटा भाऊ याकोब याला मोबदला म्हणून दिला. 34 मग याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.

इसहाक अबीमलेखाशी खोटे बोलतो

26 पूर्वी अब्राहामाच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्टकाळ आताही पडला; तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरात गेला. परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात जाऊ नकोस; तर मी सांगितलेल्या देशातच राहा; तू तेथे राहा आणि मी तेथे तुझ्याबरोबर असेन; मी तुला आशीर्वादित करीन; ही सर्व भूमी मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन; तुझा बाप अब्राहाम याला मी जे जे देण्याचे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन. मी तुमची संतनी आकाशातील ताऱ्यांइतकी करीन आणि हे सर्व देश मी तुमच्या वंशजांस देईन; तुमच्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मी आशीर्वादीत करीन; कारण तुझा बाप अब्राहाम याने माझ्या आज्ञा, नियम व कायदे पाळले आणि मी सांगितलेल्या गोष्टी केल्या.”

म्हणून मग इसहाक गरार नगरातच वस्ती करुन राहिला. इसहाकाची बायको रिबका अतिशय देखणी होती. तेथील लोकांनी रिबके विषयी इसहाकाला विचारले तेव्हा, “ती माझी बहीण आहे,” असे त्याने उत्तर दिले; “ती माझी बायको आहे.” असे सांगण्याची इसहाकाला भीती वाटली कारण रिबका मिळविण्यासाठी कोणीही त्याचा घात केला असता.

बराच काळ तेथे राहिल्यावर एकदा खिडकीतून बाहेर पाहताना इसहाक रिबकेशी प्रेमाचे खेळ खेळण्यात रंगल्याचे अबीमलेखाला दिसले. तेव्हा त्याने इसहाकाला बोलावून विचारले, “ही स्त्री तुझी बायको आहे ना? मग ती तुझी बहीण आहे असे तू आम्हाला का सांगितलेस?”

इसहाक म्हणाला, “मला अशी भीती वाटली की तिला मिळविण्याकरिता तुम्ही कोणीही मला मारुन टाकाल.”

10 अबीमलेख म्हणाला, “तू आम्हाशी असे वागून ही वाईट गोष्ट केलीस; कारण आमच्या लोकातून कोणीही तुझ्या बायको बरोबर निजला असता आणि त्यामुळे त्याच्या माथी मोठे पाप लागून तो अपराधी ठरला असता.”

11 म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांना हुकूम देऊन बजावून ठेवले; तो म्हणाला, “या माणसाला किंवा याच्या बायकोला कोणीही हात लावू नये आणी जर कोणी तसे करील तर त्याला जिवे मारण्यात येईल.”

इसहाक श्रीमंत होतो

12 इसहाकाने त्या देशात धान्य पेरले; आणि त्या वर्षी त्याला भरमसाट पीक आले. परमेश्वराने त्याला भरपूर आशीर्वाद दिला. 13 इसहाकाने भरपूर संपत्ती मिळवली आणि तो खूप श्रीमंत झाला; 14 त्याच्याकडे शेरड्यामेंढ्यांचे कळप व गुराढोरांची खिल्लारे पुष्कळ होती; त्यावरुन पलिष्टी लोक त्याचा हेवा करु लागले; 15 म्हणून त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांचाकरानी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्टी लोकांनी मातीने बुजवून सपाट केल्या; 16 तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “आता तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.”

17 म्हणून इसहाकाने तो देश सोडला व गराराच्या एका लहान नदीजवळ त्याने तळ दिला आणि तेथेच त्याने वस्ती केली. 18 याच्या बरेच वर्षे आधी अब्राहामाने आपल्या हयातीत बऱ्याच विहिरी खणल्या होत्या; परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या; त्यामुळे इसहाकाने मागे जाऊन त्या परत खणून घेतल्या त्या विहिरींना त्याच्या वडीलांनी दिलेली नावच पुन्हा त्याने दिली. 19 त्याच्या नोकरांनी एक विहीर नदीजवळ खणली; तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जीवंत पाण्याचा झरा लगला; 20 परंतु गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी हुज्जत घातली; ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” त्या लोकांनी आपल्याशी त्या जागी भांडण केले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव “एसेक” ठेवले.

21 मग इसहाकाच्या नोकरांनी दुसरी विहीर खणली; तेथील लोकही तिच्यावरुन भांडले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव “सितना” ठेवले.

22 इसहाक तेथुन पुढे गेला आणि त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा मात्र कोणीही भांडण करावयास आले नाही म्हणून इसहाकाने तिचे नाव “रहोबोथ” ठेवले. इसहाक म्हणाला, “आता मात्र परमेश्वराने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे; आता या देशात आमची भरभराट होईल; आणि आम्हाला यश मिळेल.” 23 तेथून इसहाक बैर-शेबा येथे गेला; 24 त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “इसहाका, तुझा बाप अब्राहाम याचा देव मी आहे; तर भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्याकरिता तुला आशीर्वादित करीन.” आणि तुझा वंश खूप वाढवीन. 25 तेव्हा इसहाकाने परमेश्वरा करिता तेथे एक वेदी बांधली व परमेश्वराची उपासना व उपकार स्तुती केली; व त्याने तेथे आपला तळ दिला; तेथेच त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली.

26 त्यानंतर एके दिवशी अबीमलेख राजा आपला सल्लागार अहुज्जाथ व आपला सेनापती पीकोल यांना बरोबर घेऊन गरार येथून इसहाकाला भेटावयास आला.

27 इसहाकाने विचारले, “तुम्ही या अगोदर माझ्याशी मित्रासारखे वागला नाही, एवढेच नव्हे तर माझ्यावर जोर करुन तुम्ही मला तुमचा देश सोडणे भाग पाडले; मग आता माझ्याकडे का आलात?”

28 त्यांनी उत्तर दिले, “परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे आम्हाला आता पूर्णपणे समजले आहे; आम्हाला असे वाटते की आपण आता आपल्यामध्ये एक करार करावा; तू आम्हाला वचन द्यावे अशी आमची इच्छा आहे; 29 आम्ही तुला त्रास दिला नाही त्याच प्रमाणे आता तुही आम्हाला त्रास देणार नाही असा तू आमच्याशी करार करावा; आम्ही तुला घालवून दिले हे खरे आहे, परंतु तुला आम्ही शांतीने जाऊ दिले; परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे.”

30 तेव्हा इसहाकाने त्यांना मेजवानी दिली; त्यांनी आनंदाने भरपूर खाणे पिणे केले, 31 दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्रत्येकाने वचन दिले आणि शपथ वाहिली; नंतर ते लोक शांतीने आपल्या घरी गेले.

32 त्याच दिवशी इसहाकाच्या नोकरांनी येऊन त्यांनी खणलेल्या विहीरी विषयी त्याला सांगितले. ते म्हणाले, “त्या विहिरीत आम्हांस मुबलत पाणी लागले आहे;” 33 तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नांव “शेबा” ठेवले; आणि त्या नगराला अजूनही “बैर शेबा” म्हटले जाते.

एसावाच्या बायका

34 एसाव चालीस वर्षांचा झाल्यावर त्याने दोन हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नांव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नांव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी; 35 हेथी बायकांमुळे इसहाक व रिबका दु:खाने अस्वस्थ झाले.

मत्तय 8:1-17

येशू एका आजरी माणसाला बरे करतो(A)

येशू डोंगरावरून खाली आला. पुष्कळ लोक त्याच्यामागे चालत होते. तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया पडून म्हणाला, “प्रभु, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात.”

मग येशूने आपला हात पुढे करुन त्याला स्पर्श केला व म्हटले, “तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे,” आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला. “हे जे घडले ते कुणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास ह्याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. ह्यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल.”

येशू सेनाधिकाऱ्याच्या नोकराला बरे करतो(B)

येशू कफर्णहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला आणि विनंती करू लागला की, “प्रभु, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडून आहे.”

येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”

तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, “प्रभु, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमूक कर असे सांगतो आणि तो ते करतो.”

10 येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागुन चालत होते. त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. 11 मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ जण पूर्वेकडून आणी पश्चिमेकडून येतील आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात मेजासभोवती मेजवानीसाठी बसतील. 12 परंतु जे खरे वारस आहेत. ते बाहेरच्या अंधरात टाकले जातील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”

13 मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल.” आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला.

येशू अनेकांना बरे करतो(C)

14 मग येशू पेत्राच्या घरी आला. तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे, असे येशूने पहिले. 15 त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली.

16 त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले येशूने शब्द बोलून ती भुते घालविली व सर्व प्रकारच्या रोग्यांना बरे केले 17 यशया संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने असे म्हटले होते:

“त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या,
    त्याने आमचे रोग वाहिले.” (D)

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center