Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 13-15

अब्राम कनान देशाकडे माघारे येतो

13 अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला व तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला. त्या काळी अब्राम फार श्रीमंत झाला होता; त्याच्याजवळ पुष्कळ गुरेढोरे, शेरेडेमेंढरे, गाढवे व उंट तसेच सोने चांदी इत्यादी भरपूर होते.

अब्राम इकडेतिकडे सतत प्रवास करीत राहिला; त्याने नेगेब सोडले व तो पुन्हा मागे बेथेलला गेला; बेथेल व आय यांच्या दरम्यान याच ठिकाणी त्याने त्याच्या कुटुंबासह तळ दिला होता व परमेश्वराची उपासना करण्याकरिता त्याने एक वेदी बांधली होती, म्हणून त्याच ठिकाणी अब्रामाने परमेश्वराची उपासना केली.

अब्राम व लोट वेगळे होतात

या काळात लोट अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. लोट याजकडे खूप, गुरेढोरे व तंबू होते अब्राम व लोट यांची गुरेढोरे इतकी वाढली की त्या दोघांना एकत्र राहाण्यास ती जागा व तो प्रदेश पुरेना, शिवाय अब्राम व लोट यांच्या गुराख्यांची एकसारखी भांडणे होऊ लागली; त्याकाळी त्या देशात कनानी व परिज्जी लोकांची वस्ती होती.

तेव्हा अब्राम लोटास म्हणाला, “तुझ्या माझ्यामध्ये तसेच तुझे व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडणतंटा नसावा, कारण आपण सगळे भाऊबंद आहोत. तेव्हा आपण वेगळे व्हावे हे आपल्यासाठी बरे आहे तुला पाहिजे तो प्रदेश तू निवड; तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”

10 लोटाने यार्देन दरीकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्याला दिसले (परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश केला त्याच्या आधीची ही घटना आहे. त्यावेळी थेट सोअरापर्यंत पसरलेले यार्देन नदीचे खोरे परमेश्वराच्या बागे सारखे सुंदर होते मिसर मधील प्रदेशाप्रमाणे ही भूमी चांगली होती.) 11 तेव्हा लोटाने यार्देन नदीच्या खोऱ्यात राहाणे निवडले; मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरवात केली; 12 अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या तळवटीतील शहरातून राहिला; लोट दक्षिणेकडे दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तबू ठोकला. 13 सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट व वाईट असल्याचे परमेश्वराला माहित होते.

14 लोट निघून गेल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुझ्या अवतीभोवती, उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दूरवर नजर टाकून पाहा; 15 तू पाहातोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन. 16 मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणाइतकी करीन, ती इतकी करीन की जर कोणाला ते कण मोजता येतील तर तुझ्या संततीचीही गणना होईल. 17 तर उठून जा व या तुझ्या प्रदेशातून फिरुन ये; हा सर्व प्रदेश मी आता तुला देत आहे.”

18 तेव्हा अब्रामाने आपले तंबू हलविले व हेब्रोन शहरजवळील मम्रेच्या मोठया वृक्षांत तो राहावयास गेला; परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.

लोट याला कैद केले जाते

14 शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचाराजा कदार्लागोमर आणि गोयीमाचा राजा तिदाल, यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्यांशी युद्ध केले.

या सर्व राजांनी आपले सैन्य सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमविले. (हे खोरे म्हणजे आताचा क्षार समुद्र) या सर्व राजांनी बारा वर्षे कदार्ला गोमर राजाची सेवा केली, पंरतु तेरव्या वर्षी ते त्याच्या विरुद्ध उठले. 5-6 तेव्हा चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे लढाई करण्यास चालून आले आणि त्यांनी अष्टरोथ कर्णईम येथे रेफाई लोकांचा, हाम येथे लूजी लोकांचा, शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा पराभव केला आणि त्यांना एलपारान (हे वाळवंटा जवळ आहे) जवळ असलेल्या रानापर्यंत पिटाळून लावले. त्यानंतर कदार्लागोमर राजा उत्तरेकडे वळाला व एन मिशपात म्हणजे कादेश येथे जाऊन त्याने अमालेकी लोकांचा पराभव केला; तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.

त्यावेळी सदोमाचा राजा, गमोराचा, राजा, अदमाचा सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी आपले सैन्य एकत्र केले व आपल्या शत्रूशी लढण्याकरिता ते सिद्दीम खोऱ्याकडे गेले. एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयीमाया राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एलामाचा राजा अर्योक यांच्या विरुद्ध ते लढले; असे चार राजे पांच राजांविरुद्द लढले.

10 सिद्दीम खोऱ्यात डांबराने भरलेल्या अनेक खाणी होत्या. सदोम व गमोराचे राजे सैन्यासह पळून जाताना बरेच सैनिक खाणीत पडले परंतु बाकीचे डोंगराकडे पळून गेले.

11 तेव्हा त्यांच्या शत्रुंनी सदोम व गमोरा येथील लोकांची सर्व मालमत्ता, अन्न व वस्त्र सामुग्री लुटून नेली त्यांनी त्यांच्या सर्व वस्तू ही नेल्या. 12 अब्रामाचा पुतण्या लोट सदोमात राहात होता. त्याला शत्रूनीं पकडले व त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेसह त्याला कैद करुन ते घेऊन गेले. 13 या लढाईत पकडला न गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला व त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल व आनेर ह्यांनी एकमेकांना व अब्रामाला मदत करण्याचा करार केला.

अब्राम लोटाची सुटका करतो

14 लोटाला कैद करुन नेल्याचे वर्तमान अब्रामाला समजले, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या सर्वांना एकत्र बोलावले व त्यांच्यातून लढाईच्या कामात कसलेले असे तीनशे अठरा तरबेज लढवैय्ये घेऊन त्याने थेट दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. 15 त्या रात्री त्याने आपल्या सैनिक दासांसह शत्रूसैन्यावर अचानक हल्ला चढवला; त्यांनी शत्रू सैन्याचा पराभव केला व दिमिष्काच्या म्हणजे दमास्कसच्या उत्तरेस असलेल्या होबा पर्यंत त्यांचा पाठलाग केला. 16 तेव्हा शत्रुने लुटलेली सगळी मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट याची मालमत्ता, स्त्रिया आणि दास अब्रामाने परत आणले.

17 मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम आपल्या घरी गेला; तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटावयास गेला. (त्या खोऱ्याला आता राजाचे खोरे असे म्हणतात.)

मलकीसदेक

18 आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. 19 मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,

“अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता
    परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
20 त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली
    त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”

तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. 21 मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त कैद करुन नेलेले माझे लोक द्या आणि त्यांची मालमत्ता तुम्ही तुमच्यासाठी ठेवा.”

22 परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की, 23 मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही. 24 माझ्या या तरुण माणसांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढ्याचाच मी स्वीकार करतो; परंतु इतर लोकांना लढाईतून मिळालेल्यापैकी त्यांचा वाटा घेऊ दे, आणि त्यातून काही आनेर, अष्कोल व मम्रे यांस दे, कारण त्यांनी लढाईत मला खूप मदत केली.”

देवाचा अब्रामाशी करार

15 या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”

परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वर देवा, असे काहीही प्रतिफळ नाही की जेणे कडून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही; म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्वकाही दिमिष्कातील माझा गुलाम, अलिएजर यालाच मिळेल.” अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”

परमेश्वर अब्रामाशी बोलला, तो म्हणाला, “तुझे सर्वकाही त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही; तर तुला मुलगा होईल [a] आणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”

मग देवाने अब्रामाला रात्रीचे आकाश दाखविण्यासाठी बाहेर नेले. देव म्हणाला, “ह्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, तुला मोजता येणार नाहीत इतके ते आहेत; येथून पुढच्या काळात तुझी संततीही त्या ताऱ्यांइतकी अगणित होईल.”

अब्रामाने देवावर विश्वास ठेवला देवाने त्याची प्रामाणिकांता गणना केली प्रमाणिक जीवन जगण्यास योग्य असा त्याचा विश्वास होता. देव अब्रामाला म्हणाला, “हा देश तुला वतन करुन देण्याकरिता खास्द्यांच्या ऊर नगरातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”

परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वरा, माझ्या स्वामी, हा देश कायमचा वतन करुन मला मिळेल, याची खात्री मला कशी यावी?”

देव अब्रामाला म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”

10 अब्रामाने तीं सर्व देवाकडे आणली अब्रामाने त्यांना चिरुन त्या प्रत्येकाचे दोन दोन अर्धे तुकडे केले; व ते समोरा समोर ठेवले; पक्षी मात्र त्याने दोन अर्धे चिरले नाहीत; 11 मग कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता हिंस्र पक्ष्यांनी उडून त्यावर झडप घातली; परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.

12 नंतर त्या दिवशी सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली म्हणून तो झोपला; तो झोपेत असताना अती भयंकर अंधार त्याच्यावर पडला; 13 मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज परक्या देशात राहतील ते तेथे परके असतील, ते तेथे गुलाम होतील आणि 400 वर्षे त्यांचा छळ होईल, त्यांच्यावर जुलूम केला जाईल; 14 परंतु चारशे वर्षानंतर ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राला मी शिक्षा करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.

15 “तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने मरण पावशील आणि तुझे पूर्वज जेथे पुरलेले आहेत तेथे तुला मूठमाती देतील. 16 मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. त्यावेळी ते येथे राहाणाऱ्या अमोरी लोकांचा पराभव करतील, अमोरी लोकांना शिक्षा करण्यासाठी मी तुझ्या लोकांचा उपयोग करीन. (हे काही काळानंतर घडेल कारण अमोरी लोकांचा दुष्टपणा अद्याप शिगेला पोहोंचला नाहीं.)”

17 सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या धडांच्या दोन दोन अर्ध्या तुकड्यांमधून धुराचा लोट आणि अग्नी निघून गेला.

18 म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो; 19 केनी, कनिजी, कदमोनी, 20 हित्ती, परिजी, रफाईम, 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा प्रदेश मी तुम्हाला देतो.”

मत्तय 5:1-26

येशू लोकांना शिकवितो(A)

येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला, मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. आणि त्याने त्यांना शिकविण्यास सरुवात केली. तो म्हणाला,

“जे आत्म्याने दीन ते धन्य,
    कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
जे शोक करतात ते धन्य,
    कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.
जे नम्र ते धन्य,
    कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.
ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य,
    कारण ते तृप्त होतील.
जे दयाळू ते धन्य,
    कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
जे अंतः करणाचे शुद्ध ते धन्य
    कारण ते देवाला पाहतील.
जे शांति करणारे ते धन्य,
    कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
10 नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य,
    कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

11 “जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. 12 आनंद करा आणि उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.

तुम्ही मिठासारखे तसेच प्रकाशासारखे आहात(B)

13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.

14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. 15 आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16 तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

येशू आणि जुन्या करारातील संदर्भ

17 “मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. 18 मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशात्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही.

19 “म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल. 20 कारण मी तुम्हांस सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.

रागासंबंधी येशूची शिकवण

21 “तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’ [a] 22 पण मी तुम्हांस सांगतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.

23 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले, 24 तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.

25 “वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तुरुंगात टाकील. 26 मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center